शेती करून कोट्यावधीची कमाई करणा-या या अभियंत्याने २४ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची नोकरी सोडली !

0

सध्याच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असते की, चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, जेणेकरून चांगली नोकरी मिळेल. प्रत्येक दुसरा माणूस सध्या एकतर अभियंता असतो किंवा त्यासारखेच काहीतरी करत असतो, त्याचवेळी सध्याच्या काळात तरूणांचा शेती व्यवसायातील रस कमी होवू लागला आहे. याचे कारण त्यातील भांडवली खर्च जास्त आणि उत्पन्न कमी होवू लागले आहे. मात्र असे असले तरी ही कहाणी आहे त्या माणसाची ज्याने आपली चांगली कमाई असणारी नोकरी सोडली आणि आपले गांव मधेपूर जे छत्तिसगढच्या विलासपूर जिल्ह्यात आहे येथे परत जावून शेती केली. गुरगांव येथील मोठ्या कंपनीतील नोकरी सचिन काळे यांनी सोडली, आता ते त्यांच्याच गावात शेती करून कोट्यावधी रूपये कमवित आहेत.


सचिन यांनी कंत्राटीशेती पध्दतीचा बारकाईने अभ्यास केला आणि २०१४ मध्ये स्वत:ची कंपनी सुरु केली. ‘ इन्होवेटीव ऍग्रीलाइफ सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’, ही कंपनी शेतक-यांना मदत करते ज्यांना कंत्राटी पध्दतीने शेती करायची आहे. आपले व्यावसायिक कौशल्य वापरून त्यांनी शेती सल्लागार नियुक्त केले आणि त्यांना प्रशिक्षित करत आपला व्यवसाय वाढविण्यास सुरूवात केली.

भारतामधील बहुतांश मध्यमवर्गिय लोकांप्रमाणेच, सचिनच्या पालकांना त्यांनाही सचिनने अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असेच वाटले. त्यामुळे त्यांनी नागपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २०००साली प्रवेश घेतला आणि पालकांचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी त्यांचे एमबीए हे अर्थशास्त्र विषय घेवून पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक नैपूण्य पाहून त्याना एका ऊर्जानिर्मिती केंद्रात लगेच चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली. या नोकरीत ते रमले आणि तेथे उत्तरोत्तर वृध्दीच्या पाय-या चढू लागले. त्यांना अभ्यासात इतकी रूची होती की त्यांनी पुढे जावून कायद्याची पदवी देखील घेतली. २००७मध्ये त्यांनी ‘विकासाचे अर्थशास्त्र’ या विषयात पीएचडी केली, त्याच काळात त्यांच्या मनात आले की, स्वत:चा व्यवसाय करावा कुणाची तरी चाकरी करण्यापेक्षा तेच चांगले.

ज्यावेळी सचिन यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले, त्यांच्या मनात ब-याच कल्पना तंरगत होत्या. त्या वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करता करता त्यांना त्यांच्या सरकारी नोकरी करणा-या आजोबांची आठवण झाली. सेवा निवृत्ती नंतर आजोबा शेतीकडे वळले होते. त्यांना आठवले की, आजोबा एकदा त्यांना म्हणाले होते की, ‘माणूस अन्य कश्याशिवाय राहू शकेल पण अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाही.’

सचिन यांची काही जमिन होती, मात्र पिकांचे ज्ञान नव्हते की कोणते पिक त्यांना किमान नफा मिळवून देवू शकेल. काही काळ शेतीमध्ये गुंतवणूक केल्यावर त्यांच्या लक्षात आले की येथे मुख्य प्रश्न आहे मजूरांचा, त्यांच्या गावातील मजूर कामाच्या शोधात देशाच्या अन्य भागात जातात. त्यांनी विचार केला की, या लोकांना जर गावातच काम मिळाले तर ते बाहेर जाणार नाहीत. असे असले तरी त्यांचे स्वप्न मोठे होते आणि त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांनी शेतक-यांच्या जागा भाड्याने घेण्यास सुरूवात केली, आणि वेगेवगळ्या प्रकारची शेती करण्यास सुरूवात केली. या कामात त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या १५ वर्षांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देखील गुंतवली.

सचिन यांना त्यांच्याकडुन शंभर टक्के प्रयत्न करायचे होते, त्यात त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. त्यांना नेहमी हीच भिती होती की जर हे सारे फसले तर त्यांना पूर्वीच्या नोकरीत परत जावे लागेल जे त्यांना करायचे नव्हते. त्यांचे प्रयत्न आणि मेहनत वाया गेली नाही, आणि त्यांनी करून दाखवलेच. सध्या सचिन यांच्या शेतीशी १३७ शेतकरी सलग्न आहेत, जे दोनशे एकर पेक्षा जास्त जमिनीवर काम करतात. त्य़ांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या घरात आहे.

त्यांच्या पत्नी कल्याणी देखील त्यांच्यासोबत काम करतात. त्यांनी मास कम्यूनिकेशन मध्ये पदवी मिळवली आहे, आणि कंपनीची वित्तीय जबाबदारी सांभाळतात. सचिन यांचे पुढचे स्वप्न आहे की, त्यांच्या कंपनीची नोंदणी एक दिवस मुंबई शेअर बाजारात व्हावी!