ऑफिस शेअरींगचा अनोखा फंडा – माय क्युट ऑफिस

ऑफिस शेअरींगचा अनोखा फंडा – माय क्युट ऑफिस

Monday October 19, 2015,

2 min Read

मुंबईसारख्या शहरात जागेची कमतरता असते. जर जागा मिळाली तर ती खिशाला परवडणारीही हवी. ही परिस्थिती फक्त मुंबईतच आहे असं नव्हे. देशातल्या सर्व प्रमुख शहरांमध्येच याच समस्येला तोंड द्यावं लागतं. या शहरांमध्ये एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर पहिला विचार करावा लागतो तो जागेचाच. छोट्या मोठ्या व्यवसायासाठी जागा खरेदी करणं हे स्वप्नंच म्हणावं लागेल. भाड्यानं घ्यायची म्हटलं तर ती परवडायला हवी. म्हणूनच ऑफिस शेअरींग ही नवीन संकल्पना पुढे आलीय. मुंबईच्या अभिषेक बरारी, नीलय जैन आणि राहुल शेळके या तिघांनी एकत्र य़ेऊन माय क्युट ऑफिस ही वेबसाईट सुरु केली. ज्याच्या ऑफिसमध्ये अतिरिक्त जागा आहे, जो व्यवसायासाठी जागेच्या शोधार्थ आहे. अश्यांना एकत्र आणण्याचं काम हे माय क्युट ऑफिस करतं.


image


अभिषेक सीए आहे. त्यांच्या जोगेश्वरीतल्या ऑफिसमधली जागा नीलय जैन यांनी आपल्या वैयक्तिक व्यवसायासाठी भाड्यानं घेतली. यातूनच माय क्युट ऑफिसची संकल्पना पुढे आली. मुंबईसारख्या शहरात असे अनेक जण असतील ज्यांना आपलं ऑफिस शेअर करायचं असेल किंवा ज्यांना या ऑफिसमधली जागा भाड्यानं हवी असेल. अशा सर्वांना एकत्र आणता येऊ शकतं असा विश्वास अभिषेक बीरारी यांना होता. अभिषेक आणि नीलय यांच्या मदतीला आला राहुल शेळके. सुरुवात वेबसाईट सुरु करण्यापासून झाली आणि बघता बघता ही मुंबईतून सुरु झालेली ही वेबसाईट देशातल्या १७ शहरांमधल्या ऑफिस शेअरींगची धुरा सांभाळू लागली हे विशेष.


image


माय क्युट ऑफिस वेबसाईटशी जोडण्याचे दोन प्रकार आहेत. ज्यांच्याकडे जागा आहेत ते, किंवा मग ज्यांना जागा हवीय ते. अगदी एखादी क्युबीकल शेअरींगपासून काही संपूर्ण ऑफिस शेअरींगचा व्यवहार या वेबसाईटच्या माध्यमातून केला जातोय. आपलं ऑफिस काही महिन्यांसाठी शेअर करण्याची सोयही इथं देण्यात आली आहे. अगदी एक महिन्यांसाठी ही. प्रत्येकाला आपलं ऑफिस असावं असं वाटत असतं. पण ते अनेकांना परवडत नाही. अशावेळी काही महिन्यांसाठी किंवा काही दिवसांसाठी एखादं ऑफिस शेअऱ केल्यानं त्याचा व्यवसाय वाढत असेल तर ती गोष्ट अगदी चांगली आहे. माय क्युट ऑफिस हे नाव जोडण्यामागे या जागेकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टीकोन ही आहे असं अभिषेक बरारी सांगतो.

image


आतापर्यंत वर्षभरात माय क्युट ऑफिसनं जवळपास १७ शहरांमधून २४३३ वर्कस्टेशन्सचे व्यवहार केलेत ते दिवसेंदिवस वाढत जातायत. हवी असलेली जागा शोधून देण्यासाठी त्यांना कमिशन मिळतं. सध्या माय क्युट ऑफिसला कोणताही स्पर्धक नाही. पण अशाप्रकारची मागणी वाढत जात असताना लवकरच अनेकजण या व्यवसायात उतरण्याची शक्यता आहे. पण माय क्युट ऑफिसनं केलेली सुरुवात पाहता नव्यानं या व्यवसायात येणाऱ्यांना खुप तयारी करुन मैदानात उतरावं लागेल. यात शंका नाही.