अंध व्यक्तींना मिळाला चित्र पाहण्याचा अनोखा अनुभव

0

चार-पाच वर्षांपुर्वीची घटना... पुण्यातले चित्रकार चिंतामणी हसबनीस एके दिवशी बाईकवरुन जात होते. अतिशय रहदारीचा रस्ता सहजरित्या पार करणाऱ्या एका दहा-बारावर्षांच्या अंध मुलीकडे त्याचं लक्ष गेलं. फक्त हातात सफेद काठी होती म्हणून तिला अंध म्हणायचं, बाकी ती अगदी सर्व सामान्यांसारखी होती. अगदी सहज रस्ता पार करुन गेलेल्या या मुलीला पाहून ते सुन्न झाले. त्यांना काहीच सुचत नव्हते. काहाही दिसत नसताना ही मुलगी जर रस्ता पार करुन जाऊ शकते मग अशा व्यक्तींसाठी चित्रं का असू नये. असा विचार सहज त्यांच्या मनात येऊन गेला. यातूनच ‘सी माय पेन्टींग विथ क्लोस आईज एन्ड ओपन मांईंड’ या अनोख्या चित्र प्रदर्शनाची संकल्पना पुढे आली. खरं तर गेली २५ वर्षे ते चित्र काढतायत. पण चित्रांचं प्रदर्शन भरवावं असं त्यांना वाटलं नव्हतं. आपल्या चित्रांचा कुणालातरी उपयोग झाला पाहिजे. ती फक्त चित्र राहू नयेत तर कुणासाठी तरी अनुभव ठरावीत असं त्यांचं म्हणणं होतं. ही रस्ता ओलांडणारी मुलगी त्यांना स्फुरण देऊन गेली.

अंधांना चित्रांचा अनुभव घेता यावा यासाठी ब्रेलभाषेत त्या चित्रांची माहिती कॅनव्हासवरच देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण इथं एक समस्या होती. चिंतामणी हसबनीस यांना ब्रेल येत नव्हतं. त्यांनी इंटरनेटवरुन ब्रेलची मुळाक्षरे काढली, ते ब्रेल शिकले, त्याचे शब्द बनवायला शिकले आणि त्यानंतर वाक्य बनवू लागले. आता आपल्या चित्राचा आशय त्यांना ब्रेलमधून कॅनव्हासवर साकारायचा होता. तसं केल्यानं अंध व्यक्तींनाही चित्रं पाहता येणार होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणताना सुरुवातीला फार त्रास झाला. पण तो अनुभव मनाला आनंद देणारा होता.

मुंबईच्या नेहरु सेंटर, वरळी इथं ‘सी माय पेन्टींग विथ क्लोस आईज एन्ड ओपन मांईंड’ या अनोख्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. ब्रेललिपीत माहिती असलेली मोजकी २३ चित्रं या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. प्रदर्शनात शिरता क्षणी एक मोठी वॉल चिंतामणी यांनी तयार केली होती. त्यावर चिंतामणी यांनी एका कवितेच्या माध्यमातून ब्रेल लिपीतून आपल्या या चित्रांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या चित्रात त्यांना स्फुरण देणारी ती पुण्यातली अंध मुलगी होती. ही वॉल म्हणजे ब्रेल लिपीतून चित्र पाहणाऱ्या या अंध व्यक्तींशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न होता.

या प्रदर्शनाला जवळपास ६०० अंध व्यक्तींनी भेट दिली. पहिल्यांदाच खास आपल्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनात येऊन त्यांनी ही चित्रं ब्रेलच्या माध्यमातून पाहिली आणि अनुभवलीही. या प्रदर्शनात लता मंगेशकर, पंडीत रवि शंकर, अमिताभ बच्चन असे अनेक पोर्टेट होते. प्रत्येक चित्राखाली त्यांची माहिती दिली होती. त्यामुळं प्रदर्शन पहायला आलेल्या अंध बांधवांना या सर्व महानुभावाचे चित्रं पाहिल्याचा आनंद देत होती. तो त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होता. त्यातल्या जवळपास २०-२५ अंधांनी आपली चित्रं चिंतामणी यांना दिली. 


जीवनात कायमचा अंधार असताना आपल्या कल्पनेतून साकारलेली ही चित्रं वेगळ्या विश्वातली होती. त्या चित्रांमधून जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळत होती. ती जगणं सफल करणारी होती असं चिंतामणी सांगतायत. चित्र प्रदर्शन संपलं असलं तरी ती चित्रं आजही चिंतामणी यांना प्रेरणा देत राहतायत.