गाणे हे माझे पहिले प्रेम - गायिका-अभिनेत्री केतकी माटेगांवकर

1

शाळा, टाईमपास, काकस्पर्श, आरोही, तानी सारख्या अत्यंत संवेदनशील आणि यशस्वी सिनेमांमधला एक महत्वाचा चेहरा म्हणजे अभिनेत्री केतकी माटेगांवकर. गायिका सुवर्णा माटेगांवकर यांची मुलगी असलेल्या केतकीला गाण्याचे बाळकडू लहापनपणापासून घरातनं मिळत आले. पण मनोरंजन क्षेत्रात तिच्या यशाची सुरुवात झाली ती अभिनेत्री म्हणून. असे असतानाही तिने कधीच गाण्याला स्वतःपासून दूर ठेवले नाही. नुकताच पहिला वहिला डि वाय पाटील अजिंक्यतारा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला ज्यात केतकीला उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


“मी लहानपणापासून गाणे शिकत आले किंवा असे म्हणा ना की मी गाण्यातच वाढले, घरात आई आणि बाबा दोघेही संगीताची सेवा करत आलेत मग मी यापासून कशी दूर रहाणार, लहानपणी आई सोबत विविध कार्यक्रमांना बालगीते म्हणायला मी जायचे त्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी ठरली ती झी सारेगमप लिटील चॅम्प हा रिअॅलिटी शो. या शोमध्ये मी पण भाग घेतला होता पण खूप पुढे नाही जाऊ शकले, तरीही या शोमधून मी लोकांच्या नजरेत आले खरेतर अभिनेत्री म्हणून मला मिळालेली पहिली संधी ही पण याच शोचे देणे आहे हे विसरुन कसे चालेल.”

केतकी तिला पार्श्वगायनासाठी मिळालेल्या पहिल्यावहिल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारामुळे सध्या खूप आनंदात आहे. यातच हा पुरस्कार तिला तिच्या लाडक्या हिरोकडून म्हणजे वरुन धवन कडून मिळाला. “ मला मिळालेल्या या सन्मानसाठी मी फिल्मफेअरचे धन्यवाद मानते पण याचे श्रेय जाते ते दिग्दर्शक रवि जाधव यांना. रवि यांनी टाईमपासमधल्या 'मला वेड लागले' या गाण्यासाठी माझा विचार केला, सिनेमात हे गाणे माझ्यावर चित्रित झालेय त्यामुळे जर हे माझ्या आवाजात ऐकायला मिळाले तर ते अधिक प्रभावी ठरेल हा विचार रविजींनी केलेला, जो यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरलाही. मला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कारानं हे सिद्ध केलेय.”

टाईमपासनंतर, टाईमपास २ मध्येही केतकीने सुन्या सुन्या या गाण्याला आपला आवाज दिला. “ शाळा सिनेमा आला तेव्हा सर्वांनी माझ्यातल्या अभिनेत्रीला पाहिले आणि तिला स्विकारलेही पण माझी गायकी मात्र हळूहळू खुलू लागली असे मला वाटते, टाईमपास मध्ये मी गायले, टाईमपास २ मध्ये मी गायले, आरोही या सिनेमातही काही गाणी मी गायली तर आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या नेहा राजपाल निर्मित फोटोकॉपी सिनेमातले एक गाणे मी गायलेय. या सिनेमात मी अभिनय नाही केलाय तर फक्त पार्श्वगायन केलेय”.

काकस्पर्श या सिनेमाच्या तामिळ आणि हिंदी रिमेकचे शुट पूर्ण झाले या रिमेकमध्ये केतकी दिसणारे. शिवाय फुंतरु या तिच्या आगामी सिनेमाचे शुट ही नुकतेच पूर्ण झालेय. “ फुंतरु हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे, एकतर सुजय डहाके हा माझा पहिला दिग्दर्शक, माझ्या पहिल्या सिनेमाचा दिग्दर्शक तो होता, आणि फुंतरुमुळे मी आता पुन्हा त्याच्यासोबत काम करतेय, या सिनेमातन मी चाहत्यांसमोर अत्यंत वेगळ्या लूकमध्ये येणारे, ज्याच्यासाठी मी स्वतः खूप उत्सुक आहे.”

केतकीने नुकतीच स्वतःची वेबसाईट लॉन्च केली, “सोशल मिडिया ही आज कलाकारांची गरज बनलीये असे मलाही वाटते. या माध्यमातन मी माझ्या चाहत्यांशी अधिक जास्त संपर्कात राहू शकेन, माझा आगामी सिनेमा, अल्बम या सगळ्यांची माहिती माझ्या या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल.”

नवनवीन सिनेमा तसेच जाहिरातींच्या ऑफर्स केतकीकडे येतायत. यातनं अत्यंत चोखंदळपणे ती निवड करतेय, कारण अभिनयाबरोबरच गायनाकडेही तिला लक्ष द्यायचे. पुढे जाऊन शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे.