तात्पुरत्या स्वरूपाची आणि स्वस्त घरे उपलब्ध करणारी 'Hostelnpg'

0

Hostelnpg ही स्वस्त रहिवाशी फ्लॅट्स आणि तात्पुरती भाड्याची निवासस्थाने उपलब्ध करुन देण्याचे काम करणारी एक विपणन संस्था आहे. बिस्व पुजारीणी महापात्र, या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-प्रवर्तक आहेत. ही संस्था उभी करणे किती कठीण होते याबाबत बोलताना त्या सांगतात, “ जेव्हा मी माझी नोकरी सोडून आपल्या पतीसोबत एक उद्योजिका म्हणून Hostelnpg सुरू करण्याचा विचार केला तेव्हा माझ्या कुटुंबियांनी या विचाराला विरोध दर्शवत तीव्र प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया होती, “ तुम्हा लोकांना वेड लागले आहे. तुम्हाला एक मुलगा सुद्धा आहे, तेव्हा आपल्या भविष्याविषयी जरा विचार करा.” पुजारीणी यांना पक्का विश्वास आहे, की एखादा उद्योग सुरू करण्याची विशिष्ट अशी वेळ नसतेच मुळी. याबाबत त्या म्हणतात, “ ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आपल्याकडे एक उत्कृष्ट अशी योजना आहे, तर मग ती त्याच क्षणी प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यास सुरू केले पाहिजे. हा विचार गरजवंतांच्या समस्यांवर तोडगा देऊ शकतो इतकेच तुमच्यासाठी पुरेसे असते.”

दुटप्प्या भूमिका


मूळच्या ओरिसातील भुवनेश्वरच्या असलेल्या पुजारीणी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. हैद्राबादच्या ‘आयसीएफएआय’ विद्यापीठातून कॉम्प्यूटर अप्लिकेशन या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयटी उद्योगात १० वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘इन्वेस्टो’ आणि ‘एचसीएल’ अशा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांसोबत त्यांनी काम केले. या कंपन्यांच्या सेल्स, फायनान्स आणि सोशल मिडिया विभागांमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव त्यांनी प्राप्त केला. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुजारीणी खूपच उत्साही आहेत. परंतु असे असले तरी त्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या उत्साहाने काम करतात. त्या म्हणतात, “ मी जे काही करते ते अगदी मनापासून आणि स्वत:ला झोकून देऊन करते आणि त्या कामातून पूर्ण आनंद घेते. लोक माझ्याबद्दल काय बोलतील याची मी कधीही पर्वा करत नाही आणि नेहमीच येणा-या उद्याच्या काळाबाबत मी विचार करते.”

Hostelnpg चे प्रेरणास्त्रोत


पुजारीणी यांनी आपली कारकिर्द ( करिअर) एका वेगळ्या उपक्रमासोबत सुरू केली होती. या उपक्रमामुळे त्यांना कोणताही नवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले मुलभूत ज्ञान मिळाले होते. उद्योग सुरू करण्यास लागणारी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुजारीणी आणि त्यांचे पती, बालकृष्ण यांनी एक ऑनलाईन किराणा दुकान सुरू करण्याचा विचार केला. पंरतु नंतर त्यांनी हा विचार सोडून दिला. कारण भारतात अजून 'ई-कॉमर्स' तितकासा लोकप्रिय झालेला नाही असे त्यांना वाटले होते.

लोकांना स्वस्त किंमतीत घर उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्याचा विचार त्यांनी २००५ मध्ये केला होता. परंतु त्या विचाराची अंमलबजावणी व्हायला २०१३ हे वर्ष उजाडावे लागले. पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर हैद्राबादमध्य़े नोकरी शोधण्याच्या काळात त्यांना राहण्यासाठी स्वस्त जागा मिळवताना नाकीनऊ आले होते. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांच्या काही मित्रांना देखील स्वत: घर मिळवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. या अनुभवांनंतर त्यांना वाटले की आता Hostelnpg सुरू करण्याची योग्य वेळ आलेली आहे. तो पर्यंत या पती-पत्नींकडे नवा उद्योग सुरू होऊ शकेल इतके भांडवल सुद्धा जमा झालेले होते. अशा प्रकारे स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले आणि Hostelnpg नावाची कंपनी अस्तित्वात आली.


Hostelnpg


Hostelnpg तात्पुरत्या स्वरूपाची आणि स्वस्त घरे उपलब्ध करणारी अशी कंपनी आहे, जेथे भाडेकरूंना डिपॉझिटच्या रूपात आगाऊ रक्कम मुळीच द्यावी लागत नाही. ‘बिझनेस टू कस्टमर’ (B2C) अंतर्गत वर्गीकृत झालेली ही सेवा ग्राहकांना हॉस्टेल, पेईंग गेस्ट सुविधा, छोटे फ्लॅट्स आणि गेस्ट हाऊस उपलब्ध करून देते. ग्राहकांना मिळणा-या सुविधा, भोजन व्यवस्था, परिसरातील वातावरण अशा गोष्टींवर देखील कंपनी आपला पुनरावलोकन अहवाल जाहीर करत असते.

हे पोर्टल घरे किंवा दुकाने खरेदीसाठी, तसेच ती विकण्यासाठी स्थानिक व्यापा-यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या द्वारे त्यांना कोणत्याही अडचणीँ शिवाय आपल्या सेवा देता याव्यात, ग्राहकांची चौकशी करता यावी, त्यांच्या प्रतिक्रिया तपासता याव्यात अशा उपयुक्त सुविधाही या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यांनी नुकतीच HOSMO नावाची एक ऑनलाईन हॉस्टेल मॅनेजमेंट सेवा सुद्धा सुरू केली आहे. या सेवेचा ‘अँड्रॉईड अॅप’ सुद्धा लाँच केला आहे. HOSMO हे एक मोबाईल अॅप्लिकेशन आहे. याच्या सहाय्याने संपत्तीचे मालक आणि अर्थात विक्रेते हे ऑनलाईन बुकिंगसोबत आपल्या संपतीची देवाण-घेवाण सुद्धा अगदी सहजतेने करू शकतात. ही कंपनी या अॅप्लिकेशनचे iOS आणि Windows (विंडोज़) संस्करण सुद्धा लवकरच सुरू करणार आहेत.

आव्हाने आणि भविष्यातील योजना


इतर उद्योजकां प्रमाणे पुजारीणी आणि त्यांच्या टीमला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मालमत्तांच्या मालकांचे विसंगत वागणे आणि त्यांचा असहकार, यामुळे त्या आणि त्यांची टीम त्रस्त झाले आहेत. त्या म्हणतात, “ हॉस्टेलमध्ये जागा हवी असलेल्या कोणत्याही सामान्य माणसाला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच अडचणींचा सामना आम्हालाही करावा लागतो. अशिक्षित मालमत्ता मालकांशी संपर्क करणे, त्याच्यासोबत पैशांबाबत घासाघीस करणे आणि मोठी हुज्जत घातल्यानंतर मग निर्णयावर येणे अशा गोष्टींचा सतत सामना करावा लागतो. दुर्दैवाने असे कमी शिकलेले लोकच मुख्यत: हा व्यवसाय चालवतात. आणि याच कारणामुळे मोठे उद्योगपती या क्षेत्रात पाऊल देखील ठेवायला मागत नाहीत. तथापि, हे आमच्या समोर एक गंभीर असे आव्हान आहे. परंतु आम्ही त्याकडे एक सुवर्णसंधी प्रमाणे पाहतो. कारण याच कारणामुळे लोकांसाठी आमच्या सेवा अनिवार्य बनतात.”

पुजारीणी भविष्याबाबत खूपच आशावादी आहेत. येत्या तिमाहित २००० नव्या मालमत्ता आपल्या कंपनीसोबत जोडण्याचा त्यांचा इरादा आहे. सध्याच्या घडीला त्यांचे एकमात्र स्वप्न आहे, आणि ते म्हणजे Hostelnpg ला एका महत्त्वपूर्ण ब्रँडमध्ये रूपांतरीत करणे. आपले हे स्वप्न पूर्ण करत असताना त्यांना ब्रिटनच्या माजी प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांचे विचार प्रत्येक वेळी आठवतात. थॅचर म्हणतात, “ घर चालवणारी एक महिला एक देश सुद्धा चालवू शकते.” पुजारीणी यांना तर फक्त कंपनी चालवायची आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe