पोटभर पौष्टिक आहार ‘livmore.in’

1

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे...साहजिकच याचा परिणाम म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळेची अनियमितता...त्यामुळे जास्तीत जास्त लोक फास्ट फूडला पसंती देतात आणि पोषक आहाराचा विचारही करत नाहीत. वडा पाव, समोसा, सँडविच, चायनिज असे पदार्थ खाऊन अनेकदा आपल्याला भूक भागवावी लागते. साहजिकच याचा परिणाम आरोग्यावर होतो...मग लठ्ठपणा आणि त्याला जोडून अनेक समस्या भेडसावतात. हे सगळं लक्षात घेऊनच अश्विनी भदौरिया यांनी २०१३ मध्ये लिव्हमोर डॉट इनची सुरुवात केली. यामधून पोषक आहार पुरवण्याविषयी विशेष काळजी घेतली जाते.


स्टार्टअपच्या जगात आपण पाऊल ठेवू असा विचारही अश्विनी भदौरिया यांनी कधी केला नव्हता. टीसीएसमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी गुडगावच्या एमडीआयमध्ये एमबीए केलं. त्यानंतर त्यांनी पॅरीसमध्ये जाऊन मास्टर्स इन युरोपियन बिझनेस या विषयाचा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. युरोपात दोन वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरीत जास्त स्वातंत्र्य नसल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी स्टार्टअपचा विचार केला. पण युरोपपेक्षा भारतात या क्षेत्रात अधिक संधी असल्यानं त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. परतल्यानंतर त्यांनी एका एनजीओमध्ये काम केलं. त्यानंतर एका मित्राच्या स्टार्टअपमध्ये कामाला सुरूवात केली, पण त्यात यश येत नसल्याचं पाहून त्यांनी स्वत:च काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि २०१३ मध्ये लिव्हमोर डॉट इनची सुरूवात झाली.


भारतात परतल्यानंतर अश्विनी यांच्या एक गोष्ट लक्षात आली की युरोपात लोक संतुलित आणि पौष्टिक आहार घेतात. पण भारतात तिखट आणि मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले जातात आणि लोक पौष्टिक आहार घेत नाहीत. त्याचबरोबर जेवणात चरबीयुक्त आणि जास्त कॅलरीज असलेले पदार्थ असतात. त्यातच त्यांच्या २८ वर्षांच्या एका मित्राला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे याच क्षेत्रात काहीतरी करण्याचा विचार अश्विनी यांनी केला. लोक पिझ्झा, कोक, पाकीटबंद ज्यूस असे पदार्थ घेतात पण ते आरोग्यदायक नसल्याचे त्यांना सांगणारं कुणी नसतं, असं अश्विनी म्हणतात. त्यातच लोकांच्या जीवनशैलीतील बदलामुळे त्यांचं पौष्टिक आहाराकडे लक्ष नसतं. त्यामुळे व्यायामासोबत पौष्टिक अन्न घ्यावं हा संदेश देण्यासाठी त्यांनी २०१३ मध्ये गुडगावच्या एका जिमजवळ लिव्हमोर डॉट इनची सुरूवात केली. हळूहळू त्यांच्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि आता गुडगाव तसंच दक्षिण दिल्लीत लिव्हमोर डॉट इनची सात आउटलेट आहेत.


कंपनीची दुसरे सह संस्थापक अंकीत हे आधी लिव्हमोर डॉट इनचे ग्राहक होते. हीरो कंपनीत काम करत असताना ते नियमितपणे लिव्हमोर डॉट इनमधून जेवणाची ऑर्डर द्यायचे. चार वर्ष नोकरी केल्यानंतर उद्योजक होण्याच्या निर्धाराने त्यांनी लिव्हमोर डॉट इनमध्ये सह संस्थापक म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर मग लिव्हमोर डॉट इनने घरपोच सेवा सुरू केली. त्यातून गुडगावमधील विविध कार्यालयांमध्ये ऑर्डर घेऊन जेवण पोहोचवण्याचं काम ते करु लागले. त्याशिवाय अंकीत हे कंपनीच्या नियोजन आणि विपणनाचं काम पाहतात. सध्या त्यांच्याकडे भारतीय आणि कॉन्टिनेन्टल पदार्थ तयार केले जातात. लिव्हमोर डॉट इनतर्फे ग्राहकांना विविध पॅकेज दिले जातात. यात दिवसभराच्या जेवणासह जिमचं सदस्यत्वही दिलं जातं. याशिवाय लोकांनी काय आणि किती जेवण करावं याचा सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडे आहारतज्ज्ञांची टीम आहे. सध्या २० जिम कंपनीच्या ते भागीदार आहेत.


आरोग्य चांगलं रहावं यासाठी लोकांनी आठवड्यातून फक्त दोनचवेळा आरोग्याला पोषक नसलेलं अन्न सेवन करावं याकरीता जनजागृती करण्याचं काम करत असल्याचं अंकीत सांगतात. लिव्हमोर डॉट इन आपल्या पदार्थांसाठी रिफाइन्ड केलेल्या तेलाचा वापर करत नाही तसंच गोड पदार्थांसाठी कमीतकमी साखरेचा वापर करतात. पुरूषांसाठीच्या संपूर्ण दिवसाच्या आहारात सोळाशे ते सतराशे कॅलरीज असतात तर महिलांसाठीच्या आहारात त्यापेक्षाही कमी कॅलरीज असतात. लिव्हमोर डॉट इनचं काम सकाळी साडे सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालतं. यात ते चारवेळचा आहार देतात आणि त्यातही तीन ते चार पर्याय असतात. आहारासाठी रोज विविध पदार्थ केले जातात. भारतीय नाश्त्यासाठी ४० रुपये तर कॉन्टिनेन्टल नाश्त्यासाठी ८० रुपये द्यावे लागतात.


लिव्हमोर डॉट इनचा व्यवसाय तीन महिन्यात शंभर टक्क्यांनी वाढल्याचा संस्थापकांचा दावा आहे. भविष्यात दिल्लीच्या इतर भागातही विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. वेबसाईटशिवाय फोन आणि व्हॉट्सपवरुनही ऑर्डर स्वीकारल्या जातात. ऍप तयार करण्याचंही काम सध्या सुरू आहे. फूडपांडा आणि तर वेबसाईटच्या माध्यमातूनही ऑर्डर स्वीकारल्या जातात. त्यांची १८ जणांची टीम असून यातील दोन शेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेले आहेत. आता आणखी गुंतवणूक मिळवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलंय.


लिव्हमोरची वेबसाईट www.livmore.in


लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : सचिन जोशी