शेतातून मॉलपर्यंत गणेश देशमुख यांच्या कलिंगडांचा गारेगार प्रवास

शेतातून मॉलपर्यंत गणेश देशमुख यांच्या कलिंगडांचा गारेगार प्रवास

Monday March 14, 2016,

5 min Read

             शेतीची आणि शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना मुंबईजवळच्या वांगणी गावात एक शेतकऱी मात्र मातीत पाय घट्ट रोवून उभा आहे. शेती करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत, त्यानं शेती हा आर्थिक फायदा मिळवून देणारा उत्तम मार्ग असल्याचं सिद्ध केल या कर्तृत्ववान शेतकऱ्याचं नाव आहे गणेश देशमुख.

image



दहावीपर्यंतचं शिक्षण, शेती विषयाचं कोणतंही शिक्षण आणि अनुभव नाही, अशी पार्श्वभूमी असलेल्या गणेश यांचा शेती करणाऱ्याचा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या गणेश यांना सिमेन्स कंपनीत झाडू मारण्याचं टेम्पररी काम मिळालं. कधी काम असायचं कधी नसायचं. एकदा मला संडास साफ करायला सांगितला. त्या दिवशी मी दरवाजा बंद करुन खूप रडलो. गणेश त्या कठिण दिवसांबद्दल बोलताना आजही हळवे होतात. त्यानंतर सॉक्स कंपनीत नोकरी केली, इस्त्रीचा व्यवसाय केला. रंगकाम केलं... छोट्या मोठ्या नोकऱ्या आणि व्यवसाय करत मी घर चालवत होतो. पण शेती करण्याची उर्मी मला स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी टेम्पररी काम सुटलं. त्या नोकरीच्या पीएफचे चौदा हजार रुपये मिळाले आणि त्या पैशातून १९९५ साली मी शेती करण्यास सुरवात केली.

image


पहिलं पीक लावलं टॉमेटोचं...शेती कशी करायची याची कोणतीही माहिती नव्हती. त्या वर्षी खूप पाऊस पडला. सगळं पीक वाया गेलं. नवीन बियाणं पेरायचं तर पैसा कुठून आणू. शेवटी अंबरनाथच्या एका टॉमेटो व्यापाऱ्याकडनं त्यानं फेकून दिलेले टॉमेटो विकत आणले. ते वाळवले आणि त्यातल्या बिया पेरल्या. मात्र त्या बियांमधून उगवून वर आलेली झाडं काळी-निळी दिसू लागली. काही समजेना. तेव्हा सरळ एक रोप उपटलं आणि कर्जतच्या भात संशोधन केंद्रात गेलो. तिथे माझ्या या रोपाचं परीक्षण करण्यात आलं. दोन दिवसांनी मला कळलं की माझ्या पाण्याच्या माऱ्यानं त्या रोपाच्या मुळाला बुरशी लागली होती. तेव्हा कळलं की रोप रुजणं, वाढणं, त्याला बुरशी येणं या सर्वांमागे विज्ञान आहे. मग मी जमेल तशी, जमेल तिकडून माहिती मिळवण्याचा सपाटाच लावला. लोकांना भेटून, पुस्तकं वाचून पिकांची, मातीची माहिती मिळवत गेलो. कर्जतच्या भात संशोधक केंद्राच्या प्रा. मेहंदळ्यांनी खूप मदत केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुढचे ४५ दिवस शेताला पाणी दिलं नाही. किटकनाशक फवारली आणि मला त्याचे चांगले रिझल्टस् मिळाले. माझी रोपं जगली. टॉमेटोचं भरघोस पिक आलं. मग प्रयोग करत करत गवार, वांगी, काकडी, कलिंगड अशी पिकं घेत गेलो. या सगळ्यासाठी वांगणी गावातली नदी, नाल्यालगतची जमीन भाडे तत्वावर घेतली. पाण्यावर अवलंबून राहिलो नाही. ठिबक सिंचन, प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करत पाण्याचा कमीत कमी वापर केला. पाणी हे रोपाच्या मुळांना लागतं, जमिनीला नाही. हे हळूहळू लक्षात येत गेलं, त्यामुळे पाण्याचा वापर आपसूकच कमी झाला. पाणी कमी उपसल्यामुळे वीजेचं बील पन्नास टक्यांनी कमी झालं. अतिपाण्यामुळे शेतातला पाण्याचा चिखल कमी झाला. रोगराईला आळा बसला.

image


या संपूर्ण काळात अडचणी सोबतीला होत्याचं. वांगणी आणि परिसरात अचानक नवी बांधकामं उभी राहू लागली. त्यामुळे टॉमेटो तोडणीसाठीचे मजुर रेती उपशासाठी जाऊ लागले. शेतीच्या कामासाठी माणसं मिळेनाशी झाली. तेव्हा विचार करता करता कलिंगडचं रोप घ्यावं असा विचार मनात आलं. वांगणी गावातली शेती म्हणजे शहरालगतची शेती. शहरातली कुटुंबं दोन ते चार माणसांची. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठाली कलिंगडं न पिकवता एका छोट्या कुटुंबासाठी पुरेसं होईल असं कलिंगड पिकवण्याची संकल्पना मनात आली आणि मग कामाला लागलो. तैवानवरुन बियाणं आणलं, त्याला आईस बॉक्स सेगमेंट म्हणतात. त्याचं फळ छोटं असतं. दीड ते दोन किलो वजनाचं. छोटं, दिसायला चकचकीत. ही कलिंगडं चवीला खूपच गोड असतात. कलिंगड विकण्यासाठी थेट मॉल गाठला. ठाण्याच्या हायपरसिटीमध्ये एक शेतकरी जातो. हे बहुदा पहिल्यांदाच घडत होतं. माझ्या हातात छान चकचकीत, सॅटीनच्या रिबीनमध्ये गुंडाळलेलं, बुटाच्या खोक्यात ठेवून गिफ्ट रॅप केलेलं कलिंगड होतं...आणि पुढ्यात उभे होते हायपरसिटी मॉलचे डेअरी-फ्रुटस् विभागाचे अधिकारी. माझं मार्केटिंग पाहुन ते खुष झाले आणि मग माझी कलिंगडांच्या हायपरसिटीच्या वाऱ्या सुरु झाल्या. त्यानंतर रिलायन्स, बिग बझार, गोदरेज अशा नामांकित ब्रन्ड्कडून गणेश यांच्या शेतात पिकणाऱ्या कलिंगडाला मागणी आहे. सध्या गणेश कलिंगडावर संबंधित कंपनीचं नाव नैसर्गिक पद्धतीनं लिहून देण्याच्या नव्या प्रयोगावर काम करताहेत आणि त्यासाठी त्यांचे पेटंट मिळवण्याचेही प्रय़त्न सुरु आहेत.

समोर आलेल्या संकटांनं खचून न जाता त्यावर मात करण्याच्या गणेश यांच्या वृत्तीनं आज त्यांना एक यशस्वी आणि प्रय़ोगशील शेतकरी अशी ओळख मिळवून दिलीय. गणेश यांच्या शेतीतले प्रय़ोग पहायला खुद्द पोपटराव पवार वांगणीला येऊन गेले. शेतीसाठी लागणारी अवजारं बाजारात मिळेनात तेव्हा गणेश यांनी स्वतः बनवली. कृषी विभागाच्या आदर्श शेती पद्धतीप्रमाणे एका एकरामागे शंभर क्विन्टल कलिंगड हे उत्तम उत्पादन समजलं जातं. मात्र गणेश देशमुख यांच्या एक एकर शेतात जवऴपास २८० क्विन्टल कलिंगडं पिकतात. गणेश यांच्याकडे काकडीचं उत्पादन एका एकरामागे ४०० क्विन्टल इतकं आहे. त्यांनी सुरु केलेल्या मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचा लाभ आज वांगणी आणि परिसरातील अनेक शेतकरी घेताहेत. पुढे जाऊन गणेश यांना शेतकऱ्यांसाठी रिसर्च सेंटरची उभारणी करायचीय. त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत कोकण कृषी विद्यापीठाच्या रिसर्च कौन्सिलिंगच्या समितीवर गणेश यांची नेमणुक करण्यात आलीय. अनेक शेतकऱ्यांना आज गणेश यांच्या रुपानं शेतीतील देव भेटलाय. पारंपरिक पद्धत मागे सारत, काळानुरुप होणारे बदल स्वीकारत, प्रयोग करत, अभ्यास करत शिकण्याची गणेश यांची पद्धत शेती फायद्याची असू शकते हे दाखवून देतोय. आज गणेश यांच्याकडे साडे सात लाखांचं किसान क्रेडीट कार्ड आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवत कर्जासाठी बँकांनी आपली दारं शेतकऱ्यांसाठी उघडली आहेत. शेतकरी वाचला तर शेती वाचेल, म्हणूनच आपण शेतकरी असल्याचा गणेश यांना रास्त अभिमान आहे. सकारात्मक विचार, कष्ट आणि प्रय़ोगशील वृत्ती असेल तर शेती यशस्वी होऊ शकते. हा धडा गणेश देशमुख यांनी घालून दिलाय.

मात्र वाढत्या शहरीकरणाचे वारे गावात शिरल्यानं वांगणी गावही बदलत आहे. इतकी वर्षे गणेश ज्या जमिनीवर शेती करत होते ती पंधरा एकर जमिन संबंधित मालकानं बिल्डरला विकल्यानं आता गणेश नव्या जमिनीच्या शोधात आहेत. मात्र ही अडचणदेखील एक दिवस सुटेल असा विश्वास गणेश यांना आहे. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

शेतकऱ्यांसाठी अनोखी चळवळ - लव दाय फार्मर

दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !

आता शेतीमालही ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध, postall.in वर करा कृषी उत्पादनांची खरेदी 

विक्री