योगायोगाने घडलेला अभिनयाचा प्रवास बनला ध्येयपूर्तीचा मार्ग

योगायोगाने घडलेला अभिनयाचा प्रवास बनला ध्येयपूर्तीचा मार्ग

Thursday January 07, 2016,

3 min Read

ठण ठण गोपाळ हा सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला या सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद सुमार होता मात्र यातल्या एका कलाकाराच्या अभिनयाची चहूबाजूंनी प्रशंसा केली गेली. हा कलाकार होता राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार विवेक चाबुकस्वार. बाबू बँड बाजा या सिनेमातनं पहिल्यांदा विवेकने सिनेमाचा कॅमेरा फेस केला, या सिनेमात काम करण्याची संधी ही फक्त आणि फक्त योगायोग होती. वडिलांच्या मित्राचा सिनेमा म्हणून बाबू बँड बाजासाठी विवेकला बोलावलं गेलं, त्याची रितसर ऑडिशन झाली आणि मग विवेकची निवड झाली.

image


विवेक सांगतो “मी नऊ महिन्याचा असताना पहिल्यांदा खरेतर कॅमेरा समोर काम केल होतं, अलका कुबलचा नवजात मुलगा म्हणून मला घेण्यात आलं होतं, माझे वडिल त्या सिनेमाच्या प्रॉडक्शन टिममध्ये काम करत होते, त्यांना नवजात मुल मिळत नव्हतं म्हणून मग मला घेण्यात आलं. यानंतर मी स्वप्न आणि हुनर सारख्या सिनेमांमध्ये छोटी छोटी काम केलीत पण माझी पहिली मोठी भूमिका म्हणजे बाबू बँड बाजा सिनेमातल्या बाप्याची भूमिका.”

बदलापूरमध्ये रहाणाऱा आणि एका सर्वसामान्य घरातनं आलेला हा कलाकार सध्या त्याच्या दहावीच्या परिक्षेसाठी तयारी करतोय. त्यामुळे अभिनयातनं त्यानं काही काळासाठी ब्रेक घेतलाय. विवेकचा आवडीचा विषय विज्ञान आहे तर भुगोल त्याचा नावडता विषय. क्रिकेट, कबड्डी आणि बॅडमिंटन हे त्याचे आवडीचे खेळ आहेत.

image


विवेक सांगतो “मी जेव्हा घरी असतो तेव्हा सर्वसामान्य मुलांप्रमाणे अभ्यास खेळ या गोष्टींमध्ये बिझी असतो, शाळेत भरपूर मित्र झालेत त्यामुळे शाळेतही मस्ती सुरु असतेच पण शुटिंगमध्ये असतो तेव्हा मात्र शॉट सुरु असताना मला शांत रहावं लागतं दिग्दर्शकाच्या सुचना ऐकायच्या आणि त्यानूसार अभिनय करायचा पण एकदा का शॉट संपला की धमाल असते. मराठीतल्या ज्या ज्या कलाकारांसोबत मी काम केलंय त्यांनी मला खुप छान मार्गदर्शन केलंय, मी माझ्या सहकलाकाराला बघत बघत अभिनय करत आलोय.”

आजही बाबू बँड बाजाच्या पहिल्या दिवसाच्या शुटिंगची आठवण त्याच्या मनात घर करुन आहे, “माझा पहिला शॉट आऊटडोअर होता, मे महिना आणि भोर गावात आम्ही उघड्या मैदानात शुट करत होतो, अभिनेता मिलिंद शिंदेसोबत माझं काम होतं, कडक उन्हात आम्ही उभे होतो आणि सोबत बँडवाले होते.

image


आमचा शॉट होता ज्यात मिलिंद सर बँड वाजवतायत आणि मी त्यांच्यासोबत उभं राहून खुळखुळा वाजवतोय, पहिला शॉट झाला पण दिग्दर्शकांना बँडबाल्यांकडून अजून काहीतरी हवं होतं म्हणून रिटेक वर रिटेक सुरु होते, मी ही त्यांच्यासोबत होतो, बराच वेळ असाच उभा राहिलो खरेतर उन्हाचा खूप त्रास होत होता पण कोणाला सांगणार पहिलाच दिवस होता म्हणून शांत राहिलो.

अखेर शॉट ओके झाला आणि मी सावलीमध्ये जाऊन बसलो आणि बसताक्षणी मी मागच्या मागे खाली बेशुद्ध पडलो सगळ्यांनी मला उचललं, पाणी दिलं प्यायला. बरं वाटलं पण दुसऱ्या दिवसापासून मात्र माझी बडदास्त सुरु झाली म्हणजे सतत सोबत एक ज्युसवाला असायचा, शॉट झाला की छत्री घेऊन एकजण यायचा.”

बाबू बँड बाजानंतर विवेकने सलाम, उचल्या, ठण ठण गोपाळ सारख्या सिनेमांमध्ये काम केले त्याची अशीच भुमिका असलेला धनगरवाडा हा सिनेमाही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. बाबू बँड बाजा या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेसाठी विवेकला त्यावर्षीचा बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विवेक तेव्हा फक्त चौथीमध्ये होता. त्यावेळी घरात येणाऱ्या एका ट्रॉफीपलिकडे पुरस्काराचं महत्व त्याला नव्हतं. मात्र आज हे महत्व तो जाणतो. कलाकाराला मिळणारा पुरस्कार आणि प्रेक्षकांचं प्रेम खरं प्रोत्साहन देतात असं तो मानतो.

image


विवेक सांगतो की “आता बालकलाकारांसाठी खूप चांगली संधी मराठी सिनेमात दिसून येतेय, म्हणजे फक्त सपोर्टिंग म्हणून नाही तर मुलांचे विविध विषय घेऊन सिनेमे बनवले जातायत, मला आनंद आहे की यातल्या काही सिनेमांचा मी भाग बनू शकलो, मी कधीच रितसर अभिनय शिकलो नाहीये पण भविष्यात मला अभिनयाचं शिक्षण घ्यायला नक्कीच आवडेल.”

योगायोगानं सुरु झाला विवेकचा अभिनयाचा हा प्रवास आज त्याचं पॅशन बनलाय. त्याला अभिनयातच स्वतःच करिअर करायचंय पण जर तो अभिनयात यशस्वी नाही झाला तर बॅकअप प्लॅनही त्याचा तयार आहे. विवेकला फोटोग्राफीही आवडते, पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे फोटो टिपायला त्याला आवडतं त्यामुळे जर तो यशस्वी अभिनेता नाही बनू शकला तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करेल.

असो..प्रेक्षक आणि विवेकचे चाहते मात्र त्याचा हा बॅकअप प्लॅन कधीच यशस्वी न होवो हिच प्रार्थना करत असतील.