‘विज्ञानवाहिनी’ निवृत्त लोकांनी मुलांच्या विकासासाठी सुरु केलेली एक मोहीम  

0

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सर्वसाधारण लोक उर्वरित आयुष्य आरामात जगणे पसंत करतात आणि ते स्वाभाविक पण आहे. काही लोक आपल्या नेहमीच्या दिनचर्येला बदलून जगायला शिकतात. पण वयाच्या या वळणावर काही लोक असे असतात जे आपल्या जीवनातील अनुभव व ज्ञानाचा सारांश इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका प्रयत्नाचे नाव आहे ‘विज्ञानवाहिनी’. ही एक मोबाईल सायन्स लॅबॉरेटरी (विज्ञान प्रयोगशाळा) आहे. जिने मागच्या २१ वर्षात महाराष्ट्राच्या सगळ्या म्हणजे ३६  जिल्ह्यातील २८८ तालुक्यांच्या शाळांचा दौरा केला आहे. विशेष गोष्ट ही आहे की ‘विज्ञानवाहिनी’ शी जोडलेल्या सगळ्या २२ लोकांचे वय ६० पेक्षा जास्त आहे व या सगळ्यांच्या शिक्षणाची पार्श्वभूमी विज्ञान विषय आहे.

‘विज्ञानवाहिनी’ नावाची मोहीम सुरु करण्याचे श्रेय जाते डॉक्टर मधुकर देशपांडे आणि पुष्पा देशपांडे यांना. ज्यांनी सन १९९५ मध्ये विज्ञानवाहिनी नावाची एक मोहीम सुरु केली. त्यांच्या प्रारंभी त्यांनी हैद्राबाद व पुणे येथे शिक्षण घेतले. त्यानंतर डॉक्टर देशपांडे अमेरिकेला गेले तिथे त्यांनी गणित या विषयात पीएचडी केली. अनेक वर्ष अमेरिकेमधील मार्क्वेट विद्यापीठात गणिताचे हेड ऑफ डिपार्टमेंन्ट च्या पदाचा कार्यभार सांभाळत होते व पुष्पा देशपांडे तेथील एका शाळेत गणित विषय शिकवायच्या. अमेरिकेत बराच काळ व्यतीत केल्यानंतर त्यांची देशाच्या विकासासाठी काही सामाजिक कार्य करण्याची इच्छा झाली. परंतु करायचे काय याबाबत ते दोघेही विचारात पडले.

एक दिवस पुष्पा या टीव्हीवर सिनेमा बघत होत्या त्यात एक बस काही कॉलेज मध्ये जाऊन विज्ञानासंबंधीत उपकरणे काही काळासाठी शाळेत सोडत होती जेणेकरून तेथील मुलांना त्याच्या वापराची माहिती होईल. यानंतर ती बस दुसऱ्या कॉलेज मध्ये जात होती. ते बघून पुष्पा यांना जाणवले की आज आपल्या देशातील शाळांमध्ये चांगल्या विज्ञान प्रयोगशाळेची कमतरता आहे, आपण पण याचप्रकारचे काम आपल्या देशात सुरु करायला पाहिजे. यानंतर दोघांनी आपल्या निवृत्तीनंतर पुणे येथे येऊन आपल्या मित्रांसमोर आपली कल्पना मांडली व सर्वांना ती खूपच आवडली.

अशाप्रकारे सन १९९५ मध्ये ४-५ लोकांनी मिळून एक बस भाड्याने घेऊन पुण्याच्या आसपासच्या काही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे विज्ञानातील प्रयोग करून दाखवले. त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले व त्यांच्या या उपक्रमासाठी काही ठिकाणावरून निधी उपलब्ध झाला व त्यांनी स्वतःची एक नवीन बस विकत घेण्यात यश मिळविले. ‘विज्ञानवाहिनी’ चे सचिव शरद गोडसे सांगतात की, ‘सुरुवातीला आम्ही शाळेला पत्राद्वारे या बसची माहिती द्यायचो पण आज परिस्थिती बदलली आहे की शाळाच आम्हाला पत्राद्वारे निमंत्रण देतात. आज विज्ञानवाहिनीची बस शहरातील शाळेत न जाता आसपासच्या ग्रामीण भागातील शाळेत जाते जिथे विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित असलेल्या अभिनव गोष्टी दाखवल्या जातात.’

आतापर्यंत ‘विज्ञानवाहिनी’ ने महाराष्ट्रातील सगळ्या ३६ जिल्ह्यातील २८८ तालुक्यांचा दौरा केला आहे. याशिवाय विज्ञान वाहिनीच्या टीमने उत्तरपूर्व राज्यात जसे नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम व मध्यप्रदेश मध्ये पण दौरा केला आहे. इथे मुलांना विज्ञानाविषयी माहिती दिली जाते तसेच शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. विज्ञानवाहिनीशी जोडलेले लोक भिन्न क्षेत्रातील आहेत पण त्यांची पार्श्वभूमी विज्ञान विषयाशी संबंधित आहे. २२ लोकांच्या या टीम मध्ये कुणी इंजिनीअर, टेक्सटाइल इंजिनिअर, फार्मासिस्ट, आयआयटीचे माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आहेत. या वाहिनीचे सचिव गोडसे या सगळया कामावर नजर ठेवतात. ते स्वतः एक मॅकॅनिकल इंजिनिअर आहेत. ते सांगतात की, ‘टीम मध्ये कामाप्रती सगळ्यांचा एकोपा आहे त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर मतभेद असले तरी अंतिम निर्णय सगळ्यांना मान्यच करावा लागतो. यासाठी टीमचा कोणताही सदस्य पैसे घेत नाही व स्वेच्छेने आपल्या कामाची पूर्ती करतात.’

‘विज्ञानवाहिनी’ चे सदस्य वेळोवेळी शाळांचा दौरा करतात जिथे मुलांना भौतिक शास्त्र, रसायन व जीवशास्त्र यासारखे विषय शिकवले जातात. विशेषकरून ते मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देतात तसेच मुलांच्या आरोग्याच्या बाबतीतही ते जास्त जागरूक राहतात. ही टीम शाळांमध्ये जाऊन जवळजवळ ५-६ तास मुलांबरोबर घालवतात. ‘विज्ञानवाहिनी’ च्या या बसला विशेष पद्धतीने तयार केले आहे. यामध्ये चालकाव्यतिरिक्त बसण्यासाठी फक्त ५ जागा आहेत व उर्वरित बसमध्ये ‘कॅबिनेट’ तयार केलेले आहेत व जिथे विज्ञान उपकरणे ठेवली जातात. याशिवाय ८ टेबल व जनरेटरची सोय आहे म्हणजे ज्या गावात विजेची कमतरता असेल तिथे जनरेटरच्या सहाय्याने मुलांना विज्ञानाचे प्रयोग दाखवले जातात. तसेच या व्यतिरिक्त बसमध्ये ऑडीओ व्हिडीओ-सिस्टीम आहे व त्याला बघण्यासाठी एकावेळेस ३५ मुलांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

‘विज्ञानवाहिनी’ मोबाईल बसने एका वर्षात १५० ते १६० शाळांचा दौरा केला आहे. मोबाईल बस व्यतिरिक्त गरज पडल्यास ‘ विज्ञानवाहिनी’ ची टीम कारच्या मार्फत लांबच्या शाळांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करते. ज्यात गुलबर्गा, चेन्नई, हैद्राबाद सारखे शहरेही सामील आहेत. तिथेही इतर संघटना अशीच मोबाईल विज्ञान प्रयोगशाळा चालवतात. मेघालय सरकारने सुद्धा अश्या प्रकारची बस ‘विज्ञानवाहिनी’च्या मदतीने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे जी वेगवेगळ्या गावात जाऊन शाळेतील मुलांना व शिक्षकांना विज्ञानाचे प्रयोग करून दाखवतील.

‘विज्ञानवाहिनी’ च्या सदस्यांचा एकच प्रयत्न आहे की मुलांना विज्ञान अतिशय सध्या व सोप्या पद्धतीने समजावणे. भविष्यातील आपल्या योजनेबद्दल शरद गोडसे सांगतात की ‘विज्ञानवाहिनी’ या वर्षी जूनपासून पुण्याच्या जवळ एका खास प्रकल्पावर काम करणार आहे ज्याच्या अंतर्गत अनेक शाळा काम करणार असून त्यातील एका शाळेला विज्ञानाची उपकरणे दिली जातील व तेथील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. अश्या प्रकारे एका शाळेतील विज्ञानाच्या या उपकरणांना काही काळ आपल्याजवळ ठेवल्यानंतर ते दुसऱ्या शाळेला सुपूर्त करतील. सध्या या प्रकल्पासाठी ‘विज्ञानवाहिनी’ च्या टीमला शोध आहे तो एका प्रायोजकाचा.  

वेबसाइट : www.vidnyanvahini.org

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे 'स्मार्टस्टेप्स'

केवळ एका रुपयात मुलांना शिक्षण आणि कारकीर्द घडविण्यात व्यावसायिकांची मदत, शिक्षणाबाबत भानुप्रिया यांचे आगळे वेगळे विचार!  

‘डोरस्टेप स्कूल’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी शाळा, साक्षरतेला प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचा आगळा वेगळा प्रयत्न! लेखिका - गीता बिश्त  
अनुवाद - किरण ठाकरे