केवळ १२०० रुपयांपासून व्यवसाय सुरु करणारे अरविंद बलोनी आता ४०० कोटी रुपयाच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक आहेत

यशस्वी कथा लोकांना प्रेरणा देतात. या कथेतील मोठ्या घटना लोकांना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करतात. यशाचा मंत्र सांगतात, मार्ग दाखवतात. या यश कथेमधून लोकांना अनेक गोष्टींचे धडे मिळतात. या कथा हेच सांगतात की मेहनत आणि संघर्ष याशिवाय यश मिळणार नाही. भारतात अशा अनेक प्रेरणादायी अद्भुत आणि अव्दितीय यशोगाथा आहेत ज्या सदैव लोकांना प्रेरणा देत राहतील. अशीच एक अनोखी कहाणी आहे धीरूभाई अंबानी यांची. धीरूभाई अंबानी हे भारतातील असेच एक उदाहरण आहे. धीरूभाई अंबानी असे मोठे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडून भारतात अनेकांनी प्रेरणा घेतली आणि अविश्वसनीय कामे केली आहेत. धीरूभाई यांनी आपल्या जीवनात अनेक अडचणी, समस्या आणि आव्हांनांचा सामना केला आणि आपल्या मेहनत, संघर्ष आणि विजयश्री मिळवण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे जगभरातील लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत झाले आहेत. धीरुभाई यांनी जेव्हा व्यवसायात पाऊल ठेवले होते त्यावेळी त्यांना कुणीच ओळखत नव्हते. शुन्यातून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. पण संघर्षाच्या बळावर त्यांनी व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले. धीरूभाईच्या असाधारण यशामागे भजी विकून उद्यमी होण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीपासून जगभरातील सर्वोत्कृष्ठ उद्योगपती होण्याची कहाणी आहे. धीरुभाई यांच्या याच कहाणी ने उत्तराखंडातील एका साधारण युवकाला मोठ मोठी स्वप्ने पहायला आणि साकार करायला प्रोत्साहित केले. या सामान्य तरुणाने आपल्या परंपरा तोडून व्यवसायाच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि धीराने काम करत अडचणी दूर केल्या त्यांनतर मोठे यश मिळवले. एकेकाळचा हा साधारण तरूण आता चारशे कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. त्याचे नाव आहे अरविंद बलोनी. टिडीएस समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या अरविंद बलोनी यांनी मेहनत आणि संघर्षातून यशाची नवीन कहाणी लिहिली आहे. त्यांच्या जीवनात अनेक रोचक पैलू आहेत. अनेक घटना आहेत ज्या संघर्षाची प्रेरणा देतात. त्यांनी अनेक अशी कामे केली आहेत जी त्याच्या कुटूंबातील पूर्वजांनी कधीच केली नव्हती. बहुतांश कुटूंबीयांनी पांडित्य केले तर काहीनी सरकारी नोकरी केली. अरविंद बलोनी कुटूंबातील मार्शल आर्ट शिकणारे पहिलेच व्यक्ति होते. कुटूंबात व्यवसाय करणारेही ते पहिलेच होते. मोठे होण्याचा संकल्प करून ऋषिकेश येथून आपल्या घरून निघालेल्या अरविंद यांनी चंदीगढ येथे केवळ १२०० रुपयात व्यवसाय सुरू केला आणि वाढत जाऊन चारशे कोटींचा केला. त्या मार्गात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे अनेक शत्रू झाले. त्यांच्याशी दोन हात करताना धमक्या दिल्या कारस्थाने केली, चोरीसुध्दा केली. परंतू अरविंद यांनी देखील दांडगाई शिकली होती ज्यातून त्यांना यश मिळण्यात मदत झाली. आपले स्वत:चे साम्राज्य तयार करणारे अरविंद आपल्या स्वत:च्या कथेला प्रभावी मानतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या या प्रकारच्या कहाणीमुळेच ते काही लोकांसाठी धीरुभाई यांच्यासारखे सिध्द होतील. अशाप्रकारे जबर आत्मविश्वास असलेल्या अरविंद यांची रोचक कहाणी उत्तराखंड पासून सुरू होते. जेथे त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.

1

अरविंद बलोनी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटूंबात झाला. वडील शिवदत्त बलोनी बांधकाम विभागाच्या भंडार विभागात प्रभारी होते. आई गृहिणी होती. त्याचा परिवार मोठा होता, त्यांचे अनेक नातेवाईक होते. त्यांचा नेहमी घरी राबता असे. नातेवाईकांचे घरी येणे जाणे सुरुच असे.

अरविंद यांच्या परिवाराचे मूळ गाव उत्तराखंडमधील टिहरी-गढवाल जिल्ह्यातील चाचकडा हे होते. वडिलांच्या  नोकरीमुळे कुटूंबाला ऋषीकेश येथे येऊन रहावे लागले तेथेच निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे बालपण गेले. डोंगरातून मार्ग काढत जमीनीवर येणारी गंगा नदी आजूबाजूचे लहान मोठे डोंगर, लहान मोठे आश्रम आणि त्यातील साधू संत यांच्या गर्दीची छाप त्याच्या मन-मष्तिष्कावर चांगलीच पडली होती. निसर्ग आणि अध्यात्माच्या सानिध्यातील ऋषीकेशवर त्याचे बेहद प्रेम होते. त्यांच्यावर आपल्या वडिलांचा मोठा प्रभाव होता. ते सांगतात, “ वडील खूपच धाडसी व्यक्तिमत्व होते. ते चांगले नेते होते. ते नेहमी म्हणत की माणसाला देणा-याच्या स्थितीत असले पाहिजे न की घेणा-याच्या. माणसाच्या हाताची मुठ इतरांच्या हाताच्या वर हवी, खाली नाही”

ऋषिकेशच्या भरत मंदीर इंटर महाविद्यालयातून अरविंद यांचे शिक्षण झाले. ते सामान्य विद्यार्थी होते. इतर मुलांप्रमाणेच त्याचे शिक्षण होते. कुठलीही खास योग्यता नव्हती. पण याच सामान्य विद्यार्थ्याच्या जीवनात अकरावी-बारावीत गेल्यावर मोठे बदल झाले. अकरावीत आल्यावर अरविंद खोडकर झाले. भोळेपणा आणि साधेपणा अचानक नाहीसा झाला. आणि त्याच दिवसांत महाविद्यालयात झालेल्या एका घटनेने अरविंद यांचे विचार आणि दृष्टी सोबत जीवनही बदलून गेले. असे झाले की काही कारणाने महाविद्यालयात भांडणे झाली त्यात एकाने बदमाशाने त्यांना थप्पड लगावली. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले, स्वत:ची लाज वाटू लागली. आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. मारणारा बलदंड होता त्याला अरविंद यांना प्रतिकारच करता आला नाही.त्याच्यात शक्ती नसल्याने गप्प बसावे लागले. पण मनात हीच गोष्ट खलत राहिली. त्यामुळे बदल्याची भावना इतकी तीव्र झाली की झोप उडाली होती. या अपमानाच बदला घेण्याचा त्यांनी निश्चय केला होता.

स्वत:ला मजबूत करण्याचे ठरवून त्यांनी मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. बदल्याच्या भावनेतून त्यांनी ज्युडो कराटे शिकण्यास सुरूवात केली. सहा महिन्यात प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वत:ला मजबूत केले. सहा महिन्यांनंतर जेंव्हा विश्वास आला की ते कुणालाही लोळवू शकतात तेंव्हा त्यांनी त्या बदमाशाला आव्हान दिले. त्याला यथेच्छ मार देऊन त्यांनी अपमानाचा बदला घेतला. त्यांना वाटले की मित्रांमध्ये त्यांची जी बदनामी झाली ती धुतली गेली आहे. अरविंद सांगतात की, “ त्या घटनेने माझे विचार बदलेले. मार्शल आर्टने मला ताकद दिली. मी ती शिकलो नसतो आणि बदला घेतला नसता तर कमजोर राहिलो असतो. मार्शल आर्टने माझा आत्मविश्वास वाढला आणि मला हार न मानण्याची हिंमत दिली.”

त्यानंतर आणखी एका घटनेने अरविंद यांच्या जीवनाला नवी दशा आणि दिशा दिली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असताना त्यांच्या घरात काही कारणाने भांडणे झाली. त्यातून त्यांच्या मनाला जोरदार धक्का बसला. ते इतके भावूक झाले की घर परिवार सोडून कुठेतरी दूर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दु:खी मनाने अरविंद यांनी चंदीगढला जाणारी बस पकडली. अरविंद सांगतात की, “ चंदिगढचा तो प्रवास मी कधीच विसरणार नाही. प्रवासात माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्याचेवेळी मी निश्चय केला होता की काही करून मी मोठा होईन”.रोचक हे देखील होते की त्याचवेळी त्यांनी हा निर्णय घेतला  होता की ते बसमध्य़े पुन्हा कधीच बसणार नाहीत.आपल्या गावी परत जाताना स्वत:च्या कारमध्येच जातील. दु:खीत मनाने पण चंदीगढला पोहोचलेले अरविंद यांनी नोकरीचा शोध सुरू केला. त्यासाठी ते इतके उतावीळ होते की रेनबैक्सी कंपनीत सहायकाची नोकरी करायलाही तयार झाले. त्यांना जेंव्हा तेथे नोकरी आहे असे समजले तेंव्हा ते रांगेत जाऊन उभे राहिले. तेथे लोक दूरुन मोठ्या अपेक्षेने आले होते. त्या रांगेत मोठ्या प्रमाणात मजूर होते जे निरक्षर होते. खूप वेळाने जेव्हा त्यांचा क्रमांक आला तेंव्हा त्यांना पाहून व्यवस्थापक दंग झाला. त्यांचे वागणे बोलणे रंग रूप पाहून त्याला वाटले की ते झाडू-पोछा साफ सफाईची कामे करू शकत नाहीत. त्याला वाटले की कोण्या विवशतेने ते या नोकरीसाठी आले असावेत. त्यामुळे त्यांनी हेल्पर म्हणून नोकरी देण्यास साफ नकार दिला. अरविंद यांनी पडेल ते काम करण्याची तयारी दाखवली तरी त्याने मान्य केले नाही. रोचक बाब ही होती की याच नोकरीसाठी त्यांनी शिफारश देखील मिळवली होती. जेंव्हा शिफारस करणाऱ्याने व्यवस्थापकाला फोन केला तेंव्हा त्याला ते मान्य करावे लागले. त्याने अरविंद यांना त्यांचे प्रमाणपत्र आणून देण्यास आणि नोकरीवर येण्यास सांगितले. आनंदाने अरविंद प्रमाणपत्र आणण्यास निघून आले. परंतू त्या दरम्यान आणखी एक घटना झाली त्यामुळे व्यवसाय करण्याची अरविंद यांना प्रेरणा मिळाली.

त्या काळात चंदिगढमध्ये अनेक जॉब कन्सल्टन्सी सुरू झाल्या होत्या. वेगवेगळ्या कंपनीत नोक-या देऊन एजन्सीच कमीशन मिळवत असत. एक दिवस अरविंद यांनी पाहिले की काही बेरोजगार अश्याच एका कंपनीच्या दरवाज्यावर हंगामा करत होते. त्यांनी कारण जाणून घेतले. तेंव्हा त्यांना समजले की कंपनीने नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगारांची फसवणूक करत मोठी रक्कम हडपली होती. नोकरी न मिळाल्याने नाराज बेरोजगार पैसे परत करावे यासाठी हंगामा करत होते. त्यांची फसवणूक पाहून अरविंद यांना दया आली. ते स्वत: बेरोजगार होते आणि स्थिती समजत होते. त्याचवेळी त्यांनी बेरोजगारांना नोकरी देवून मदत करण्याचा निर्णय घेतला. आपली स्वत:ची जॉब कन्सल्टन्सी सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय एका प्रकारे मोठा आणि धाडसी होता. त्यांच्या घरात पूर्वजांनी कधी व्यवसाय केला नव्हता. त्याचे वडील नोकरी करत तर आजोबा ज्योतीषी होते. मात्र बेरोजगारांचे कष्ट पाहून त्यांचा निश्चय पक्का झाला होता की त्यांना नोकरी देण्यासाठी ते आपल्या जीवनाचे उद्दीष्ट ठेवतील. अरविंद सांगतात की, “ त्याकाळी सल्लागार कंपन्या नोकरी देण्यापूर्वीच मोठी रक्कम घेत असत. ती खूप जास्त होती. मी पाहिले की अनेक जण कर्ज काढून ही रक्कम देत असत. नोकरी मिळाली नाहीतर बेरोजगार ही रक्कम परत मागत होते. त्यावेळी कंपन्या त्यांना दाद देत नव्हत्या. त्यांच्या त्या विवशता पाहून मला खूप पिडा होत असे. मी ठरवले की मी माझी कंपनी सुरू करून बेरोजगारांना नोक-या देईन, मी ठरवले की मी कमी पैसे घेऊन त्यांना नोक-या देईन.” अरविंद यांचा प्रामाणिक विचार होता. विश्वास मोठा होता, मनात जोश होता. मात्र त्यांना भविष्यात येणा-या आव्हानांची जाणीव  नव्हती. अडचणी आणि आव्हाने त्यांना आलिंगने देत होती.

काम सुरू करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. त्यावेळी त्यांच्या हाती केवळ बाराशे रुपये होते. पण त्यांची इच्छा इतकी तीव्र होती की, त्या पैश्यातच त्यांनी काम सुरू केले. जे काही होते ते त्यांनी कामात लावले. मेहनत सुरू केली आणि काम सुरू केले त्याचवेळी नवी अडचण समोर आली. जेथे अरविंद यांनी कार्यालय सुरू केले होते तेथे इतरही काही कंपन्याची कार्यालये होती. त्या कंपन्याच्या मालकांनी पाहिले की अरविंद यांच्याजवळ अनेक बेरोजगार येत आहेत, आणि त्यांची लोकप्रियता वाढत आहे, त्यावेळी त्यांनी अरविंद यांना बोलायला आणि त्रास द्यायला सुरूवात केली. एका कंपनीच्या मालकाने अरविंद यांचा अपमान करण्यासाठी सांगितले की, “ अरे तू तर गढवाली आहेस तुला कुठल्या तरी हॉटेल मध्ये वेटरचे काम करायला पाहिजे होते किंवा सैन्यात भर्ती व्हायला हवे होते.” त्याकाळात गढवाली लोक अनेक हॉटेलात लहान मोठी कामे करत होते. हाच धागा पकडत अरविंद यांचा अवमान करण्यासाठी त्याने असे कुत्सीत उदगार काढले होते. पण अशा आणखी अनेक वाईट बोलण्याचा आणि गोष्टींचा अरविंद यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. ते निधड्या मनाने आपले काम करत राहिले. जेंव्हा अरविंद यांनी जोरदार प्रगती करण्यास सुरुवात केली तेंव्हा काही कंपन्याच्या मालकांनी त्यांना चंदीगढ सोडून जाण्यासाठी धमक्याही देण्यास सुरूवात केली. त्यांनी त्यांना हे सांगत धमकीदिली की- “ तू बाहेरचा आहेस इथे व्यवसाय करण्याचे थांबले नाहीस तर तुझी वाईट अवस्था करू मग तुझे काहीच राहणार नाही” या धमक्यांचाही अरविंद यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ते कामात प्रामाणिक होते, त्यांचा विचार पक्का होता. मनापासून बेरोजगारांची मदत करत होते. त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नव्हते मार्शल आर्टच्या शिक्षणाचा इथेही फायदा होता. त्यामुळे ते शरीराने आणि मनाने इतके मजबूत झाले होते की, त्यांना कशाची भीती वाटत नव्हती. बदमाशांच्या धमक्या त्यांनी हवेतच उडवुन दिल्या होत्या. त्यांच्या या बेडरपणामुळे प्रतिस्पर्धकांनाही भीती वाटू लागली होती.

अरविंद यांचे शत्रू बनणे स्वाभाविक होते ते पर-राज्यातून आले होते. त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी होती. बेरोजगारांचा विश्वास त्यांनी मिळवला होता त्यामुळे त्याचे काम वाढत होते आणि इतरांचे कमी होत होते. हीच गोष्ट प्रतिस्पर्धेत असलेल्यांना सलत होती. एक व्यावसायिक तर इतका नाराज झाला की त्याने अरविंद यांच्या एका माणसाला आपला खबरी बनविला होता. इतकेच नाहीतर अरविंद यांना बरबाद करण्यासाठी त्याने त्यांच्या कार्यालयातील प्रमाणपत्र आणि कागदपत्र आपल्या हस्तकांकरवी गहाळ केले होते. अरविंद यांना जेंव्हा हे समजले तेंव्हा त्याचे भान हरपले, प्रमाणपत्रे चोरली जाणे म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्यासारखे होते. इतकेच नाही तर त्यांच्यावर विश्वास असलेल्या बेरोजगाराचे नुकसान होणार होते. संकटाच्या या क्षणी अरविंद यांनी समजूतीने काम केले. ते सरळ पोलिस ठाण्यात गेले आणि प्रमाणपत्रे मिळाली नाहीतर काहीही करु शकतो असे त्यांनी सांगितले. एका प्रकारे ही धमकीच होती. अरविंद यांना राग येणे स्वाभाविक होते. त्यांनी पोलिस ठाणे अंमलदाराला सांगितले की, ‘प्रमाणपत्रे मिळाली नाहीतर मी स्वत: मरेन नाहीतर कुणाचाही जीव घेईन’ ते पाहून ठाणेदारही घाबरला. त्याने अरविंद यांना विश्वास दिला की प्रमाणपत्रे परत मिळतील. त्यानंतर अरविंद आपल्या कार्यालयात परत आले तेंव्हा त्यांना दिसले की सारी प्रमाणपत्रे जागेवर होती. ती आठवण सांगताना ते म्हणतात की, ‘ मी स्वत:ला सांभाळू शकत नव्हतो, ठाण्यातून येताना माझ्या डोळ्यात पाणी होते. मी पोलीसांला धमकी दिली नसती तर माझे काम बंद झाले असते”

अरविंद यांनी असाच धाडसीपणा केला आणि अनेक वेळा आपली प्रगती साध्य केली. धीरुभाई अंबानी यांची कंपनी रिलायन्स मध्ये अशाच धाडसने त्यांना मोठे व्यावसायिक बनविले. झाले असे होते की रिलायंस कंपनीने पंजाबमध्ये टेलीकॉम क्षेत्रात काम सुरू केले होते. हे अरविंद यांना समजले तेंव्हा त्यांनी विचार केला की, रिलायंसचे काम मिळाले तर त्यांचा फायदा होऊन व्यवसाय वाढणार होता. त्यांना रिलायंस कडून मोठी अपेक्षा होती. त्यांना वाटत होते की कंपनीला योग्य उमेदवार तेच देऊ शकतात आणि हे काम केल्याने ते स्वत:ही मोठे व्यावसायिक बनतील. मोठ्या अपेक्षेने ते रिलायंसच्या कार्यालयात गेले. पण त्यांचा प्रस्ताव नामंजूर झाला. त्यांना धक्का बसला. पण स्वत:ला सावरत त्यांनी त्यामागची कारणे जाणून घेतली. त्यांना समजले की त्यांची कंपनी नवी आणि लहान असल्याने आधी मोठ्या कंपन्यांसोबत काम न केल्याने त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. जसे त्यांना ही कारणे समजली ते तडक स्थानिक प्रभारी यांच्या दालनात घुसले. त्याने त्या अधिका-याला ही जाणिव दिली की रिलायंसचे प्रमुख धीरुभाई अंबानी देखील लहान व्यावसायिक होते. आणि त्यावेळी त्यांना मोठ्या लोकांनी कामे दिली नसती तर रिलायंस कदाचित आज इतकी मोठी झाली नसती. त्यांनी ही हमी दिली की त्यांची कंपनी लहान असली तरी मोठे काम करण्याचा आवाका ठेवते. मोठ्या आवेशाने आपले म्हणणे सांगून अरविंद आपल्या कार्यालयात परत आले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना समजले की त्यांचा व्यावसायिक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. पुन्हा एकदा धाडसीपणाचा अरविंद यांना फायदा झाला होता. त्यांचा जोशपूर्ण पवित्रा रिलायंसलाही भावला होता. हे काम मिळणे त्यांच्याकरीता मोठे सुयश होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा मोठे यश मिळवले. अरविंद बलोनी म्हणतात की, “ सुरुवातीपासून धीरूभाई अंबानी माझे आदर्श होते. त्याच्या कहाणीतून मला अनेकदा प्रेरणा मिळाली” कदाचित याच प्रेरणेचा परिणाम म्हणून त्यांनी रोजगार संस्थेचा विस्तार करत इतर अनेक क्षेत्रात विस्तार केला. अरविंद यांनी रिटेल व्यवसाय, रिअल इस्टेट, हॉस्पीटॅलिटी (आदर आतिथ्य )आणि शिक्षणासारख्या क्षेत्रातही काम सुरू केले. त्यातून खूप पैसा, प्रसिध्दी मिळवली. अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपन्या टिडिएस समुहाचा व्यवसाय सुरू आहे.

अरविंद यांनी आपल्या आजी आजोबांच्या नावे कंपनीचे नामकरण केले आहे. त्यांचे आजोबा तारा दत्ता आणि आजी सरस्वती यांच्या नावे टिडीएस समूह तयार केला आणि वाढविला. जेंव्हा आजी आजोबांच्या गोष्टी सुरू होत्या त्यांनी एक किस्सा सांगितला, “ माझे आजोबा मोठे ज्योतिषी होते, माझ्या नामकरणाचे जेवण झाल्यावर त्यांनी म्हटले होते की- मला माझ्या या नातवाचे नामकरण करताना अभिमान वाटतो, हे माझे भाग्य आहे की याचे नामकरण मी करतो आहे हा पुढे जावून केवळ आई बापाचे नाहीतर गावाचे नाव मोठे करेल हा मोठा माणूस बनेल” किस्सा सांगताना अरविंद भावूक झाले होते. आपल्या आजी आजोबांच्या नावेच त्यांनी कंपन्या स्थापन केल्या आणि खूप नाव आणि पैसा मिळवला. केवळ बाराशे रुपयात सुरुवात करून ते आज चारशे कोटीच्या टिडीएस समूहाचे मालक आहेत. टिडीएस समूह मोठ मोठ्या कंपन्यात मनुष्यबळ पुरवठा करते. कंपन्यांना लागणा-या मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. टिडिएस समूह वेगाने किरकोळ व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, आदर आतिथ्य हॉटेल व्यवसायात प्रगती करत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेच्या कामातही समुहाने जबाबदारी निभावली आहे. टिडिएस समुहाचा कारभार देशभर पसरला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात समूहाची कामगिरी सुरू आहे. सुमारे पंचविस हजार कर्मचारी समूहात विविध राज्यात काम करत आहेत. या समुहाची सेवा मिळवणा-या लोकांची संख्या सतत वाढत आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासपूर्ण आवाजात अरविंद सांगतात की, “ टिडीएस समूह लवकरच चारशे कोटी वरून हजार कोटी रुपयांचा समूह होणार आहे.” त्यांच्या या विश्वासाचा आधार त्यांचे कर्मचारी  आहे. ते म्हणाले की, “ माझे कर्मचारी फारच छान आहे. त्यात चांगले प्रामाणिक, मेहनती लोक आहेत. जे स्वप्न मी पाहतो ते सत्यात आणण्यासाठी माझी माणसं शक्ती  लावतात. ” हे स्वाभाविक आहे की जो माणूस रिलायंस, एअरटेल, डिश टिव्ही, गोदरेज, व्हिडिओकोन, विप्रो, टाटा, हिरो समूह, आदित्य बिर्ला समूह, फिलिप्स सारख्या मोठमोठ्या कंपन्याना चांगले सक्षम प्रतिभाशाली, मेहनती कर्मचारी देऊ शकतो तो आपल्या जवळ चांगलीच  माणसे ठेवणार!

अरविंद बलोनी यांच्या जीवनात अनेक असे पैलू आहेत जे रोचक आहेत. अरविंद यांनी तो संकल्प देखील पूर्ण केला जो त्यांनी चंदीगढला बसमध्ये येताना केला होता. चंदीगढला केंद्र बनवून जेंव्हा त्यांनी खूप पैसा मिळवला तेंव्हा ते गावी गेले. त्यावेळी ते स्वत:च्या कारने आपल्या गावी गेले तेही अश्या तश्या कारने नाही तर मर्सिडिज कारने. गावात अशी कार पहिल्यांदा आली होती. आजोबांची भविष्यवाणीसुध्दा खरी झाली होती की त्यांचा नातू घर-परिवारासोबत गावाचे नावही मोठे करून आला होता. हे देखील पहाण्यासारखे आहे की अरविंद यांनी त्या पहिल्या बस प्रवासानंतर पुन्हा कधीच बसने प्रवास केला नव्हता. रोचक गोष्ट ही सुध्दा आहे की अरविंद यांनी घरच्यांपासून ही गोष्ट दोन वर्षे लपवून ठेवली होती की ते व्यवसाय करत आहेत. त्यांना वाटले की घरची माणसे हे ऐकुन घाबरतील की ते व्यवसाय करत आहेत. त्यांच्या घरात कुणीव व्यवसाय केला नाही आणि त्यांचा समज असा होता की त्यात खूपच जोखीम असते. नुकसान झाले तर सारे आयुष्य उध्वस्त होऊन जाते. अरविंद यांना या गोष्टीची देखील भिती होती की घरचे त्याना निरुत्साही करतील आणि व्यवसाय करण्यापासून परावृत्त करतील. व्यवसायात जम बसविल्यानंतरच अरविंद यांनी घरच्यांना त्याबाबत सांगितले की त्यातच ते त्यांचे जीवन व्यतीत करणार आहेत.

अरविंद यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हांनाचा सामना केला. पण त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की ते इतरांचे प्रश्नही आपलेच समजून सोडवून देतात, अरविंद यांचे परिचित कोलकाता मध्ये टीव्ही सेट तयार करून देत असत. काही राजकीय कारणांनी स्थिती अशी झाली की कारखान्यातील मजूरांनी संप केला. कारखान्याचे काम थांबले. अरविंद यांना जेंव्हा हे समजले तेंव्हा मदत करण्यासाठी ते स्वत:च सरसावले. कारखाना मालकाने जेंव्हा त्यांना पाहिले तेंव्हा त्यांना विश्वास बसला नाही की एक तरूण पुन्हा कारखाना सुरु करू शकेल. मात्र त्यांच्या समोर काहीच पर्याय नव्हता. त्यांनी अरविंद यांना कारखान्यात पुन्हा एकदा टिव्ही संच तयार करण्याचे काम सोपविण्याचे ठरविले. अरविंद यांच्या एकाच आवाहनात अनेक जण त्यांच्यासोबत कोलकाता येथे येण्यास तयार झाले. जितकी गरज होती त्यापेक्षा जास्त कामगार आले. सारे अरविंद यांच्या सोबत येण्यास हटले होते. लोकांना येऊ नका असे सांगण्यात अरविंद यांचा खूप वेळ गेला. आपल्या मजूरांसोबत अरविंद जेंव्हा कोलकाता येथे पोहोचले तेंव्हा दिसले की स्थिती खूपच खराब आहे. कारखान्यात काम सुरू करण्याचा अर्थ होता की जीव धोक्यात घालणे. त्यांच्या सोबत आलेल्या मजूरांनाही हे समजले होते की काम सुरू करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे होते. पण अरविंद यांनी हिंमत केली. त्यांनी सा-या मजूरांना जोश भरण्यासाठी एक भाषण केले. त्याच्या भाषणात इतका जोश होता की सा-या मजूरांच्या मनात तो संचारला आणि पूर्ण शक्तीने ते निर्भयपणाने कामाला लागले. अरविंद यांच्या धाडसा समोर कोलकाता येथील मोठे संघटनाचे नेते देखील हारले. स्थानिक मजूर संघटनाचे नेता इतके चरफडलेकी त्यांनी अरविंद यांना ‘ पंजाब मधून आला दहशतवादी’ असे हिणवण्यास सुरूवात केली. मात्र अरविंद यांनी नेहमीप्रमाणे त्यावर लक्ष दिले नाही आणि आपल्या कामावर ध्यान केंद्रीत केले. अरविंद सांगतात की, “ जेंव्हा कुणी मला सांगते की काम अशक्य आहे, तेंव्हा माझी हिंमत जास्तच वाढते, आणि अशक्य कामाचे आव्हान मला ते करून पूर्ण करे पर्यंत शांत बसू देत नाही.” अरविंद बलोनी मजबूत मनाचे व्यक्ती तर आहेतच पण त्यांच्यात अनेक गुणही आहेत. ते चांगले वक्ता आहेत आणि लोकांना चांगली मोठी कामे करण्यासाठी प्रेरीत करतात. ते असे धाडसी उद्योजक आहेत जे धाडसाने कामाला सोपे करून टाकतात. ते डॉ अब्दुल कलाम यांच्या या गोष्टीने बेहद प्रभावित आहेत की, ‘ स्वप्न ती नसतात जी झोपेत पाहिली जातात, तर स्वप्न ती असतात, जी माणसाला झोपू देत नाहीत’ मोठी स्वप्ने पहायची आणि पूर्ण करण्यासाठी सारी ताकद पणाला लावायची ही आता अरविंद यांची सवय झाली आहे.धीरूभाई अंबानी यांच्यापासून प्रेरणा घेऊन कोट्यावधीचा व्यवसाय उभा करणा-या या सामान्य माणसाने यश मिळवून दाखवले आहे. ते हे सांगतानाही कचरत नाहीत की, ‘धीरुभाई यांची प्रेरणा घेऊन अनेकजण यशस्वी झाले आहेत, जर मी काही लोकांसाठी धीरूभाईंसारखा प्रेरक बनलो तर मला खूप आनंद होईल’

आपल्या मोठ्या आणि अनोख्या यशाचे श्रेय आपल्या कुटूंबियाना देण्यासही ते चूकत नाहीत. ते म्हणतात की, माझी पत्नी अंजली माझी प्रेरणा आहे, ती मला प्रगतीसाठी नेहमी प्रोत्साहीत करते. जेंव्हा कधी मला व्यावसायिक चिंता असतात ती मला प्रेरीत करते, ती माझी मोठी शक्ती आहे”. अरविंद आणि अंजली यांना दोन लहान सुंदर मुले आहेत. मोठा मुलगा आर्यन दहा वर्षांचा आणि मुलगी आदिती पाच वर्षांची आहे. आपल्या कुटूंबासोबत वेळ घालविताना अरविंद यांना आनंद मिळतो त्यातून त्यांचा उत्साह अधिकच वाढतो. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.


Dr Arvind Yadav is Managing Editor (Indian Languages) in YourStory. He is a prolific writer and television editor. He is an avid traveler and also a crusader for freedom of press. In last 19 years he has travelled across India and covered important political and social activities. From 1999 to 2014 he has covered all assembly and Parliamentary elections in South India. Apart from double Masters Degree he did his doctorate in Modern Hindi criticism. He is also armed with PG Diploma in Media Laws and Psychological Counseling . Dr Yadav has work experience from AajTak/Headlines Today, IBN 7 to TV9 news network. He was instrumental in establishing India’s first end to end HD news channel – Sakshi TV.

Related Stories

Stories by ARVIND YADAV