'संस्कृती नृत्य कला मंदिर'च्या माध्यमातून कथ्थक नृत्यशैलीची जोपासना करणाऱ्या रुपाली देसाई

'संस्कृती नृत्य कला मंदिर'च्या माध्यमातून कथ्थक नृत्यशैलीची जोपासना करणाऱ्या रुपाली देसाई

Thursday April 07, 2016,

7 min Read

आठ भारतीय नृत्यप्रकारातील एक नृत्यप्रकार म्हणजे कथ्थक. हावभाव आणि हातापायाच्या हालचालींवरुन कथा सांगणे म्हणजे कथ्थक. याचा दुसरा अर्थ असा की, कथ्थक म्हणजे कथा सांगणारी शैली. आजकालच्या आधुनिक संगीत आणि नृत्यकलेत ही कला मागे पडत चालली आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र आजही ही नृत्यकला जपण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कथ्थकनर्तिका रुपाली देसाई. त्यांनी 'संस्कृती नृत्य कला मंदिर' नावाची संस्था सुरू केली आहे. या संस्थेत त्या गेली १९ वर्षे विद्यार्थ्यांना कथ्थकचे प्रशिक्षण देत असून, या संस्थेच्या सध्या चार शाखा आहेत. तसेच सध्या त्यांच्याकडे २२५ मुली कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहेत. रुपाली देसाई आणि त्यांच्या संस्थेच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले.

image


रुपाली यांचा जन्म ठाण्यातील एका कलेची साधना करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांचे वडिल चंद्रकांत वैद्य हे मराठी रंगभूमीची सेवा करत. स्वतःची नोकरी सांभाळून ते व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या आई प्रज्ञा वैद्य यांनी गायनात विशेष असे प्रशिक्षण घेतले नव्हते मात्र आवड म्हणून त्या संगीताची साधना करत होत्या. तसेच त्यांची आजी इंदिरा वैद्य यांनादेखील विणकाम, शिवणकामाची आवड होती. शिवाय त्या दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील चिकित्सक शाळेमध्ये याचे प्रशिक्षणदेखील द्यायच्या. त्यामुळे रुपाली यांच्या माहेरी कलेसाठी पोषक असे वातावरण होते. त्यामुळे आपल्याला घरातूनच कलेचे बाळकडू मिळाले, असे रुपाली सांगतात.

आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना रुपाली सांगतात की, 'माझा जन्म कलेची आवड असणाऱ्या, तिच्यावर प्रेम करणाऱ्या, तिची साधना करणाऱ्या कुटुंबात झाला. लहानपणी मला अभिनेत्री व्हायचे होते आणि मी माझ्या बाबांसमोर नेहमी ती इच्छा व्यक्त करुन दाखवायचे. त्यावेळी ते गंमत म्हणून त्यांच्या डायलॉगचा सराव मला घ्यायला सांगायचे. शालेय शिक्षण घेताना पाचव्या इयत्तेपासून मी विविध कार्यक्रमात भाग घेण्यास सुरुवात केली. स्वागतगीत, समूहगान, नाटकं आणि शाळेचा वार्षिकोत्सव यांमध्ये मी सक्रिय सहभागी होऊ लागले. मात्र माझा नृत्याशी संबंध माझी मैत्रीण अपर्णा कुलकर्णी हिच्यामुळे आला. आम्हाला शाळेतील नृत्याच्या कार्यक्रमात पहिले बक्षीस मिळाल्यानंतर मला नृत्य शिकावे, असे वाटू लागले. जसजशी शाळेच्या वार्षिकोत्सवामध्ये मी नृत्याच्या कार्य़क्रमात सहभागी होऊ लागले, तसतशी मी नृत्याकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले. मला गायनाचे शिक्षण तर घ्यायचे होतेच पण आता मी त्यासोबत मला नृत्याचे शिक्षणदेखील घ्यायचे आहे, असा प्रस्ताव घरी मांडला. त्यावेळी माझी आई अन्न आणि औषध प्रशासन विभागात नोकरी करत होती तर वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला होते. त्या दोघांनाही कामानिमित्त घरातून लवकर बाहेर पडावे लागत असे तसेच घरी परतण्यासाठीदेखील उशीर होत असे. त्यामुळे मी आणि माझ्या दोन भावंडांची जबाबदारी आमच्या आजीवर होती. तेव्हा मला घरातून असे सांगण्यात आले की, जेव्हा तू स्वतः नृत्याच्या क्लासला जाऊ शकशील, तेव्हाच तुला त्या क्लासेसला जाता येईल. त्यामुळे मला तेव्हा काही नृत्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करता आली नाही. मात्र मी शाळेच्या कार्यक्रमात, विविध सांस्कृतिक कार्यक्रमात जिथे जिथे मला सहभागी होता येईल, तिथे तिथे भाग घेऊ लागले. हल्ली ज्याप्रमाणे रिएलिटी शो, विविध स्पर्धा याद्वारे कलेला प्रोत्साहन दिले जाते, तशी परिस्थिती त्याकाळी नव्हती. मात्र दहावीनंतर मी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर अविरत मेहनत करुन मी कथ्थक विशारद ही पदवी संपादित केली. मी काही ठराविक ठिकाणीच स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि यशस्वीदेखील झाले.'

शाळेत असताना जेव्हा रुपाली यांनी पहिल्यांदा नृत्य करण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले, तेव्हाचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की, 'शाळेत असताना मी समूहगायन, स्वागतगीत गायन या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. मात्र जेव्हा मी नृत्य करण्यासाठी पहिल्यांदा व्यासपीठावर पाऊल ठेवले तेव्हा क्षणभरासाठी माझे संपूर्ण शरीर सुन्न झाल्यासारखे वाटत होते. मला संपूर्ण वातावरण एकदम वेगळं वाटत होतं आणि मी एका बाजूला होते. पण पार पडलं एकदाचं ते! आमच्या संघाला त्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले आणि त्यानंतर अधिक आत्मीयतेने नृत्याचे प्रशिक्षण घ्यावे, असे मला वाटू लागले.' रुपाली यांनी आजवर अनेक नाटकांमध्येदेखील विविध भूमिका साकारल्या आहेत तसेच विविध कार्य़क्रमाचे सूत्रसंचालनदेखील त्यांनी केले आहे. आपल्या आयुष्यातील या पैलूबद्दल बोलताना त्या सांगतात की, 'बाबांना नाटकात काम करताना पाहून लहानपणी मला त्यांच्याप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. मी जेव्हा १२वीचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हा माझ्या वडिलांनी हौशी रंगभूमीशी माझी ओळख करुन दिली. मुलूंडच्या रंगपराग संस्थेमधून मी पहिल्यांदा अडिच तासाचे नाटक केले. त्यातील नायिकेच्या भूमिकेकरिता मला राज्यनाट्यस्पर्धेत पदकदेखील मिळाले आणि मग मी दोन वर्षे अनेक एकांकिका, विविध स्पर्धा तसेच राज्य नाट्यस्पर्धेत विविध भूमिका साकारल्या. अशाप्रकारे माझा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. हळूहळू दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्ये मी झळकू लागले. त्याकाळी एकच चॅनेल असल्याने माझा चेहरा अनेक लोकांपर्यंत पोहोचला होता. तसेच मी अनेक कार्य़क्रमांचे निवेदनदेखील करू लागले होते. साधारण अभिनय क्षेत्रात जेव्हा मी अभिनेत्री म्हणून झळकत होते, तेव्हा मुंबई विद्यापीठातून मी आर्टसमध्ये पदवीपर्य़ंतचे शिक्षणदेखील पूर्ण केले होते तसेच माझी कथ्थक विशारदची परिक्षा पूर्ण झाली होती. त्यामुळे मी कथ्थकचे एकल सादरीकरण (सोलो परफॉमन्स) करू लागले होते.' रुपाली यांनी सुयोग निर्मित 'झालं एकदाचं', श्री चिंतामणी निर्मित 'उंच माझा झोका गं' आणि अस्मी थिएटर निर्मित 'असेच आम्ही सारे' या आणि अशा अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत.

image


वयाच्या २४व्या वर्षी रुपाली यांचा विवाह अभिनेते श्रीकांत देसाई यांच्यासोबत झाला. विशेष म्हणजे, रुपाली यांना सासरदेखील कलेची जोपासना करणारे मिळाले. त्याबद्दल बोलताना रुपाली सांगतात की, 'लग्न होऊन सासरी आल्यानंतर माझे आयुष्य संपूर्णपणे बदलून गेले होते. माझ्या घरच्यांचा कोणत्याही क्षेत्रात कारकिर्द घडविण्यास पाठिंबा होता. माझ्या गुरु डॉ. मंजिरी देव यांच्या आशीर्वादाने मी कथ्थक नृत्यामध्ये नृत्यालंकार करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने त्याची पहिली परिक्षादेखील उत्तीर्ण झाले.' दरम्यानच्या काळात रुपाली यांना त्यांच्या लहान मुलीमुळे मनाला थोडीशी मुरड घालावी लागली. मुलीचा सांभाळ करण्यासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी या सर्व गोष्टींपासून लांब राहणे पसंत केले. काही काळ या सर्व गोष्टींपासून दूर राहिल्याने त्यांना स्वतःचे अस्तित्व कोठेतरी हरवत असल्याचा भास झाला. एवढे दिवस अभिनेत्री म्हणून जी ओळख निर्माण झाली होती, ती आता पुसली जाणार, ही कल्पना त्यांना अस्वस्थ करू लागली होती. मग त्यांनी नृत्यक्षेत्रातच कारकिर्द घडवण्याचे निश्चित केले. दरम्यान त्यांनी वडिलांची इच्छा म्हणून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच नृत्य विषयातील एम.ए ही पदवी (नृत्यालंकार) देखील संपादित केली.

image


नृत्यसंस्था सुरू करण्यामागील प्रेरणेबद्दल बोलताना रुपाली सांगतात की, 'माझ्या गुरू डॉ. मंजिरी देव यांची खुप इच्छा होती की, मी लग्नानंतर नृत्याचे क्लासेस सुरू करावेत. नाटकं, शुटींग सांभाळून मी नृत्याचे क्लास घेऊ शकते, असा विश्वास त्यांना होता. त्यामुळे मग मी माझ्या घरीदेखील नृत्याच्या क्लासेसबद्दलचा माझा विचार सांगितला. तेव्हा त्यांनीदेखील माझ्या क्लासेसकरिता जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेरीस सहा जून १९९७ साली आम्ही 'संस्कृती नृत्य कला मंदिरा'ची स्थापना केली. आज त्याला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सासर आणि माहेरच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे हे सहजशक्य झाले आणि आता क्लासच्या जवळपास चार शाखा असून, २२५ मुली सध्या कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहेत.' आजवर आलेल्या आव्हानाबद्दल बोलताना रुपाली सांगतात की, 'संस्था सुरू केल्यापासून फार मोठ्या अडचणी आल्या नाहीत. मात्र कुठलाही व्यवसाय म्हटला की, थोड्याफार अडचणी तर येणारच. पण गुरुंच्या आशीर्वादाने आणि हिंमतीवर त्या निभावून नेल्या. पण एक सर्वात मोठे आव्हान माझ्यासमोर आले ते म्हणजे माझा झालेला अपघात. २००८ साली एका कार्यक्रमाला जाताना माझा अपघात झाला होता, ज्यात माझा पाय दुखावला गेला होता. त्या अपघातानंतर मला जवळपास आठ महिन्यांचा कालावधी फक्त उभं राहण्यासाठी लागला होता. त्यानंतर मी जिद्दीने नृत्याचा प्रवास पुन्हा सुरू केला आणि सहा महिन्यांनी पुन्हा सादरीकरण सुरू केलं. यात माझ्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींचा पाठिंबा मला मिळाला. फक्त त्यांच्या सहकार्यामुळेच मी संकटातून बाहेर पडले होते. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता. ज्याची आठवण आली तरी माझ्या अंगावर शहारा येतो.'

image


आजकालच्या युगात पारंपारिक नृत्यप्रकार किंवा शास्त्रीय संगीत मागे पडत आहे का, असे विचारले असता रुपाली सांगतात की, 'असे मी म्हणणार नाही. कारण हल्ली एकंदरीतच शास्त्रीय संगीताला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. लोकांना ते आवडायला लागले आहे. तीच गोष्ट नृत्याच्या बाबतीतही आहे. पण हल्लीचा जमाना हा फास्टट्रॅकवर जगण्याचा जमाना आहे. त्यामुळे बरीच वर्ष एखाद्या कलेचे शिक्षण घ्यावे, याकडे शक्यतो पालकांचा तसेच विद्यार्थ्यांचा कल कमी असतो. त्यांना कोणत्याही कलेचे ज्ञान झटपट आत्मसात करायचे असते. तसेच पालकांनादेखील आपल्या मुलांना अनेक गोष्टी या कमी वेगात शिकवायच्या असतात. ज्यामुळे त्यांचा गोंधळच होत असतो. साध्य काहीच होत नाही.' पारंपारिक कलेला तिचे पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. याबाबत बोलताना रुपाली सांगतात की, 'आजच्या काळात कला मागे पडत नाही. विविध संस्था, कलाकार कलेची जोपासना करत आहेत. पारंपारिक कलेला आधुनिकतेची जोड देऊन ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.' 

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'

नृत्यदिग्दर्शनामध्ये माझ्यातला परफॉर्मर आणि डान्स टिचर नेहमीच वरचढ ठरतो - फुलवा खामकर

“दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत काम करणे ही स्वप्नपुर्ती ” - गायिका वैशाली-माडे