'फ्रेश टू ऑल' : ताजी ताजी भाजी शेतातून थेट घरपोच

'फ्रेश टू ऑल' : ताजी ताजी भाजी शेतातून थेट घरपोच

Wednesday November 18, 2015,

5 min Read

फार पूर्वीपासून गल्लीतला भाजीवाला किंवा फळवाला ताजी भाजी, ताजी फळ अशी हाळी देत यायचा , तेंव्हाही या वस्तू ताज्याच हव्या असा प्रत्येकाचा आग्रह असायचा. आज काळ वेगाने बदललाय, घरापर्यंत येणारे अनेक विक्रेते आता निव्वळ आठवणीत जमा झाले आहेत. धावपळ आणि धकाधकीच्या या जीवनात, काहीतरी सकस खावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते . बदलत्या काळानुसार आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत, भाज्याही आता ऑनलाइन घेता येणं शक्य आहे, या हायपर लोकल म्हणजेच , तंत्रज्ञान आणि स्थानिक बाजाराची सांगड घालत ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवणे , या टप्प्यावर पूर्णिमा राव यांच्या ‘फ्रेश टू ऑल’ची भूमिका महत्त्वाची ठरतेय. "फ्रेश टू ऑंल" ची सुरुवातच मुळात झाली ती, ग्राहकांपर्यंत, थेट शेतातला माल पोहोचावा या संकल्पनेतून! म्हणजेच शेतकऱ्यांकडून ताजी भाजी आणि फळ घेऊन , ग्राहकांच्या दारात थेट पोहोचवल्याने ग्राहकांनाही पौष्टिक भाज्या आणि फळांचा आस्वाद घेता येतो आणि आरोग्याच्या बाबतीतही निश्चिंत राहता येते.

कॉर्पोरेट ते स्टार्ट अप

पंजाबमधल्या पटियालातल्या , मध्यमवर्गीय कुटुंबात पूर्णिमा यांचा जन्म झाला . पटियालात शालेय शिक्षण घेतल्यावर, त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये बी. टेकची पदवी फरीदाबाद इथून मिळवली . पदवी मिळाल्यावर त्यांनी सात महिने जेनपॅक्ट कंपनीत काम केलं. त्यानंतर इन्वेल्युसर्वसारख्या कंपनीतही काम केलं. २००४ साली त्याचं लग्न झालं आणि २००७ मध्ये पहिली मुलगी होईस्तव त्या काम करत होत्या . काही काळ मुलीच्या संगोपनात घालवल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली . एक वर्षभर काम केल्यावर त्यांना दुसऱ्या अपत्याची चाहूल लागली. मग २०१२ मध्ये नोकरी सोडणं क्रमप्राप्त होतं. " दोन मुलांनंतर मी दोनदा काम सोडलं. लहान मुलगी दोन वर्षांची झाल्यावर , पुन्हा कामावर रुजू होईन असं वाटलं होत. पण कुठेतरी , स्वत:चं काहीतरी करावं हा विचार सतत मनात घोळत असायचा " पूर्णिमा आपली कहाणी सांगत होत्या . लग्नानंतर त्या पुन्हा गुरगावमध्ये राहायला होत्या आणि सासरकडच्या मंडळींची गावच्या मातीची ओढ ही त्यांच्या नव्या व्यवसायाची नांदी ठरली .


image


जुलै २०१५ मध्ये त्यांनी ‘फ्रेश टु ऑल’ ची सुरुवात केली. ज्याचा उद्देश शेतकरीवर्ग आणि ग्राहकांना जोडणे हाच होता. त्या पुढे म्हणतात," आमची स्वत:ची शेती हरयाणामध्ये आहे. त्यामुळे तिथले शेतकरी आमच्या परिचयाचे, त्याचबरोबर , राजस्थान , आणि पंजाबमधल्या शेतकऱ्यांची ही चांगली ओळख , तसाच गुरगावमधले अनेक कुटुंब आमच्या परिचयाचे. त्यामुळे मला हे बिंदू जोडून , या भागात कधीच कोणीही न राबवलेली अगदी आगळी-वेगळी अशी संकल्पना राबवता आली. ज्यात ग्राहकांना रसायन मुक्त असा भाजीपाला आणि तोही सामान्य भाजी बाजाराच्या किंमतीत जेणेकरून शेतकरी आणि ग्राहकांनाही मालाची आणि किंमतीची हमी मिळेल. सुरुवातीला फक्त आमच्या शेतातला माल आम्ही विकू लागलो आणि त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचाही यात समावेश झाला."

वेगळी ओळख

" मला इतकं पक्क ठाऊक होत की या स्पर्धात्मक जगात , विशेष म्हणजे मोठमोठ्या कंपन्या ज्यांना व्यवसाय सुरु होण्यापूर्वीच मोठमोठी भांडवल मिळतात , त्यांच्या तुलनेत आपल्याला भक्कम पाय रोवून उभ राहायचं आहे. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी अत्यंत निराळी अशी संकल्पना असायला हवी , यावर मी ही ठाम होते ." पूर्णिमा सांगत होत्या आणि अर्थात त्यांच्यासमोरच्या आव्हानांची त्यांना पूर्ण कल्पना असल्याच जाणवत होत. गेल्या काही महिन्यात त्यांच्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे आणि त्यांच्या ग्राहक संख्येत ही वाढ झालीय.

" आमचं सुरूवातीचं धोरण होतं, ते म्हणजे , गुरगावमधील प्रत्येक विभागात थोडे थोडे ग्राहक असणं आणि त्यानंतर , एखाद्या संपूर्ण इमारतीत विपणन करणे आणि ग्राहकांकडून अन्य ग्राहकांची माहिती मिळवून नवीन ग्राहक बनवणे . आमचं हे धोरण बऱ्यापैकी यशस्वी ठरलं. मला आजही हे धोरण योग्य वाटतं ज्यामुळे ग्राहकांचाही या योजनांमुळे , आर्थिक लाभ होतो .

परिणाम :

त्यांच्या ग्राहक या मुख्य घटकाबद्दल आणि आपल्या या नव्या उद्यमाबद्दल बोलताना त्या पुढे म्हणतात की, सध्याचा त्यांचा ९९% ग्राहक वर्ग मध्यमवर्गीय आहे आणि त्या स्वत: प्रत्येक ग्राहकाशी त्यांच्या आवडी निवडी जाणून घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात असतात. त्या अभिमानाने पुढे सांगतात की त्यांच्या ग्राहकांपैकी ९०% ग्राहकांनी अद्यापही, स्थानिक वेबसाईट वरून भाजीपाला मागवलेला नाही आणि त्यामुळेच त्यांच्या समोरच आव्हान आहे ते म्हणजे , ग्राहकांच्या अपेक्षेला खरं उतरणे. पूर्णिमा यांचा महत्त्वाचा मंत्र म्हणजे गुणवत्ता जपणे आणि किफायतीशीर किंमतीत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी त्या आग्रही आहेत .

टीम :

शेतातला भाजीपाला आणि फळे ही गुरगावच्या घरांमध्ये डिसेंबरपर्यंत पोहोचतील , पण तत्पूर्वी , पूर्णिमा सध्या , भाज्या आणि फळं ही अन्य बाजारातून आणून ग्राहकांना पुरवत आहे, त्यांची टीम लहान आहे अगदी मोजकीच मंडळी तिथे काम करतायत, तर शेतात काम करणारी दुसरी टीम आहे. पूर्णिमा त्यांच्या या छोट्याश्या चमूबरोबर स्वत:ही व्यवसायात जातीनं लक्ष घालतात. घर आणि व्यवसाय सांभाळणं त्यांच्यासाठी सोपं जातं, ते सासरच्या मंडळींच्या सहकार्याने. त्यांचे पती तर त्यांच्यासाठी आधारस्तंभ आहेत आणि याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.


image


ग्राहक सर्वात महत्त्वाचा :

पूर्णिमा यांच्या मते , ग्राहक संबंध व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ' विश्वास '. त्यामुळे त्याचं संपूर्ण लक्ष हे व्यवहारापेक्षा , ग्राहकांवर केंद्रीत असत. ग्राहकांकडून आलेल्या अभिप्रायांची त्या आवर्जून दखल घेतात, ज्यामुळे त्यांना स्वत:ला अधिक सुयोग्य बनवण्याची संधी मिळते . याबाबतीत बोलताना पूर्णिमा म्हणतात ," आता आम्ही पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरत असल्यानं , आमच्या पॅकेजिंग चा खर्च जो, प्रयेक पॅकेज मागे ५ रुपये इतका आहे , तो वाचतो . प्रत्येक ग्राहकाला आम्ही पावतीची एक कॉपी पाठवतो , ज्यावर त्याचं हस्ताक्षर करवून ती आमच्याकडे माहितीसाठी परत येते. त्याचबरोबर , ग्राहकांना कोणतीही वस्तू न आवडल्यास परत करण्याचीही सोय आहे आणि अगदी कमीत कमी किंमतीची वस्तूसुद्धा, त्यामुळे आमच्या ग्राहकांना आमची धोरण इतरांपेक्षा अधिक पटतात " या व्यतिरिक्त , व्यवसाय ते व्यवसाय या प्रारूपावरही त्यांनी लक्ष केंद्रित केल आहे , ज्यामध्ये हॉटेल उद्योगाशी संलग्न होण्याचा त्यांचा विचार आहे .

ही निव्वळ एक सुरुवात :

त्यांच्या व्यवसायात त्या पूर्ण व्यस्त आहेत , पण अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. " आम्ही अजूनही अन्य उत्पादन प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्या परिक्षेत्रात अशा पद्धतीने उत्पादन देणारे खात्रीलायक विक्रेते मिळाल्यावर , आम्ही ही अन्य उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवू. आम्ही डिसेंबर महिन्याची आतुरतेनं वाट बघत आहोत. जेंव्हा आम्ही, ग्राहकांना आमच्या स्वत:च्या शेतातून , रसायनमुक्त भाजीपाला आणि फळं देऊ शकणार आहोत आणि अर्थात हा आमच्यासाठी एक अनुभव असणार आहे, ज्यातून चांगलं उत्पादन अत्यंत किफायतीशीर किंमतीत देऊनही आम्ही नफा कमवू शकतो" हे सांगताना पूर्णिमा यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मितहास्य उमटलं. ऑक्टोबर २०१५ पर्यंत जमा झालेला सुमारे दोन लाखाचा महसूल त्यांना वर्षातल्या प्रत्येक महिन्यात वाढवायचा आहे, पुढील दोन वर्ष त्यांच्या व्यवसायचं लक्ष निव्वळ गुरगाव असणार आहे.

पूर्णिमा यांचे वडील त्या आठ वर्षांची असताना हे जग सोडून गेले, तेंव्हापासून त्यांनी त्यांच्या आईला कष्ट करताना पाहिलं आहे. " मी माझ्या आई किंवा सासूबाईनाही खूप काम करताना पाहिलंय, इतकाच काय तर गावातील प्रत्येक माणूस आपला उदरनिर्वाह करण्यासाठी घेतं असलेलं कष्ट त्यांनी पाहिलेत आणि त्यांची ही ध्येयासक्ती मला माझ्या धडपडीसाठी बळ देऊन जाते ज्यामुळे मी सर्वोत्तम काम करण्यावर भर देते."


लेखक : तन्वी दुबे

अनुवाद : प्रेरणा भराडे