आईच्या आजाराने घडवलेला डॉक्टर.... 

0

वयाच्या १४ व्या वर्षी विजय  सुरासे यांची आई मनोरुग्ण बनली. तिला स्क्रिझोफेनिया झाला होता. या वयात आईला नक्की काय झालंय याची कल्पना त्यांना नव्हती. आसपासचे लोक म्हणायचे आईला वेड लागलेय. खूप वाईट वाटायचं. त्यावेळी मनोरुग्णालयातले उपचार कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करणारी होती. त्या उपचारांचा परिणाम विजय यांच्या मनावर खोलवर आघात करत होता. रुग्णालयातून घरी आली की आईला बंद खोलीत ठेवायला लागायचे. तिला आपल्या शरीरावरच्या कपड्यांची ही शुध्द नसायची. मग तिच्या सेवेची जबाबदारी विजयची. तिला कपडे घालण्यापासून ते तिला औषध आणि इन्जेक्शन देण्यापर्यंत सर्व काही विजय करायचे. त्यावेळी आईला बघायला कधी डॉक्टर घरी यायचे. तेव्हाच कुठ तरी आपण डॉक्टर व्हायला हवं असं मनात खोलवर बिंबलं गेलं. त्यादृष्टीनं प्रयत्न सुरु झाले आणि अखेर डॉक्टर विजय  सुरासे हे नाव शल्यचिकित्सक म्हणून देशातच नव्हे तर जगभरात पोचलं. “आईच्या आजारपणाने माझ्यातला डॉक्टर घडवला. आईची सेवा करता करता मनात हे ठाम बसलं की आपल्याला डॉक्टरच व्हायचं आहे. माझ्या इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणासाठी इतर भावंडांना मराठी माध्यमाच्या शाळेत जावं लागलं. खस्ता खाल्ल्या. पण डॉक्टर झालो. आता मागे वळून पाहताना तो प्रवास किती खडतर असला तरी मनाला उभारी देणारा होता याची जाणिव होते आणि मन भरुन येतं". डॉक्टर विजय सुरासे सांगत होते. 

डॉक्टर विजय सुरासे ठाण्यातल्या ज्युपीटर रुग्णालयातले मुख्य हृद्यरोगतज्ञ आहेत. ज्युपीटरच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या केबीनबाहेरची गर्दी कधीच संपत नाही. अपॉयमेन्ट आणि अपॉयमेन्टशिवाय ही भेटणाऱ्यांची संख्या जास्त असते. कुणी आगंतुक आलं म्हणून त्याला नाकारायचं हे डॉक्टरांच्या स्वभावात नाही. त्यामुळे पहिल्या मजल्यावरची ही गर्दी कधीच कमी होत नाही. आलेल्या प्रत्येकाचं समाधान होईस्तव त्याच्या आरोग्याच्या गोष्टी करायच्या आणि हसत मुखानं त्याला परत पाठवायचं हा डॉक्टरांचा सध्याचा दिनक्रम.

मराठवाड्यातल्या औरंगाबाद शहरात डॉक्टर विजय सुरासे लहानाचे मोठे झाले. वडिल तिथल्या एका महाविद्यालयात क्लार्क होते. पुढे त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथंच अगोदर प्रोफेसर ते कॉलेजचा रजिस्ट्रार असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी. “ आम्ही जे घडलो ते वडिलांच्या या सकारात्मक दृष्टीकोनातून. आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते जी काही मेहनत घेत आहेत ते पाहून आम्हालाही त्यापेक्षा जास्त मेहनत करण्याचा हूरुप यायचा. याच जोरावर वडिलांनी आईचं आजारपण काढलं. ती पूर्ण बरी झाली.   निवृत्तीनंतर वडील अध्यात्माकडे वळले. त्यामुळे आम्हाला जीवनाकडे एका वेगऴ्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी मिळाली आणि त्याच जोरावर आम्ही आमचा प्रवास केला. आज आम्ही तीनही भावंडं डॉक्टरी पेशात आहोत. आमचं प्रेरणास्थान आमचे वडीलच आहेत.” डॉक्टर विजय आठवणीत रमले होते. 

आठवीपर्यंत सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून शिकणारे विजय अचानक आईची काळजी घेताना अभ्यासात रमायला लागले. मेरीटमध्ये आले आणि सायन्स घेऊन त्यांनी मेडिकलचा मार्ग निवडला. मुंबई सारख्या शहरात येण्याची संधी मिळाली होती पण घराच्या जवळ राहता यावं म्हणून औरंगाबादमध्येच वैद्यकिय शिक्षण पूर्ण केलं. पुढे मुंबईला आले ते मुळी डॉक्टर रमाकांत पांडा यांच्याकडे त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. “ डॉक्टर पांडांबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा होता. समृध्द करणारा होता. एवढा मोठा डॉक्टर आपल्या रुग्णांशी मग तो भारताचा पंतप्रधानांपासून सर्वसामान्य का असेना ज्या पध्दतीनं वागतो, त्यांचं निरिक्षण करणं हा जीवन सृमृध्द करणारा अनुभव होता.” 

अमेरिकेतली स्कॉलरशीप मिळाली आणि त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टीट्युटमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर डॉक्टर विजय  सुरासे यांना नवीन आकाश खुणावत होतं. आतापर्यंत त्यांच्या नावावर अनेक पुरस्कारांची नोंद झाली. ते जेव्हा ठाण्यातल्या ज्युपीटर रुग्णालयात पोचले तेव्हा डॉक्टर विजय  सुरासे नाव जगभरात पोचलं होतं, ते त्यांच्या शल्यचिकित्सेसाठी. आज त्यांच्या नावावर १५ हजारहून अतिसंवेदनशील सर्जरी आणि ५० हजाराहून अधिक चिकित्सा आहेत. “ मी १२ ते १५ तास काम करतो. त्यात जास्तीत जास्त रुग्णांना बघण्याची माझा प्रयत्न असतो. मग एन्जीओप्लास्टी ते पेसमेकर बसवण्यापर्यंतच्या सर्वच उपचार पध्दतीचा अवलंब करत असल्यानं स्वत:साठी वेळ थोडासा कमी पडतो. पण त्याची तक्रार नाही. उलट देवानं आपल्याला हे मानवतेचं काम करण्यासाठी निवडल्याचं समाधान जास्त आहे. "

डॉक्टर आणि तोही देवभक्त असं म्हटल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं. डॉक्टर  सुरासे म्हणतात, हा वसा वडिलांचा आहे. त्यांनी आम्हाला अध्यात्माकडे वळवलं. “ वडील स्वत: अध्यात्माकडे वळले, सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. गिता, बायबल, ज्ञानेश्वरीचं वाचण सर्व काही त्यांनी आमच्याकडून करुन घेतलं, सुरुवातीला कळायचं नाही. रोज घरी देवाची आरती, देवाचे श्लोक आमच्या घरी व्हायचे. वडील श्लोकाचे अर्थ सांगायचे. त्याचा अर्थ त्या वयात कळायचा नाही पण एक अनुशासन म्हणून आम्ही ते करायचो.” 

वडिलांकडून मिळालेला अध्यामिक वारसा डॉ. विजय  सुरासे पुढे नेतायत. ते म्हणतात, “ माणूस स्वत:पुर्ता  मर्यादीत  विचार करतो. त्याला नंतर कळेनासं होतं की आपली प्रगती कश्यात आहे. माणूस अगोदर वासरा सारखा असतो, नंतर त्याचं मन गोचिडासारखं होतं. सुरुवातीला दूध पितो, मोठा होता आणि त्यानंतर त्याच्या भावभावना बदलतात. शुध्द कुठलं अशुध्द कुठलं हे त्याला समजत नाही.   गोचिड हे गायीच्या स्तनावर असलं तरी ते दूध पित नाही तर ते रक्तच पितं. मानसाची वृत्ती तशीच आहे. आपल्याला यश मिळालं की आपण फार आत्मकेंद्रित होतो,  पण मी परदेशात का नाही राहिलो कारण मला इथं यायचं होतं. माझ्या अभ्यासाचा, अनुभवाचा  आपल्या इथल्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मीही माझ्या नव्या सहकाऱ्यांना तसंच सांगतो. आपल्या देशातलं ब्रेन ड्रेन थांबलं पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतो. गावाकडून आलेल्या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यातूनच अनेकांना रुग्ण सेवेशी जोडण्यास मी यशस्वी झालोय. असं मला वाटतं. "

शहरातल्या मोठाल्या इमारतींमध्ये राहताना डॉक्टराचं मन मात्र अजूनही गावाकडच्या मातीत रमलंय. त्या मातीचा रंग आणि त्याचा गंध कधीच जाणारा नाही. आज वडिल रिटायर आहेत. आई ठिक आहे. मुलं मोठी होतायत. दिवसभर रुग्णसेवेत असलेले डॉक्टर विजय रात्री जेव्हा घरी जातात तेव्हा दिवसभर केलेलं जीवदानाचं काम त्यांना शांत झोप देतं. मनाची शांतता ही सर्वात मोठी कमाई असं डॉक्टर विजय  सुरासे म्हणतात...