‘जुरासिक पार्क’ ते ‘हेल्थ पार्क’पर्यंत, आरोग्य-धारणांच्या ‘रूपा’तला बदल

‘जुरासिक पार्क’ ते ‘हेल्थ पार्क’पर्यंत,
आरोग्य-धारणांच्या ‘रूपा’तला बदल

Wednesday October 21, 2015,

6 min Read

डॉ. रूपा नाथ… स्त्रीशक्तीचे आधुनिक रूप… दार ठोठावणाऱ्या संधीला त्यांनी कधीही आल्या पावली परत जा म्हटले नाही. स्वप्नपूर्तीच्या दिशेने निघाल्यानंतर त्यासाठी तुडवावयाच्या वाटेवरील प्रत्येक परिवर्तनाचे स्वागत करताना कुठलीही कसर सोडली नाही. महत्त्वाचे म्हणजे स्वत:पेक्षा स्वत:च्या उद्दिष्टावर अधिक लक्ष दिले.

उद्दिष्टामध्ये अविरत कष्ट मिसळले.

मुळात साध्यासरळ असूनही प्रयत्नांमधील सातत्याच्या बळावर त्या यशस्वी होत आल्या. सतत कार्यमग्न राहणे या प्रकारात मोडणाऱ्या कार्यसंस्कृतीच्या त्या जणू मूर्तिमंत प्रतीकच!

पीएचडी केल्यानंतर जैवतंत्राचे (बायोटेक) पंढरपूर मानल्या जाणाऱ्या सॅनफ्रान्सिस्कोत काही वर्षे काम केले. पुरेसा अनुभव गाठीला आला तशी २००६ मध्ये ‘अॅक्टिस बायोलॉजिक्स इंक’ कंपनीच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. ‘अॅक्टिस बायोलॉजिक्स इंक’च्या त्या सहसंस्थापिका.

कँसर-उपचारातील ‘ॲअॅक्टिस’

‘अॅक्टिस बायोलॉजिक्स इंक’ कँसरवरील नवनवे उपचार तंत्र विकसनात कार्यरत आहे. कंपनीचे व्यवस्थापन भारतामध्ये सुस्थापित करणे, कंपन्यांकडून तसेच अमेरिकेतील विद्यापीठांकडून बौद्धिक संपदा परवाने प्राप्त करणे ही महत्त्वपूर्ण कार्ये डॉ. रूपा यांनी एकहाती पार पाडली. कंपनीसाठी भारतातही औषधे विकसित करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. भारतातील स्टार्टअपसाठी निधीसंकलनाचे श्रेयही त्यांनाच जाते. अनुदानासाठी अर्ज लिहिणे आणि पाठपुरावा करणे, असे त्यांनी सुरूच ठेवले. अखेर केंद्र शासनाकडून (भारत सरकार) १० कोटी रुपये प्राप्त झाले. कंपनीच्या संशोधन, विकास या प्रक्रियांमध्येही त्यांचा सहभाग होताच. मुंबईत ‘अॅक्टिस’साठीच्या संधी चाचपडण्यातही त्यांनी दाखवलेली दिशा उपयुक्त ठरली. आणि मुंबईत कंपनीच्या विकासाने वेग घेतला.

image


मुंबईनंतर सिंगापुरात कंपनी

डॉ. रूपा या सध्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मुंबई एंजल्स कंपनीत सक्रिय गुंतवणूकदार आहेत. प्रौद्योगिकी क्षेत्रातील कंपन्यांसह आरोग्य सेवा आणि अन्य व्यवसाय क्षेत्रांसाठी स्टार्टअपकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. डॉ. रूपा यांनी नुकतीच सिंगापूर येथे ‘विदेंदा लिमिटेड’ कंपनी सुरू केलेली आहे. भारत, अमेरिका आणि सिंगापूर येथील बाजारात आरोग्य, चिकित्सा सामुग्री आणि औषधी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासह या कंपन्यांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या भवितव्याची काळजी वाहणे, अशी या कंपनीची कार्यक्षेत्रे आहेत. संपूर्ण व्यवसाय सिंगापुरात स्थलांतरित करण्याच्या विचारात त्या आहेत. तूर्त भारतीय कंपन्यांना त्यांचे मार्गदर्शन आदी सहकार्य सुरूच आहे. स्थलांतरानंतरही ते सुरूच राहील.

आरोग्य सेवा गुंतवणुकीच्या विषयात डॉ. रूपा ‘मुंबई एंजल्स’च्या सल्लागारही आहेत. इथल्या सर्वच तांत्रिक पडताळणी प्रकल्पांच्या त्या प्रमुखही आहेत. मुंबई एजल्ससह त्यांनी जीवन विज्ञानच्या आशियन आणि कार्मिक आरोग्योपचार तंत्र संशोधन केंद्रांमध्येही गुंतवणूक केलेली आहे. भारतातील औषधं आणि आरोग्य क्षेत्रातील विशाल जाळ्याशी या केंद्रांचीही नाळ जुळलेली आहे. ‘कार्मिक जीवन विज्ञान’मध्येही डॉ. रूपा या सल्लागार आणि बोर्ड पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.

तुम्हीही जर आरोग्य आणि वेलफेअर क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक असाल तर डॉ. रूपा या तुमच्यासाठी खचितच महत्त्वपूर्ण आहेत.

रूपारेल कॉलेजची रूपा

डॉ. रूपा या मुंबईतील रूपारेल कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. अकरावी, बारावी त्यांनी इथेच केले. मेडिकल, इंजिनिअरिंगऐवजी त्या ‘जिनोमिक्स’ (जनुकीयशास्त्र) या विषयाकडे वळल्या. त्यांच्यातील या विषयाबद्दलच्या जिज्ञासेला आणि उत्सुकतेला ‘जुरासिक पार्क’ने जन्म घातला. चित्रपट नव्हे पुस्तक. पुस्तकावर चित्रपट निघण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. झाले… डीएनए आणि क्लोनिंग या संकल्पनांच्या चक्रव्युहात रूपा पुरत्या अडकल्या. दोन्ही संकल्पना त्यावेळी अगदी नव्याकोऱ्या होत्या. मुंबईतील सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये पुढे त्या शिकल्या. इथल्या जीवशास्त्र, आनुवंशिकी आणि जैव रसायन विभागातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी रूपा यांच्यातली या विषयाबद्दलची ओढ अधिकच वाढवली.

अमेरिकेतील अवघड पीएचडी

अमेरिकेत पीएचडी करणे हे त्यांचे स्वप्न होते. पीएचडीच्या अनुभवाबद्दल त्या सांगतात, ‘‘पीएचडीसाठी मी सलग सहा वर्षे दररोज सोळा-सोळा तास कष्ट उपसलेले आहेत. खरोखर या विषयात पीएचडी करणे फार अवघड आहे. बऱ्याचदा सोडून देण्याचा विचार येई, पण लवकरच मी सोडून देण्याचा हा विचारच सोडून दिला. अर्थात माझ्या यजमानांना त्याचे श्रेय जाते.

पीएचडीनंतर ठरवले असते तर अध्यापनाची दारे डॉ. रूपा यांच्यासाठी सहज खुली झाली असती, पण पीएचडीदरम्यानच त्यांना हा आपला पिंड नाही, असे जाणवले होते. उद्यमशिलता त्यांच्या ठायी होतीच. एका ‘जिनोमिक्स स्टार्टअप’मध्ये त्या सहभागी झाल्या. काम सुरू करण्याचाच अवकाश आणि कळले की आपण गर्भवती आहोत. पुढे काही वर्षे चिंतनात गेली. २००५ मध्ये ‘ॲअॅक्टिस बायोलॉजिक्स’च्या सीईओंशी भेटीचा योग जुळून आला. ॲअॅक्टिसला भारतातही कंपनी सुरू करायची आहे आणि तिथले काम तुम्ही पाहिलेले आम्हाला आवडेल, असे या सीईओंनी सांगितले आणि डॉ. रूपा यांचा प्रवास पूर्ववत सुरू झाला.

नागपुरातले ते वाचनपुराण

डॉ. रूपा महाराष्ट्रीय आहेत. नागपूरला त्यांचा जन्म झाला. शिक्षण मुंबईत. नागपुरात त्यांचे वरचेवर येणेजाणे असे. इथे त्यांच्या आजोबांचे एक ग्रंथालय आहे. १० हजारांहून अधिक पुस्तके त्यात आहेत. इथली बहुतांश पुस्तके त्यांनी वाचलेली आहेत. बालपणापासूनच वाचनाचा छंद त्यांना जडला. आजोबा, आजी आणि आई वडिलांना याचे श्रेय त्या देतात.

डॉ. रूपा म्हणतात, ‘‘या निरंतर आणि अवांतर वाचनादरम्यानच मला जिज्ञासेचा किडा बहुदा चावला असावा.’’

शिक्षणतज्ज्ञ, विषयतज्ज्ञ असताना एक उद्योजिका म्हणून नावारूपाला येणे रूपा यांना अजिबात कसेनुसे वाटत नाही. त्या म्हणतात, ‘‘शून्यापासून सुरू होणाऱ्या एका कंपनीच्या विकास प्रक्रियेचा तुम्ही घटक असता आणि त्या कंपनीचे शिखर गाठण्यात तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असते, ही भावनाच मुळात रोमांचक आहे. थरारक आहे. मी ‘वन वुमेन आर्मी’ होते, हे विशेष. मार्केटिंग, अकाउंट, संशोधन, मनुष्यबळ विकास अशा सर्व आघाड्यांवर मी एकटी लढलेले आहे.’’

पुढे डॉ. रूपा या ‘ॲअॅक्टिस’च्या भारतातील व्यवस्थापनाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्या. पती अमेरिकेत राहात होते, हे त्यामागचे कारण. सॅनफ्रान्सिस्कोला परतल्या. अर्थात नंतरही वेळोवेळी भारत दौरे सुरूच राहिले. संस्थापक म्हणून अजूनही त्या अॅक्टिस संलग्न आहेत. पण भागीदारीचे स्वरूप मात्र आता अंशकालिन असेच आहे.

image


पुढे पती संजय नाथ यांनी भारतात ‘ब्लुम व्हेंचर्स’ म्हणून व्हेंचर फंडची स्थापना केली. संजय यांच्यासमवेत डॉ. रूपाही २०१० मध्ये कायमच्या भारतात परतल्या.

तत्पूर्वी डॉ. रूपा यांनी भारतात जी कंपनी २००६ मध्ये सुरू केलेली होती, ती भारतीय डीसीजीआयच्या ( ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ) धोरणात्मक बाबींमुळे बंद करावी लागली. डॉ. रूपा आता पुन्हा शून्यावर येऊन थांबलेल्या होत्या. पुढे काय, हा प्रश्न त्यांच्या पुढ्यात होता. संजय हे मुंबई एंजल्समध्ये सक्रिय होते. मुंबई एंजल्सच्या बैठकांना तू येत चल म्हणून त्यांनी रूपा यांना सुचवले. ‘मी एक जैव आणि आरोग्य क्षेत्रातली व्यक्ती तांत्रिक गुंतवणूक समूहाच्या बैठकीत काय बोलणार अन् काय करणार’, असा प्रश्न डॉ. रूपा यांच्यासमोर उभा राहिला. पण पुढे मग, आता काहीच नाहीये तर चला या अनिश्चिततेलाच आलिंगन देऊ... बघू काय होते अन्‌ कसे जमते ते म्हणून डॉ. रूपा यांनी बैठकीत पाऊल टाकले. काळ सरकत गेला तसे मुंबई एंजल्सच्या आरोग्य व्यवहारांचे विश्लेषण सुरू केले. जमले. आरोग्यासंदर्भात भारतात उदयाला येत असलेल्या नव्या धारणा लक्षात आल्या. ‘योगास्मोगा’साठी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरली.

पती संजय पुरोगामी ‘नाथ’

पती संजय नाथ यांची कथाही कमी प्रेरणादायक नाही. त्यांनी एकविसाव्या वर्षी बिट्स पिलानीतून काढता पाय घेतला तशी आपली स्वत:ची पहिली कंपनी सुरू केली. डॉ. रूपा यांची पीएचडी होण्यापूर्वी सहा वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात होते. पुढे त्यांनी विवाह केला. संजय यांनी रूपा यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. डॉ. रूपा सांगतात, ‘‘बऱ्याच नवऱ्यांना बायको त्यांच्यापेक्षा अधिक शिकलेली नको असते. पण संजय हे याबाबतीत पुरोगामी. त्यांच्यामुळेच माझे पीएचडी होऊ शकले. माझा पक्का विश्वास आहे, की स्त्रीच्या यशामागे एक पुरुष असतोच. असा नवरा आणि असे सासर मला मिळाले, हे माझे भाग्यच.’’

एकूणच कॉर्पोरेट जगतातील महिलांचे स्थान अधोरेखित करताना त्या म्हणतात, ‘‘घर आणि ऑफिस असा ताळमेळ साधणे महिलांना अधिक चांगले जमते. विशेषत: भारतात काही महिलांना या क्षेत्रात असुरक्षित वाटते, त्याचे कारण आपल्या पितृसत्ताक जीवनपद्धतीत दडलेले आहे, असे मला वाटते. अजूनही आम्ही समतेची ती पातळी गाठू शकलेलो नाही, जिथून पुरुषांना महिला आपल्या बरोबरीच्या आहेत, हे दिसू अन् समजू शकेल. करिअरला केंद्रस्थानी मानणाऱ्या महिलांना भारतात अाजही साशंक नजरेने पाहिले जाते. हे मळभ दूर व्हायला मला वाटते आणखी कितीतरी पिढ्या जाव्या लागतील. महिलांनी एकमेकींवर विश्वास टाकायला हवा. पुरुष एकमेकांवर सहज विश्वास टाकतात, पण महिलांना ते जमत नाही, असे मला वाटते.’’

कमी वयात आजार चिंताजनक

देशातील आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या सचिंत आहेत. त्या म्हणतात, ‘‘आरोग्यविषयक नव्या धारणांना आणि धोरणांना प्रोत्साहन देण्याची इथं आवश्यकता आहे. कमी वयातच लोकांना आजार जडताहेत. जीवनशैली बदलते आहे. आरोग्याच्या बदललेल्या या स्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी साधनसामग्री नाही. पिण्याचे स्वच्छ पाणीही इथे अनेकांना मिळत नाही. ग्राहकोन्भिमुख उद्योगांच्या विरोधात मी नाही, पण इतर अनेक क्षेत्रेही अशी आहेत, जिथे उद्योजकांनी गुंतवणुकीच्या पातळीवर लक्ष पुरवायला हवे. माझी वैयक्तिक मालमत्ताही मी आरोग्य, कल्याण आणि ऊर्जा या क्षेत्रांतल्या कंपन्यांतून गुंतवलेली आहे. देशाच्या भावी पिढीला आपण आपल्यापेक्षा उत्तम आणि सुरक्षित भवितव्य उपलब्ध करून देऊ शकू, अशी मला आशा आहे. आणि याच हेतूने आरोग्याशी संबंधित नव्या धारणांच्या पाठीवर माझ्याकडून सदैव प्रोत्साहनाची थाप असते, याचा मला आनंद आहे.’’