‘आव्हानाला समस्या न मानता संधी मानतो’ ‘आम्ही उद्योगीनी’च्या परिषदेत व्यक्त झाला दुर्दम्य विश्वास !

‘आव्हानाला समस्या न मानता संधी मानतो’

‘आम्ही उद्योगीनी’च्या परिषदेत व्यक्त झाला दुर्दम्य विश्वास !

Wednesday March 08, 2017,

4 min Read

दरवर्षी आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, मनोकायिक उन्नतीसाठी समाजात सुरु असलेल्या प्रक्रियेबाबत उहापोह केला जातो. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानने गेल्या २० वर्षाच्या परंपरेनुसार महिला दिनाआधी येणाऱ्या शनिवारी उद्योजक महिलांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेत आजही स्त्रियांना स्त्री म्हणून समाजाकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही आणि तरीही धडपड करून उद्योगाच्या क्षेत्रात महिलांना काम करताना पारंपारिक घरची जबाबदारी देखील सांभाळावी लागते, असा सूर परिसंवादात बोलताना मान्यवरांनी व्यक्त केला. उद्योजिका होणे ही महिलांसाठी अजूनही कठीण बाब असून कुटुंब हीच महिलांची प्राथमिकता समजली जाते. यावर तज्ज्ञांचे एकमत झाले स्त्रिया उद्योगात यशाची शिखरे पादाक्रांत करत असतील तर ती कौतुकास्पद बाब आहे, असेही यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी मान्य केले.


image


जागतिक महिला दिनानिमित्त ‘उद्योगिनी प्रतिष्ठान’ने शनिवारी या परिषदेचे आयोजन केले होते. पुरुष उद्योजकांना सहजा-सहजी ज्या गोष्टी उपलब्ध होतात त्या महिलांना उपलब्ध होत नाहीत. कुटुंबाकडे प्रथम लक्ष देणे ही बाब आपल्या येथील स्त्रियांसाठी आवश्यक बाब मानली जाते. त्यातूनही महिला उद्योजिका यशस्वी होताहेत ही कौतुकास्पद बाब आहे. असे मत या परिसंवादात बोलताना एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका मीनल मोहाडीकर म्हणाल्या की, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संधी येते मात्र योग्य वेळ ती ओळखून तिचे सोने करणे यालाच उद्योजक होण्याचा पहिला गुण समजले जाते. स्त्री जन्मताच उत्तम व्यवस्थापिका असते, त्यामुळे स्त्री मुक्ती नव्हे तर शक्तीची आज गरज आहे. घरातील पुरुषांच्या, कुटुंबाच्या मदतीने अक्षरशः हजारो स्त्रिया आज उद्योजगतेतून पुढे आल्या आहे असे त्या म्हणाल्या.


image


‘जिद्द तुमची, साथ आमची, आम्ही उद्योगिनी’ या ब्रीद वाक्याप्रमाणेच आमच्या उद्योजक महिलांची वाटचाल सुरू असून गेली २० वर्षे सलग आम्ही हा कार्यक्रम करत आहोत असे मोहाडीकर म्हणाल्या. राज्यभरात उद्योगिनी प्रतिष्ठानची १० केंद्र निर्माण झाली असून दुबईत देखील आमची एक शाखा झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

श्रीमती मोहाडीकर यांनी फेब्रुवारी महिन्यात यावर्षी देखील ३५ महिला उद्योजिकांनी भेट दिल्या बाबत माहिती दिली. गेली चार वर्ष सातत्याने आम्ही उद्योगिनीच्या महिला अरब देशात जाऊन तेथील उद्योगाच्या संधी हस्तगत करत आहे याचा अभिमान पूर्वक उल्लेख त्यांनी केला. यावर्षीच्या दौऱ्यात नाशिक येथील शेतकरी हेमंत सानप, उद्योजिका उज्ज्वला हावरे प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या. श्रीमती मोहाडीकर म्हणाल्या कि, महिलांना कौशल्य विकासातून उद्योग प्रशिक्षण आणि त्यातून उद्योगाच्या संधी देणारे विविध उपक्रम वर्षभर सुरु असतात. त्यात नोव्हेंबर महिन्यात होणारे प्रदर्शन दिल्ली सह देशभरात महिला उद्योजिकांचे दौरे इत्यादी कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो. आम्ही उद्योगीनीचे वैशिष्टय म्हणजे पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या अरब देशांपासून महिलांना दुय्यम वागणूक दिल्या जाणाऱ्या राजस्थान पर्यंत वेगवेगळ्या भागात जाऊन या महिला उद्योजिकांनी नवीन क्षितिजे पादाक्रांत केली आहे.


image


श्रीमती मोहाडीकर म्हणाल्या कि, संकट आणि आव्हानाला आम्ही समस्या न मानता त्यातूनच संधी शोधण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो. त्यामुळे यश नक्कीच मिळते असे सांगताना त्यांनी निश्चलनीकरणानंतर १ फेब्रुवारी रोजी आलेल्या अर्थसंकल्पात महिला उद्योजीकांसाठी अनेक चांगल्या योजना सवलती आणि संधी असल्याचे उदाहरण दिले. या अर्थसंकल्पाची तपशीलवार माहिती महिलांनी घ्यावी अशी आग्रहाची सूचना त्यांनी केली.

या परिषदेत प्रसिद्ध गायिका व ‘पिझ्झा बॉक्स’च्या संचालिका वैशाली सामंत, माजी आमदार जयूनाना ठाकरे, एन.वी.आय.डी.आय.ए.च्या संचालिका जया पानवलकर आदींनी आपली मते मांडली.

लिंगभेद आजही आढळून येतो ही खेदाची बाब आहे. तरीही आजच्या स्त्रिया उद्योग जगतात मेहनतीने यश मिळवताना दिसतात ही अभिमानाची बाब आहे, असे मत राज्य शासनाच्या लघु उद्योजकता विभागाच्या (एमएसएसआयडीसी) सह-संचालिका लीना बनसोड यांनी व्यक्त केले. स्त्रियांनी एकत्र येऊन केलेल्या ‘सामाजिक व्यवसायां’मध्ये लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यामुळे भारतात दीड कोटी नवे उद्योग निर्माण होऊ शकतात असे वातावरण आहे असेही त्यांनी सांगितले.

या राज्यव्यापी महिला परिषदेत शासकीय योजनांची माहिती उद्योग सचिव विजय सिंघल यांनी दिली. तर औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय संचालक अलका मांजरेकर यावेळी उपस्थित होत्या. उद्योगातील बदलत्या तंत्रज्ञानाबाबत आणि ते आत्मसात करण्याच्या मानसिकतेत स्त्रिया आणि मुली देखील आहे याचा उपयोग आधुनिक तंत्रज्ञान आधारित उद्योग उभारण्यासाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी येथील इचलकरंजी गारमेंट्स क्लस्टर लिमिटेडच्या संचालिका किशोरीताई आवाडे, दुबई येथील पेशवा या उपहारग्रुहाच्या संचालिका श्रिया जोशी. अर्जेंटिनामधील माय स्पाइसच्या प्रीती सालकर आणि मांगिरीश अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे च्या सीइओ अनुराधा देशपांडे यांनी ‘मी कशी घडले’ या परिसंवादात स्वअनुभवावर आधारित उद्योगाचे तंत्र आणि मंत्र उपस्थित उद्योजिकाना सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपात उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते उद्योगीनिना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेते अविनाश नारकर आणि सारस्वत सहकारी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर उपस्थित होते.