विदेशातील पैसा कमविण्याच्या अनेक संधी नाकारून प्रसिध्दीपासून दूर, सुवर्णपदक विजेत्या डॉ. दीप्ती देशातील गरजूंसाठी आजही तत्पर... !

0

वैद्यकीय क्षेत्रात आज सर्वत्र गरीब गरजू रुग्णांची जी सर्रासपणाने लूट केली जाते त्याचा अनुभव आपण सा-यांनी कधी ना कधी घेतलेलाच असेल. ‘डॉक्टर तुम्ही सुध्दा’ हे गाजलेले नाटकही याच विषयावर प्रकाश टाकणारे होते.एखाद्या आजाराची सुरूवात झाली की आपणांस डॉक्टरांची पायरी चढावीच लागते. आणि त्यावेळी आधी काय झाले आहे (रोगनिदान)ते तपासण्यासाठी काही चाचण्या करण्यास डॉक्टर सांगतात. अनेकदा या चाचण्या इतक्या महागड्या असतात की रुग्णांना ‘रोगबरा चाचण्या नको’ असा विचार मनात येतो. शहरी भागात ही गोष्ट इतक्या भयानक पध्दतीने अनुभवास येते तर ग्रामीण भागात जिथे सा-याच प्रकारच्या चाचण्या होतील की नाही याची शंका असते अशा भागात किती निकड असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशाच ग्रामीण भागात आपल्या कुटूंबियांसोबत गरीब गरजू रुग्णांना नक्षलग्रस्त भागात गेल्या चाळीस वर्षांपासून सेवा देत आहेत एसव्हीके डियग्नोस्टिक सेंटरच्या डॉ. दिप्ती कोठारी कुटूंबीय!

रेडिओलॉजी या विषयात देशात पहिला येण्याचा विक्रम केल्यानंतरही आणि विदेशातून नोकरीच्या मोठ्या ऑफर्स असतानाही देशातील दुर्गम भागात आपल्या गरजू रुग्णांना पैसा कमविण्याचा हेतू न ठेवता निरसलपणाने आणि प्रचार प्रसिध्दी यांपासून दूर राहून सेवा देण्याचा हा अनोखा उपक्रम चाळीस वर्षांपासून सुरु आहे.

कठोर मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तसेच प्रत्येक गोष्टीचे योग्य नियोजन यांचा ताळमेळ घातला गेला की, अशक्य असे काहीच नसते. हे सिद्ध करून दाखविले आहे डॉ. दीप्ती कोठारी - खजांची यांनी! ‘रेडिओडायग्नोसिस’च्या परीक्षेत सर्वात अधिक गुण मिळवून भारतातून पहिला येण्याचा मान डॉ. दीप्ती यांनी मिळवला तर आहेच, शिवाय त्यांना एन. बी. ई. तर्फे आयोजित १७व्या दीक्षांत सोहळ्यात तत्कालिन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते, डी. एन. बी. (डीप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड) ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच तत्कालिन लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांच्या हस्ते दीप्ती यांना सुवर्णपदक देखील प्रदान करण्यात आले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बोर्डातर्फे सदर परिक्षा घेण्यात येते. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये रेडिओलॉजिस्टची (रेडिओलॉजिकल) भूमिका अत्यंत महत्वाची असून, कुठल्याही आजाराचे निराकरण करण्यासाठी रेडिओलॉजिस्टची भूमिका महत्त्वपूर्ण असते. एखाद्या व्यक्तीस कोणता गंभीर आजार झाला आहे, हे शोधण्यासाठी रेडिओलॉजिस्टची नेहमीच मदत होत असते. छत्तिसगढच्या दुर्ग या नक्षल प्रभावित भागात डॉ दिप्ती आणि त्यांचे कुटूंबीय एसव्हीके डायग्नोस्टिक सेंटर चालवितात. हे काम करताना गरीब- गरजू रुग्णांना त्यांच्याकडे किती पैसे देण्याची क्षमता आहे हे न पाहता आवश्यक चाचण्या-उपचार करून दिले जातात.

सदर अभ्यासक्रमाची पदवी घेण्यासाठी डॉ. दीप्ती कोठारी यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली, १९९९–२००४ यावर्षात के. जे. सोमैय्या मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर येथून एम. बी. बी. एस. चा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी तेथेच एक वर्षाचा सराव केला. एम. बी. बी. एस.च्या प्रत्येक वर्षात त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी २००५ मध्ये त्यांनी महाराष्ट्र प्रवेश परीक्षा (पी. जी. एम. – सी. ई. टी.) दिली. सदर परीक्षेत दीप्ती या संपूर्ण महाराष्ट्रातून १८४व्या स्थानावर होत्या. आशियातील सर्वात मोठ्या ‘ट्रॉमा सेंट’र म्हणून ओळखल्या जाणा-या सायन रुग्णालयात डॉ. दीप्ती यांना डी. एम. आर. डी. च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. त्यानंतर २००७मध्ये घेण्यात आलेल्या डी. एम. आर. डी. च्या अंतिम परीक्षेत मुंबईच्या सर्व महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. २००८–२०१०मध्ये के. जे. सोमैय्या मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर येथून डी. एन. बी. हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या कालावधीत त्यांनी डिसेंबर२००९मध्ये लेखी तर, एप्रिल२०१०मध्ये प्रायोगिक परीक्षा दिली. या परीक्षांमध्ये त्यांनी अधिक गुण प्राप्त करून संपूर्ण भारतातून प्रथम येण्याचा मान मिळविला.

यासाठी त्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. सदर परीक्षा एन. बी. ई. (नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन न्यू दिल्ली)च्या वतीने एकाचवेळी संपूर्ण देशातून घेण्यात येते. एन. बी. ई. तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १७व्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डॉ. दीप्ती यांना नवी दिल्लीच्या सिरी सभागृहात गौरविण्यात आले. गौरन्वित झाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवा गावातील गरजूंना देण्याची इच्छा व्यक्त केली. वयाच्या २८व्या वर्षीच डॉ. दीप्ती यांनी जैन समुदायाचे नाव उंचाविले.

डॉ. दिप्ती यांचे सास-यांचे छत्तीसगढच्या दुर्ग या नक्षली भागात गेल्या चाळीस वर्षांपासूनचे क्लिनीक होते. या ठिकाणी समाजाच्या ‘नाहीरे’ घटकातील गरीब आदिवासी समाजातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा ते देत होते. डॉ. दिप्ती आणि त्यांच्या पतीनेही हाच वारसा पुढे सुरू करुन त्यात आणखी काही रुग्णसेवांची भर घालण्याचा निर्णय घेतला, विदेशातील मोठ्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या मायदेशातील गरीब-गरजूंना आपल्या वैद्यकिय शिक्षणातून उपयोग व्हावा ही भावना त्यामागे होती आणि आजच्या वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिकता पाहता ही खूप मोठीच गोष्ट म्हणावी लागेल. डॉ दिप्ती आणि त्यांच्या पतीने आपल्या घराण्याच्या निरपेक्ष वैद्यक सेवेचा वारसा पुढे चालवताना रुग्णांकडे किती पैसे आहेत हे कधीही पाहिले नाही. बस त्यांच्यावर उपचार करायचे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना निरामय करून पुढे जाण्याचा मार्ग द्यायचा इतकाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे. नक्षली समजला जाणारा हा भाग आता ब-याच प्रमाणात विकसित होत आहे. मात्र त्यावेळी येथील समस्या फारच वेगळ्या होत्या त्याबाबतच्या जुन्या वाईट आठवणींना उजाळा नको असाच त्यांचा आणि कुटूंबियांचा आग्रह असतो. आम्हाला आमचे काम करत राहायचे आहे त्याला प्रसिध्दी किंवा वाहवा नाही मिळाली तरी चालेल असा आपला आग्रह असल्याचे त्यांनी ‘युवर स्टोरी’शी बोलून दाखवले.

गेली अनेक वर्षे डॉ. दीप्ती गरीब रुग्णांच्या मदतीसाठी काम करत आहेत. त्यावेळी त्यांच्यासाठी काम करत असताना तेथील अनुभवाबाबत त्या सांगतात की, त्या लोकांना आणि तेथील जागेला बघून असे वाटत होते की, गरीब लोकांसाठी काम करणे किती गरजेचे आहे. डॉ. दीप्ती यांच्या या कामात त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना साथ दिली. तसेच लग्नानंतर देखील डॉ. दीप्ती यांनी आपल्या या कामाला पूर्णविराम लागू दिला नाही. आज त्या छत्तीसगढ येथील दुर्ग शहरात राहतात. ‘युअर स्टोरी’ला त्यांनी सांगितले की,

“अनेकदा विदेशातून मला आपली सेवा देण्यासाठी बोलाविण्यात आले. मात्र, त्यावेळी देखील मला भारतातच राहून गरिबांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा निर्णय घ्यावा असेच वाटले.” आज त्यांनी स्वतःचे सोनोग्राफी केंद्र उघडले आहे. या केंद्रात त्या प्रत्येक वर्गातील लोकांना आपल्या सेवा देऊ करतात. विशेष करून गरिबांसाठी त्या मोठ्या उत्साहाने काम करत असतात. डॉ. दीप्ती यांचे पती डॉ. दीपक कोठारी देखील प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांना देखील डीएनबी मध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. हे दोघेही मिळून आज गरीब रुग्णांसाठी आपल्या सेवा देऊ करतात. एखाद्या रुग्णाला त्याच्या आरोग्य तपासणीसाठी आवश्यक पैसे नसतील तरी या केंद्रातून कधी विन्मुख परत जावे लागत नाही त्याच्याकडे पैसे असोत नसोत त्यांच्यावरील वैद्यकीय चाचण्या आणि पुढील उपचारांची सुरूवात केली जाते. विदेशात जाऊन पैसा कमविण्याचा किंवा शहरी भागात जाऊन पैसा कमविण्याचा सर्रास मार्ग असताना हे दांपत्य आजही आपल्या कुटूंबिय़ासोबत या भागात कार्यरत आहे, त्यांना पैसा, प्रसिध्दी नसली तरी चालेल आमचे काम आम्हाला करु द्या असेच सांगायचे आहे.


working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte