देशातील पहिलं कौशल्य विकास विद्यापीठ महाराष्ट्रात होणार, केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्य मंत्री राजीव प्रताप रुडी यांची घोषणा

0

मुंबईमध्ये मेक इन इंडिया सप्ताह सुरु असतानाच, महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. मेक इन इंडिया साठी उपयुक्त असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून देशातील पहिलं कौशल्य विकास विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु करण्याचा प्रस्ताव आहे, अशी घोषणा केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्य मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी पुण्यात केली. सिंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास या चर्चासत्रानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

नीती आयोगाच्या अंतर्गत कौशल्य विकास उपसमिती स्थापन करण्यात आली होती. प्रकाश सिंह बादल या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कौशल्य विकास कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. याबद्दल राजीव प्रताप रुडी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे.


रुडी पुढे म्हणले की, कौशल्य विकासासाठी ४० कौशल्यांची निवड करण्यात आली आहे. या कौशल्याचं प्रशिक्षण कौशल्य विकास आयोगाच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. यापैकी वाहन उद्योग, बांधकाम व्यवसाय, वाहतूक आणि सौंदर्य आणि आरोग्य इत्यादी कौशल्यांचं प्रशिक्षण पुण्यामध्ये दिलं जाणार आहे. सध्या बांधकाम व्यवसायात येत्या पाच वर्षात तीन कोटी कुशल मनुष्य बाळाची गरज आहे. तर वाहन उद्योगात सुमारे ४० लाख तर वाहतूक क्षेत्रात पाच लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आपल्याकडे मनुष्यबळ आहे पण प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. यासाठीच देशात पहिल्यांदा कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कौशल्य विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ शोधून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि यासाठी आवश्यक प्रशिक्षण संस्थाही सुरु केल्या जाणार आहेत, अशी माहिती रुडी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, देशात अनेक शिक्षण संस्था आहेत पण कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. तसंच कौशल्य प्रशिक्षण देणारे शिक्षकही उपलब्ध नाहीत. मेक इन इंडिया बरोबर मेकर्स ऑफ इंडिया ची ही गरज आहे. प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी संरक्षण दलातील निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाची चर्चा सुरु आहे. ज्यामुळे प्रशिक्षित आणि शिस्तप्रिय मनुष्यबळ निर्मिती करता येईल.

कौशल्य प्रशिक्षणा बरोबरच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात कौशल्य प्रशिक्षण समाविष्ट करता येईल का या संदर्भातही शालेय मंडळांशी चर्चा केली जात आहे असं रुडी यांनी सांगितलं.

देशाच्या विकासासाठी कौशल्य विकास हेच मुख्य सूत्र असल्याचं राजीव प्रताप रुडी यांनी नमूद केलं.