संकटाला संधीत रुपांतरीत करत आहे, मराठवाड्यातील जनता आणि सेवाभावी संस्थांची जलसंधारणाची कामे!

संकटाला संधीत रुपांतरीत करत आहे, मराठवाड्यातील जनता आणि सेवाभावी संस्थांची जलसंधारणाची कामे!

Monday May 23, 2016,

4 min Read


असे म्हणतात की मोठ्यातले मोठे संकट आले तरी त्याला संधीत रुपांतरीत करण्याची हिंमत असेल तर संकट हे संकट राहातच नाही तर पुढच्या काळातील उज्वल भविष्याची ती नवी वाट देणारी अनमोल पर्वणी ठरते. सध्या राज्यात पडलेल्या दुष्काळात अनेक संस्था, लोकचळवळीतून दुष्काळ निवारण्याची कामे सुरू झाली आहेत. राज्यात आज भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर लोक खडबडून जागे झाले आहेत. राष्ट्रीय जल बिरादरी, जलयुक्त शिवार, शिवजलक्रांती अश्या अनेक नावांनी ही कामे सुरू झाली आहेत.

चार वर्षापूर्वी धुळे जिल्ह्यात शिरपूर पँटर्न राबविण्यात आला त्याचे अनुकरण करण्याचे त्यावेळी काही गावांनी ठरवले आणि आज मराठवाड्यात सर्वत्र भीषण स्थिती असताना या तीन गावात मात्र त्याच्या फारच कमी झळा लागल्या आहेत. शिरपूर पॅटर्नची चर्चा खूप झाली त्यावर टिका-टिपण्णी देखील झाली मात्र ही पध्दती कमी खर्चाची आणि निश्चित प्रकारे उपयोगी असल्याचे सिध्द झाले आहे ते देखील दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तीन गावात त्यांची नावे आहेत, दैत्यनांदूर,एकनाथ वाडी आणि बलमटाकळी.

image


दैत्यनांदूर या गावाच्या ८४०हेक्टर परिसरात ४००पेक्षा जास्त विहीरी आहेत. उन्हाळा सुरू झाला की या गावात आणि बाजूच्या वाड्या वस्त्यातून लोकांचे स्थलांतर सुरु व्हायचे, शहराकडे पाणि आणि रोजगार मिळवण्यासाठी हे लोक बाहेर पडत असत. पाऊस सुरू झाला की ते गावाकडे येत असत. पण सन २०१२-१३ मध्ये या गावाने एक निर्णय घेतला शिरपूर पध्दतीने पाण्याचे संवर्धन करण्याचा,आता या गावातील लोक दोन पिके घेतात आणि गाव सोडून अगदी मे अखेरीस देखील बाहेर जात नाहीत. दैत्यनांदूर गावातल्या ज्या विहीरी मे २०१३मध्ये कोरड्या हो्त्या आज भरलेल्या दिसतात.

image


दुसरे गाव आहे एकनाथ वाडी. या गावाची कहाणी देखील सारखीच आहे. या गावाला टंचाईच्या काळात चार टँकर सुरू कराचे लागत त्यांचा रोजचा खर्च वीस हजार रुपये होता. हा आर्थिक भार सहन करन्यासाठी गावक-यांनी एक निधी उभारला होता. त्यातूनच मग हा पैसा टँकरला देण्या ऐवजी शिरपूर पध्दतीवर खर्च करावा असा विचार करत १८लाख रुपयांचा निधी उभारला गेला. मात्र तरीही काही शेतक-यांनी याला विरोध केलाच कारण त्यांच्या शेतात शिरपूर पध्दतीसाठी खणायला त्यांची अनुमती नव्हती. मात्र त्यांना विश्वासात घेऊन यातून काय फायदे मिळतील हे पटवून देण्यात आले. आता या गावातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. केवळ पिण्याचे पाणीच नाहीतर सिंचनाच्या पाण्यासाठी देखील या लोकांना मुबलक पाण्याचा वापर करता येणे शक्य झाले आहे. शिरपूर पध्दतीने जलसंवर्धन ्सांगतात. २०१३नंतरच्या एक दोन वर्षात कमी पर्जन्यमान झाले तरीही या गांवांना आवश्यक पाणी मिळाले आहे. शिवाय शिरपूर पध्दतीच काम करताना करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांचाही त्यांना आता वाहतुकीसाठी उपयोग होतो आहे ते वेगळेच!

image


बलमटाकळी या गावाच्या ग्रामपंचायतीने देखील ठराव करून शिरपूर पध्दतीने कामे केली होती. तीन वर्षापूर्वी केलेल्या या कामांचा आज मराठवाड्यात आजुबाजुला भीषण स्थिती असताना या गावाला फायदा झाल्याचे प्रकर्षांने दिसून आले आहे. या गावाच्या परिसरात पावसाचे प्रमाण नेहमीच तीनशे सेमी पेक्षा जास्त नसते. तसेच यावर्षी सुध्दा झाले त्यामुळे या गावात यंदा पाण्याची पुन्हा टंचाईस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नव्याने उपाय योजना करण्याचा विचार केला जात आहे.

लातूर आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी शिरपूर पध्दतीने पाण्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. पावसाचे येणारे पाणी साठवण्याची सारी तयारी या दोन जिल्ह्यात सध्या केली जात आहे. या शिवाय पिक पध्दतीत कमीत कमी पाणी वापरून कसे चांगले पीक घेता येईल हा विचार सुरू झाला आहे. शिरपूर पध्दतीच्या कामांना जरी आता सा-यांनी मागणी केली असली तरी त्याच्या उपयुक्त ते साठी काही गोष्टी आवश्यक असतात हे देखील लक्षात आले आहे.

image


“हा काही चमत्कार नाही ही पाण्याचा प्रत्येक थेब वाचविण्याची शास्त्रीय पध्दती आहे. कोणत्या प्रकारच्या जमिनीत कोणत्या प्रकारे पाणी साठवून मुरवता येईल याचा अभ्यास करून केली जाणारी ही पध्दत आहे. रोजगार हमी सारख्या कार्यक्रमातून ही कामे होणार नाहीत” असे या प्रयोगाचे जनक सुरेश खानापूरकर यांचे म्हणणे आहे.

साधारणपणाने ६०० दशलक्ष घनमिटर पाणी अडविण्यासाठी ८० कोटी रुपयांचा खर्च आला असता त्यातही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नि्र्माण झाले असते तसे न करता केवळ २० कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणूकीतून ९१ लहान सिमेंट बंधारे शिरपूर परिसरात घेण्यात आले आणि या भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावला असा हा शिरपूर पध्दतीचा मुळचा करिष्मा आहे.

राष्ट्रीय जल बिरादरी या जलतज्ञ राजेंद्र सिंग यांच्या चळवळीच्या माध्यमातूनही या शिरपूर पध्दतीच्या कामांना गौरविण्यात आले आहे. मराठवाड्यात सध्या सिंग यांना अनेक ठिकाणी नदी पुनुरुज्जीवन आणि पुनर्भरणाच्या कामांवर देखरेख करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात त्यांची कामे सुरू आहेत. जलबिरादरीचे राज्याचे प्रमुख सुनिल जोशी यांनी संगितले की, “ पाणी वाहून नेणा-या नाल्यांना पूर येतील आणि यावेळी पावसात त्यातील पाणी वाहून जाणार नाहीतर साठवले जाईल. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे यावर आता लक्ष दिले जात आहे.”

या दुष्काळाने लोकांना खरेच जागे केले आहे येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे भाकीत केले जात आहे या पावसानंतर झालेल्या मराठवाड्यातील विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांची कसोटी लागणार आहे. निसर्गाच्या संकटाला माणसाच्या प्रयत्नातून कसे दूर करता येते याचा हा इतिहास लिहिला जाणार आहे. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

'जलदिंडी' करतेय नदी संवर्धनाचा जागर

दुष्काळग्रस्त उत्तर महाराष्ट्रात शिरपूर पॅटर्नची जलक्रांती करणारे आधुनिक भगिरथ : सुरेश खानापूरकर

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !