'पुणे मेट्रोचे काम गतीने सुरु करून कालमर्यादेत पूर्ण होईल' पंतप्रधानांचे पुणेकरांना आश्वासन

'पुणे मेट्रोचे काम गतीने सुरु करून कालमर्यादेत पूर्ण होईल' पंतप्रधानांचे पुणेकरांना आश्वासन

Sunday December 25, 2016,

3 min Read

पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतानाच भविष्याचा विचार करून 25 वर्षाचे नियोजन केले पाहिजे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी म्हणून देशात ओळखले जाते. येथील वाढती लोकसंख्या पाहता मेट्रो कार्यान्वित होणे आवश्यक होते. आज पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होत असून मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरु करून कालमर्यादेत त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

image


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेती महाविद्यालयाजवळील मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘पुणे शहराची गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामुळे पुण्यात रोजगारासाठी देशभरातून लोक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसीत करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल आहे.

image


पुणे मेट्रो प्रकल्प विविध कारणांमुळे रेंगाळला गेला पण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पास मंजुरी देणे आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य झाले. मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करून पुण्याच्या विकासाला अधिक गती देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नागरीकरणाचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे. शहरावरील ताण कमी होण्यासाठी गावांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुर्बन अभियान राबवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात शहरातील सुविधा, संधी उपलब्ध होतील. त्याच बरोबर रोजगारांची संधीही वाढतील. यामुळे गावांकडून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी होईल. विकासाचा विचार करताना तात्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी विकासाचा विचार करायला हवा.’

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील केवळ शहरांचा विकास चाललेला नाही तर ग्रामीण भागांचाही विकास सुरु आहे. त्यासाठी देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. आता विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे विकासाची परिमाणेही बदलण्याची आवश्यकता आहे.

निश्चलीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धची ही लढाई आहे. यापुढेही याबाबत अधिक कठोर निर्णय घेतले जातील. या निर्णयामुळे त्रास जरूर झाला पण, भविष्यात त्रास होणार नाही. ज्यांनी अद्यापही काळे धन लपवून ठेवले आहे, त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

पुण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुण्यात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.