वेगळ्या वाटेने चला, स्वत:चा आत्मविश्वास असू द्या, इतरांचे कौतुक करा, यशस्वी व्हाल : श्रध्दा शर्मा मुख्य संपादिका युअर स्टोरी.

1

गर्दीत चालणे सोपे आहे, गर्दीत बसणेही सोपे आहे. परंतू गर्दीपासून बाजूला जाऊन आपण जेंव्हा वेगळे होतो, काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतो, वेगळ्या वाटेने जाऊ लागतो तेंव्हाच कळते, जगणे वाटते तितके सोपे नसते. हे उघड आहे गर्दीचा कोणताही चेहरा नसतो. कोणतीही ओळख नसते. त्यामुळे त्यात हरवून जाण्याची भिती सदैव असते. बहुतांश लोक असे असतात जे गर्दीत राहूनच जगणे पसंत करतात. काहीतरी काम करतात. परंतू काहीजण असेही असतात जे वेगळ्या वाटेने जाऊन आपल्या वाटा निर्माण करतात, आणि जीवन नव्याने जगतात. जे वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतात, ते अर्थातच स्वत:वर प्रेम करत असतात. स्वत:ची कदर करत असतात.

हे प्रतिपादन आहे युअर स्टोरीच्या संस्थापक आणि मुख्य संपादिका श्रध्दा शर्मा यांचे! त्यांनी आपल्या उत्साहजनक वक्तव्याने ‘टेकस्पार्क-६’ मध्ये उपस्थित टेक स्टार्टप्स आणि आंत्रप्रेन्योर्स यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.


युअर स्टोरीच्या संस्थापक आणि मुख्य संपादिका श्रध्दा शर्मा ‘टेकस्पार्क-६’ मध्ये मार्गदर्शन करताना
युअर स्टोरीच्या संस्थापक आणि मुख्य संपादिका श्रध्दा शर्मा ‘टेकस्पार्क-६’ मध्ये मार्गदर्शन करताना

स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर प्रेम करा

श्रध्दा यांचे मत आहे की, जीवनात सर्वात महत्वाचा आहे स्वत:चा आत्मविश्वास आणि त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे इतरांचे महत्व जाणणे. श्रध्दा शर्मा यांनी आपले अनुभव सांगताना म्हटले की, जेंव्हा पाच वर्षांपूर्वी मी बंगळूरूला आले तेंव्हा एका समारंभात काही मान्यवर लोकांशी ओळख झाली. त्यांना जेंव्हा मी युअर स्टोरीबाबत सांगितले तेंव्हा त्यांनी विचारले- ते सारे ठिक आहे पण आपण दिवसभर काय करता? मी उत्तर दिले दिवसभर मी युअर स्टोरी करते. लोकांनी पुन्हा विचारणा केली-रात्री काय करता? मी पुन्हा उत्तर दिले रात्री देखील मी युअर स्टोरी करते. त्या लोकांच्या लक्षात आले की, माझ्याकडे कोणतीही व्यापारी परिकल्पना नाही. त्यांना असे वाटले की, यांच्याशी बोलत बसणे म्हणजे स्वत:चा वेळ वाया घालवणे आहे. परंतू त्यामुळे माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. मला असे वाटते की, जे काम आपण करतो आहोत त्याचा सन्मान सर्वात आधी आपणच ठेवला पाहिजे. सांगायचा मुद्दा हा आहे की, जर तुमचे आपले काम असेल तर सातत्याने केले पाहिजे. दिवस असो की रात्र. यासाठी आवश्यक आहे की, स्वत:वर प्रेम करायला शिकले पाहिजे. आपल्या कामाला अमर्याद वेळ द्या. आपणच आपल्या कामावर प्रेम करू लागलो तर लोकही त्याचा सन्मान करू लागतात.

दुस-यांच्या कामांचे कौतुक करा, तुमच्याबाबत ते जाणू लागतील.

स्टार्टअप्स आणि आंत्रप्रेन्योर्स यांचा उत्साह वाढविताना श्रध्दा शर्मा म्हणाल्या की, हे आवश्यक आहे की तुम्ही लोकांना स्वत:चा परिचय द्यायला हवा. त्या म्हणाल्या की, मी ट्वीटर खाते २०१० मध्ये सुरू केले. खरेतर माझी इच्छा होती की, जर मोठे लोक माझ्यासाठीदेखील ट्वीट करतील. जर नामवंत लोक युअर स्टोरीबाबत ट्वीट करतील. पण कसे? मी तर सर्व सामान्यच आहे. जिच्या बाबत लोकांचे मत होते की, माझ्याकडे कोणतीही व्यापारी परिकल्पना नाही. मी फक्त कथा लिहिते. अश्यातच सन २०१३-१४ मध्ये मी एक काम सुरू केले. मी लोकांच्या ट्वीटला रि-ट्वीट करण्यास सुरूवात केली, आणि लिहिण्यास सुरूवात केली की आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहात? आपल्या कल्पना वेगळ्या आहेत, आपण असामान्य आहात. मी सातत्याने लिहित गेले. पाहता-पाहता चमत्कार झाला. लोकांना माझ्याबाबतीत माहिती झाली. यासाठी आवश्यक हे आहे की, तुम्ही इतरांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला लागा. एक वेळ अशी येईल की ते देखील तुमच्यातील चांगल्याची दखल घेतील. विश्वास ठेवा, आज मी युअर स्टोरीच्या उच्चपदावर आहे ते काही कुणाच्या वशिल्याने नाही स्वत:च्या भरवश्यावर उभी आहे.

आनंदी रहा, नक्की फायदाच होणार

श्रध्दा शर्मा यांचे मत आहे की, तुम्ही आनंदी आहात, दररोज दिवसाची सुरूवात आनंदाने करता, स्वत:ला कमजोर नाही परिपक्व समजता तर नक्कीच आनंदी राहाल. तुम्ही स्वत:च ठरवले पाहिजे की रोज खूश राहिले पाहिजे, आणि हा विचार केला पाहिजे की इतरांना कसे खूश ठेवता येईल? इतरांच्या गुणांचे कसे कौतुक करता येईल? विश्वास ठेवा आपण नेहमीच आनंदी व्हाल. विजयाचा सर्वात मोठा मंत्र आहे तो आनंदी असणे! आज युअर स्टोरीला गुंतवणूकदार मिळाले तर लोक म्हणतात की, अरे वा! काय काम आहे?! छान कल्पना आहे! मी विचारू इच्छिते की, सात वर्षांपासून आम्ही काय करतो आहोत? हेच करत होतो जे आज करतो आहोत. बस लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. त्यांना हे लक्षात येऊ लागले आहे की हे काम मोठे आहे. इतरांचे कौतूक करणे हे देखील खूप मोठे कार्य आहे. त्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे आनंदी राहणे.

जे तुम्हाला वाईट समजतात त्यांच्याशी अधिक प्रेमाने वागा.

श्रध्दा शर्मा म्हणाल्या, अशी माणसे जी तुम्हाला चांगले मानत नाहीत, तुमच्या कामाला महत्व देत नाहीत, त्यांच्याशी सर्वाधिक प्रेमाने वागा. जे तुम्हाला म्हणतील की, अमूक काम तर तुझ्याकडून होऊच शकत नाही. त्यांना उत्साहाने लगेच भेटा. प्रेमाने भेटा. मनापासून भेटा. मी एक गोष्ट सांगू इच्छिते, सात वर्षापूर्वी मी मुंबईत याबाबत घोषणा केली की, मी युअर स्टोरी सुरू करत आहे, त्यावेळी एका मोठ्या आणि प्रसिध्द व्यक्तीने मला म्हटले की, खरंच! मी हमखास सांगतो; एका आठवडाभरापेक्षा जास्तकाळ हे चालू शकणार नाही. त्यादिवशी मी घरी जाऊन खूप अश्रू ढाळले. त्यानंतर मी माझ्या वडीलांना फोन केला आणि याबाबत सांगितले. तर त्यांनी तर खूपच मोठी गोष्ट सांगितली- ‘एका श्रध्दा शर्मा, मी म्हणालो होतो लग्न कर. आता तू रस्त्यावर उभी आहेस, तर अभिमानाने ताठ मानेने उभी राहा. रस्त्यावर उभी आहेस तर त्याप्रमाणे वागायला शिक. घरातल्यासारखी नाही. हे रडणे-पडणे सोड, हिंमतीने उभी रहा आणि समोरच्याना उत्तरे द्यायला शिक’. सात वर्षांनी माझी त्या व्यक्तीशी पुन्हा गाठभेट झाली, त्यांनी सांगितले, ‘श्रध्दा मला तुझ्यातील एक गोष्ट खूपच भावली आहे, मला तुझा उत्साह वाढवायचा होता म्हणूनच तर मी तसे म्हणालो होतो. बघ त्या गोष्टीचा परिणाम हा आहे की तू आज या ठिकाणी पोहोचली आहेस’. मला हसू आले आणि मी त्यांचे आभार मानले.

कार्य ही तपस्य़ा आहे.

श्रध्दा मानतात की, स्वत:ला उभे करणे, चांगले काम करणे खरोखर एक तपश्चर्या आहे. सोपे नाही. सातत्याने लढावे लागते. सतत अडचणींचा सामना करावा लागतो. क्षणोक्षणी स्वत:ला मजबूत करावे लागते. ही गोष्ट खरीच आहे. अडचणीच्या वेळी लोक तुमचा त्रास नाही समजू शकणार पण जेंव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेंव्हा नक्कीच कौतुक करतील. पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही सतत काम करत असाल, आनंदाने लोकांत मिसळत असाल तर खाली राहाल. हे देखील सत्य आहे की, ज्या माणसाने उद्दीष्ट गाठले आहे त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष उभा आहे. प्रत्यक्षात होते असे की, लोकांचे लक्ष त्याच्या संघर्षाकडे कमी जाते आणि यशावर जास्त. पण जे यश मिळते त्यामागे खूप मोठा संघर्ष श्वास घेत असतो. तो श्वास जीवंत ठेवण्याची गरज आहे. तेंव्हाच तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करता येतात. म्हणतात ना की , जो जागृत आहे तोच जिवंत आहे, तो संघर्ष करेल आणि यशस्वीच होईल.