कँसर क्लिन बोल्ड! कनिका जिंकली!! मृत्यू ओशाळला, जीवनाचे ‘जेट सेट गो’

कँसर  क्लिन बोल्ड! कनिका जिंकली!!
मृत्यू ओशाळला, जीवनाचे ‘जेट सेट गो’

Friday October 09, 2015,

7 min Read

डॉक्टर – ‘‘तुमच्याकडे वेळ फार कमी आहे.’’


डॉक्टरच असे म्हणताहेत म्हटल्यावर २२ वर्षांची एक मुलगी थोडी विचारात पडते आणि मग एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर डॉक्टरांना उद्देशून म्हणते, ‘‘खरंच डॉक्टरसाहेब… (आणि हसू लागते) मी ४० वर्षांनंतर तुम्हाला भेटायला पुन्हा येईन, पण तपासून घ्यायला वा इलाजासाठी नाही… तर हे सांगायला येईन, की बघा मी चांगली जिवंत आहे. धडधाकड आहे आणि एकदम आनंदात जगते आहे.’’


मुलीचे उत्तर ऐकून डॉक्टर चक्रावलेले होते.


मुलीने त्याच वेळी ठरवलेले होते, की आपण एखाद्या अशा डॉक्टरला आता दाखवायचे ज्याचा दृष्टीकोनही सकारात्मक असेल आणि जो स्वत:च्या गुणवत्तेबाबत आत्मविश्वासाने भरलेला-भारलेला असेल. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाच्या आत्मविश्वासाची कदर करणारा असेल आणि त्या आत्मविश्वासात आपल्या आत्मविश्वासाची भर घालणारा असेल.

image


वरील वाक्ये कुठल्या कादंबरीतील उतारा नाहीत. एखाद्या काल्पनिक पात्राचे ते संवाद नाहीत. एका मुलीची ही खरीखुरी, घडलेली कहाणी आहे. मृत्यूला तिने अगदी जवळून पाहिले होते, पण ती भ्यायलेली नव्हती. मृत्यूशी चार हात करण्याची जिद्द स्वत:त तिने जन्माला घातलेली होती. आता तिच्याकडे मोजकेच श्वास शिल्लक आहेत, हे कळल्यानंतर निराश तर ती झालीच नाही. उलट जर हे सत्य असेल आणि मला स्वीकारायचेही असेल तर मी स्वीकारेनही, पण मृत्यूशी मी दोन हात करेन आणि त्याला मात दिल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ संकल्प तिने सोडला. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने कँसरला गुडघे टेकायला लावले. मृत्यूला तोंडघशी पाडणाऱ्या या मृत्यूंजय मुलीचे नाव आहे कनिका टेकरीवाल. एक जलतरणपटू, एक धावपटू आणि एक यशस्वी व्यावसायिक कनिका टेकरीवाल. उत्साह आणि जिद्दीच्या बळावर स्वत:च्या हस्तरेषा फाकवणाऱ्या टेकरीवाल ‘जेट-सेट-गो’ कंपनीचे संचालन यशस्वीपणे करताहेत.

धाडसाचे दुसरे नाव कनिका टेकरीवाल

डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या असाध्य आजारावर निराशाजनक उत्तरे द्यायला सुरवात केली, तेव्हा त्यांनी ठरवून टाकले, की त्या अशा डॉक्टरकडूनच इलाज करवून घेतील, जो त्यांच्याप्रमाणे भीती आणि आत्मविश्वासातल्या सीमारेषा ओळखतो. यातला फरक ओळखतो. त्या अशा डॉक्टरच्या शोधात होत्या, ज्याच्या सहाय्याने त्या कँसरसारख्या आजाराशी मुकाबला करू शकतील आणि आजाराला मात देऊ शकतील. अर्थात हे सोपे काम नव्हते. कनिका सांगतात, अशा डॉक्टरच्या शोधात मी उभा देश पालथा घातला. झाडून सर्व प्रसिद्ध विशेषज्ञांची भेट घेतली. कनिका म्हणतात जोवर तुम्हाला तुमच्या कामासाठी योग्य व्यक्ती भेटत नाही. शोध सुरूच ठेवा. तुमचा अशा व्यक्तीवर विश्वास बसायला हवा, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. आणखी दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीचाही तुमच्यावर विश्वास असायला हवा. खूप मेहनत घेतल्यावर, खूप भटकल्यावर कनिका यांची ही शोधयात्रा अखेर किनाऱ्याला लागली. मनासारखा डॉक्टर त्यांना मिळाला. डॉक्टर आणि कनिका दोघांनी हा आजार एक आव्हान म्हणून स्वीकारला. एखादा संघ खेळात प्रतिस्पर्ध्यांशी लढतो, तशा संघभावनेने दोघे लढले. वर्षभर इलाज चालला. केमोथेरेपीच्या वेदनादायी प्रक्रियेतूनही कनिका यांना जावे लागले. या वर्षात जुन्या गोष्टींवर पाणी सोडत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी त्यांनी स्वत:ला तयारही केले. कँसरशी लढता-लढता त्या इतक्या मजबूत झालेल्या होत्या, की आता कुठलेही आव्हान स्वीकारण्याची आणि त्यावर मात करण्याची त्यांची तयारी होती.


कनिका म्हणतात, ‘‘तुमची सर्वांत मोठी भीती म्हणजे तुमचा मृत्यू. पण जेव्हा तुम्ही मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन त्याचा अनुभव घेतलेला असतो, तेव्हा मृत्यूचे भय संपलेले असते. मी तर मृत्यूच्या नुसतेच जवळ जाऊन आलेले नव्हते, मी तर मृत्यूला वाकुल्या दाखवून आलेले होते. भीती संपलेली होती आणि मी कँसरशी युद्धाला रणसज्ज होते. पहा. मी जिंकले… स्वत:वरला माझा भरवसा आता पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेला आहे.’’


मृत्यूसमवेत सरळ सामना करून जीवनाच्या तंबूत विजयी होऊन परतल्यानंतर कनिका यांनी नव्याने सुरवात करण्याची तयारी आता चालवली. आपली आवडनिवड आणि क्षमता पाहाता त्यांनी पुन्हा जेट-सेट-गोच्या श्रीगणेशाचा विडा उचलला. काम सुरू असताना अपयशाचा सामना जेव्हाही करावा लागे, तेव्हा नव्या प्रयत्नात यश कसे मिळेल, याच्या विचारात त्या स्वत:ला झोकून देत. हताश होण्यापेक्षा पुढच्यावेळी काम अधिक चांगले कसे होते, याकडे लक्ष पुरवत. दृष्टिकोन पूर्णत: सकारात्मक झालेला होता. कनिका म्हणतात, ‘‘सहा महिने वेळ दिल्यानंतरही ग्राहकाला फक्त दर मंजूर नाहीत किंवा मग त्याचा इरादा आता बदललाय म्हणून जर मी माझा प्लॅन विकू शकत नसेल, तर आता मी निराश का म्हणून व्हायचे. उलट मी पुन्हा आपल्या कामात दुप्पट उत्साहाने गर्क होते. नकार आलेल्या ग्राहकांमध्ये अडकून राहण्यापेक्षा मी नव्या ग्राहकांचा वेध घेते. माझा प्रयत्न असतो की माझ्या ग्राहकांना स्वस्त आणि मस्त प्लॅन उपलब्ध करून द्यावे. मला जगातल्या सर्वाधिक शंभर शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवायचे आहे, असे वचन मी दररोज रात्री निजण्यापूर्वी, स्वत:च स्वत:ला न चुकता देत असते.’’

हा आत्मविश्वास आणि हाच सकारात्मक दृष्टिकोन कनिका यांना आयुष्याच्या या वळणावर घेऊन आलाय. आज त्या केवळ एक यशस्वी व्यावसायिक नाहीत, तर कुशल मॅरॅथॉन धावपटू आहेत, चित्रकार आहेत, हौशी पर्यटक आहेत… आणखीही बरेच गुण त्यांच्यात दडलेले आहेत. दररोज त्या नवनवे काहीतरी करीत असतात.

image


‘जेट सेट गो’चा प्रवास

कनिका सांगतात, ‘‘मी जेव्हा १७ वर्षांचे होते, तेव्हापासूनच एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आलेले आहे. ६ वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव माझ्या गाठीला आहे.’’ कनिका यांनी व्यवसायाला सुरवात केली तेव्हा देशात प्रायव्हेट जेट विमाने नावालाच होती. अगदी बोटावर मोजण्याइतकी. कनिका यांनी भारतातच नव्हे तर विदेशातही काम केलेले होते. इंडस्ट्रीतील चढउतार त्यांच्या परिचयाचे झालेले होते. खूप जवळून त्यांनी हे सारे चढउतार पाहिलेले अनुभवलेले होते. जेट सेट गो ही या अनुभवांचीच परिणती. चार्टर्ड ब्रोकर्स किंवा ऑपरेटरशी डिलिंग करताना ग्राहकांना कुठल्या समस्या येतात, ते कनिका यांना अगदी जवळून माहिती होते. एखाद्या ग्राहकाला प्रायव्हेट जेटचा वापर करायचा असेल तर तो सामान्यत: ऑनलाइन वेबासाइट्सच्या माध्यमातून अगर ब्रोकर किंवा एअरक्रॉफ्ट ऑपरेटरशी संपर्क साधतो. हे ब्रोकर्स ग्राहकांना महागडे जेट वा हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून देतात, जेणेकरून त्यांना (ब्रोकर्सना) कमिशन जास्तीचे मिळावे. ग्राहकांना हे त्रासाचे होते, पण लोकांना या सगळ्या विषयाची एकतर माहिती अगदीच कमी होती. चार्टर प्लेन्सही तेवढे उपलब्ध नसत म्हणा. साहजिकच जास्त पेमेंट करणे ही एक अनिवार्यता झालेली होती. ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये चार्टर सर्व्हिस देऊ शकेल, अशा कंपनीची प्रतीक्षा होतीच. आवडीचे विमान मिळावे आणि भाड्यातही पारदर्शकता असावी, ही अपेक्षाही ग्राहकांना होतीच. लोकांची ही अपेक्षा पूर्ण करावी, असे कनिका यांनी ठरवले. भारतात अजूनही एव्हिएशनबाबत लोकांना फारशी माहिती नाही. म्हणून ग्राहकांच्या वाट्याला अशीच चार्टर्ड विमाने येतात, ज्यात दलालांची मनमानी चालते. मनमानी मोडीत काढावी, हा दुसरा फैसला कनिका यांनी केला.

‘जेट-सेट-गो’च्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या चुटकीसरशी संपवण्याचा ध्यास कनिका यांनी घेतला. ग्राहकांना स्वस्तात जेट विमाने पुरवण्यास सुरवात केली.

ऑनलाइन सुविधा

गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘जेट-सेट-गो’ सुरू झाले. खूप सारे बदल आणि खूप साऱ्या चढउतारांनंतर ही देशातील पहिली ऑनलाइन वेबसाइट अत्यंत यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. कनिका सांगतात, ‘‘माझ्या डोक्यात या वेबसाइटला उत्कृष्ट बनवण्यासाठी आणखी कितीतरी कल्पना होत्या. येत्या तीन वर्षांत चार्टर्ड विमाने आणि त्यासंदर्भातल्या सर्वप्रकारच्या स्टेटस्साठी संपूर्ण प्लॅन तयार होता. याचदरम्यान दुर्दैवाने त्यांचे दार पुन्हा वाजवले आणि याचदरम्यान कळले, की त्यांना कँसरसारखा असाध्य आजार जडलाय. कनिका आपल्या स्वप्नांना पंख फुटावेत म्हणून झोकून झटत असताना… ‘जेट-सेट-गो’ची लाँचिंग झालेली असताना आणि व्यवसाय वाढवण्याचा नवा मार्ग कनिका शोधत असताना हा कँसर असा आडवा आला. वर्षभर कनिका यांना कंपनी आणि वेबसाइटच्या कामांपासून लांबच राहावे लागले. पण वर्षभर अन्य कुणीही हे वा अशा स्वरूपाचे काम सुरूच केलेले नव्हते. नशिबाने अशाप्रकारे त्यांना साथ दिलेली होती. कँसरला आडवा केल्यानंतर पुन्हा त्या ‘जेट-सेट-गो’चा मार्ग सुकर करण्यात व्यग्र झाल्या. कंपनी बहरू लागली. व्यवसाय वाढत गेला.

जेट-सेट-गो एक असे ऑनलाइन माध्यम आहे, जिथे ग्राहकांना घरबसल्या देशभरातील चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टर्सशी संबंधित इत्थंभूत माहिती उपलब्ध होते. जेट-सेट-गोजवळ सध्या देशभरातील ८० टक्के प्रायव्हेट जेट विमानांबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. कनिका यांची ही कल्पना देशातल्या ग्राहकांनी डोक्यावर उचलली. जेट-सेट-गोच्या माध्यमातून प्रायव्हेट जेट बुक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस म्हणूनच वाढत चालली आहे. ब्रोकर्स, ऑपरेटर्सना मोठे कमिशन द्यावे लागत असलेल्या ग्राहकांना या सेवेचा विशेष फायदा झाला.

यशाचे उंच शीखर गाठल्यानंतर अनेकांच्याबाबतीत असे घडते की वेळ काळ होऊन येते आणि त्यांना आपल्या कवेत पचवून टाकते. कधीकाधी जो एक अमुक इतक्या उंच पोहोचला होता, त्याचे नामोनिशाण मिटलेले असते, पण कनिका टेकरीवाल त्याला अपवाद आहेत. कनिकासारख्या शक्तिस्थळांवर वेळ कधीही काळ होऊन बरसू शकत नाही. अशा ‘ब्रह्मपुत्रे’च्या प्रवाहात वेळही वाहून जाते आणि काळही वाहून जातो… अगदी पाचोळ्यासारखा…

मृत्यू आणि जिवनाच्या पाठशिवणीच्या खेळाला अगदी जवळून पाहिल्यानंतरही स्वत:साठी ज्या पद्धतीने कनिका टेकरीवाल यांनी मार्ग तयार केला, तो पाहाता त्या खरोखर प्रेरणादायी आहेत, हे कुणीही नाकारू शकणार नाही. कनिका या एक अशी प्रेरणा आहेत, ज्या कुठल्याही डगमगत असलेल्या आत्मविश्वासाला ताठ मानेने पुन्हा उभा करू शकतात. आशेला एक नवी ओळख देऊ शकतात.

कनिका तुम्हाला आणि तुमच्या दुर्दम्य धाडसाला सलाम… त्रिवार सलाम!!!