पत्नीच्या सोबतीशिवाय बनले, ३०० विवश आणि गरीबांचे आश्रयदाता

0

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांच्या एका कवितेच्या पंक्ती

“वही पशु प्रवृत्ती है आप, आप ही चरे

वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे"

या पंक्ती दिल्ली स्थित ४७ वर्ष वय असलेल्या रवी कालरा यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतात. जे मागच्या आठ वर्षापासून गरीब, विवश, अनाथ आणि आजारी लोकांची मदत करीत आहेत. हे असे लोक आहेत की ज्यांचे या जगात कुणीही नाही किंवा त्यांच्या स्वकीयांनी त्यांना नशिबाच्या भरवशावर सोडून दिले आहे. जवळजवळ ३०० लोकांना आश्रय देऊन ५००० पेक्षा जास्त बेवारस प्रेतांचा अग्निसंस्कार केला आहे. त्यांचे विशेषण म्हणजे ते इंडियन एम्योचर ताइकांदो फेडरेशन चे अध्यक्ष होते. रवी यांनी आपल्या आयुष्यात बरेच चढ-उतार बघितले आहे. लहानपणी त्यांना शाळेत जाण्यासाठी बसच्या तिकिटासाठी पैसे नसायचे तेच त्यांनी तरुणपणात आपल्या स्वबळावर दुबई, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक ठिकाणी आपले ऑफिस उघडले आहे पण एका घटनेनंतर त्यांच्या आयुष्याने कलाटणी घेतली आणि या सर्व सुखांवर त्यांनी पाणी सोडले व गरीब लोकांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले.


रवी कालरा यांचे पालक दोघेही सरकारी नोकरीत होते. वडील दिल्ली पोलीस मध्ये इन्स्पेक्टर होते. वडिलांवर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्यामुळे बालपण अनेक अडचणींतून गेले. रवी यांनी युवर स्टोरीला सांगितले की, ‘अनेक वेळा माझ्याकडे इतके पैसे सुद्धा नसायचे की मी शाळेत बसने जाऊ शकेल. तेव्हा मी अनेक मैल पायी जात असे. मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो पण लहान वयातच मार्शल आर्टचा प्रशिक्षक बनलो. त्यासाठी मला शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली. त्याच्या प्रशिक्षणासाठी मी दक्षिण कोरियाला गेलो, तिथे मी या खेळाच्या संदर्भातील अनेक आंतरराष्ट्रीय पदव्या मिळवल्या. यानंतर भारतात परतल्यावर मी मार्शल आर्ट शिकवण्यासाठी एक शाळा उघडली आणि काही काळानंतर इंडियन एम्योचर तायकांदो फेडरेशनचा अध्यक्ष झालो’.


आपल्या मेहनतीने त्यांनी २०० ब्लॅक बेल्ट खेळाडू तयार केले. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक पोलीस बटालियन आणि आर्म फोर्सला सुद्धा मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले. आपल्या खेळांच्या दरम्यान त्यांनी आतापर्यंत ४७ देशांचा दौरा केला आहे.


आपल्या खेळाव्यतिरिक्त त्यांनी आयात निर्यातच्या व्यवसायात पण आपला जम बसवल्यामुळे एके काळी त्यांच्याकडे अमाप पैसा आला म्हणून त्यांनी दुबई, दक्षिण आफ्रिका यासारख्या अनेक ठिकाणी ऑफिस उघडली तरीही त्यांनी प्रामाणिकपणाची साथ सोडली नाही. जीवनात पूर्ण ऐशोआराम होता पण एक दिवस अचानक त्यांना रस्त्यावर दिसले की एक गरीब मुलगा आणि त्याच्याजवळ बसलेला कुत्रा एकच पोळी खात होते. हे दृश्य बघून त्यांचे मन पिळवटून गेले आणि जीवनाने असे वळण घेतले की त्यांनी आपला सगळा व्यवसाय सोडून गरीब आणि बेवारस लोकांच्या सेवेचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नीने या निर्णयाला विरोध केला आणि ती त्यांना सोडून निघून गेली. पत्नीच्या या तडकाफडकी निर्णयाने न डगमगता ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले.


रवी यांनी प्रारंभी दिल्लीच्या वसंतकुंज भागात भाड्याने एक जागा घेतली आणि काही वर्षानंतर गुडगाव मध्ये दिवसरात्र अशा लोकांची सेवा केली जे बेवारस होते, जे स्वतः आपला उपचार करू शकत नव्हते, ज्यांना आपल्या आप्तेष्टांनी सोडून दिले होते. सुरुवातीला रवी यांनी या लोकांबरोबरच वृद्धांसाठी सुद्धा जागेची व्यवस्था केली आणि नारी निकेतन उघडले. याव्यतिरिक्त जे गरीब मुले भिक मागण्याचे काम करीत होते त्यांच्यासाठी शाळेची व्यवस्था केली. याप्रकारे १-२ लोकांपासून सुरु झालेला हा प्रवास विना अडथळा सुरु आहे. यादरम्यान स्थानिक लोकांव्यतिरिक्त पोलिसांचा जाच पण त्यांना सहन करावा लागला. रवी पुढे सांगतात की, ‘पोलीस मला रात्रभर चौकीमध्ये बसवून विचारायचे की मी किडनी रॅकेट सुरु केले आहे का? पण मी कच खाल्ली नाही व लोकांची सेवा करत राहिलो.’


रवी सांगतात की त्यांनी आतापर्यंत रस्त्यात आणि दवाखान्यात मेलेल्या जवळजवळ ५००० बेवारस लोकांचा अंतिम संस्कार केला आहे. याव्यतिरिक्त जे लोक त्यांच्याबरोबर होते आणि त्यांच्या आजारपणात किंवा इतर कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला अशा लोकांचा पण त्यांनी अंतिम संस्कार केला. लोकांच्या प्रती असलेली समर्पणाची भावना बघून हळूहळू स्थानिक लोक तसेच पोलिस व समाजसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येऊ लागल्या. रवी सांगतात की, ‘दिल्लीच्या अनेक सरकारी दवाखान्यात असे अनेक वृद्ध रुग्ण होते ज्यांना त्यांच्याच नातेवाईकांनी सोडून दिले होते. अशावेळेस दवाखान्याचे व्यवस्थापक आमच्याशी संपर्क साधतात व आम्ही या लोकांना आमच्याजवळ घेऊन येतो.’


ते सांगतात की आज आमच्या आश्रमात ३०० पेक्षा जास्त वृद्ध लोक राहतात ज्यात १०० पेक्षा अधिक स्त्रिया आहेत ज्या नारी निकेतनमध्ये राहतात. यात काही बलात्कार पीडित, आजारी, व काही वृद्ध स्त्रियापण आहेत.

रवी यांनी अशा लोकांच्या मदतीसाठी हरियाणाच्या बंधवाडी गावात ‘द अर्थ सेव्हर फाउंडेशन’ ची स्थापना केली, ज्यात ३०० स्त्री आणि पुरुष राहतात. येथे राहणारे अनेक लोक मानसिक रूपाने विक्षिप्त, काही एचआयव्ही व कॅन्सर सारख्या गंभीर आजारांनी पीडित आहेत. याव्यतिरिक्त सेवानिवृत्त न्यायधीश, शिक्षक, वकील आणि इतर वृद्धसुद्धा आहेत की ज्यांना आपल्याच नातेवाईकांनी सोडून दिले आहे. आजारी लोकांसाठी येथे तीन अॅम्बुलंसची व्यवस्था आहे. रवी हे दिल्लीच्या सर गंगाराम दवाखान्याशी संलग्न आहेत ज्यामुळे एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये रुग्णावर उपचार होऊ शकतो. येथे अनेक दवाखान्याचे डॉक्टर कॅम्प लावतात आणि त्याचबरोबर येथे २४ तास डिस्पेंनसरीची व्यवस्था आहे. इथल्या लोकांच्या मनोरंजनाकडे पण विशेष लक्ष पुरविले जाते म्हणून दरवर्षी होणाऱ्या दिल्लीच्या राजपथावर होणारा गणतंत्र दिवसाची परेड दाखवण्यासाठी ते अनेकांना घेऊन जातात. तसेच त्यांना वेळोवेळी सिनेमापण दाखवितात.

तसेच येथे राहणाऱ्या वृद्ध लोकांना मथुरा, वृंदावन आणि अनेक तीर्थक्षेत्रांची सहल करविली जाते. रवी यांनी या जागेचे नाव गुरुकुल ठेवले आहे. गुरुकुल मध्ये सगळे सण-समारंभ साजरे होतात. मागच्या आठ वर्षापासून निस्वार्थ सेवा करणारे रवी व त्यांच्या साथीने काम करणारी ३५ जणांची एक टीम आहे. ४७ वर्ष वय असणाऱ्या रवी कालरा यांचे एकच स्वप्न आहे की भविष्यात गरीब, आजारी व बेवारस लोकांना रहाण्यासाठी मोफत जागेशिवाय दवाखान्याची पण सोय उपलब्ध असेल.

website : www.arthsaviours.in

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे