शिक्षण क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी झटणाऱ्या सीमा कांबळे

0

आपल्या देशातील मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सीमा कांबळे जेव्हा पाचव्या इयत्तेत शिकत होत्या, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना काही कारणास्तव वरळी येथे स्थायिक व्हावे लागले. वस्तीत राहण्याचा हा त्यांच्या आयुष्यातील पहिला अनुभव होता. येथे आल्यानंतर पहिल्यांदा तर त्यांना काही समजेनासे झाले. कारण आतापर्यंत त्या एका शिस्तबद्ध वातावरणात वाढल्या होत्या. अचानक झालेल्या या बदलाने त्यांना समाजाच्या चोहीकडे पसरलेल्या अव्यवस्थेचा सामना करावा लागला. याच दरम्यान त्यांचा स्वतःवरचा विश्वासदेखील ढळू लागला होता. स्वतः बद्दल त्यांना अविश्वास वाटू लागला होता. मात्र कधीच हार न मानण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्या सामाजिक अव्यवस्थेशी सामना करत होत्या. सीमा सांगतात की, ʻकाही पारिवारिक कारणांमुळे मला माझ्या शिक्षणासाठी सरकारी शाळेत दाखल व्हावे लागले होते. ही एक अशी शाळा होती, जेथे सर्व भर हा शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांना साक्षर बनविण्यावर दिला जात होता. त्या शाळेत शिक्षणाऐवजी फक्त घोकंपट्टीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले जात होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, मी माझ्या शालेय जीवनात पहिल्यांदा या शाळेत शारीरिक शिक्षा भोगली. त्याकाळी शाळेत शिस्तिचे वातावरण राखण्यासाठी शिक्षा करणे, ही प्रचलित पद्धत होती. शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या असमानतेचा मी पहिल्यांदाच सामना करत होती. आपल्या प्रगतीचा वेग मंदावत असल्याने मी स्वतःला असक्षम समजत होती. याशिवाय अशा वातावरणात राहून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे, माझ्यासाठी कठीण होते. कारण तेथे कायम गोंधळाचे वातावरण होते. तसेच लक्ष विचलित होतील, अशी अनेक कामे तेथे होत असत. त्यामुळे तुम्ही कोणतेच काम एकाग्र चित्ताने करू शकत नव्हता.ʼ, असे सीमा सांगतात.

सीमा जेव्हा सहाव्या इयत्तेत शिकत होत्या, तेव्हा आकांक्षा फाउंडेशनने वरळी येथील नेहरू तारांगण येथे आपले एक अभ्यास केंद्र सुरू केले. या केंद्राबाबत उत्सुकतेपोटी अधिक माहिती घेण्यासाठी तसेच कदाचित या केंद्रात गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण दिले जात असेल, असा विचार करत सीमा या केंद्रात पोहोचल्या. येथे त्यांनी शालेय वातावरणापेक्षा एकदम वेगळे वातावरण अनुभवले. तेव्हा त्यांना त्याचे अप्रूप वाटले. सीमा सांगतात की, तेथे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि शैक्षणिक मूल्यांवर अधिक भर दिला जात होता. तेथील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास दाखवत होते. याच कारणामुळे सीमा यांनी या फाउंडेशनचा एक भाग होण्याचे ठरविले. सीमा सांगतात की, ʻसुरुवातीपासूनच माझी शिक्षिका राजश्री दीदी होती. याठिकाणी शिक्षिकांना दीदी आणि शिक्षकांना भैया अशी हाक मारतात. राजश्री दीदीने मला प्रोत्साहन दिले. त्यांनी माझ्यावर त्याकाळी विश्वास दाखवला जेव्हा माझा स्वतःवरचा विश्वास उडाला होता. माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला प्रेरणा दिली.ʼ खरेतर महाराष्ट्र राज्यात नगर निगमद्वारे संचलित शाळांची कार्यप्रणाली अशी आहे की, इंग्रजी माध्यमाच्या शाळा फक्त सातव्या इयत्तेपर्यंतच संचालित असतात. त्यामुळे जेव्हा सीमा यांनी सातवी इयत्ता उत्तीर्ण केली तेव्हा त्यांना पुन्हा एकदा खासगी शाळेत दाखल व्हावे लागले. खासगी शाळांच्या शिक्षणाचा स्तर सरकारी शाळांतील शिक्षणाच्या तुलनेत उच्च असतो. सीमा सरकारी शाळेमधुनच शिक्षण घेऊन आल्या होत्या त्यामुळे स्वतःला पुन्हा त्या वातावरणाशी जुळवून घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्वतःमध्ये काहीतरी कमतरता असल्याचा न्यूनगंड त्यांच्यात निर्माण झाला होता, सीमा सांगतात की,  ' त्या संपूर्ण काळात राजश्री दीदी यांनी धैर्याने आणि प्रेमाने मला प्रोत्साहन दिले. मी शिक्षणात एक सर्वसाधारण विद्यार्थिनी होते. अनेकदा मी विनाकारण वर्गात गैरहजर राहत असे. राजश्री दीदी अनेकदा माझ्या घरी येत असत. मला घाबरवत आणि पुन्हा शाळेत घेऊन जात असत.ʼयामुळे सीमा या सर्व अडचणींवर मात करण्यात यशस्वी झाल्या. याचे संपूर्ण श्रेय त्या आपल्या शिक्षिकांना देतात.

सीमा जेव्हा दहावीच्या वर्गात गेल्या, तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्या कुटुंबाची आशा, अपेक्षा कशाप्रकारे सीमा यांच्यावर अवलंबून आहेत, हे त्यांना समजावले. ʻतिला वाटत होते की, मी जगासमोर हे सिद्ध करावे की, आम्ही भलेही एका कुटुंबाच्या रुपाने अनेक आव्हानांचा सामना केला असेल. मात्र ती आव्हाने एका चांगल्या शिक्षणाच्या रस्त्यावरील अडसर कधीही ठरली नाहीत.ʼ, असे सीमा सांगतात.

परतफेडीचे संस्कार तर सीमा यांच्यावर बालपणातच झाले होते. कोणी वेगळ्या व्यक्तीने सीमा यांच्या जीवनाला चांगले वळण देण्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे आपल्यासारख्याच अन्य विद्यार्थ्यांसाठी सीमा यांना असेच काहीतरी करायचे होते. महाविद्यालयात जाण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांकरिता करण्याचे ठरविले. याकरिता त्यांनी एका संस्थेसोबतच ʻराजश्रीʼदीदी बनण्यासाठी स्वयंसेवा करणे सुरू केले. त्यामुळे त्यांची दिनचर्या कोण्या सुपरहिरोपेक्षा कमी धकाधकीची नव्हती. त्या रोज सकाळी या केंद्रांवर जाण्याकरिता घरातून बाहेर पडत असत. त्यानंतर महाविद्यालयात जात असत. याशिवाय महाविद्यालयातील अतिरिक्त वर्गांमध्येदेखील सहभागी होत असत. सीमा सांगतात की, ʻती दिनचर्या खुप व्यस्त असायची. मात्र त्यामुळे समाधान मिळत होते. भले मी दररोज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचत असते. तरीही मी मला मिळत असलेला वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरत असे. माझे उद्देश्य स्पष्ट होते. मला अधिकाधिक मुलांना शैक्षणिकबाबतीत सशक्त बनवायचे होते.ʼ सीमा यांनी आकांक्षासोबत पूर्णकालीन स्वरुपात जनसंपर्क आणि विपणन या विभागात नोकरी करणे सुरू केले. त्याच दरम्यान त्यांना व्यावसायिक शिक्षण घेण्याचादेखील विचार आला. एमबीए केल्यानंतर आपल्या कुटुंबाकरिता त्या आर्थिक स्थिरता आणू शकतात, या प्रेरणेमुळे त्यांना हा विचार आला होता. सीमा सांगतात की, ʻ२००९ साली त्याच दरम्यान टीएफआय फैलो आपल्या पहिल्या संघाच्या स्वागताची तयारी करत होता. ʻआकांक्षा फाउंडेशनʼ आणि ʻटीच फॉर इंडियाʼच्या संस्थापक शाहीन मिस्त्री (ज्यांना मी प्रेमाने शाहीन दीदी म्हणते) आणि मी, आम्ही दोघी अशा संस्थांसोबत जोडलेल्या आहोत. मात्र असे असले तरी मी कधीही अशा संस्थेसोबत सभासद म्हणून हिस्सा होण्याचा विचार केला नव्हता. त्यांनी मला असे करण्याचा आग्रह केला. मला २०१० सालातील तो क्षण लक्षात आहे, जेव्हा शाहीन दीदीने मला एका संमेलन कक्षात बसवून समजावले होते की या आंदोलनाचा हिस्सा होणे, माझ्यासाठी का गरजेचे आहे आणि मला तसे केलेच पाहिजे. अखेरीस त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेने मला या गोष्टीसाठी राजी केले.ʼ सुरुवातीला सफलतेबाबत सीमा साशंक होत्या. त्यांना अंर्तमनातून ही कायम भीती वाटत होती की, ज्ञान आणि स्पर्धेच्याबाबतीत त्या अन्य सभासदांच्या तोडीस तोड नाहीत. मात्र हेच विधिलिखित होते. अखेरीस फेलोशिपकरिता त्यांची निवड झाली आणि त्याचवेळेस १०० टक्के शिष्यवृत्तीसहित मुंबई वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट येथे त्यांना अॅडमिशन मिळाले. त्यांच्यासमोर दोन्ही कठीण पर्य़ाय होते. मात्र त्या कोणत्याही द्विधा मनस्थितीत नव्हत्या. सीमा सांगतात की, ʻतोपर्यंत देशातील शिक्षण क्षेत्रात पसरलेली असमानता दूर करण्यासाठी काही सकारात्मक काम करण्याचा माझा निर्णय झाला होता. माझ्यासाठी येथे राहून या अडचणींचा सामना करणे आणि त्यावर उपाय शोधणे यापेक्षा एमबीए करुन या अडचणींपासून दूर जाण्याची एक चांगली संधी होती. मात्र आव्हानांचा सामना करण्याच्या माझ्या स्वभावामुळे माझे ध्येय निश्चित झाले होते.ʼ स्वतःला आरामदायी जीवनशैलीतून बाहेर काढण्यासाठी सीमा यांनी घरापासून दूर पुणे येथे फेलोशिपला सुरुवात केली. आपल्या विद्यार्थ्यांकरिता एका शिक्षकाच्या रुपात आपण तितकेसे यशस्वी होत नाही, हे पाहून त्या रडवेल्या झाल्या. याशिवाय त्यांच्यासमोर आव्हानेदेखील काही कमी नव्हती. कमी पटसंख्येच्या अडचणीचा सामना करणाऱ्या सीमा यांच्या वर्गात माकडेदेखील घुसत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत होती. याशिवाय सीमा यांच्या प्रधानाचार्या त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या होत्या. त्यामुळे त्या सीमा यांच्या शैक्षणिक क्षमतांबाबत साशंक होत्या. कालांतराने या स्थितीत बदल झाला आणि सीमा यांना आत्मविश्वास वाढवणाऱ्या प्रतिक्रिया मिळू लागल्या. सीमा यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना येऊन मिठी मारली. त्यानंतर प्रधानाचार्यांनी हळूहळू त्यांच्या कामाची प्रशंसा करणे सुरू केले. अखेरीस त्यांच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिक्षेत चांगले गुण मिळवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी त्यांनी अभ्यासक्रमाची रुपरेखा आखणे किंवा आर्थिक माध्यमातून पीएमसीची मदत कऱणे, या कामांनादेखील सुरुवात केली. या समाजासोबत व्यतित केलेला प्रत्येक क्षण त्यांना या शिक्षणपद्धतीबाबत अधिकाधिक समजण्यास सहाय्यक ठरत होता. सीमा सांगतात की, ʻमी माझी फेलोशीप माझ्या विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या संगीतमयी प्रस्तुती ʻचार्ली एण्ड द चॉकलेट फॅक्ट्रीʼने पूर्ण केली. वास्तविक पाहता, हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा अनुभव होता. हे सादरीकरण काही सरकारी अधिकाऱ्यांसमोर करण्यात येत होते. त्यांच्यापैकी एकाला तर यावर विश्वास ठेवणे देखील कठीण जात होते की हे कोणत्यातरी सरकारी शाळेतील विद्यार्थी आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसोबत घालवलेल्या वेळेत मी हे शिकले आहे की, काहीही अशक्य नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही, जी तुमचे विद्यार्थी साध्य करू शकत नाहीत. फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास हवा.ʼ

सीमा सांगतात की, ʻफेलोशीपनंतर माझ्यासमोर शिक्षण क्षेत्रात काही सकारात्मक बदल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कारण लहानसहान स्तरावर कोणत्या बदलांची आवश्यकता आहे, याची मला माहिती होती. मी हे काम एका दीर्घकालीन दृष्टीकोनातून पूर्ण करू इच्छित होती. ३.२.१ शाळेचे संस्थापक गौरव टीएफआय ( टीच फार इंडिया ) च्या वेळेपासूनचे माझे मित्र आहेत. एका समारंभात त्यांनी मला म्हटले होते की, जर मी कधी शाळा सुरू केली तर त्या शाळेचा ते मला एक भाग नक्कीच बनवतील. २०१२ साली टीएफआय प्लेसमेंटचे अर्ज भरत होती. तेव्हा माझे लक्ष ३.२.१ शाळेत एका किंडरगार्डन शिक्षक पदाच्या भरतीच्या जाहिरातीकडे गेले. मी पूर्णकालीन नोकरी करण्यासाठी इच्छूक होते. मात्र गौरव यांनी मला बोलवले आणि माझे विचार बदलले. त्यानंतर माझा निर्णय झाला.ʼ पहिल्या दोन वर्षी सीमा यांनी किंडरगार्डनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले. यादरम्यान ʻग्रेट लीडरʼ होण्यात त्या यशस्वी झाल्या. प्रत्येक ग्रेडमध्ये १२० विद्यार्थी होते आणि सीमा यांची जबाबदारी त्यांना शिकवणे, त्यांना मानसिकरित्या सक्षम बनविणे, मूल्यांची जोपासना करणे, ही होती. सध्या त्या ३.२.१ शाळेच्या शैक्षणिक प्रमुख (हेड ऑफ अॅकॅडमिक्स) आहेत. वास्तविक हे काम एका प्रधानाचार्याप्रमाणे आहे. सीमा पुढे सांगतात की, ʻमी माझ्या अनुभवाच्या आधारे या निष्कर्षावर पोहोचली आहे की, वयस्क लोक हे लहान मुलांपेक्षा वेगळे नसतात. तुम्हाला दोघांनाही एकाच पद्धतीने शिक्षित करावे लागते. ʼ

सीमा यांच्या मते, शिक्षण क्षेत्रातील अनियमितता भारतातील मुख्य समस्यांपैकी एक आहे. त्या सांगतात की, ʻशिक्षण क्षेत्रातील असमानतेने अद्यापपर्यंत तरी मोठ्या संकटाचे स्वरुप धारण केलेले नाही. ʻचुकलेल्याच्या दाही दिशाʼप्रमाणे जेव्हा तुमच्यावर एखादे संकट येते तेव्हा तुम्ही त्यावर उपाय शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करता. संकटस्थिती उद्भवल्यावर तुम्ही स्वतःला त्यातून बाहेर काढण्यासाठी शक्यतेवढे सर्व प्रय़त्न करता. आज आपला देश शिक्षणाच्या बाबतीत अशा परिस्थितीत आहे ज्यात अशाच प्रकारच्या क्रिया आणि प्रतिक्रियांची आवश्यकता आहे.ʼ

भारतात शिक्षण क्षेत्रातील समस्यांची यादी फार मोठी आहे. त्यापैकी काही मुख्य समस्या म्हणजे,

स्वास्थ्य आणि स्वच्छतेची कमतरता - जर कोणत्या विशेष समाजात किंवा समुदायात स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही. तर त्या कारणाने त्यांची मुले सारखी आजारी पडत राहतात. तेव्हा ती मुले नियमित स्वरुपात शाळेत जाऊ शकत नाहीत आणि अभ्यासात लक्ष देऊ शकत नाहीत.

गरिबी - एखाद्या परिवाराचे जर एकूण मासिक उत्पन्न जवळपास पाच हजार रुपये आहे आणि त्या परिवारात एकूण ९ सदस्य आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की, तो आपली भूक आणि अस्तित्वाच्या लढाईला मागे ठेऊन आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष देईल.

शिक्षणाचे एका व्यवसायात झालेले रुपांतर - ʻगुरू गोविंद दोऊ खड़े काको लागे पाय, बलिहारी गुरू आपने गोविंद दियो दिखायʼ भारतासारख्या देशात जेथे कबीरासारख्या थोर संतांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून शिक्षकांना देवापेक्षा मोठा दर्जा दिला आहे, त्याच ठिकाणी आज शिक्षणासारख्या पवित्र कार्याला व्यवसायाच्या स्वरुपात पाहिले जाते. ही परस्पराविरोधी परिस्थिती आहे. आपल्या येथे शिक्षकांचे व्यवस्थित मूल्यांकनदेखील केले जात नाही आणि त्यांना योग्य ते मानधनदेखील दिले जात नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या देशाकडून सर्वश्रेष्ठ होण्याची अपेक्षा कशी करू शकतो. येथे शिक्षणाची आणि शिक्षकांची परिस्थिती फारशी अनुकूल नाही.

सरकारी धोरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सीमा सांगतात की, ʻमाझ्या मते शिक्षणाच्या अधिकाराबाबतच्या (आरटीई) अनेक योजना चांगल्या परिणाम दाखवतील. मध्यान्ह भोजनाचे (मिड डे मील) उदाहरण घ्या. शाळेत मोफत भोजन मिळते, या विचारानेच कमीत कमी मुले वर्गात दररोज उपस्थित राहतात. यासोबतच मला असे वाटते की, यापैकी अनेक धोरणे अधिक विचार करून राबविण्यात आली असती. आरटीईमध्ये प्रत्येक मुलाचे नामांकन निश्चित करण्यासाठी एक योजना आहे. मात्र या संकल्पनेसाठी काहीही करण्यात येत नाही, जी माझ्या मते सर्वात मोठी चूक आहे.ʼ

आरटीईच्या अंतर्गत शिक्षणाला फक्त साक्षरतेच्या रुपात परिभाषित करण्यात आले आहे. ज्यात विद्यार्थ्याच्या समग्र विकासाकरिता आवश्यक असलेल्या गोष्टींऐवजी फक्त लिहिण्यावर आणि शिकवण्यावर भर दिला जातो. ही धोरणे तयार करताना पायाभूत स्वरुपाची माहिती असणाऱ्या शिक्षकांना आणि प्रधानाचार्यांना सहभागी करणे आवश्यक होते. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर आणि अन्य संस्थांवर काही कडक प्रतिबंध न लगावता सरकार जर त्यांना आपल्या सोबत घेऊन शिक्षण क्षेत्रात काम करेल तर चांगले परिणाम दिसू लागतील. आमचे अधिकतर विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील कुटुंबातून येतात. याशिवाय शिक्षण क्षेत्रात पसरलेल्या या असमानतेला दूर करण्यासाठी काही सकारात्मक प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशात सीमा यांच्यासारख्या सामान्यातील असमान्य व्यक्ती स्वतः या समाजातून येतात आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतात, हे एका आशेच्या किरणासारखे आहे. या नायक नायिकांना श्रेय मिळण्याची किंवा न मिळण्याची कोणतीही चिंता नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की, त्यांना ते देऊ नये. शिक्षण क्षेत्रातील असमानतेचा आपण आपल्या सर्वांची समस्या असल्याप्रमाणे विचार करायला हवा. तसेच यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करायला हव्यात. भले त्यांचा हा प्रयत्न खारीच्या वाट्याप्रमाणे असेल. मात्र शिक्षण क्षेत्रातील असमानता हटविण्यासाठी योग्य दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे.

Related Stories

Stories by Ranjita Parab