वयाच्या ९१व्यावर्षी सुध्दा, स्वत: रुग्णाईत असताना ६४वर्षापासून डॉक्टर भक्ति यादव करत आहेत विनामुल्य सेवा-उपचार!

0

लोकांची सेवा करण्याची जिद्द असेल तर, त्याला वय आणि कुठल्याही आजाराचे बंधन नसते. ही कहाणी आहे ९१वर्षांच्या एका अशा डॉक्टरची, ज्यांना अनेक आजार होते. त्यांना पूर्णवेळ खाटेवरच रहावे लागत होते. मात्र त्यांची लोकांना सेवा देण्याची जिद्द अशी की, त्यांना त्यांच्या आजाराने देखील जखडले नाही.

वय ९१वर्ष, वजन केवळ २८किलो, आजार असूनही लोकांच्या सेवेची जिद्द इतकी की, दु:खी आवाज ऐकूनही त्या झटक्यात उभ्या राहतात. हीच ओळख आहे डॉ. भक्ती यादव यांची. ज्यांनी आपल्या आयुष्याची ६४वर्ष लोकांच्या सेवेत व्यतीत केली. या परिस्थितीत देखील मध्यरात्री जर एखाद्या रुग्णाने त्यांचा दरवाजा ठोठावला तर, डॉ. भक्ती यादव उठून त्वरित त्यांचा उपचार करत असत. डॉ. भक्ती खूप पैसा कमवून एशो आरामात आपले जीवन व्यतीत करू शकल्या असत्या. परंतु त्यांनी पैशां व्यतिरिक्त लोकांची सेवा करण्याकडे जास्त महत्व दिले. आपल्या ६४वर्षांच्या कारकिर्दीत डॉ. भक्ती यांनी ६०हजारापेक्षा अधिक महिलांची सामान्य प्रसूती देखील केली आहे. मात्र कधीही त्यांच्या रुग्णालयात डॉक्टरांना भेटण्याची वेळ, डॉक्टराचे सेवा मुल्य यांसारखी कोणतीही सक्ती नव्हती. कारण त्या २४तास आपल्या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध रहात असत आणि कुणालाही कधी त्यांनी आपले सेवामुल्य मागितले नाही. संपन्न कुटुंबातील रुग्ण स्वखुशीने त्यांना त्यांच्या सेवेचे मुल्य द्यायचे. मात्र गरीब मजूरांकडून पैसे घेणे त्यांच्यासाठी पाप करण्यासारखे होते. डॉ. भक्ती यादव यांची कहाणी देखील संघर्ष आणि मानव सेवा अभियानाची वेगळी कहाणी आहे. 

भक्ती यांचा जन्म उज्जैन जवळील महिद्पूर भागात ३एप्रिल १९२६ला झाला. भक्ती यांचे कुटुंब महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होते. १९३७मध्ये मुलींना साक्षर करण्याबाबत कुणी विचारच करत नव्हते. विशेषकरून गावात तर अजिबात नाही. मात्र, जेव्हा भक्ती यांनी पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना नातेवाईकांकडे गरोठ गावात पाठविले. तेथे देखील सातवीपर्यंतच शाळा होती. त्यामुळे पुन्हा भक्ती पुढील शिक्षणासाठी घरच्यांना भिडल्या. भक्ती यांचे पिता त्यांना इंदौरला घेऊन आले आणि इंदौरच्या अहिल्या आश्रम शाळेत त्यांना दाखल केले. कारण त्यावेळी इंदौरमध्ये तीच एकमेव मुलींची शाळा होती, जेथे वसतिगृहाची सुविधा होती. येथून ११वी चे शिक्षण घेतल्यानंतर भक्ती यांनी इंदौरच्या होळकर विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बीएससी वर्षात महाविद्यालयात अव्वल आल्या. त्या दरम्यान महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज (एमजीएम) मध्ये एमबीबीएस चा अभ्यासक्रम सुरु झाला होता. भक्ती शिक्षणात अव्वल होत्या, त्यामुळे मेट्रीकुलेशनच्या चांगल्या गुणांमुळे त्यांना प्रवेश मिळाला. एकूण ४०विद्यार्थी एमबीबीएससाठी निवडण्यात आले, ज्यातील ३९मुले होती आणि भक्ती मुलींमध्ये एकुलत्या एक होत्या. भक्ती एमजीएम मेडिकल महाविद्यालयामधील एमबीबीएसच्या पहिल्या श्रेणीतील पहिल्या महिला विद्यार्थी होत्या, सोबतच मध्यभारतातील देखील त्या पहिल्या महिला विद्यार्थी होत्या. ज्यांची एमबीबीएसमध्ये निवड झाली होती. १९५२मध्ये एमबीबीएस करून डॉक्टर बनल्या. त्यानंतर डॉ. भक्ती यांनी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातून एमएस केले. १९५७मध्येच डॉ. भक्ती यांनी सोबतच शिकणा-या डॉक्टर चंद्रसिंह यादव यांच्याशी प्रेम विवाह केला. 

डॉ. भक्ती यांच्या पतिने देखील डॉक्टरची नोकरी केवळ लोकांची सेवा करण्यासाठी केली. त्यांच्या शहरातील मोठ्या सरकारी रुग्णालयात त्यांना नोकरी करण्यासाठी बोलाविण्यात आले, मात्र डॉ. यादव यांनी इंदौरच्या मिल भागातील बिमा रुग्णालयाची निवड केली. जेथून त्याच रुग्णालयात नोकरी करताना रुग्णांची सेवा करायचे. डॉ. यादव यांना इंदौर मध्ये ‘कामगार डॉक्टर’ या नावाने ओळखले जायचे.

डॉ. भक्ती देखील आपल्या पतीच्या  पावलावर पाउल देऊन चालायला लागल्या. डॉक्टर बनल्यानंतर इंदौरचे सरकारी रुग्णालय महाराजा यशवंतराव रुग्णालयात त्यांची नोकरी लागली. मात्र भक्ती यांनी सरकारी नोकरीला नकार दिला. कारण हे होते की, इंदौर त्यावेळी कपडा गिरणी नगरी च्या नावाने प्रसिद्ध होते. देशातील मोठ मोठ्या कापड गिरण्या येथे होत्या. मात्र कामगारांच्या स्वास्थ्यावर सरकारचे इतके लक्ष नव्हते. विशेषकरून कामगारांच्या घरातील महिलांची परिस्थिती खूपच दयनीय होती. इंदौरच्या भंडारी मिल ने नंदलाल भंडारी प्रसूती गृहाच्या नावाने एक रुग्णालय उघडले, जेथे डॉ. भक्ती यांनी स्त्रीरोग विशेषज्ञ म्हणून नोकरी केली. रुग्णालयात येणा-या गरीब महिलांची सेवा करून डॉ. भक्ती यांच्या मनाला दिलासा मिळत होता. त्यानंतर भक्ती यांना लोकांची सेवा करण्याची अशी आवड निर्माण झाली की, डॉ. दांपत्याने रुग्णालयाच्या बाजूलाच आपल्या जमा पुंजीने घर विकत घेतले. रुग्णांकडे जास्त लक्ष देणे सुरु केले. मात्र हळू हळू कपड्यांच्या गिरण्या बंद होण्यास सुरुवात झाली. १९७८मध्ये भंडारी गिरणीवर देखील टाळे लागले आणि भंडारी रुग्णालय देखील बंद झाले. डॉ. यादव दांपत्याच्या नातेवाईकांनी आणि भेटणा-यांनी त्यांना समजाविले की, आता येथे काहीच शिल्लक राहिलेले नाही, एखाद्या चांगल्या रुग्णालयात नोकरी केली पाहिजे. मात्र, डॉ. भक्ती आणि त्यांच्या पतीने गरिबांसाठी आपले संपूर्ण आयुष्य दिले होते. डॉ. भक्ती यांना माहित  होते की, या भागात महिलांसाठी कुठले रुग्णालय किंवा संस्था नाही. 

अशातच त्यांनी निश्चय केला की, ते आपल्या घरातच महिलांच्या उपचाराची व्यवस्था करतील. ‘वात्सल्य’ या नावाने त्यांनी घरातील खालच्या मजल्यावर नर्सिंग होमची सुरुवात केली. डॉ. भक्ती यांचे नाव आजूबाजूच्या भागात देखील खूप प्रसिद्ध होते. जे संपन्न कुटुंबातील रुग्ण यायचे, त्यांच्याकडून केवळ नावाला पैसे घेतले जायचे, जेणेकरून ते स्वतःचे पालन पोषण करू शकतील आणि गरीब रुग्णांची सेवा करू शकतील. तेव्हापासूनच आजपर्यंत डॉ. भक्ती यांनी रुग्णांची सेवा सुरु ठेवली आहे.

२०१४मध्ये डॉ. चंद्र्सिंह यादव यांचे निधन झाले. आपल्या ८९वर्षापर्यंत ते रुग्णांची सेवा करत राहिले. डॉ. भक्ती यांना ६वर्षापूर्वी अस्टियोपोरोसिस नावाचा भयानक आजार झाला, ज्यामुळे त्यांचे वजन सलग कमी होत जाऊन २८किलो राहिले. मात्र त्यांची जिद्द कमी झाली नाही. वयाच्या या टप्प्यावर देखील त्यांच्याकडे येणा-या रुग्णांना त्या कधी निराश करत नाहीत. त्यांच्याबद्दल सांगितले जाते की, त्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायच्या की, प्रसूती  शस्त्रक्रिया न करताच व्हावी. जेव्हा स्थिती विपरीत असेल तेव्हाच त्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला द्यायच्या. त्यांचा विश्वास आहे की, शस्त्रक्रियेशिवायचं प्रसूती केली जाऊ शकते. त्यांच्या याच विश्वासामुळेच इंदौरच नव्हे तर, प्रदेशातील बाहेरून देखील महिला त्यांच्याकडे येत असतात. डॉ. भक्ती यांना आपल्या सेवेसाठी सात वर्षापूर्वी डॉ. मुखर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच वर्षी २६जानेवारीला टेक्सटाईल एम्पलॉइज एसोसिएशनने त्यांचा सम्मान केला. 

डॉ. भक्ती यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “मी जेव्हा कारकिर्दीला निवडले तेव्हा, हे निश्चित केले होते की, डॉक्टरी माझे लक्ष्य असेल व्यवसाय नाही. आजही माझी हीच इच्छा आहे की, आपले काम करत असतानाच मी माझा अखेरचा श्वास घ्यावा. माझे पती सेवा करण्याची अशी एक दिशा देऊन गेले, ज्याने माझा जीवन जगण्याचा हेतू  यशस्वी केला.”

त्यांनी सांगितले की, “ज्यावेळी मी आणि माझे पति यांनी नर्सिंग होम सुरु केले होते, तेव्हा आमच्याकडे पुरेशी साधने नव्हती आणि विजेची व्यवस्था देखील मुबलक नव्हती. मात्र, यामुळे आम्ही कधीच रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली की, वीज नसायची, प्रसूती करणे देखील खूप गरजेचे होते. तेव्हा कंदील आणि मेणबत्तीच्या प्रकाशाच्या मदतीने प्रसुती करण्यात येत असत. या नोकरीत आल्यानंतर प्रत्येक दिवशी जवळपास ५-८ प्रसूति केल्या. त्यावेळी रुग्णांची दिवस रात्र रांग लागलेली असायची. घर आणि मुलांसाठी वेळ खूप मुश्किलीने मिळत होता.”

आज देखील या परिस्थितीत डॉ. भक्ती प्रत्येक दिवस २-३रुग्णांचा उपचार करतात. तर त्यांचा मुलगा रमण देखील डॉक्टर आहे आणि आपल्या आईला ते सहकार्य करतात. डॉ. रमण यादव देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल देत चालत आहेत. ६७वर्षाच्या वयात देखील याच भागात गरीब कुटुंबियांकडून केवळ नावाला सेवेचे मूल्य स्विकारतात. अस्टियोपोरोसिस सारख्या गंभीर आजारामुळे त्यांचे वजन कमी होत आहे. कमजोरी अधिक असल्यामुळे १५दिवसापूर्वी डॉ. भक्ती पडल्या. मात्र, त्यामुळे त्यांची सेवा करण्याचे काम थांबले नाही. डॉ. भक्ती यांचा मुलगा डॉ. रमण यादव यांचे म्हणणे आहे की, “माझ्या आईने कधीच कुठल्याही पुरस्कारासाठी काम केले नाही. मात्र, त्या ज्या पुरस्काराच्या मानकरी होत्या, तो सम्मान त्यांना सरकारने कधी दिला नाही.”

लेखक : सचीन शर्मा
अनुवाद : किशोर आपटे