स्वस्त, सुबक आणि टिकाऊ बांबू तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी : 'वंडरग्रास’

स्वस्त, सुबक आणि टिकाऊ बांबू तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी : 'वंडरग्रास’

Friday December 18, 2015,

3 min Read

आज भारतातील लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढत आहे तिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीला पर्याय आतापासूनच शोधून ठेवला पाहिजे म्हणजे भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या अडचणी थोड्याफार प्रमाणात कमी होतील. यातील बरेच पर्याय आपण यापूर्वी अंमलात आणले आहेत पण काळाच्या ओघात आणि तांत्रिक सुविधांमुळे त्यांचा प्रयोग कालबाह्य झाला आहे. त्यातीलच एक बांबूचे घर. पूर्वी लोक आपली घरे बांबूपासून बनवीत असत पण त्याची जागा सिमेंट –विटांनी घेतली आहे. आज शहराबरोबरच गावाकडील चित्र सुद्धा बदलत आहे, तिथेपण आधुनिकीकरण फोफावत चालले आहे. सगळीकडे घर बांधण्यासाठी सिमेंट-विटांचा वापर होत आहे. पण वैभव काळे यांनी आपल्या नूतन कल्पनेने त्यांची कंपनी ‘वंडरग्रास’ तर्फे लोकांना बांबूच्या घरांसाठी प्रेरित करीत आहे.


image


भारतात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात होते. चीन नंतर पूर्ण विश्वात बांबूच्या शेतीसाठी भारताचा नंबर लागतो. बांबूच्या झाडांची शेती ही मुळीच त्रासदायक नसते. तसेच ते मजबूत असून त्यांची झटपट वाढ होते. बांबू हे ५० वर्षापर्यंत खराब होत नाही म्हणून त्यापासून बनवलेले घरपण मजबूत असते. ते आपल्याला सहज उपलब्ध पण होतात व जिथे आताच्या एका घराचा खर्च २ लाख होतो तिथे बांबूचे घर फक्त १.२५ लाखांत आणि अल्प वेळेत तयार होते.


image


भारत देश हा अतिशय वेगाने विकासाकडे वाटचाल करीत आहे. अशातच एका मोठ्या लोकसंख्येच्या देशात अनेक जण बेघर आहेत. गावात लोकांकडे थोडीफार जमीन आहे पण घर बांधायला पैसे नाहीत. त्याचबरोबर भारतातील वाढती लोकसंख्या हा एक चिंतेचा विषय आहे म्हणून घरांची निकड पूर्ण करणे सरकारला सुद्धा जरा कठीणच आहे. त्याचबरोबर वाढत्या मागणीमुळे इमारतींसाठी आवश्यक असलेल्या मालाच्या किंमती पण वाढतच आहेत म्हणून घर विकत घेणे हे लोकांसाठी मोठे प्रश्नचिन्ह्च आहे.

अशातच ‘वंडरग्रास’ कंपनी ही लोकांसमोर एक पर्याय म्हणून उभी आहे की कशाप्रकारे लोक बांबूपासून सुरेख घर बनवू शकतात. वैभव काळे या कंपनीचे संस्थापक आहेत. घराच्या निर्मिती अगोदरच तयार कॉलम, पॅनेल, भिंती, छत आणतात जे जागेवर फक्त पक्के करायचे असतात, हे मजबूत तर असताच पण त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा वेळही कमी असतो. परिणामी घरबांधणीसाठी वेळ कमी लागतो, स्वस्त, सुबक आणि टिकाऊ असल्यामुळे लोकांची स्वप्नपूर्ती निश्चितच होऊ शकते.


image


वैभव यांनी ६ वर्षापूर्वी आपल्या कंपनीचा शुभारंभ केला. त्यांच्यासाठी त्यांचे वडील हे नेहमी प्रेरणास्त्रोत आहेत. वडिलांच्या संशोधनामुळेच ते आज ‘वंडरग्रास’ ची स्थापना करू शकले. त्यांच्या वडिलांचे नाव विनू काळे होते व व्यवसायाने ते वास्तुविशारद होते. बांबूवरच्या संशोधनामुळे लोक त्यांना बांबूमॅन म्हणत. वैभव यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बांबूपासून लोकांच्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी मदत करीत आहेत.

‘वंडरग्राम’ साठी बांबूचे उत्पादन नागपूर भागात होते. नागपूरमध्ये बांबूचे दाट जंगल आहे जिथे ‘वंडरग्रास’ ने आपले २५ कुशल कारागीर कामाला लावले आहेत. पुढील दोन वर्षात वैभव भुवनेश्वर, चेन्नई, आणि पुणे येथे शोरूम उघडू इच्छिता. तेथे ते ग्राहकांना बांबूपासून तयार केलेल्या अनेक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देऊन त्याची गुणवत्ता व उपयुक्ततेबद्दल मार्गदर्शन करू इच्छितात.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे