यशोशिखरावर विराजित कृतीचा रंजक प्रवास

कृती जैन, पुण्यातील एक तरुण यशस्वी बांधकाम व्यावसायिक... ललितकुमार जैन यांच्यासारख्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची मुलगी असलेल्या कृतीला व्यवसायाचे बाळकडू घरातच मिळाले...आठव्या वर्षी सर्वप्रथम वडीलांबरोबर सोसायटी हॅंडओव्हरच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या कृतीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती अवघ्या पंधराव्या वर्षी... तर सतरा वर्षाच्या वयातच ती कार्यकारी संचालक बनली.. आता तुम्ही म्हणाल की, तिच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या तरुणीसाठी यात विशेष ते काय? पण तसे मुळीच नाही... हे यश तेवढे सहज नक्कीच नव्हते. त्यासाठी अथक मेहनत घेतल्याचे कृती आवर्जून आणि अभिमानाने सांगते. वयाची तिशीदेखील पूर्ण न केलेल्या कृतीचा हा रंजक प्रवास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...

0

पुण्याची कृती जैन जेंव्हा कुमार बिल्डर्ससारख्या नामांकीत कंपनीमध्ये कार्यकारी संचालक झाली त्यावेळी तिचे वय होते अवघे सतरा.... तिच्या वयाचे तरुणतरुणी मौजमजेत मग्न असताना कृतीने मात्र आपले ध्येय निश्चित करुन त्यावर दमदार वाटचाल सुरु केली. एवढेच नाही तर कारकिर्दीच्या सुरुवातीच्याच काळात अनेक मानाचे पुरस्कार मिळवित तिने आपले कर्तृत्व सिद्धही करुन दाखविले. महाराष्ट्राचे तत्कालिन राज्यपाल एस एम कृष्णा यांच्या हस्ते मिळालेला द टॉप मॅनेजमेंट कन्सोरशियम एवोर्ड ऑफ एक्सलन्स, २००४-०५ (मेहर पदमजी आणि सुलज्जा एफ मोटवानी यांसारखे मान्यवर या पुरस्काराचे मानकरी आहेत) हा त्यापैकी एक महत्वाचा पुरस्कार... त्याचबरोबर एनडीटीव्हीच्या यंग गन्स ऑफ रियल इस्टेट या कार्यक्रमात २०१२ साली तिला वक्ता म्हणून बोलविण्यात आले होते.


अशा प्रकारे आज यशोशिखरावर असलेल्या कृतीचा प्रवासही तितकाच रंजक म्हणावा लागेल.. या प्रवासाला सुरुवात झाली ती तिच्या वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी....तेदेखील एका योगायोगाने... वडीलांबरोबर काही काळ घालविण्याच्या निमित्ताने तेरा वर्षांच्या लहानग्या कृतीने आपली ती उन्हाळी सुट्टी वडिलांबरोबर त्यांच्या ऑफीसमध्येच घालविण्याचे ठरविले. यावेळी ती त्यांच्याबरोबर विविध बांधकाम साईटस् वरही जात असे. मात्र वडिलांबरोबर वेळ घालविण्याबरोबरच तिचा यामागे आणखी एक छुपा हेतुही होता... तो म्हणजे कामापासून सुट्टी घेऊन सगळ्यांना बाहेर सुट्टीसाठी नेण्यास वडिलांना राजी करणे...प्रत्यक्षात झाले मात्र उलटेच.... कृतीच यामध्ये अडकली... “मी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करत होते आणि त्यांनीच मला आत ओढले,” कृती हसून सांगते.

एकीकडे वडीलांना त्यांच्या प्रत्येक बैठकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतानाच, ती दिवसभर त्यांच्या संगणकावर बसून मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये काही ना काही करत असे. त्याचबरोबर ती अनेकदा त्यांच्या कामाच्या चर्चेच्यावेळीही तेथे बसत असे आणि त्यांची बोली समजण्यासाठी काही नोटस् ही काढत असे. एक प्रसंग आठवून आजही तिला हसू येते. कायद्यासंबंधीच्या एका बैठकीला कृती हजर होती. त्यामध्ये काही माहिती देण्यासाठी एक कायदेतज्ज्ञही आले होते. मात्र त्यावर अधिक विचार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी आणखी एक औपचारीक बैठक बोलाविण्यात आली. त्यावेळी कृतीने हे सगळे जण एका कलमाचा विचार करण्यास विसरले असल्याचे लक्षात आणून दिले. तिच्या या बोलण्याने पुढील पाच सेकंद सगळे एकदम शांतच झाले आणि त्यानंतर मात्र सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक खुषीचे हास्य उमटले. “अशीही मी खूप बडबडी आहेच आणि प्रत्येक गोष्टीबाबत मला मतही असते,” ती सांगते. या प्रसंगी कायदेतज्ज्ञाकडून मिळालेली शाबासकची थाप मात्र कृतीसाठी एका वेगळ्या अर्थी महत्वाची ठरली. याच क्षणी तिने स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेण्याचा आपला विचार बदलून कायद्याचे शिक्षण घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. (या व्यवसायासाठी कायद्याची पदवी अतिशय उपयोगी ठरु शकते)

खरे तर दहावीची परीक्षा संपताच, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच कृतीने औपचारीकपणे ऑफीसमध्ये जाण्यास सुरुवात केली. पण तिच्या वडीलांनी तिला कोणतीही गोष्ट सहजसाध्य होऊ दिली नाही. पुढील दोन वर्षे २३ वेगवेगळ्या विभागांमध्ये तिला काम करायला लागले. आज जे लोक कृतीच्या हाताखाली काम करतात त्याच लोकांच्या हाताखाली ती त्याकाळात शिकली. इतर सगळ्यांप्रमाणेच तिलाही ठराविक काम पूर्ण करावेच लागत होते.

तिच्या तर मते बॉसची मुलगी असल्याने तिच्यावर शिस्तबद्ध रीतीने काम करण्याचा थोडा जास्तच ताण होता. एकूणच ललितकुमार जैन यांची मुलगी म्हणून तिला सहजपणे काही मिळाले नाही. हो, आता एका गोष्टीसाठी मात्र ती आपण चांदीचा चमचा घेऊन जन्मल्याचे मान्य करते, ती म्हणजे या क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्ता आणि विचारवंतांपर्यंत तिला सहज पोहचता आले. ललितकुमार यांचा या क्षेत्रातील लोकसंग्रह दांडगा होता. त्यामुळेच तिला तिच्या बांधकामविषयक किंवा वास्तुविषयक सर्व शंकांच्या निरसनासाठी दिग्गज लोकापर्यंत पोहचण्यासाठी केवळ एक फोन पुरेसा होता. सहाजिकच शिकण्याची क्रिया त्यामुळे जास्त सुलभ झाली. या दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतरच तिला कार्यकारी संचालक पद मिळू शकले. कदाचित ती त्यावेळी शहरातील सर्वात तरुण कार्यकारी संचालक होती. त्याचवेळी तिने बीबीए-एलएलबी अशा डुएल पदवीसाठी प्रवेश घेतला आणि त्यातही यश मिळविले.

लहानपणापासूनच मिळालेल्या आत्मविश्वासामुळे तिचे ध्येय निश्चित होते आणि कदाचित त्याचमुळे स्त्री-पुरुष भेदभावाबद्दलचा विचारही तिच्या मनात आला नाही. लहानपणापासून ती एखाद्या टॉमबॉयसारखीच वाढली आणि त्यामुळेच बांधकामाच्या साईटवर आपण एकटीच मुलगी आहोत किंवा आंतरराष्ट्रीय दौऱ्याच्यावेळी ९० इतर बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपण एकट्याच आहोत, या गोष्टीने तिला काहीच फरक पडत नव्हता. मात्र पाच वर्षांपूर्वी पुण्याच्या क्रेडईच्या बैठकीत तेथील अध्यक्षांच्या भाषणांत तिचे या सत्याकडे लक्ष गेले. “दोनशे लोकांच्या त्या बैठकीत आपल्या भाषणाची सुरुवात करताना अध्यक्ष म्हणाले, ‘माय फेलो डेवलपर्स ऐंड द लेडी’. ते मला लेडी म्हणाले?” त्या विचाराने आजही कृतीला हसू येते... तिच्या मते स्त्री असण्याचा एक फायदा नक्कीच आहे, ते म्हणजे या स्त्रिला काय म्हणायचे आहे, ते सगळ्यांनाच जाणून घ्यायचे असते.

अशा प्रकारे आत्मविश्वासाने भरलेल्या कृतीच्या आयुष्यात सहाजिकच तिच्या वडीलांचे स्थान खूपच महत्वाचे आहे. ती केवळ दोन शब्दात तिच्या स्मूर्तीस्थानाचे वर्णन करते – “माझे बाबा”

कृतीचे कुटुंब हे पिढीजात व्यावसायिक कुटुंब आहे. महत्वाकांक्षी असणे तिच्या रक्तातच आहे. ललितकुमार जैन यांच्याबाबत ती अतिशय अभिमानाने बोलते. तिच्या मते जैन या द्रष्ट्या व्यक्तिमत्वाचा तिला घडविण्यातील वाटा अमूल्य आहे. मोठी स्वप्ने बघायला त्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. तसेच कालात्रवा आणि झहा हादीद यांच्यासारख्या वास्तुविशारदांपासून प्रेरणा घेऊन पॅरॅमेट्रीक (प्रचलीय) इमारती बांधण्याबाबत विचार करण्यास प्रोत्साहन दिले, तेदेखील तेंव्हा जेंव्हा अशा इमारती भारतात फारशा प्रचलित नव्हत्या. त्याचबरोबर जेवणाच्या टेबलावर वडीलांकडून त्यांच्या भागीदारीविषयी किंवा जमिनींच्या करारासंबंधी जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या चर्चाही तिला आठवतात. तिचा या विषयातील रस वाढविणे आणि तिची या बोलीशी ओळख करुन देणे हा तर त्यामागचा हेतू होताच पण त्याचबरोबरच लहान वयातच तिच्यामध्ये महत्वाकांक्षा जागृत करणे, हा देखील या चर्चांमागचा उद्देश्य होता.

शिस्त आणि ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करणे, या यश मिळविण्यासाठी अतिशय आवश्यक बाबी आहेत. मग ते यश व्यावसायिक असो किंवा खासगी... अकरा वर्षांची असताना ती राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळत असे. वयाच्या तेराव्या वर्षी, जेंव्हा वडीलांना सुट्टीसाठी बाहेर काढणे हेच तिचे ध्येय होते, ती सकाळी साडे सात वाजताच नाष्ट्याच्या टेबलपाशी हजर होत असे, तेदेखील त्यांच्याबरोबर ऑफीसला जाण्यासाठी तयार होऊनच... पंधराव्या वर्षीच तिच्या कामाच्या खडतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली, जेंव्हा बहुतेक तरुण-तरुणी मजा-मस्करीत गर्क होती... आणि जेंव्हा ती सतराव्या वर्षी कार्यकारी संचालक झाली, तेंव्हाही ती सुस्तावली नाही. तर आजही रात्री कोणत्याही कारणाने कितीही उशीर होवो, सकाळी ठीक आठ वाजता ती कामावर हजर असे.

अशा प्रकारे सतत कामच करत असणाऱ्या या तरुणीला काही सामान्य आयुष्य आहे की नाही? तिचे मित्रमैत्रिणी तिच्याशी कसे जुळवून घेतात? हे प्रश्न सहाजिकच आपल्याला पडतात. मात्र आपल्या कामाचा कोणताही विपरित परिणाम मित्रमैत्रिणींच्या वर्तुळावर झाला नसल्याचे कृती सांगते आणि याबद्दल ती नेहमीच त्यांची आभारी असते. एवढ्या लहान वयात तिच्या कामाचे स्वरुप पाहून सुरुवातीला तेदेखील गोंधळूनच गेले, पण नंतर मात्र त्यांनी तिच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिला सतत प्रोत्साहीत केले तसेच त्यासाठी सर्वोतोपरी मदतही केली. तिला अभ्यासात मदत करणे, त्यांच्या भेटींबाबतची माहिती देणे, तिच्या सोयीनुसार कार्यक्रम आखणे, त्यांनी सर्व काही केले. त्यामुळेच लहान वयातच कामाला सुरुवात केल्याने खूप काही हुकल्याची भावना तिला नाही. “मुख्य म्हणजे त्यांच्यापैकी काही जणांना व्यावसायिकपणे विचार करायला मी शिकवू शकले, याचा मला जास्त आनंद आहे. आता मला तेरा वर्षांचे मित्र आहेत आणि सत्तर वर्षांचेही...” ती सांगते.

आयुष्यात खूपच लवकर कामाला सुरुवात केल्याबद्दलचे तिचे मतही तिच्याचसारखे खूप हटके आहे. “माझ्या वयाचे नवे मित्रमैत्रिणी मिळवणे माझ्यासाठी कदाचित आता कठीण असेल, कारण त्यांचे पालक यापूर्वीच माझे मित्र झाले असतील,” ती हसून सांगते.