मुंबईत सुरु झाले ‘एक्स्पो इंडोनेशिया' प्रदर्शन

0

भारत आणि इंडोनेशियात पूर्वीपासून सौहार्दपूर्ण संबंध आहेत. ‘एक्स्पो इंडोनेशिया 2016’ सारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘एक्स्पो इंडोनेशिया 2016’ प्रदर्शनाचे आयोजन कौन्सिल जनरल, रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे केले आहे. त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.


यावेळी  देसाई यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट दिली. यामध्ये वस्त्र प्रावरणे, सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, खाद्यपदार्थ, पर्यटन कक्ष, हस्तकला वस्तू आदी कक्ष आहेत. हे प्रदर्शन दि. 12 नोव्हेंबर 2016 पर्यंत खुले आहे. या प्रदर्शनामध्ये इंडोनेशियातील 50 कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. 

देसाई म्हणाले की, भक्कम पायाभूत सुविधा, जमीन, पाणी तसेच कौशल्य विकसित मनुष्यबळ यामुळे महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे इंडोनेशियन कंपन्यांकडून राज्यात गुंतवणूक केली जात आहे. या कंपन्यांनी नागपूरमध्येही गुंतवणूक केली आहे.