मुस्लिम शेजा-यांनी माल्दा मध्ये हिंदू शेजा-याचे केले अंत्यसंस्कार!

0

पश्चिम बंगाल मध्ये माल्दा येथे एका हिंदू माणसाचे अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र त्यासाठी पुढाकार घेतला तो शेजारच्या मुस्लिम तरूणांनी. बिश्वजीत रजक यांचा मृत्य़ू झाला त्यावेळी त्यांच्या शेजारच्या मुस्लिमांनी अगदी आर्थिक मदतीपासून तिरडी उचलण्यापर्यंत त्यांच्या कुटूंबियांची मदत केली.


३५ वर्षीय बिश्बजीत जे हंगामी मजूर होते, त्यांना दोन वर्षापासून यकृताचा कर्करोग झाला होता. त्यावर योग्य ते इलाज करणे त्यांना शक्य झाले नाही. आर्थिक कारणाने त्यांच्या दोन भावांनी मदत करण्यास नकार दिला, त्यावेळी त्यांच्या शेजा-या-पाजा-यांनी त्यांना कोलकाता येथे जाऊन इलाज करावे म्हणून आर्थिक मदत केली. मात्र ही मदत मिळाली तोवर खूप उशीर  झाला होता. कोलकाता येथील डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांना ते शक्य नव्हते.एका वृत्ता नुसार, ग्रामपंचायत सदस्य मोहमद यासीन यांनी सांगितले की, “ आम्ही गावतून पैसे गोळा करून बिश्वजीत यांना कोलकाता येथे उपचारासाठी पाठविले. पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला नेण्यास सांगितले. त्यासाठी आम्ही पैसे गोळा करण्यास सुरूवात केली होती.”

आठवडाभरात बिश्वजीत यांना रूग्णालयातून गावात परत आणण्यात आले. कोलकाता येथून परतल्यावर काही दिवसांत त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पालक, पत्नी आणि तीन मुली आहेत.

घरात अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठा मुलगा नसल्याने मुस्लिम तरूणांच्या गटाने पुढाकार घेतला, आणि अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली आणि ते तीन किमी दूर असलेल्या स्मशानात जावून पार पाडले. हिंदू गावक-यांनी नंतर त्यांच्या अस्थी विसर्जनाचे काम पूर्ण केले. एका वृत्ता नुसार, बिश्वजीत यांचे वडील नागेन रजक म्हणाले की, “ मला माझ्या मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे आणि मनुष्यबळ दोन्ही नव्हते, मला समजत नाही की जर गावकरी पुढे आले नसते तर काय झाले असते, त्यांचे अत्यसंस्कार कसे झाले असते”.

हाजी अब्दुल खालेक, यांनी यात पुढाकार घेतला होता, ते म्हणाले की, “ कोणताही धर्म मत्सर शिकवत नाही, बिश्वजीत आमच्या बांधवासारखाच होता, जर आम्ही अशा प्रसंगी कामी आलो  नसतो तर अल्लाहने आम्हाला कधीच माफ केले नसते, आम्ही ते दुस-या धर्माचे आहोत असा विचार करूच शकत नव्हतो”.

बिश्वजीत यांच्या पत्नी सरिता यांनी सांगितले की, “ माझे मुस्लिम बांधव पुढे आले, आणि त्यांनी शवाला गंगास्नान घातले, हिंदू समाजाचे लोकही त्यात सहभागी होते. मी माझा पती गमावला होता आणि सासरे खूप आजारी होते. मला येथील मुस्लिम समाजाचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आमच्यासाठी ते मुस्लिम म्हणून नाही, माणूस म्हणून उभे राहिले. त्यांच्यामुळेच माझ्या पतीला मरणोपरांत मुक्ती मिळू शकली आहे”.

धर्माच्या नावे जेंव्हा तुम्हाला खूप सारी भांडणे दिसतात, त्याचवेळी अशा कहाण्यातून हेच सिध्द होते की, सामाजिक सलोखा अजूनही नष्ट झाला नाही, नष्ट होवू शकत नाही.

(थिंक चेंज इंडिया)