पंचविशीतली तरूणी उत्तरप्रदेशातल्या आडगावातली कारीगिरी पोहचवतेय राष्ट्रीय नकाशावर...

पंचविशीतली तरूणी उत्तरप्रदेशातल्या आडगावातली कारीगिरी पोहचवतेय राष्ट्रीय नकाशावर...

Friday April 22, 2016,

6 min Read

आपल्या आयुष्यात आलेली मरगळ झटकण्याचं काम कला करते. - पाब्लो पिकासो

image


लाकडाच्या वस्तू निर्मितीमध्ये पदवी मिळवल्यावर २०१३ मध्ये नव्या अग्रवालने 'आय व्हॅल्यू एव्हरी आयडिया' (आयव्हीइआय) ची स्थापना केली. कॉर्पोरेट जगापासून लांब आणि शहराच्या कोलाहलापासून दूर वसण्याचा निर्णय नव्याने घेतला. तिने लखनौपासून ९० किमी अंतरावर असणाऱ्या सीतापूर या आपल्या मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला. जगातल्या प्रत्येक कल्पनेला योग्य खतपाणी मिळाल्यास ती निश्चितच फळाफुलाला येते. या प्रमेयावर आयव्हीइआयचं काम चालत.

आयव्हीइआय सुरु करण्याच्या पूर्वतयारी विषयी नव्या सांगते, "मी सर्वात आधी चार सुतार शोधले. त्यांची पारख करण्याकरता, मला जी वस्तू हवी होती, ती लहान आकारात मी त्यांना सुरुवातीला बनवायला सांगितली. त्यांनी कोणत्याही मशीनशिवाय केवळ पारंपारिक अवजारांच्या सहाय्याने बनवलेल्या या वस्तू अतिशय व्यवस्थित आणि नीट होत्या. मी त्यांच्या अंगभूत कौशल्याने भारावून गेले".

कौशल्य असूनही हे कारागीर बेरोजगार असण्याची कारण नव्या सांगते, "मोठी ग्राहकसंख्या असणाऱ्या शहरी बाजारपेठेपासून चार हात लांब, आर्थिक कारणांमुळे कौशल्य कालानुरूप अद्ययावत न करणं. यामुळे या कारागिरांच हस्तकौशल्य जोडधन्द्यामध्येच वापरलं जातं. पोटापाण्याकरता ते मुख्य व्यवसाय दुसराच करतात. त्यामुळे सीतापूरसारख्या आडगावात राहून ग्राहकांना बांधून ठेवणं आणि बाजारपेठेत जम बसवणं कठीण जातं.

भारतातील हस्तकलेचा बाजार 

भारतातलं हस्तकलेचं क्षेत्र प्रचंड मोठं आहे. साधारण ७० लाख कारागीर आपल्याकडे आहेत. तर या क्षेत्रात ६७ हजार निर्यातदार आहेत. तरीही यातले बरेचसे कारागिर बेरोजगारच आहेत. याचं कारण म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात हे कारागीर वसले आहेत. या सर्वठिकाणी त्यांना प्रशिक्षण, पुरेशा सोयीसुविधा आणि बाजाराचीही सोय नाही. तसेच कनिष्ठ वर्गातील असल्यामुळे बाकीचे प्रश्नही आहेतचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारागिरांच्या अंगभूत गुणांना वाव मिळून, कलेला न्याय मिळण्याकरता राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत 'कुशल भारत अभियाना'ला सुरूवात केली आहे.

फॅब इंडिया, मदर अर्थ आणि दस्तकार बजार यासारखे काही मोठे ब्रँडस् ग्रामीण भागातल्या कारागिरांच्या विकासाकरता आणि ग्रामीण कलेच्या संवर्धनाकरता प्रयत्न करताना दिसतात. ग्रामीण बाज कायम ठेवून काळाशी सुसंगत गोष्टी या कारागीरांकडून तयार करून घेण्यात येतात. यामुळे कारागीराच्या कलेला न्याय आणि त्याला पुरेसं उत्पन्नही मिळतं. तर बाजारपेठेतला ग्राहक त्याला हवी ती गोष्ट अनोख्या रुपात मिळाल्याने तो ही खूष. देशभरात आयव्हीइआय सारख्या अनेक लहान संस्थाही या कारागीरांच्या विकासाकरता आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीकरता मोठी भूमिका बजावत आहेत. भरुचमधील सुजनी लूम्स ही संस्था गेली दीडशे वर्ष सुजनी कला जोपासत घरसजावटीला आवश्यक सामान बनवत आहे. इंदूरची 'रंगरंग' ही संस्था गृहिणींकडून कपडे, पडदे आणि सजावटीच्या वस्तूंवर चित्र रंगवून घेते. रितिका यांची 'मोरा' ईशान्य भारतात महिलांसोबत कपडे बनवतात. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या आयटोकरी, गाथा, जयपोर आणि क्राफ्टीझन वर्क या वेबसाईटस् कपड्यांपासून शोभेच्या वस्तू, दागिने, फर्निचर, घरसजावटीच्या वस्तू ग्रामीण कारागीरांकडून शहरी स्टाईलनुसार गरजेनुसार बनवून घेतात. भारत सरकार आणि वेबसाईटसं किंवा नव्या सारख्या महिलांद्वारे हस्तकलेशी संंबंधित हे उद्योग, हस्तकला आणि कारागिरांना रोजगारशाश्वत राहणार हे नक्की. 

तुटलेल्या काचेच्या बांगडयांपासून बनवलेलं बुकमार्क

तुटलेल्या काचेच्या बांगडयांपासून बनवलेलं बुकमार्क




सुरूवात आणि अडथळे

सुरवातीला लहान प्रमाणात काम सुरू करण्याचं नव्यांनं ठरवलं. २०१३ मध्ये नव्यांनं तिच्या वडिलांकडून साडेतीन लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि 'आय व्हॅल्यू फॉर आयडीया' च्या कामाला सुरूवात केली. सुरूवातीला कारागिरांकडूनच तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

नव्या सांगते, "कारागिरांनी मला अक्षरशः वेड्यातच काढलं. २३ वर्षांची मुलगी कामाच्या नवीन पद्धती आणि कसले प्रयोग करतेय असचं त्यांना वाटायचं. मग मी त्यांच्या कारखान्यात जायला सुरूवात केली. त्यांना नवीन डिझाईन्स दाखवू लागले, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना काही टीप्स देऊ लागले. त्यांच्यातल्या कलागुणांची त्यांना जाणीव करून दिली. आणि मग हळूहळू ते नवीन गोष्टी शिकायला तयार होऊ लागले. काही जण तर म्हणू लागले मी त्यांना नवीन शिकवलं तर त्या बदल्यात ते माझं काम मोफत करून देतील. हा त्यांच्यात एक उत्तम बदल घडून यायला लागला".

तिने १२ कारागिरांसोबत एक छोटी कार्यशाळा सुरू केली. एक मोलकरणीचं काम करणारी महिला लाकडाच्या बांगड्या बनवायची. तिलाही नव्याने तिच्या कार्यशाळेत कामावर घेतलं. एक सुंदर मेहंदी काढणारी मुलगीही नव्याबरोबर काम करण्यास तयार झाली. हे सर्वजण केवळ नव्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून तिच्या सोबत आले. नव्या या कारागिरांना कोस्टर, पेन स्टँड, घड्याळ, ट्रे आणि बाऊल्स यांचे मूळ डिझाइन द्यायची. उत्पादन तयार झाल्यावर चित्रकला करणाऱ्या महिलांकडे या उत्पादनांवर चित्रकाम, रंगकाम करायला पाठवण्यात येत असे. या महिला मग एक्रेलिक पेंट, बांगड्याचे तुकडे आणि क्रोशे च्या सहाय्याने या उत्पादनांना सजवायच्या. नव्या हळूहळू त्यांच्यातलं वैयक्तिक कसब, वैशिष्ट्य ओळखून त्याप्रमाणेे त्यांना तयार करू लागली. हे सर्व तयार तर झालं पण मग नव्यापुढे दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता, या उत्पादनांची विक्री...

आयव्हीइआयमधील मेहंदीमध्ये निपुण असणारी महिला व्हाईट बोर्ड सजवताना

आयव्हीइआयमधील मेहंदीमध्ये निपुण असणारी महिला व्हाईट बोर्ड सजवताना


बेंगळुरुतल्या सण्डे सोल संते या व्यापारीपेठेत त्यांनी पहिल्यांदा वितरणाचा प्रयत्न केला. नव्या सांगते, "आमची फक्त २० हजार रुपयांचीच विक्री झाली. चांगलाच तोटा मला सहन करावा लागला. पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे आमच्याकरता खूप महत्त्वाचं होतं. लोकांना आमची उत्पादनं आवडली म्हणजे आम्ही योग्य मार्गावर होतो याचं आम्हाला समाधान मिळालं". 

यानंतर आयव्हीइआयला त्यांची पहिली ऑर्डर कुकु क्रेट (सध्या बंद पडलेल्या) या स्टार्टअपकडून मिळाली. मुलांकरता मिकी माऊसच्या शेपची शंभर घड्याळं बनवायची ऑर्डर त्यांना मिळाली. ही घड्याळं मुलंच नंतर रंगवणार होती. नव्या हसून सांगते, "आम्हांला प्रत्येकी शंभर रुपये उत्पादन खर्च आला आणि आम्ही ही घड्याळं एकशे दहा रुपयांना विकली". पण या व्यवहारामुळे त्यांना काही अनोख्या कल्पना सुचल्या.

image


नव्या सांगते, "आमची सर्वात मोठी चूक म्हणजे आम्ही मोठ्या ऑर्डर्सच्या मागे धावत होतो. पण कुकु क्रेटस् नंतर मग मी छोट्या बुटीक्स आणि दुकांनांवर लक्ष केंद्रीत केलं". वर्षभरातच मग आयव्हीइआयची उत्पादन मुंबई, चेन्नई, हैद्राबाद आणि बेंगळुरूतल्या काही मोजक्या दुकानांमध्ये दिसू लागली. तोंडी प्रसिद्धीने त्यांना बऱ्याचशा ऑर्डर्स मिळाल्या. २०१४ मध्ये आयव्हीइआय च्या व्यवसायाला कलाटणी मिळणारी ऑर्डर मिळाली. दिल्लीच्या इकोसेन्सने पाचशे व्हाईटबोर्ड कॅलेंडर बनवण्याची ऑर्डर दिली. यातून त्यांना चांगलाच नफा मिळाला. तिच्या टीमसोबतही तिने हा नफा वाटला. या ऑर्डरमुळे त्यांचं नाव झालं. फ्लिपकार्ट, स्नॅपडिल आणि अॅमेझॉन या वेबसाईटस् सोबत तसंच काही कॉर्पोरेट कंपन्यांसोबत व्यवहाराला सुरूवात झाली. 

सध्या नव्याकडे १८ कारागीर पूर्णवेळ काम करतात. त्यांना तासाला ६० रुपये मेहनताना ती देते. यापूर्वी त्यांना दुसरीकडे काम करताना दिवसाला दोनशे रुपये मात्र मिळायचे. म्हणजेच नव्या सोबत काम करताना त्यांना चांगला आर्थिक फायदाही होत आहे. कॉर्पोरेट भेटवस्तू, घरगुती सजावट, वैयक्तिक भेटवस्तू अशा सर्व प्रकारची उत्पादनं आयव्हीइआय बनवते. पहिल्या वर्षी नव्याला फक्त एक लाख रुपयांचाच व्यवसाय करता आला. एखादी व्यक्ती यामुळे उदास होऊन हे सर्व सोडून द्यायचा विचार करू लागली असती. पण नव्याने आशा सोडली नाही. अखंड मेहनत करत राहिली आणि तिचे कष्ट फळाला आले. गेल्या वर्षी त्यांना १४ लाख रुपयांचा फायदा झाला. नव्या सांगते, "आमच्याकरता ही खूप मोठी रक्कम होती. यामुळे आम्हांला काम करायला आणखी बळ मिळालं. आम्ही आता आणखी मोठी स्वप्न पाहू लागलोय". नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांना ती तिच्या या प्रवासातल्या काही ठळक गोष्टी सांगते. 

स्थळ - "सुरूवातीला मला वाटायचं की, सितापूरसारख्या आडगावात राहून मी बाजारात उत्पादन कशी उतरवणार? पण ऑनलाईन व्यवसायामुळे तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून ग्राहकाकडे पोहचू शकता. लोकांना वेगळेपणा हवा आहे. त्यामुळे ते आयव्हीइआय सारख्या विक्रेत्याच्या शोधात असतात. तुम्ही चांगलं उत्पादन बनवणं आणि ते लोकांपर्यंत पोहचवणं हे महत्त्वाचं आहे. ते कुठल्या गावी बनवता हे महत्त्वाचं नाही".

पर्यायी काम - "मी माझ्या कारागिरांना त्यांचं हातातलं काम सोडून माझ्यासोबत काम करा असं कधीच सांगितलं नाही. आयव्हीइआयला यश मिळेपर्यंत ते दुसरीकडे काम करत होते. उरलेल्या फावल्या वेळात ते आमच्याकडे काम करायचे. म्हणून प्रती तासाला पैसे असा मोबदला देऊ लागले. कमी वेळात ते मनापासून काम करायचे".

हळूहळू वाढ - "बऱ्याचदा मोठं होण्याच्या घाईत आपण लहान लहान गोष्टीतल्या आनंदाला मुकतो. आयव्हीइआयची वाढ हळू झाल्यानं आणि छोट्या प्रमाणात सुरूवात केल्याने चांगला विकास झाला. मला या कारागिरांना शाश्वत काम आणि उत्पन्न द्यायचयं. जेणेकरून ते त्यांचं आयुष्य सुखाने जगू शकतील. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील. नवीन गोष्टी शिकू शकतील".

image



या वर्षाखेर नव्या तिची टीम वाढवणार आहे. ४० कारागिरांना ती रोजगार उपलब्ध करून देणार आहे. पण कारागिरांना काम करताना आनंद मिळाला पाहिजे हे तिच्याकरता जास्त महत्त्वाचं आहे. 

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

भरमसाठ वेतनाची संधी नाकारून विणकरांच्या विश्वात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या 'इंडोफॅश'च्या पल्लवी

‘ब्ल्यू पॉटरी’ – नामशेष होऊ घातलेल्या पिढीजात कलेचं पुनरूज्जीवन

‘लखनवी चिकनकारी,’ खाणे नव्हे, हे कापड भारी! ‘आंचल’ सप्त-आकाशी… तयाची दुमदुमते ललकारी!!

लेखिका - श्वेता विट्टा

अनुवाद - साधना तिप्पनाकजे

 

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा