पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया पासून मिळाली प्रेरणा, चार मित्रांच्या प्रयत्नांनी देशातील पहिली ग्रामपंचायत बनली फ्री वाय-फाय झोन

0

देशभरात डिजिटल इंडिया या योजनेवर केंद्रातले मोदी सरकार जे काम करीत आहे त्यामुळे युवकांमध्ये भरपूर उत्साह आहे. युवक आपल्या प्रयत्नाच्या जोरावर या मोहिमेचा हिस्सा बनण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यापासून प्रेरणा घेऊन मध्यप्रदेशातील चार युवकांनी एक अद्भुत काम केले आहे. तरुण अभियंता शकील अंजुम, तुषार भरथरे, भानू यादव, आणि अभिषेक भरथरे यांनी देशातील पहिली ग्रामपंचायत वाय-फाय फ्री झोन बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कोणतीही सरकारी मदत न घेता आपल्या स्वतःच्या पैशांनी हे काम केले आहे.


चार युवकांनी विचारविनिमय करून राजगढ जिल्ह्यातील शिवनाथपुरा गाव व त्याच्या बावडीखेडा जागीर ग्रामपंचायतीला निशुल्क वायरलेस टेक्नोलॉजीने वाय-फाय गाव बनविण्याची योजना बनवली. या गावाची निवड ही त्या गावाचे स्थान व भौगोलिक दृष्ट्या उंचीवर असल्यामुळे केली गेली. गावात विजेची अनियमितता असल्यामुळे येथे २०० अॅम्पिअर चा इंव्हरटर लावला की ज्यामुळे गाव व ग्रामपंचायतमध्ये २४ तास विजेच्या अभावात सुद्धा इंव्हरटरमुळे वाय-फाय चालू राहील. यामुळे ग्रामपंचायतीच्या लोकांना याचा लाभ विना अडथळा मिळत राहील.


राजगढच्या या चार युवा आयटी अभियंत्यांनी डिजिटल इंडिया या योजनेला ग्रामीण भागात यशस्वीरित्या चालू करण्याची योजना सहा महिन्यांपूर्वी बनवली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे मध्यप्रदेशातील पहिली वाय-फाय ग्रामपंचायत शिवनाथपुरा लोकांच्या समोर आहे.

या पूर्ण योजनेला १लाख ९० हजार रुपये खर्च आला. गावात प्रथम अंदाजे ८० फुट उंचीचा लोखंडी खांब उभा करण्यात आला. एअरटेल कंपनीचा सर्व्हर घेतला आणि लाईन भाड्याने घेतली. यानंतर अक्सेस पॉइंट, एक्स्टेन्शन आणि टॉवर यासाठी साधारणता ९० हजार रुपये खर्च आला. एक पॉवर बीम आणि २०० अॅम्पिअर पॉवरचा इंव्हरटर लावण्यात आला.

त्यांच्या या उपक्रमाविषयी या चार मित्रांपैकी एक शकील अंजुम यांनी युअर स्टोरी ला आपला अनुभव सांगितला.


युअरस्टोरी – शकील अंजुमजी, फ्री वाय-फाय ग्रामपंचायत बनवण्याची योजना मनात कशी आली?

शकील अंजुम – प्रारंभी एका गावाला फ्री वाय-फाय उपलब्ध केल्यानंतर आम्ही चौघांनी ठरविले की आता यापेक्षाही मोठे काम करायचे. एका पूर्ण ग्रामपंचायतीलाच फ्री वाय-फाय झोन मध्ये परिवर्तीत करण्याचे योजिले . यासाठी आम्ही चौघे कायम प्रयत्नशिल होतो. स्वतःचे थोडे थोडे पैसे जमवून आम्ही काम चालू ठेवले. या पूर्ण कामासाठी अंदाजे २ लाख रुपये खर्च झाले. परंतु शेवटी या कामात आम्हाला यश मिळाले. यासाठी आम्ही शिवनाथपुराला बेस स्टेशन बनवून बावडीखेडाला जोडले, ज्यात ५.८ आणि २.४ फ्रिक्वेन्सीचे डिव्हाईस वापरले.

युअरस्टोरी – तुम्हाला चौघांना ही कल्पना कशी सुचली?

शकील अंजुम – आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या योजनेत सामील होण्यासाठी इच्छुक होतो. त्यामुळेच आणि तेथूनच प्रेरणा मिळाली की देशाला फ्री वाय-फाय करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पहिजे. सहाजिकच आहे की प्रयत्न केल्याने यश मिळते व त्यामुळे खूप आनंद मिळतो.

युअरस्टोरी – या योजनेसाठी आपल्याला असे कधी वाटले नाही का की यासाठी कोणाकडून आर्थिक मदत घ्यावी? आपले स्वतःचे पैसे खर्च करण्यामागे उद्देश काय? सरकारकडून मदत मिळविण्यासाठी काही योजना बनवली का ?

शकील अंजुम – हे बघा आम्ही जर कोणाकडे पैसे मागितले असते तर त्यांचा गैरसमज झाला असता. यामुळे आम्ही असे ठरविले की कोणाकडूनही मदत न घेता या कामासाठी आपले स्वतःचे पैसे खर्च करून ही योजना यशस्वी करायची. आज आम्ही गर्वाने सांगू शकतो की हा पूर्ण प्रोजेक्ट आमच्या चार मित्रांचा आहे. आता पुढील विस्तारासाठी सरकारी मदतीची अपेक्षा आहे. आमचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आमच्या या यशाविषयी ट्विटर वर आनंद व्यक्त केला आहे.


युअरस्टोरी – गावातील लोकांची याविषयी काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्यासाठी ही एक नवखी गोष्ट आहे की ते याचा वापर करीत आहेत?

शकील अंजुम – गावातील लोक याविषयी आभार व्यक्त करतात. त्यांनी आम्हाला भरपूर सहाय्य केले. आम्ही लोकांना इंटरनेट विषयी प्रशिक्षण दिले आहे. यासाठी आम्ही एका एनजीओची मदत घेतली आहे. आता हे बघून खूप आनंद होतो की गावातील लोक अॅन्ड्रॉइड फोन खरेदी करून फेसबुक, गुगल यासारख्या सुविधांचा उपयोग करीत आहेत. हे सर्व बघून आम्हाला खूप आनंद होतो.

लेखक : नीरज सिंग

अनुवाद : किरण ठाकरे