ग्रामीण भारताचं वास्तव दाखवणारी ‘परी’

0


परी नाव वाचून आश्चर्य वाटलं? पण नावावर जाऊ नका..ही काही लहान मुलांच्या स्वप्नात येणारी परी नाही तर ही परी प्रत्यक्षात आहे आणि इंटरनेटवर एका क्लिकद्वारे तुम्ही या परीला भेटू शकता. खरं तर हे एक डिजिटल अर्काइव्ह आहे आणि याचं पूर्ण नाव आहे ‘पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया (PARI)’ अर्थात ग्रामीण भारतातील लोकांचे संग्रहण. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी याची सुरूवात केली. या संग्रहणामध्ये सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्टींवरील आलेख, चित्र आणि व्हिडिओज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्रामीण भारताची आधी कधीही न दिसलेली असामान्य वैशिष्ट्यं जगासमोर आणण्याचं काम परीने केलं आहे.


पी साईनाथ यांनी आपल्या आयुष्यातील ३५ वर्ष पत्रकारितेत घालवली आहेत. गेल्या २२ वर्षांपासून ते ग्रामीण भारतावर लिहित आहेत. पण त्यांच्याप्रमाणे विचार करणारे फार थोडेच लोक आहेत. ते सांगतात की पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात शिरल्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले कारण ग्रामीण भारतात गरीबीची मुळं खूप खोलवर रूजल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

ग्रामीण भारताएवढी मोहून टाकणारी जागा या पृथ्वीवर कोणतीच नाही असं ते म्हणतात. ग्रामीण भारतात ८८. ३ कोटी लोक राहतात, ते ७८० प्रकारच्या भाषा बोलतात, जगातील सगळ्यात जुने आणि वेगळे व्यवसाय करतात. तसेच देशाच्या इतर भागातून लुप्त झालेल्या नृत्यप्रकारांनी स्वत:चं मनोरंजनही करतात. या देशाला वेगळा आणि महान बनवण्यास कारणीभूत ठरलेल्या गोष्टी गेल्य़ा २० ते ३० वर्षात लोप पावल्याचं पी साईनाथ सांगतात, आणि लोप पावण्याची ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. ग्रामीण भागातील बोलीभाषा दिवसेंदिवस नामशेष होत चालल्या आहेत. प्रत्येत पिढी वेगानं आधीच्या पिढीशी जुळवून घेत असली तरी योग्य त्या प्रतिमा, दृश्य आणि तोंडी माहिती याच्या अभावामुळे येणाऱ्या पिढ्यांना आपल्या भुतकाळाबद्दल एकदम कमी माहिती असेल किंवा ते त्याबाबत अनभिज्ञच राहतील. या दुर्मिळ साधनांचा सांभाळ केल्यास आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल. पण जोपर्यंत ग्रामीण भारताशी आपण थेट संपर्क साधत नाही तोपर्यंत आपल्याला तेथील वास्तवाची माहिती मिळणार नाही. तेथील भयंकर वास्तवाची व्याप्ती एवढी आहे की ते जाणून आपली विचारसरणीच बदलू शकते. “सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जिवंत नियतकालिक” असं घोषवाक्य असलेलं परी नावाचं अर्काईव्ह तुम्हाला निश्चितच अविस्मरणीय आणि ज्ञानपुरक अनुभव देतं. या मनमोकळ्या गप्पांमध्ये पी साईनाथ परीच्या वैशिष्ट्यांवर विस्तारानं चर्चा करतात. ते सांगतात की पत्रकारिता करीत असताना त्यांना योगायोगानं काही अनपेक्षित रोजगारांविषयी माहिती मिळाली आणि ग्रामीण भारतातच माणुसकीचं सगळ्यात चांगलं रुप कसं काय बघायला मिळतं हे समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेत भरती होणाऱ्या ओडिशाच्या लक्ष्मी पांडा या सगळ्यात तरुण सैनिक होत्या, ही माहिती परीमुळे मिळते असं पी साईनाथ सांगतात. एकीकडे राज्य सरकार लक्ष्मी यांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा देण्याचा आग्रह करतंय तर त्या जेलमध्ये गेल्या नाहीत म्हणून केंद्र सरकार त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानायला तयार नाही.


कोवलमच्या एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या २१ वर्षांच्या काली वीरपद्रनचीही अशीच एक कहाणी आहे. भरतनाट्यम आणि तीन प्राचीन तामिळ लोकनृत्यप्रकारांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेले ते जगातील बहुतेक एकमेव व्यक्ती आहेत.


परीवर अशाच एका टोमॅटो गीताची माहिती देण्यात आली आहे. सोप्या इंग्रजी भाषेतील हे गीत सर्व भाज्यांच्या स्तुतीपर रचलेलं आहे. आणि एका आदिवासी मुलीने हे गीत गायले आहे.

साईनाथ म्हणतात, अशा प्रकारचा परी हा पहिला डिजिटल अर्काईव्ह आहे. भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांमध्ये हे अर्काईव्ह व्हावं यादृष्टीनं आमचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, ग्रामीण भागातलं आयुष्य, काम आणि आराम याबद्दलच्या ८००० ब्लॅक अँड व्हाईट फोटोंचा संग्रह असलेलं हे एकमेव अर्काईव्ह आहे. १९८० पासून ते आत्तापर्यंत कृषी क्षेत्रातल्या सर्व समस्यांशी झगडणाऱ्या ग्रामीण भारताचं चित्रं यात संकलित केलं आहे. त्याचबरोबर परीमध्ये ही सगळी माहिती फोटो, आलेख आणि दृक् श्राव्य माध्यमातून साठवण्यात आल्यानं बघणाऱ्याला एक वेगळा अनुभव मिळतो.

परीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अत्यंत अनपेक्षित रोजगारांबद्दल साईनाथ सांगतात की, मलबारमधल्या खलाशांनी आधुनिक काळातल्या कामांसाठी प्राचीन साधनं आणि तंत्रांचा वापर केला आहे, हे खरंच अद्भूत आहे. याचप्रकारे झारखंडमधील कोळसा विकणारे लोक तीस रुपये कमावण्यासाठी १५० ते २५० किलो कोळसा सायकलवर लादून ४२ किलोमीटर पायी जातात, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.साईनाथ सांगतात की त्यांनीही एकदा असा प्रयोग करून पाहिला पण कोळसा लादलेली सायकल ते फक्त ३ किलोमीटरपर्यंतच नेऊ शकले. त्यानंतर अनेक आठवडे त्यांचं अंग दुखत होतं. धक्कादायक म्हणजे कोळसा विकणारे आठवड्यातून तीन ते चार वेळेस अशाप्रकारे काम करतात. या व्यवसायाचा शोध त्यांनी स्वत:च लावला आहे. उर्जा संवर्धनाचं हे उत्तम उदाहरण आहे. कचरा म्हणून फेकलेल्या कोळशावर हे लोक पुनर्प्रक्रिया करतात. खरंतर असं करणं बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षाही होते. पण तरीही हे लोक फेकलेल्या कचऱ्यातून अत्यंत कष्टानं ३ ते ५ टक्के कोळसा निर्माण करतात.

३५ वर्ष पत्रकारितेत काम केल्यानंतर डिजिटल अर्काईव्ह सारख्या एका चांगल्या उद्योगात केलेलं पदार्पण हा एक वेगळा अनुभव आहे, असं साईनाथ सांगतात. खरंतर त्यांना नोकरी बदलणं आवडत नाही. पण अर्काईव्हचं क्षेत्रही पत्रकारितेशी संबंधित आहे.त्यामुळे या क्षेत्रात येणं काही वाईट नाही. डिजीटल व्यासपीठावर तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्रं विस्तारता येतं जे तुम्हाला प्रत्यक्ष काम करताना विस्तारण्याची संधी मिळ्त नाही, ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट मी शिकलो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये लिखाण आणि साध्या फोटोजना काहीही स्थान नाही, तसंच छापील माध्यमात व्हिडिओ निरर्थक आहे, पण डिजिटल माध्यमात या सगळ्याचा उपयोगत मुक्तपणे आणि अधिक चांगल्या पध्द्तीनं केला जाऊ शकतो. आम्ही एक समृद्ध डिजिटल व्यासपीठ तयार करण्यासोबतच प्रेक्षकांना डिजिटल अनुभव कसा द्यायचा हेही शिकलो. भारतातले लोक उदार आणि तत्ववादी आहे, यावर माझा पूर्वीही विश्वास होताच.पण जेव्हा मी परी सुरु करण्याची घोषणा केली तेव्हा अनेक लोक त्यांचा वेळ, पैसा आणि मार्गदर्शन देण्यासाठी स्वत:हून पुढे आले. त्यामुळे माझा भारतीयांवरील विश्वास आणखी दृढ झाला.


पी साईनाथ यांचं म्हणणं आहे की, आमचे सगळे स्वयंसेवक व्यवस्थेची उत्तम जाण असणारे आहेत. हे सगळेजण ग्रामीण जीवनाशी सहजपणे जोडले जातात आणि त्याचा अर्थातच सकारात्मक परिणाम होतो. ग्रामीण भारतात स्वयंसेवक म्हणून काम केल्यानं तुम्हाला तुमचा इतिहास आणि मुळांशी जोडलं गेल्याची जाणीव होते. यादरम्यान तुम्ही ज्यांच्याबद्दल तुम्हाला अगदी कमी माहिती आहे अशा जवळपास ८० कोटी ३३ लाख भारतीयांशी जोडले जाता.

ही आपल्या समाजातल्या जवळपास ६८ टक्के लोकांशी संबंधित अशी माहिती आहे. ही जोडली गेलेली नाळ आपल्या आयुष्याचा आधार आहे आणि गरजही आहे. साईनाथ म्हणतात की त्यांना प्रोग्राम तयार करणारे,डेव्हलप करणारे आणि डिझाईन करणाऱ्यांची गरज आहे. आम्हाला भविष्यात असं एक टॅब बनवायचं आहे जे वृद्ध ग्रामीण माहिलाही अगदी सहजपणे वापरू शकतील. आत्ताचा ब्रॉडबँडचा होणारा विकास पाहिला तर येत्या १० वर्षांत हे शक्य होईल अशी अपेक्षा आहे. ग्रामीण आणि गरीब लोकांसाठी टॅबची योजना कदाचित आत्ता ऐकायला विचित्र वाटत असेल...पण सध्या अगदी प्रत्येकाच्या हातात दिसणाऱ्या मोबाईलबद्दल १० वर्षांपूर्वी कोणी विचारही करू शकत नव्हतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की आमचे हुशार स्वयंसेवक ही योजना नक्कीच प्रत्यक्षात आणतील. भारताच्या या विशेष भागाच्या विकासासाठी आपल्या प्रतिभेचा वापर करणाऱ्या चांगल्या लेखक आणि फोटोग्राफर्सची आम्हाला गरज आहे, असंही साईनाथ म्हणतात.

साईनाथ यांच्या मते, परीमध्ये दिसलेलं आणि त्यांना स्वत:ला भावलेलं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचा व्यावहारिक लवचिकपणा. गरीबी आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करताना शेतकरी जो व्यावहारिक लवचिकपणा दाखवतात, ती एक जादूच आहे. आपण कधीही विचारही करू शकत नाही, अशी अनेक कामं करण्यामध्ये ते सक्षम आहेत. जवळपास प्रत्येक ग्रामीण महिला तिच्या जीवनातील एक तृतीयांश वेळ हा दूर अंतरावरून पाणी, लाकडं आणि अन्न आणण्यासारख्या कंटाळवाण्या कामांमध्ये घालवते. आपल्या कुटुंबाशी जोडलेली नाळ आणि स्वाभिमानानं काम करण्याचं धाडस हे या ग्रामीण लोकांचं वैशिष्ट्य आहे. हे मानवतेचं शक्तिशाली आणि योग्य उदाहरण आहे. अगदी सामान्य दिसणारे हे लोक हिंमत,धाडस आणि कौशल्याच्या बाबतीत मात्र असामान्य आहेत.

ग्रामीण भारताबाबत प्रसारमाध्यमांची भूमिका गंभीर नसल्याचा थेट आरोप साईनाथ करतात. शहरांमधल्या गळेकापू स्पर्धेच्या जगात गावाचं सौंदर्य आणि ग्रामीण लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायचा माध्यमांना विसर पडलाय.

ग्रामीण भारताबद्दल आस्था असलेले आमच्यासारखे काही पत्रकार या विषयाला माध्यमांमध्ये थोडीफार जागा मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत खरे. पण तरी आजही शेतकऱ्याची आत्महत्या हीच बातमी होते, शेतकऱ्याची समस्या ही बातमी होत नाही, हीच खेदाची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर जेव्हा माध्यमांमधून भारताच्या विकासाच्या बातम्या येतात तेव्हा सगळ्यांत जास्त नुकसान ग्रामीण भारताचंच होतं, असं मला वाटतं. कोणताही विचार न करता एखाद्या शेतकऱ्याच्या अनपेक्षित यशाचं गुणगान प्रायोजित पद्धतीनं केलं जातं. काही पत्रकार अगदी रस घेऊन एखाद्या छोट्या शेतकऱ्यानं घेतलेल्या कारची बातमी करतात, पण नंतर त्या कारचं कर्ज फेडण्यासाठी त्या शेतकऱ्याला आपली कार, घर आणि शेती विकावी लागली हे पाहण्यासाठी ते परत येत नाहीत. खऱ्या गोष्टींकडे माध्यमं अनेकदा दुर्लक्ष करतात, हीच माध्यमांची मोठी कमतरता आहे.