नवीमुंबईतील नेरुळ मध्ये सुरू झाले आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी अधाता ट्रस्टचे सहावे केंद्र

नवीमुंबईतील नेरुळ मध्ये सुरू झाले आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी अधाता ट्रस्टचे सहावे केंद्र

Wednesday September 14, 2016,

2 min Read

मुंबईतील एक सेवाभावी संस्था अधाता ट्रस्टने ज्येष्ठ नागरीकांना आधार देणारे अनेक उपक्रम गेल्या काही वर्षापासून राबविले आहेत. नवी मुंबईतील नेरूळ येथे नुकतेच त्यांचे सहावे समाजकल्याण केंद्र सुरू झाले आहे. नेरुळ येथील एसआयइएस महाविद्यालयाजवळ हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबई परिसरात सुरू झालेले संस्थेचे हे पहिलेच केंद्र असून ते सुरू करण्यामागे या परिसरातील वयोवृध्द ज्येष्ठ नागरीकांना चांगले जीवन जगता यावे, आणि जीवनाच्या सायंकाळी त्यांना आधार मिळावा हा उद्देश आहे. यापूर्वी संस्थेची मुंबईतील सायन, अंधेरी माटुंगा, साकीनाका आणि टीआयएसएस मुंबई येथे केंद्र सुरू असून येत्या पाच वर्षात अशाप्रकारची शंभर केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. नवी मुंबईत धर्मादाय रुग्णालय देखील सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

image


संस्थेचे संस्थापक अरुण नंदा म्हणाले की, “ ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या काळात निवृत्तीनंतरचे आयुष्य म्हणजे नवे आव्हान आणि जीवनातील नव्या संघर्षांचा काळ असतो. जीवनाचा हा दुसरा डाव खेळताना त्यांना स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासाने जगता यायला हवे, त्यासाठी आधात ट्रस्ट मार्फत काही विशिष्ट कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना धीर देणारे आणि प्रोत्साहित करेल असे वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यातून त्यांना जीवनाच्या नव्या आव्हानाना तोंड देण्यास सज्ज केले जाते. नव्या जगातील नव्या गोष्टीसोबत परिचय करुन देत त्यांनाही आत्मविश्वासाने नव्या जीवनाचा आनंद देण्याची एक खास पध्दत आधातामध्ये विकसित करण्यात आली आहे. 

image


नेरुळ येथील केंद्राच्या उद्घाटन समारंभात नर नृत्य आणि रंगमंचावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आधाताच्या मुंबईतील सर्व केंद्रानी त्यासाठी जोरदार तयारी केली होती आणि सहभाग घेतला होता. यावेळी एस आय इ एस महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा विशेष सहभाग होता. ज्येष्ठ नागरिकांना काही वर्षे मागे घेऊन जात त्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सादरी करण केले.

image


देशाच्या वीस टक्के लोकसंख्येइतके ज्येष्ठ नागरीक २०५० पर्यंत आपल्या देशात असतील, त्यामुळे अशा प्रकारच्या संस्था आणि त्यांच्यासाठी करण्यात येणा-या सेवाभावी कार्याचे महत्व अधोरेखित होते. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात सहन करावे लागणारे प्रश्न समस्या जीवनातील रिकामेपणा एकटेपणा तसेच त्यांना समाजाकडून केली जाणारी हेटाळणी आणि अनादर यामुळे त्यांचे जीवन असह्य होवून जाते. भारताच्या ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, प्रतिभा यांचा फायदा नव्या समाजाला होण्याची गरज असताना त्यांना अडगळीच्या वस्तूप्रमाणे वागणूक दिली जाते. 

image


जैविक विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसांचे वाढलेले आयुर्मान आणि जीवनाकडून वाढलेल्या अपेक्षा यामध्ये उतरत्या वयात ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून नैराश्याची भावना आणि उदासवाणे आयुष्य त्यांच्या पदरी येते यातून त्यांना दूर ठेवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. ज्यांची मुले नातवंडे दूर आहेत किंवा सोबत असूनही त्यांना त्यांच्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नाही अशा वयोवृध्दांचे जीवन तर भयावह होण्याची शक्यता आसते त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची आजच्या काळात नितांत गरज निर्माण झाली आहे.