“दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत काम करणे ही स्वप्नपुर्ती ” - गायिका वैशाली-माडे

0

गायिका वैशाली भैसने माडे तुम्हाला आठवतेय का. झी सारेगमप या गाण्याच्या टॅलेंट शोची ती विजेती होती यानंतर तिने हिंदी सारेगमपचा महासंग्रामही जिंकला होता. सध्या ती मराठी तसेच इतर सिनेमांसाठी पार्श्वगायन करतेय. वैशालीच्या या सांगितिक प्रवासात आता एक मानाचा तुरा रोवला गेलाय तो म्हणजे सध्याच्या चर्चित पिंगा या गाण्याची सहगायिका म्हणून.

बाजीराव मस्तानी या सिनेमातल्या पिंगा या गाण्यासाठी वैशाली आणि श्रेया घोषाल यांनी पार्श्वगायन केलेय. या दोघींचा आवाज या गाण्यात ऐकायला मिळतोय. ज्याबद्दल बोलताना वैशाली सांगते की “पिंगा या गाण्यात अनेक अस्सल मराठी शब्दांचा समावेश आहे ज्यामुळे संजय सर आणि त्यांची टीम श्रेयासोबत एका मराठी गायिकेच्या शोधात होते, माझा आवाज संजय सरांनी यावेळी रिअॅलिटी शोमधून तसेच सिनेमातनं ऐकायला होता, त्यामुळे मला या गाण्याबद्दल जेव्हा विचारण्यात आले तेव्हा नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

पिंगा या गाण्यात मराठी संस्कृतीचे अनोखे प्रदर्शन दिसते, त्यामुळे हे गाणे गातानाही खूप मस्त अनुभव होता. एकतर श्रेयासारख्या मातब्बर गायिकेसोबत पार्श्वगायन आणि त्यात संजय सरांचे संगीत दिग्दर्शन म्हणजे तर माझ्यासाठी सोने पे सुहागा होतं” अशी कबुली वैशाली देते.

पिंगा या गाण्याबद्दलच्या सध्याच्या चर्चेबद्दल मात्र वैशाली फार प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. “बाजीराव मस्तानी या सिनेमातले पिंगा हे गाणे एक उत्तम कलाकृती आहे, गायिका म्हणून त्याचा मी भाग बनू शकले याचा मला आनंद आणि अभिमान आहे, बाकी चर्चांमध्ये मला नाही पडायचे, प्रेक्षकांनी या गाण्याकडे एक कलाकृती म्हणून पहावे” एवढेच मी सांगेन असे मत वैशाली मांडते.

सारेगमप सारख्या रिअॅलिटी शोपासून गायिका म्हणून नावारुपास आलेली वैशाली आता आघाडीची पार्श्वगायिका बनलीये. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात फिरताना आजही तिने स्वतःतला नम्रपणा सोडलेला दिसत नाही. “मनोरंजन क्षेत्रात दिवसाला कितीतरी नवनवीन कलाकार येत असतात प्रत्येकाला इथे काम करायचेय आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला इथे कामाची कमतरता कधीच जाणवणार नाही. मला अभिमान आहे की मी या क्षेत्राचा भाग आहे, आत्तापर्यंत मिळालेल्या आपल्या या यशाचे सर्व श्रेय ती मायबाप प्रेक्षकांना देते, रिअॅलिटी शो हे प्रेक्षकांसाठी बनवले जातात पण सारेगमपसारखे शोज हे आमच्या सारख्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देते.

कुठचाही गॉडफादर नसताना आम्हाला या क्षेत्रात प्रवेश करायचा मार्ग म्हणजे हे शोज आहेत, मी नशिबवान आहे की प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले आणि आजही देतायत, माझा आवाज त्यांना आवडतो, माझ्या प्रत्येक नवीन गाण्याला ते भरभरुन प्रतिसाद देतात, यांच्याशिवाय मी काहीच नाहीये. पिंगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या चाहत्यांना मी सुरेल भेट देऊ शकले,”

फॅमिली ४२० या नव्या मराठी सिनेमासाठी सध्या वैशाली पार्श्वगायन करतेय. भरारी नंतर स्वतःचा एक नवा म्युझिक अल्बम काढायचे तिच्या डोक्यात आहे. यासोबतच हिंदी मराठी शोमध्ये गायनही सुरु आहे, एकूण वैशाली तिच्या कामात चांगलीच व्यस्त आहे.