स्वप्नांमागे अहोरात्र… ‘वंदना’ मेहरोत्रांची!

स्वप्नांमागे अहोरात्र… ‘वंदना’ मेहरोत्रांची!

Sunday November 08, 2015,

7 min Read

वंदना मेहरोत्रा म्हणतात, ‘‘मी सतत कार्यरत असते. हो आणि मी स्वप्नेही बघते. स्वप्नांमागे धावते. स्वप्नांच्या सतत मागावर असते. अगदी अहोरात्र. स्वप्ने फार पुढे दिसत असली तरी मी त्यांचा माग सोडत नाही. पिच्छा पुरवते. भीत नाही, की थकत नाही.’’

वंदना हे असे नुसतेच बोलत नाहीत, तसे त्या जगतात. Meteonic हा वंदना यांचा पहिलवहिला उपक्रम. ‘सीएनबीसी इंडिया’वर त्यासंदर्भात एकदा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. माहिती प्रौद्योगिकी सेवा, कर्मचारी प्रशिक्षण, खाण्या-पिण्याचे पदार्थ, छंद, दागदागिने आणि तयार कपडे आदी नाना तऱ्हांच्या व्यवसायांमध्ये वंदना यांनी मनसोक्त मुशाफरी केलीच, या सगळ्याच गोष्टींसह गेल्या काही वर्षांतच आणखीही अन्य व्यावसायिक उपक्रम वंदना यांनी सुरू केले.

मातृ-पितृ ऋणात कायम...

वंदना यांचा जन्म विदर्भातल्या नागपुरातला. बालपणीच त्यांना एका संकटाचा सामना करावा लागला. वडिलांना झालेल्या एका अपघाताने अवघे कुटुंबच हादरून गेले. वंदना ५ वर्षांच्या होत्या. वडिल दोन वर्षे दवाखान्यात पडून होते. डावा पाय निकामी झालेला होता. वंदना त्या आठवणींनी आजही थरारतात. ‘‘खरं तर मी लहान होते, पण मला कळत सगळं होतं. वडील सरकारी नोकरीत होते. पगारही बंद झालेला होता. आईला कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. इतक्या विपरित परिस्थितीतही आई-वडिलांनी माझे शिक्षण थांबवण्याचा विचार कधीही केला नाही. मला शिकण्याची प्रत्येक संधी मिळावी आणि शाळेतही मी हुशार म्हणून गणली जावी, असा त्यांचा अट्टाहास असे. आज मी जे काही आहे ते शिक्षणाच्याच बळावर आहे. मातृ-पितृ ऋणातून तर मी कधीही उतराई होऊ शकत नाही आणि शकणारही नाही.’’

image


वंदना पुढे सांगतात, ‘‘मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा मला जे काही वाटते ते कृतींत आणायला अर्थातच मर्यादा होत्या. आणि हे स्वाभाविकही आहे, पण तरीही माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास होता, हे मला नोकरी करताना बळ देणारे ठरले.’’

वंदना इंजिनिअर आहेत आणि ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’च्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केलेली होती. इथे त्यांनी १९९७ ते २००७ पर्यंत काम केले. अर्थात त्यांची ही पहिली नोकरी एवढी सोपीही नव्हती…

नागपूर विद्यापीठातून पदवी

१९९६ मध्ये नागपूर विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली. …आणि त्यानंतर… त्यांच्याच शब्दांत ‘‘त्या वेळेला आज होतात तसे कॅम्पस्‌ इंटरव्ह्यू होत नव्हते. तरीही शिकत असतानाच पहिली नोकरी माझ्यापर्यंत चालत आलेली होती. मी तिथे महिनाभर काम केले. मग पुढे रामदेव बाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजात व्याख्याता म्हणून लागले. मला एमबीए करायचे होते. मला वाटले हीच वेळ आहे, पण दुर्दैवाने CAT परीक्षेत मी पास होऊ शकले नाही. म्हणून मग मी आपले शिकवणे सुरू ठेवले.’’

वंदना यांच्या अध्यापन शैलीवर विद्यार्थी खुश असत. पण वंदना यांना मात्र समाधान नव्हते. शिकवणे आवडत नव्हते, असेही नाही, पण नेहमी असे वाटत असे, की आपण काही तरी भव्यदिव्य असे करायला हवे. आपण त्यासाठीच आहोत. आपली जडणघडणच भव्य असं काही घडवण्यासाठी आहे. नोकरी मिळणार नाही, ही फिकिर त्यांना नव्हतीच, चांगली संधी मिळेल, की नाही ही चिंता होती. रामदेव बाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजची नोकरी सोडून त्या भावाकडे अहमदाबादला आल्या. व्यवस्थापनाशी संबंधित काही कोर्सेस इथे पूर्ण केले. प्रशिक्षक म्हणून काही दिवस पुन्हा नोकरी केली आणि पुढे लगेचच एप्रिल १९९९ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस्‌मध्ये त्यांना संधी मिळाली.

‘टाटा’तील अनुभवांनी समृद्ध

वंदना सांगतात, ‘‘इथेच माझ्या आयुष्याला वळण मिळाले. टाटा कन्सल्टन्सीमध्ये असताना मला खूप शिकायला मिळाले. मला तिथे जवळपास ५०० कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. न्यू जर्सीत एक आउटसोर्सिंग स्किमही मी कंपनीसाठी राबवली. दोनवरून ८० लोकांपर्यंत या योजनेने मजल गाठली. भारतात परतल्यावर इथेही अशीच एक टीम बनवली.’’

२००३ पर्यंत टाटा कन्स्टल्टन्सी सर्व्हिसेसची नोकरी मजेत चाललेली होती आणि अशात वंदना यांना ‘मॅटर्निटी लिव्ह’ (गर्भारपणाची रजा) घ्यावी लागली. वंदना सांगतात, ‘‘नोव्हेंबरमध्ये प्रसूती ठरलेली होती. पाच महिने मी कामावर जाऊ शकले नाही. याचदरम्यान नेमके कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे समीक्षण आणि मूल्यांकन केले जाते. माझ्यावर यात अन्याय करण्यात आला. माझ्याशी कुठलीही चर्चा न करता मला सुमार दर्जा देण्यात आला. मी हतोत्साहित झाले. कारण मी कंपनीसाठी खूप काही केलेले होते.’’

‘‘२००५ मध्ये जेव्हा माझ्या लेकीचा जन्म झाला. माझ्यासंदर्भात अन्यायाचीच पुनरावृत्ती झाली. लागोपाठ तीन वर्षांत पाचपैकी चार असे गुण प्राप्त झाले तरच आमच्या कार्यालयात पदोन्नती दिली जात असे. म्हणजे तेव्हा हा नियमच होता. एखाद्या वर्षी जरी कमी गुण मिळाले तर पुढल्या पदोन्नतीसाठी कमीत कमी २०१० पर्यंत वाट पाहणे आले होते.’’

image


‘माझा पती, माझा सोबती’

वंदना यांनी मग स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू केला. पतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणतात, ‘‘माझे पती माझ्यासाठी फारच हळवे आहेत आणि माझ्या प्रत्येक निर्णयाला त्यांचे पाठबळ असते. नोकरी सोडण्याचा असो अगर व्यवसाय सुरू करण्याचा माझ्या कुठल्याही निर्णयाला त्यांनी हरकत तर घेतली नाहीच, उलट तू जे करशील ते योग्यच करशील, असा विश्वास दाखवला.’’

२००६ नंतर वंदना बाजार आणि व्यवसाय-उद्यमांसंदर्भात माहिती मिळवत राहिल्या. विचार करत राहिल्या, की काय, कसे आणि कुठे सुरू करावे?

‘‘मी हॉटेल आणि रेस्टॉरंटसंबंधित माहिती घेत राहिले. सर्वांत आधी मी या व्यवसायांशी संबंधित आकडे आणि कामाच्या पद्धतींबाबत जाणून घेतले. फ्रेंचायझीचाही शोध घेतला. पण मग मला वाटले अरे यात नफ्याचे प्रमाण कमी आहे आणि त्या तुलनेत कष्ट मात्र फारच आहेत.’’

अपयशातून आली उभारी

आपल्या मर्यादा आणि शक्तिस्थळे नेमकी जोखल्यानंतर वंदना यांनी ठरवले, की आपण तेच काम करायचे ज्याची आपल्याला आधीच माहिती आहे. मग त्यांनी माहिती प्रौद्योगिकीत स्वत:ला आजमवावे, असे ठरवले. पती अंकुर यांना सोबत घेत त्यांनी आपली कंपनी Meteonic या नावाने नोंदवली. त्या सांगतात, ‘‘आम्ही स्वतंत्र उत्पादन सुरू करू इच्छित होतो, पण त्यासाठी पुरेशा भांडवलाची उणीव होती. मग आम्ही आधी सेवा क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न केला.’’ वंदना यांनी आपल्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी २०० हून अधिक कंपन्यांना ईमेल पाठवले. उद्यमी म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याच्या दिशेने वंदना यांचे हे पहिले पाउल होते. ‘‘चार ते सहा महिने आम्ही ईमेल पाठवतच राहिलो, पण कुणाकडूनही उत्तर आले नाही. इनबॉक्समध्येच आमचे मेल सडत राहिले. आमचे डोळे उघडले. कुणी आमचे मेल उघडूनही न पाहणे म्हणजे आमच्यासाठी एक इशाराच होता. वास्तवाचे भान आम्हाला आले. प्रस्थापित कंपन्यांशी मुकाबला करत कुठल्याही नव्या कंपनीला स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळणे हे किती मोठे दिव्य असते, ते कळले. अपयशाने आम्हाला अधिक ताकद दिली. मनापासून काम करण्याची प्रेरणा दिली.’’

अन्‌ रुंदावली संपर्ककक्षा

रस्त्यात खुप अडथळे आले आणि तेव्हा वंदना यांनी दुसऱ्यांदा आपली संपूर्ण योजना तपासून पाहण्याचा निर्णय घेतला. वंदना सांगतात, ‘‘कर्मचारी पुरवणे आणि प्रशिक्षण देणे या सेवा आम्ही सुरू केल्या होत्या. पण नफा बाजूलाच राहिला, त्यातनं आमचे रोजचे लहानसहान खर्चही भागत नव्हते. मग आमच्या लक्षात आले, की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर टूल्स असतात. कंपन्या हे टूल्स वापरतात, पण त्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांना कुठलीही सेवा मिळत नाही. आम्हाला जणू अलीबाबाची गुहाच गवसली होती. काही कंपन्यांशी आम्ही बोललो. 'Klockwork' नावाच्या कंपनीशी पहिला करार केला. आमच्या कंपनीसाठी ही एक चांगली सुरवात होती. 'Klockwork' ही एक उच्च दर्जाची उत्पादने देणारी कंपनी आहे. लवकरच आमची संपर्ककक्षा रुंदावली आणि काही मोठ्या कंपन्यांशी आम्ही संलग्न झालो.’’

‘मंदी’बाई नावाची अवदसा...

दुर्दैवाने याच काळात मंदीची लाट आली आणि या सगळ्यांच्याच व्यापारावर त्याचा विपरित परिणाम झाला. ‘‘आमच्यासाठी तर हे धक्कादायक होते. आम्ही आताच कुठे चांगली सुरवात केलेली होती आणि अचानक ही अवदसा अवतरली. Meteonic कंपनीचे स्वरूप मुख्यत्वे माहिती प्रौद्योगिकी सेवा असेच ठेवत आम्ही इतर नव्या क्षेत्रांत पाउल ठेवायला निघालेलो होतो.’’ २००८ मध्ये वंदना यांनी लहान मुलांसाठी ‘छंद परिसर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष हा उपक्रम सुरू राहिला. खरं तर हा एक सामाजिक स्वरूपाचा उपक्रम होता. वंदना सांगतात, ‘‘मी हे पैसे कमवण्यासाठी नव्हतेच सुरू केले, पण आपण यातनं आपल्या पायावर उभे राहू शकू, अशी अपेक्षा जरूर होती. पण तसे काही घडले नाही आणि मी हा उपक्रम बंद केला. सगळ्या पालकांचे आणि शिक्षकांचे पैसे परत केले. नैतिकदृष्ट्या ते योग्यही होते. वंदना यांनी २०१२ मध्ये रेस्टॉरंट व्यवसायातही स्वत:ला आजमावले. विशेष म्हणजे यावेळी त्या यात यशस्वीही झाल्या. पण इथेही पण होताच. वंदना यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘‘…पण पुढे जाऊन आम्हाला असे वाटले, की अरे हे काम आपल्यालायक नाही. मग आम्ही हे रेस्टॉरंट विकून टाकले.’’ नंतर वंदना यांनी ‘गीतांजली ज्वेल्स’ची फ्रेंचायझी घेतली. आज वंदना यांचे स्टोअर ‘नगिना जेम्स’ नावाने प्रसिद्ध आहे. ‘गीतांजली ज्वेल्स’च्या सर्वांत मोठ्या दुकानांपैकी हे एक आहे.

यशासाठी हवे समर्पण

किरकोळ व्यापार म्हणजे नेमकी काय भानगड आहे, हे समजून घेण्यात वंदना यांना आठ वर्षे लागली. त्या सांगतात, ‘‘काही वर्षांपूर्वीपर्यंत किरकोळ विक्री व्यवसाय एक सुसंघटित व्यवसाय वगैरे नव्हता. माहिती प्रौद्योगिकीतले माझे सगळे ज्ञान आणि अनुभव मी त्यात ओतला आणि ही युक्ती उपयोगी आली. काही काळानंतर वंदना यांनी रेडिमेड कपड्यांचे दुकानही सुरू केले. ‘यू अँड यू (U&U) असे या दुकानाचे नाव आहे.

वंदना सांगतात, ‘‘नेमके काय करायचे आहे, त्याची योजना बनवण्यात आणि मग अंमलबजावणीत माझे धोरण नेहमी आक्रमक आणि तडकाफडकी असते. दुसरीकडे अंकुरला आपल्या क्षमतांवर आणि कष्टांवर कमालीचा विश्वास. माझ्या प्रत्येक कामात मला त्यांचे पाठबळ मिळत राहिले. माझ्या सगळ्याच उपक्रमांमध्ये त्यांचा हातभार मोलाचा ठरला. व्यवसायात नाहक होणारा खर्च टाळून नफ्याचे प्रमाण कसे वाढवता येते, हे मी माझ्या नवऱ्याकडूनच शिकले. काटकसर करण्यात अंकुरचा हातखंडा आहे. अंकुर घरगुती कामांत आणि जबाबदाऱ्यांतही मला नेहमी मदत करत आले.’’

इतक्या वर्षांतील अनुभवांतून काय शिकायला मिळाले, त्या संदर्भात वंदना सांगतात, ‘‘मी पराभव वा अपयशाने कधीही खचले नाही. कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी फार विचारही मी कधी केला नाही. खरंतर मला जेव्हा वाटते, की अरे हे काम मला चांगले वाटते आहे, तर मी त्यात हात टाकलाच म्हणून समजा. मग आपल्याला काहीही करून हे काम तडीस न्यायचेच आहे, असे ठामपणे ठरवून मी स्वत:ला त्या कामात संपूर्णपणे समर्पित करून टाकते, झोकून टाकते…’’