गिर्यारोहण म्हणजे धमक आणि धैर्याची खरी परीक्षा – इशानी सावंत

0

लडाखमध्ये २२०५४ फुटांच्या उंचीवर असलेल्या 'स्टॉक कांगडी पीक' वर पाऊल ठेवणे कुण्याही गिर्यारोहकासाठी वा ट्रॅकरसाठी त्यांच्या जीवनातला सर्वात रोमांचक आणि आव्हानात्मक प्रवास असतो. आणि केवळ दोन दिवसांमध्ये हे दुर्गम शिखर सर करण्यासाठी एक वेगळेच झपाटलेपण आणि वेडाची गरज आहे. इशानी सावंत हिने तसे वास्तवात करून दाखवत आपण वेगळ्याच मातीचे बनलेलो आहोत हे सिद्ध केले. या व्यतिरिक्त या संपूर्ण प्रक्रियेत ती गिर्यारोहणाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम करण्यात यशस्वी सुद्धा झाली.

पुण्याची इशानी एक अडव्हेंचर अँड आऊटडोअर टूर प्रशिक्षक आणि गाईड म्हणून काम करत आहे. इशानीने पुणे लॉ कॉलेजातून कायद्याची पदवी संपादन केलेली आहे. सुरूवातीला इशानीने शनिवार-रविवारी प्रवासाला जाणे सुरू केले. सध्या ती वेगवेगळे आऊटडोअर उपक्रम आणि इव्हेंट्सच्या संदर्भात लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम करते.

केवळ १३ वर्षांच्या वयात हिमालय परिसरात प्रवास करताना इशानी या पर्वतांच्या प्रेमात पडली. हा प्रवास करत असताना हे पहाडी सौंदर्य आणि त्यांची भव्यता पाहून ती आवाक् झाली आणि आपल्या स्वत:च्या कॅमे-याने या भव्य अशा शक्तीशाली पर्वतरांगांचे फोटो काढण्यात ती गुंग होऊन गेली. पुढच्या काळात हे फोटोच तिचे मित्र बनले आणि वारंवार तिला या चमत्कारी पर्वतांची आठवण देत राहिले.

भारतात गिर्यारोहण अद्याप एका खेळाच्या स्वरूपात म्हणावे तितके लोकप्रिय होऊ शकलेले नाही. आणि या क्षेत्रात महिलांची भागीदारी तर जवळ जवळ नसल्यासारखीच आहे. तरीही गिर्यारोहणाला साहसी खेळाच्या रूपात स्वीकारणा-या काही निवडक महिलांमध्ये इशानीच्या नावाचा समावेश होतो. एका प्रशिक्षकाच्या रूपात लोकांना आऊटडोअर खेळांचे प्रशिक्षण देणे ही तिच्यासाठी एक नैसर्गिक गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तिच्यासाठी आपला चरितार्थ चालवण्याचे केवळ एक साधन न राहता तिला आऊटडोअर पर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम सिद्ध झाले आहे.

पर्वत नेहमीच अतिशय प्रेरणादायी असतात. गिर्यारोहण हे कुणाच्याही क्षमता आणि धाडसाचे एक खरेखुरे परिक्षण असते. इशानी सांगते की प्रत्येक चढाईबरोबर स्वत:ला पुढे पुढे ढकलावे लागते. जेव्हा आपला मार्ग पूर्ण करण्याची आपल्यात क्षमता उरत नाही त्यावेळी आपल्याला पूर्णपणे निसर्ग आणि तेथील पाणी तसेच वा-याच्या स्थितीच्या दयेवर अवलंबून रहावे लागते अशी ही स्थिती अनेकदा उद्भवते. ज्या मार्गांवरून आपण अगदी सहजपणे गेलेलो असतो, तेच मार्ग अतिशय कठीण बनत जातात. इशानी म्हणते की हे काम करत असताना आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त संकटांचा सामना जास्त करावा लागतो. आणि अशा परिस्थितीत सतत पुढे जात राहण्यासाठी स्वत:ला प्रेरित करणे अतिशय गरजेचे असते. जेव्हा आपण आपली एखादी चढाई किंवा मिशन पूर्ण करतो तेव्हा आपल्याला होणा-या आनंदाची आणि मिळणा-या शांतीची तुलनाच करता येत नाही असे इशानी सांगते.

ती पुढे सांगते, की गिर्यारोहण आपल्याला एकाग्रता आणि विनम्रता शिकवतो. एखाद्या अतिशय कठीण मार्गावर केलेली छोटी चूक देखील घातक तसेच प्राणघातकही सिद्ध होऊ शकते. जेव्हा तुम्ही चढाई करण्यासाठी जाल, तेव्हा तुमची पूर्ण तयारी झालेली असली पाहिजे आणि अशा वेळी आपल्याला जराही बेजबाबदार अथवा आळशी राहून चालत नाही. तुम्ही जागरूक आणि सतर्क तेव्हाच असू शकता, जेव्हा या पर्वतांकडे तुम्ही आदराच्या दृष्टीने पाहाल. इशानी म्हणते, “ या पर्वतावर बैठका, नियुक्त्या किंवा मग वेळेची मर्यादा अशा गोष्टींचा संबंध येत नाही. इथे केवळ दोनच गोष्टींना अर्थ आहे- एक म्हणजे तुम्ही आणि दुसरी हे सुंदर पर्वत.”

सुरूवातीच्या काळात गिर्यारोहणाच्या क्षेत्रात पाय घट्ट रोवणे हे इशानीसाठी अतिशय कठीण असे आव्हान होते . इशानी मुलगी असूनही गिर्योरोहण क्षेत्रात जाण्याचा विचार करते हे तिच्या कुटुंबियांना आवडले नाही. त्यांचे मन वळवण्यासाठी इशानीला काही काळ लागला असे इशानी सांगते. या व्यतिरिक्त तिला दरम्यानच्या काळात या क्षेत्रात काम करणा-या काही उर्मट पुरूषांसोबतही लढावे लागले.

इशानी सांगते, “ गिर्यारोहणाच्या क्षेत्रात असलेल्या महिलांची संख्य़ा तुम्ही हाताच्या बोटांवर मोजू शकाल इतकी कमी आहे. सुरुवातीला पुरूष गिर्योरोहक माझ्यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. आणि त्यांच्या याच दृष्टीकोनामुळे ब-याच महिला या क्षेत्रात यायला कचरतात. परंतु मला ज्या पुरूषांनी प्रशिक्षण दिले ते खूपच मदत करणारे होते आणि मी मुलगी आहे म्हणून मला कोणत्याही प्रकारच्या विशेष सवलती देण्यात आलेल्या नव्हत्या. जर पुरूषांनी ५० पुलअप्स काढल्या तर मला सुद्धा तेवढ्याच काढाव्या लागत.”

असे असतानाही इशानीने पुढे प्रगती करण्यात यश मिळवले. तिची बांधिलकी आणि तिच्या दृढ निश्चयाने लोकांची बोलती बंद केली आणि तिच्या प्रति असलेला लोकांचा दृष्टीकोनही तिने बदलून टाकला. १८ वर्षांची झाल्यानंतर इशानीने 'हिमालय माउंटेनियरिंग इंस्टीट्यूट'मध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथेच तिने आपल्या तांत्रिक कौशल्यांची पारख केली आणि ही कौशल्ये अधिक धारदार बनवून चांगल्या प्रकारे आत्मसात केली.

या व्यतिरिक्त इशानीने 'रॉक क्लायम्बिंग' आणि इतर साहसी खेळांमध्ये देखील व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. याच कारणामुळे ती इतरांपासून नेहमीच दोन पावले पुढे राहण्यात यशस्वी झाली. गेल्या काही वर्षांमध्ये तिने भारताच्या उत्तर भागांमध्ये अनेक मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. सह्याद्री पर्वतारांगावर देखील ती ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी अनेक स्थानिक चमूंना घेऊन गेली आहे.

या भव्य पर्वतांनी इशानीसाठी एक शिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. निसर्ग हा एका बाजुला अतिशय उदार दाता असतो, परंतु तो अगदी सहजपणे आपले रौद्र रूप दाखवू शकतो हे या पर्वतांनीच इशानीला शिकवले आहे. याच शिकवणीसबंधी एक धडा शिवानीला चांगल्या प्रकारे आठवतो. आणि तो म्हणजे २०१४ मध्ये उत्तराखंडात आलेला विनाशकारी पूर.

त्यावेळी इशानीने आपला प्रवास उत्तरकाशी इथून सुरू केला होता. त्यांचा चमू एक गिर्यारोहण मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी पूर्णपणे तयार होता. दुर्दैवाने सतत चार दिवस मुसळधार पाऊस पडत राहिला आणि हे गिर्यारोहक भयानक पूरात अडकले. हे गिर्यारोहक ख-य़ा अर्थाने मृत्यू आणि विनाशाच्या मार्गावरुनच चालत गेले. इशानी सांगते, “ त्यावेळी नाष्ट्यासाठी आमच्याकडे फक्त काळा चहाच होता आणि चपातीसोबत खाण्यासाठी उकडलेले बटाटे. त्यावेळी चारी बाजूंना पाणीच पाणी आणि विनाश पसरला होता .

या गिर्यारोहकांना स्वत:च आपल्यासाठी रस्ते तयार करून पर्वत चढावे लागत होते. कारण ते ज्या पर्वताचा गिर्यारोहणासाठी उपयोग करत होते तो पर्वत नष्ट झाला होता. त्यावेळी त्यांनी रस्त्यामध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेले गाव सुद्धा पाहिले. त्यांच्याकडे आपले डोके झाकण्यासाठी देखील काहीही नव्हते आणि रात्र घालवण्यासाठी स्थानिक शाळांची कुलुपे तोडून जिवंत राहण्याचा शक्य आहे तो तो प्रयत्न त्यांना करावा लागला होता. इशानीला ते क्षण लख्ख आठवतात. ती सांगते, “ अशा परिस्थितीत काय करावे हे त्यावेळी आम्हाला समजत नव्हते. आमचे बुटांचे तळवेच   नाही तर मन, शरीर देखील पूर्णपणे फाटले होते.”

इशानी सांगते, “ आम्ही 'द्रौपदी का डंडा' ( डिकेडी२) असलेल्या शिखराच्या अगदी जवळ असूनही तिथे पोहोचण्यात असफल ठरलो होतो.” त्यामुळे त्यांना शेवटी ‘सोमोरी लेक अडव्हेंचर’वर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

हा प्रवास मनाली ते लेह असा सोप्या मार्गाचा प्रवास नव्हता, तर तो लेह ते मनाली असा होता. इशानी सांगते, “ त्या मार्गाने जाणारा आमचा मित्र अर्चित याला आम्ही भेटलो आणि त्यांच्या चमूचा एक भाग झालो. आम्ही गरजेची सर्व साधने, तंबू, कपडे, खाद्यपदार्थ असे सामान घेतले आणि निघालो.” त्यावेळी त्यांना नाष्ट्यामध्ये फक्त एक चहा, दुपारच्या जेवणात दोन-दोन काजू, बदाम आणि अक्रोड मिळत होते, तर रात्रीच्या जेवणात पटकन शिजणारे नुडल्स किंवा पास्ता मिळायचा. इशानी सांगते, “ आमच्याकडे असलेले नकाशे तीन वर्षे जुने होते आणि पुरामुळे नद्यांनी आपले मार्ग बदलले होते. कितीतरी पर्वत आपल्या जागेवरून इकडे तिकडे सरकले होते. आत्ताही प्रत्येक आठवड्याला भूस्खलन होत होते. यामुळे आमचे मार्ग आम्हालाच शोधावे लागले. खरे म्हणजे हिमालयाच्या अलिकडेच तयार झालेल्या या नव्या रांगा आहेत आणि म्हणून इथे अशा प्रकारच्या घटना केव्हाही घडू शकतात. आम्हाला आमचे मार्ग शोधावे लागले आणि त्यांची नोंद करून ठेवावी लागली. अनेक ठिकाणी आमच्यासाठी आम्हाला स्वत:च आमचे कॅम्प्स तयार करावे लागले. मी हा अनुभव कधीही विसरू शकणार नाही.”

इशानीने नुकतेच सिक्किमला आयोजित करण्यात आलेल्या ‘रॉक क्लायम्बिंग ओपन नॅशनल’ मध्ये चौथे स्थान पटकावले आहे. सध्या ती आपल्या भविष्यातील आव्हानात्मक मोहिमांसाठी प्रायोजकांच्या शोधात आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe