कुटुंबाचा बहिष्कार, समाजाचा तिरस्कार, तरीही सामाजिक क्रांतीसाठी एक नवा अविष्कार.

0

तमिळनाडूच्या अरुणाचलम मुरुगनाथनची ओळख आज देशातल्या यशस्वी व्यावसायिक उद्यमींमध्ये आहे. त्यांनी बनविलेल्या एका मशीन द्वारे भारतात एक क्रांती झाली आणि त्याचा फायदा महिलांना झाला. महिलांसाठी एक स्वस्त आणि उपयुक्त सॅनेटरी नॅपकीन बनवायच्या मशीनचा शोध लावून अरुनाचलमने देशभरात खूप नाव कमविले. या मशीनला बनविण्यासाठी त्यांनी एक कारखाना सुद्धा उघडला. मशीनच्या उपयुक्ततेमुळे तिच्या विक्रीत प्रचंड खप झाला आणि त्याचा अरुनणाचलमला फायदा झाला. अरुणाचलम यांची कंपनी ‘जयश्री इंडस्ट्रीज’ ने देशातल्या २९ मधल्या २३ राज्यात आपल्या मशीनची विक्री केली आणि आता परदेशातही मशीनची मागणी वाढली आहे.


क्रांतीकारी शोध आणि यशस्वी उद्योजक म्हणून २०१४ मध्ये जगप्रसिद्ध ‘टाइम्स मॅगझीन’ ने त्यांना जगातल्या १०० प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील केले. या यादीत अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या सारख्या नावाजलेल्या व्यक्ती सामील आहे. अरुणाचलमने अनेक प्रतिष्ठीत सम्मान आणि पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

पण, या यशामागे खुद्द त्यांच्या पत्नीचा आणि आईचा बहिष्कार व समाजाचा तिरस्कार होता. कुटुंबातल्या लोकांनीच नाहीतर मित्रांनी पण त्यांच्याशी संबंध तोडले. काही लोकांनी तर अरुणाचलमला वेडे ठरविले. आपल्या संशोधनासाठी प्रयोगाच्या दरम्यान काही लोकांनी त्यांना मानसिकरित्या विक्षिप्त आणि लैगिक आजाराने पिडीत असल्याचे ठरविले. त्यांना बऱ्याच वेळा अपमान आणि तिरस्काराला सामोरे जावे लागले.

एकंदरीत त्यांचा दृढ निश्चय, हार न स्वीकारण्याची भावना, यशस्वी होण्याचा उन्माद, लक्ष प्राप्त करण्याचा हट्ट याने अरुणाचलमला एका साधारण गरीब माणसापासून यशस्वी,प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्ती बनविले.

अरुणाचलमचा जन्म तमिळनाडू च्या मागासलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब बुनकर परिवारात झाला. वडील एका दुर्घटनेत मरण पावल्या नंतर अरुणाचलम यांची परिस्थिती बिकट होत गेली. आई वनिता शेतात मोल-मजुरी करत असे. मजुरी करून पण त्यांचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊ लागले, म्हणून अरुणाचलम ने शाळा सोडली. १४ व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर घराला हातभार लावण्याच्या उदेशाने अरुणाचलम ने बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. कधी कारखान्यातल्या मुलांसाठी डब्बे पोहचविले तर कधी वेल्डिंग, मशीन ऑपरेटर चे काम केले. अशा प्रकारच्या कष्टातून त्याने आपला उदरनिर्वाह चालविला.

१९९८ मध्ये अरुणाचलम यांचा विवाह शांती नावाच्या मुलीशी झाला.

लग्नानंतर अरुणाचलम यांचे आयुष्य बदलत गेले. लग्नाच्या काही दिवसानंतर अरुणाचलम यांनी बघितले की त्यांची पत्नी त्यांच्या पासून काही तरी लपवत होती.

अरुण्चालम यांची उत्सुक्ता जागृत होऊ लागली की अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांची पत्नी त्यांच्या पासून लपवत होती. पण व्यर्थ, त्यांना हे नाही कळू शकले.

एक दिवस अरुणाचलम ने बघितले की त्यांची पत्नी वृत्तपत्राची पाने आणि कचऱ्यातून कपड्याचे तुकडे शोधत होती. अरुण्चालम हे बघून थक्क झाले. न राहून त्यांनी त्यांच्या पत्नीला या सगळ्यांची विचारणा केली. पत्नीने सांगितले की,’’मासिक पाळीच्या वेळेस ती या कपड्याच्या तुकड्याचा आणि पेपरच्या पानाचा वापर करते. पत्नीने हे पण सांगितले की, जर तिने नविन कपडा विकत घेतला तर पैसे खर्च होतील आणि दुधा सारख्या बऱ्याच गरजेच्या वस्तू घरात येणे बंद होईल. आश्चर्याची गोष्ट ही होती की पहिल्यांदा अरुणाचलम यांना महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भात कळाले होते. यानंतर त्याने महिलांच्या मासिक पाळी संदर्भात अधिक माहिती गोळा केली की अस्वच्छ कपडे आणि पेपरची पाने वापरल्याने प्रकृती खराब होऊ शकते प्रसंगी अनेक आजाराना तोंड द्यावे लागते. कॅंन्सर पण होऊ शकतो. या माहिती मुळे घाबरून गेलेल्या अरुणाचलमला लाभदायक अशा सॅनिटरी नॅपकिन बद्दल कळाले. ते लगेच मेडिकल स्टोअर मध्ये गेले आणि सॅनिटरी नॅपकिन मागितले. या मागणीमुळे दुकानदाराचे हावभाव बघून अरुनाचालाम यांना जाणवले की शक्यतो महिला या वस्तूची खरेदी करतात. त्याने आपल्या पत्नीला नॅपकिन भेट म्हणून दिले. स्वाभाविक पणे ब्रांडेड नॅपकिनची किमत एकूण थक्क झालेल्या पत्नीने अरुणाचलम यांना नॅपकिन परत न आणण्याचा सल्ला दिला.

अरुणाचलम ला या गोष्टीचे आश्चर्य वाटले की कॉटनच्या एका तुकड्याचे ४० रुपये का वसूल केले जातात. त्या वेळेस १० ग्रॅम कापूस १० पैशाला विकत मिळत होता. म्हणजे सॅनिटरी नॅपकिनची किंमत वजनाप्रमाणे ४ रुपये पाहिजे होती. या उलट नॅपकिनमची किंमत ४० रुपये होती, म्हणजे ४० पट जास्त होती. अरुणाचलमचे डोके चक्रावून गेले. त्याने निर्णय घेतला की त्याच्या पत्नीच्या आरोग्यासाठी तो स्वतः नॅपकिन बनवेल.

एक दिवस त्याने कापसापासून एक नॅपकिन बनवून आपल्या पत्नीला त्याचा वापर करून प्रतिसाद द्यायला सांगितला. पत्नीने महिनाभर थांबायला सांगितले. मासिक पाळी एक महिन्यानंतर येते ही नवीन गोष्ट अरुणाचलमला कळाली. पण अरुणाचलम बनवलेल्या उत्पादनाच्या प्रतिसादासाठी एक महिना थांबू शकत नव्हता. त्याची उत्सुकता प्रचंड होती. त्याने गावातल्या इतर स्त्रियांची माहिती मिळवली जी ऐकून त्याला आश्चर्य वाटले की गावातल्या जास्तीत जास्त स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी वाळू, राख, झाडाची पाने यांचा वापर करतात, ज्यामुळे त्यांची प्रकृती खराब होऊन अनेक आजाराची संभावना होती. आता, अरुणाचलमने एक निर्णय घेतला. त्याने निश्चय केला की जो पर्यत तो स्त्रियांसाठी स्वस्त, टिकाऊ, आणि आरोग्यदायक सॅनिटरी नॅपकिन बनवत नाही, तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही. त्याने लावलेल्या शोधासाठी बहिणींची मदत घेतली, पण बहिणींनी त्याला स्पष्ट नकार देऊन असा प्रस्ताव न आणण्याबाबत धुडकावले. पण ते विचलित झाले नाही. त्यांनी निश्चय केला की ते मुलींच्या कॉलेज मध्ये जाऊन स्वतः बनवलेले नॅपकिनचे मोफत वाटप करून मुलींचा प्रतिसाद घेईल. त्याने कॉलेज च्या २० मुलींची निवड करून सॅनिटरी नॅपकिन सोबत एक फिडबॅक फॉर्म पण दिला. प्रतिसादाच्या अपेक्षेने कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी बघितले की मुली मनाविरुद्ध फॉर्म भरत होत्या, त्यांना जाणवले की मुलींचा प्रतिसाद योग्य नाही.

यावेळेस अरुणाचलमने जो निर्णय घेतला तो अचंबित करणारा होता. त्याने स्वतः नॅपकिन वापरून त्याची योग्यता पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला. पुरुष असल्यामुळे त्याला मासिक पाळी येऊ शकत नाही, म्हणून आपल्या शरीरातून रक्तस्त्राव होण्यासाठी कृत्रिम बनावटीचे गर्भाशय तयार केले. रक्त खरे असले पाहिजे यासाठी खाटीका कडे बकरीचे रक्त घेतले आणि आपल्या प्रयोगासाठी वापर केला. नॅपकीन लावून ते कधी चालायचा, कधी पळायचे , कधी साईकल चालवायचे . त्यांना जाणून घ्यायचे होते की त्यांचे नॅपकीन किती रक्त, किती वेळ शोषु शकते. अरुणाचलम यांच्यासाठी हा एक प्रयोग होता. पण त्यांची कृती बघून लोकांनी त्यांना वेडे ठरविले.

त्यांचे हे प्रयोग पाहून वैतागून त्यांची आई व पत्नी त्यांना सोडून विभक्त राहू लागल्या. रक्ताने माखलेले कपडे धुण्यासाठी जेव्हा तो गावातल्या तलावावर जायचा तेव्हा लोकांना वाटायचे की याला काही लैगिक आजार झाला आहे. गावक-यांना अरुणाचलम च्या हालचाली विचित्र, असभ्य, आणि गलिच्छ वाटायला लागल्या. गावक-यांना वाटायचे की अरुणाचलम ला भूतबाधा झाली आहे आणि भूत काढण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतली पाहिजे. एक दिवस गावकऱ्यांनी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार अरुणाचलम ला झाडाला बांधून बेदम मारले, विनवणी करून कसे तरी अरुणाचलम तिथून वाचले , पण त्यांना गाव सोडावे लागले.

वेगवगळ्या प्रयोगांतर्गत सुद्धा त्यांना हे कळले नाही की आंतरराष्ट्रीय कंपन्या सॅनिटरी नॅपकिन कशा पासून तयार करतात. त्यांना कळले की कापसा ऐवजी दुसऱ्या वस्तूचा यात वापर होत आहे.

आपल्या ओळखीच्या एका प्राध्यापकाच्या मदतीने सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपन्याना पत्र लिहायला सुरवात केली. प्रयत्न करून सुद्धा अरुणाचलम यांना उत्तर मिळाले नाही. जवळ जवळ २ वर्षाच्या प्रयत्नांनी अरुनाचलम यांना कळले की सॅनिटरी नॅपकिन मध्ये सॅलुलोज फाईबर चा वापर होत आहे. सदर सॅलुलोज फाईबर पाईन बार्क वूड पल्प पासून काढतात. या माहिती मुळे अरुणाचलम मध्ये एक नवा उत्साह संचारला आणि नवीन आशा जागृत झाल्या. आता त्याने सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या मशीनचा शोध सुरु केला. बाजारातल्या सगळ्यात स्वस्त मशीन ची किमत ३.५ करोड एकूण तो थक्क झाला. त्याने निश्चय केला की तो स्वतः त्या मशीनची निर्मिती करेल . त्याच्या मेहनतीला फळ मिळाले, फक्त ६५ ह्जार खर्चून सदर मशीन त्याने बनवली.

या नंतर अरुणाचलम यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. ते सतत यशस्वी होत गेले. त्यांची ख्याती वाढतच गेली.

त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, त्यांना आईआईटी (IIT) मद्रासला जाण्याची संधी मिळाली. आईआईटी मद्रासने अरुणाचलम यांना खास आमंत्रित करून जाणून घेतले की सॅनिटरी नॅपकिन बनवायच्या मशीनचा शोध कसा लावला. त्यांची गोष्ट एकूण आईआईटीचे वैज्ञानिक आणि समस्त लोक प्रभावित झाले. या लोकांनी पुढे त्यांच्या नावाची शिफारस 'इनोवेशन्स अवार्ड' साठी केली. अरुनाचलम यांना हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला. या पुरस्कार नंतर अरुणाचलम यांना खूप प्रसिद्धी मिळाली, मिडिया मध्ये त्यांच्या बद्दल चांगल्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या.

या सगळ्यांनी प्रेरित होऊन त्यांनी ‘’जयश्री इंडस्ट्री ‘’ची स्थापना केली. मशिनच्या विक्रीने अरुणाचलम यांना उद्योगविश्वात पण खूप यश मिळाले. त्यांनी स्त्रियांच्या विकास आणि कल्याणासाठी काम करणाऱ्या सेवाभावी तसेच स्वयंसेवी संस्थाना पण आपल्या मशीन विकल्या.

अरुणाचलम यांच्या मशीनमुळे संपूर्ण देशात कमी किंमतीतले आणि स्वस्त दरातील सॅनिटरी नॅपकिन बनवून विकायला सुरवात झाली जे स्त्रिया आणि मुलींसाठी उपयोगी होते. अरुणाचलम यांच्या या शोधामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांना भारतातल्या स्त्रियांच्या या गरजेबद्दल जागरूकता आणण्यास मदत मिळाली. देशभरातल्या कितीतरी मुली आणि स्त्रियांसाठी हे नॅपकिन वरदान ठरले.

हा अरुणाचलम यांच्या मेहनतीचा, प्रयत्नांच्या संघर्षाचा परिणाम आहे की भारतात एक नवी क्रांती झाली आणि स्त्रियांना त्याचा लाभ झाला.

अरुणाचलम यांच्या या यशानंतर त्यांचे कुटुंब त्यांच्या जवळ परत आले. त्यांची पत्नी ज्या प्रयोगांना गलिच्छ समजून सोडून गेली होती, त्याच प्रयोगांचा आणि पतीच्या यशाचा तिला गर्व आहे. गावकऱ्यांना पण आपल्या चुकीचा पश्चाताप आहे. देश आणि प्रदेशातील मोठ मोठी संस्था अरूणाचलम यांच्या विचारांना आत्मसात करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी बोलवत आहे.

आज अरुणाचलम फक्त संशोधकच नाही तर एक सफल उद्यमी, समाजसेवक, मार्गदर्शक, आदर्श आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे.


लेखक : गीता परशुराम

अनुवाद : किरण ठाकरे