दिव्यांगाच्या कृत्रिम अवयव निर्मितीमध्ये एलिम्कोचे मेक इन इंडिया!

0

जन्मत: किंवा एखाद्या अपघाताने अपंगत्व म्हणजे कमजोरी असे आता मानले जात नाही. कानपूर येथील कृत्रिम अवयव निर्माण करणा-या एलिम्को ने जर्मनी आणि ब्रिटनच्या कंपनीसोबत तांत्रिक सहकार्य करार करून अधिक उपयोगी आणि आधुनिक प्रकारच्या कृत्रिम अवयवांचे उत्पादन सुरू केले आहे. दिव्यांगाना हे अवयव अपेक्षेनुसार कमी किमतीत दिले जाणार आहेत.

कानपूर येथील एलिम्काे मध्ये प्रॉडक्ट असेंबलिंग युनिटचे उदघाटन करताना सामाजिक न्याय आणि हक्क विभागाचे मंत्री थावरचंद गहलोत यांनी एलिम्कोने दिव्यांगाच्या करीता करीत असलेल्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. त्याच बरोबर केंद्र सरकारने यासाठी सुरू केलेल्या नव्या योजनांची देखील माहिती दिली. त्यांनी यावेऴी सांगितले की, दिव्यांगाना राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासोबतच सुगम्य योजना आणि रोजगारासाठी जॉब पोर्टलची सुरुवात केली जात आहे.

एलिम्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी आर सरीन यांनी एलिम्कोच्या आधुनिकीकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, १४४एकर जमिनीवर तयार होणा-या नव्या युनिट मध्ये पूर्णत: संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यात केवळ कच्चा माल पोहोचविण्याची गरज आहे. त्यानंतर सारी प्रक्रिया यंत्राने होईल. कच्चा माल उत्पादनात परावर्तित करण्यासाठी यंत्राची मदत घेतली जाईल. या आधुनिक यंत्रातून तयार झालेल्या मानवी अंगाना मुळच्या मानवी अवयवांपेक्षा वेगळे असल्याचे ओळखणे कठीण जाईल.

सा-या जगात होईल एलिम्कोची ओळख

सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाव्दारे मेक इन इंडिया योजने अंतर्गत जर्मनीची कंपनी ऑटोबँकव्दारे तंत्रज्ञान घेऊन कानपूर येथील कार्यशाळेत अवयव तयार केले जातील. याच करारानुसार कंपनी भारतात तयार होणा-या उत्पादनातून ३० टक्के स्वत:ची विक्री जगभरातील बाजारात करेल.

दिव्यांगाना दिल्या ट्राय सायकल्स

या प्रसंगी एलिम्को मध्ये आधुनिक कृत्रिम अवयव जोडणी प्रकल्प, टोल फ्री क्रमांक आणि समाधान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दिव्यांगाना सुमारे पाचशे ट्राय सायकल्स,६० व्हिल चेअर,आणि दहा ट्राय रोलेटर देण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षपदी कानपूरचे खासदार डॉ मुरली मनोहर जोशी होते.