कोडिंग हे कल्पकतेने सोडवायचं कोडं आहे : ए. बी. पेरियासामी

कोडिंग हे कल्पकतेने सोडवायचं कोडं आहे : ए. बी. पेरियासामी

Thursday February 25, 2016,

7 min Read


आनंद बाबू (ए. बी.) पेरियासामी म्हणजे ‘आयटीती’ल बडी आसामी… क्रमवारीत जगभरातला दुसरा गतीमान सुपर कॉम्प्युटर यांनीच विकसित केलेला. ‘ग्लस्टर’चे ते सहसंस्थापक आणि सीटीओही! ‘पोस्टमन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक अभिनव अस्थाना यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये आनंद बाबूंनी उद्यमशिलता, ‘ग्लस्टर’ Gluster आणि ‘मिनिओ’ Minio च्या उभारणीबद्दलचे सगळे पट हळुवार उलगडत नेले…

‘‘मला काही सुपर कॉम्प्युटर वगैरे बनवायचा नव्हता. मला फक्त असं काम हवं होतं ज्यात मला फुकटचे सॉफ्टवेअर हॅक करता येतील. मोकळंही राहता येईल. मोकळं राहून पैसे मिळवून देणारं काम मिळवणं म्हणजे जरा अवघडच होतं. अखेर ते अर्धवेळ अशा स्वरूपाचं स्वीकारावं लागलं. माझ्यावर लोकांच्या बऱ्यापैकी उधाऱ्या थकलेल्या होत्या. आणि मी ‘सुपरकॉम्प्युटिंग’वर संशोधन करत असलेली ही कंपनी जॉइन केली. सीटीओ बनवला गेलो. माझ्या कामाचा भाग म्हणून मी विमुक्त व्यावसायिक हॅकर्स हायर करू लागलो. आता ह्यांना मला पैसे द्यावे लागणार हे उघड होते.’’ अभिनव यांच्याशी रंगलेल्या गप्पाष्टकाचा भोपळा फोडताना आनंद बाबू… (ज्यांना एबी म्हणूनही ओळखले जाते) असा जणू नगाडाच वाजवतात… निमित्त असते ‘नेक्सस व्हेंचर पार्टनर्स’समवेत ‘युवर स्टोरी’च्या ‘यू कॅन डू इट टू’ (तुम्हीसुद्धा हे करू शकतात) या प्रेरणादायक चौघड्याचे!

image


विनामूल्य सॉफ्टवेअर! खुले स्त्रोत नव्हे!

टीम आपल्या कामात काय दिवे लावते आहे, त्याकडे लक्ष देण्याची आता वेळ होती. परिणतीच्या पडताळणीसाठी ऊर्जा विभागाचे लोक एबी आणि त्यांच्या टीमकडे पोहोचलेच.

एबी सिंहावलोकन करतात… सांगतात, ‘‘मी काही इथे (कंपनीत) कायमचा नव्हतो. आम्हाला आम्ही उभारणी करत असलेला सुपर कॉम्प्युटर याची डोळा पाहण्याचेही अधिकार नव्हते. एका अर्थाने आम्ही उपरेच होतो. हा सुपर कॉम्प्युटर मी चित्रातूनच काय तो पाहिलेला होता. आम्ही त्याचे सुटे भाग बनवत होतो आणि पोहोचते करत होतो. तेच ॲसेम्ब्लिंग (जुळणी) वगैरे करत होते.’’

तरीही सुपर कॉम्प्युटरची उभारणी ते ‘ग्लस्टर’ची मुहूर्तमेढ, प्रतिष्ठापना अशी प्रत्येक पायरी एबींसाठी आव्हानवजा होतीच. २०११ मध्ये ‘रेड हॅट’ने १३६ दशलक्ष डॉलर मोजून ‘ग्लस्टर’ खरेदी केलेली होती… आणि आता… ‘ग्लस्टर’च्या अवघड अडचणी अगदी साधेसरळपणेच पण साळसूदपणे सोडवायला ‘मिनिओ’ भिडलेली होती. विनामूल्य सॉफ्टवेअरचा वापर करत, शक्य त्या सगळ्या वाटा आणि माध्यमे चोखाळत ‘मिनिओ’चे काम चाललेले होते.

वास्तविक पाहता विनामूल्य सॉफ्टवेअर आणि ओपन सोर्स (खुले स्त्रोत) दोन्ही बाबी फार वेगळ्या आहेत. ए. बी. सांगतात, ‘‘खुले स्त्रोत हे विनामूल्य सॉफ्टवेअरचे व्यावसायिकरण करण्यात नाणावलेले होते. आणि माझ्या दृष्टीने साहजिकच विनामूल्य सॉफ्टवेअर अधिक महत्त्वाचे होते. स्वातंत्र्य हे तसे खर्चिक असते, ते आम्ही गमावले तर पुन्हा मिळवायला खूप किंमत मोजावी लागते.’’

कल्पना आणि सॉफ्टेवेअर खुले असावेत, त्यांना कुंपण नकोच.

ए. बी. आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना सांगतात, की हॅकिंग म्हणजे संगणक सुरक्षेवर घाला घालणारा प्रकार असेच बऱ्याच जणांना वाटते. पण हॅकिंग हा नव्या काळातील एक जीवनमार्ग आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अगदी एखाद्या कलावंताचा असतो तसा तो एक दृष्टीकोन आहे. ए. बी. यांच्यासाठी सॉफ्टवेअर म्हणजे एखाद्या कल्पनेसारखीच गोष्ट आहे. कल्पना ही वाटून घेतली म्हणजे अधिक बहरते. कल्पना गुप्त ठेवली वा आपल्यापुरती ठेवली तर ती तशीच संकुचित राहते. कल्पना खुली केली म्हणजे मूळ कल्पनेत नव्या कल्पनांची भर पडत जाते आणि सुधारणा घडत जातात.

ए. बीं.च्या मते ज्ञानाची कवाडे खुली करणे, ही बाब नितिशास्त्रातील एखाद्या मानवहिताच्या नियमासारखीच आहे. त्यामुळेच बंदिस्त ज्ञान बंडखोरी करून खुले करावे लागले तरी ते नैतिकच आहे. रिचर्ड स्टॉलमॅन यांचा संदर्भ ए. बी. देतात. ए. बी. सांगतात, की एका मुलाखतीमध्ये एकाने जेव्हा रिचर्ड यांना सांगितले की खुले सॉफ्टवेअर हे ‘प्रॅक्टिकल’ (कृती करण्याजोगे) नाहीत. ठिक नाहीत. त्यावर रिचर्ड म्हणाले होते, ‘‘तुला असे म्हणायचेय का, की नैतिक जीवन कृती करण्याजोगे नसते?’’

तुम्ही खुल्या सॉफ्टवेअरबाबत वा हॅकिंगबाबत सकारात्मक असता त्याचे कारण असते, की तुम्ही एकुणात या नव्या ज्ञानाबद्दल कमालीचे आसक्त असता… आणि जेव्हा तुम्ही खुल्या सॉफ्टवेअरबाबत वा हॅकिंगबाबत नकारात्मक असता, तेव्हा हा प्रचलित संकेत आहे हे त्यामागचे कारण असते.

ए. बी. सांगतात, की त्यांना असे अनेक स्टार्टअप्स ठाऊक आहेत ज्यांनी आपण विकसित केलेल्या भागाला खुल्या स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केलेल्या काही भागाची जोड देऊन आपले प्रॉडक्ट हे विशुद्धपणे आपले आहे, अशा थाटात उभारलेय. ते म्हणतात, की अशाप्रकारे दिशाभूल करणारे ब्रँडच तुम्ही उभारू शकता. हे बरोबर नाही कारण तुमच्या हेतूविषयी सत्याच्या पातळीवर तुम्ही परखड असायलाच हवे, असे ए. बीं.चे म्हणणे असते. ते सांगतात, ‘‘व्यवसाय ही शेवटी ब्रँडच्या उभारणीशी निगडित गोष्ट आहे. ग्राहकाचे निखळ प्रेम मिळवण्यात ब्रँड यशस्वी व्हायला हवा असेल तर तुम्ही त्याची (ग्राहकाची) दिशाभूल करता कामा नये.’’

एकत्रित झपाटलेपण हवे

एका दर्जेदार मॉडेलसाठी कामाचा स्तर आणि त्यानुसार श्रेणीबद्धता क्रमप्राप्त असते. सध्याच्या काळात असे मॉडेल महागडे आणि ध्यानीमनीही नसणारे असेच. पैशाचा मोठा ओघ कार्यकारी चमू जमवण्यात जातो आणि ते लोक जे खऱ्या अर्थाने चमूचे खरे सदस्य असतात, त्यांना कमी मोबदला ठरवलेला असतो. ए. बी. म्हणतात, "व्यवसायाचे हे मॉडेल औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून वारशाने पुढे सरकत गेलेले आहे. ते ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री’साठी (कापड, साबण असे वस्तू स्वरूपातील उत्पादने निर्माण करणाऱ्या उद्योगांसाठी) होते व आहे, पण सॉफ्टवेअर हे उद्योगाचे एक अत्यंत वेगळे क्षेत्र आहे".

सॉफ्टवेअरमध्ये काय महत्त्वाचे तर तुमचे प्रॉडक्ट आणि लोक. ए. बी. म्हणतात, "… पैकी एक जर तुम्हाला एकाने कमी करायचे असेल तर तुम्ही लोकांतून कमी करा. लोकांची नुसती खानेसुमारी काय करायचीय. असे लोक मिळवणे वा अशा लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, की ज्यांची गती आणि मती शाबुत आहे. मजबूत आहे. काहीतरी घडायला जे निमित्त ठरू शकतात. माझ्यादृष्टीने असेच वाण महत्त्वाचे आहे. तुम्ही खुप साऱ्या चुका करू शकता, पण त्या लोकांसंदर्भात वा प्रॉडक्टसंदर्भात असू नयेत. कारण हेच घटक तुमची आस्थापना, तुमची कंपनी घडवू शकतात आणि बिघडवूही शकतात.’’

संकल्पना तिला म्हणतात, जी प्रत्येकाला काहीतरी संकल्प करायला खुणावते. स्टार्टअप हे लोकांचे व्यवस्थापन करणारे असावे, प्रॉडक्टचे नव्हे. भारतातील स्टार्टअपचे वाढते प्रमाण पाहता ही बाब सर्वाधिक महत्त्वाची आहे.

कंपनीच्या मजबुतीची कथा…

ए. बी. सांगतात, ‘‘काही कंपन्यांना ज्या गोष्टींच्या आधारावर इथे भारतात निधी उभारण्यात यश मिळवले, त्याच आधारावर त्यांना अमेरिकेत निधी उभारता येऊ शकला नसता. इथे मूल्यांकन जरा जास्तच उच्च आहे. मला या बाबतीत भारतातही आणि अमेरिकेतही काही सुधारणांना वाव दिसतो. पण एक व्यावसायिक म्हणून तिथे काही भव्यदिव्य करण्याची संधी कायम असते. मी जेव्हाही तिथे अमेरिकेत काही सुरू केले त्या-त्यावेळी तिथला आर्थिक आणि राजकीय माहोल काही फारसा चांगला नव्हता. मग ते ९/११ असो, हाउसिंग क्रॅश (गृहखरेदीतील तीव्र मंदी), मी अशाच कुठल्या तरी दुर्दैवी मुहूर्तावर ‘स्टार्टअप’ केलेले आहे.’’

प्रत्येकाला एक मजबूत कंपनी उभारायची असते. पण विपरित परिस्थितीतही तग धरू शकेल, किंबहुना अशा परिस्थितीवरही मात करू शकेल, असे प्रॉडक्ट योजणे, उभारणे अधिक हितावह असते.

एबी म्हणतात, ‘‘अमेरिकेतील ‘हाउसिंगबुडी’च्या संकटापाठोपाठच मी माझ्या उद्यममालिका वाढवत नेल्या.’’ गुंतवणूकदारांना असा भरवसा होता की हीच गोष्ट उद्यमासक्त लोकांना खळबळजनक प्रॉडक्टस्‌ उभारायला प्रेरित करणार. म्हणूनच त्यांनी त्यांच्या टिमवर आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सवर गुंतवणूक केली. 

एबी सांगतात, की योग्य गुंतवणूकदार मिळवणे हे खचितच महत्त्वाचे आहे. संस्थापक म्हणून तुम्ही जहाजाचे कप्तान असता. आणि गुंतवणूकदार हे तुम्हाला बाहेरून मदत करतात. प्रॉडक्ट आणि ब्रँडसाठी काय योग्य आणि काय अयोग्य, हे नेमकेपणाने समजून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणे फार महत्त्वाचे ठरते, असेही ते नमूद करतात.

एबी म्हणतात, ‘‘असे गुंतवणूकदार तुमच्याकडे असायला हवेत, जे तुम्ही संकटात असताना तुम्हाला सावरून घेतात. तुमच्या हातून चुका घडल्या तरी ते सांभाळून घेतात. मार्ग काढून तुम्हाला पुढे जाण्यासाठी आधाराचा हात देतात. अगदी कमी मूल्यांकनाच्यासाठी म्हणूनही तुम्ही करत असलेल्या कामात तुमच्या इतकाच ध्येयवेडा जर एखादा गुंतवणूकदार असेल तर त्याला बोर्डवर घ्या.’’

साधेपणा हाच प्रॉडक्ट बिल्डिंगचा राजमार्ग

एबी पुस्ती जोडतात, की त्यांना त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी म्हणून खूप बड्या लोकांची आवश्यकता नाही. ते म्हणतात, ते कुणाचा शोध घेत नाहीत, पण त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून ते बड्या मंडळींना मदत करतात. तुम्ही एक योग्य अशी कार्यसंस्कृती विकसित केली म्हणजे योग्य लोक तुमच्याकडे आकर्षिले जातात. आणि एका चांगल्या प्रॉडक्टमध्ये त्याची परिणती होते. एबी म्हणतात, ‘‘हे असे लोक असतात जे आपल्यासमवेत जोडणे तसे फार अवघड. कारण पैसा किंवा इतर भौतिक गोष्टी त्यांना कामासाठी प्रवृत्त करत नाही. ध्येयवेडेपण, एक झपाटलेपण यासाठी हे लोक आसुसलेले असतात. तेच त्यांना कामासाठी प्रेरणा देते. आणि म्हणूनच एक कार्यसंस्कृती सुनिश्‍चित करणे हे फार महत्त्वाचे आहे.’’

प्रोजेक्ट (प्रकल्प) आणि प्रॉडक्टमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. प्रोजेक्ट म्हणजे एका संकल्पनेचे आणि मध्यवर्ती संकल्पनेचे एक प्रात्यक्षिक असते. आणि प्रॉडक्ट हे काहीसे वेगळे असते, त्यात जीवनतत्व असते. प्रात्यक्षिक हे विशिष्टांना दाखवले जाते, पण प्रॉडक्ट हे प्रत्येकासाठी असते, असे एबींचे म्हणणे असते.

एबी आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण ठेवतात. ते म्हणतात, चॅट बेस्ड ॲप प्रत्येक जण बनवू शकतो. पण ते WhatsApp असत नाही. ते म्हणतात, ‘व्हाटस्‌ॲप’ ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वथा वेगळी आहे आणि आपली आईसुद्धा त्याला समजून घेऊ शकते आणि त्याचा वापर करू शकते. तुम्ही जर एखादा अत्यंत गुंतागुंतीचा असा सॉफ्टवेअरचा भाग सोप्या पद्धतीने स्पष्ट करू शकत नसाल तर तुम्हाला त्याच्याशी निगडित समस्या सोडवता येणारच नाहीत.

एबी म्हणतात, ‘‘कोड’ हे एका भल्यामोठ्या आकृतीतील एक घटक तेवढे आहेत. आकृती समजून घेणे आणि समाधान शोधणे यात तुमची क्षमताच खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरते. एक साधं गप्पांचं सॉफ्टवेअर कितीतरी उपयुक्त बाबींसाठी कौशल्यपूर्वक हाताळता येतं. आणि दुसरीकडे तुम्ही शंभर गोष्टी कराल तेव्हा स्विस सैन्यातला तो विशिष्ट चाकू तयार होतो आणि विशेष म्हणजे तो अन्य कुणी वापरणारही नाही. वा वापरू शकणार नाही". अर्थात एबींना जे सांगायचंय ते हे की, अव्वाच्या सव्वा प्रमाणात कंपोनंटस्‌ नकोत. त्यापेक्षा मोजके आणि उपयोगात पडतील, तेवढेच ते असावेत.

आणखी काही कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

एक लाखांवरुन १०० कोटी रुपये, इ-कॉमर्स स्टार्टअपच्या विकासाचा सातत्यपूर्ण आलेख

देशातले पहिले ‘करिश्मा कोच’ दानिश शेख अन् दान आनंदाचे!

शाळकरी राहुल बनले सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ


लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : चंद्रकांत यादव