पाच अॅसिड हल्ला पीडित महिलांची ताजमहालाच्या सौंदर्याला टक्कर देणारी कामगिरी ‘शिरोज हँगाऊट’!

0

आग्रा येथे असलेल्या ‘ताजमहाल’ समोर सर्व उपमा फिक्या आहेत, मात्र तेथून काही पावलेच अंतरावर आहे, ‘शिरोज हॅंगआउट’. ताजमहालला जर प्रेमाची ओळख मानली जाते, तर ‘शिरोज हॅंगआउट’ला एक असे स्थान मानले जाते जी, मानवतेची प्रेरणा आहे, आयुष्याची आशा आहे, अनेक समस्येनंतर देखील काहीतरी करण्याची परिपूर्ती आहे, परिस्थितीशी सतत झगडून पुन्हा उभे राहण्याचे मनोधैर्य आहे, स्वतःला सावरण्याची आवड आहे आणि एक हिम्मत आहे. या अशा शूर महिला आहेत, ज्या अॅसिड हल्ल्याने पिडीत असून सुद्धा त्यांनी आपले पुनर्वसन केले आहे. ही अशी खाण्या-पिण्याची जागा आहे, जी अॅसिड हल्ल्याने पिडीत महिला चालवत आहेत, ऋतु, रूपाली, डॉली, नीतू आणि गीता अशी त्यांची नावे आहेत. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये केवळ वेगवेगळे खाद्यपदार्थच नव्हेतर, अॅसिड हल्ल्याने पिडीत रुपाली यांनी नक्षीकाम केलेले कपडे देखील खरेदी करू शकता.

‘शिरोज हॅंगआउट’ ची सुरुवात मागीलवर्षी १० डिसेंबरला झाली होती. हे सुरु करण्याची कल्पना लक्ष्मी यांची होती. ज्या अॅसिड हल्ल्याने पिडीत महिलांसाठी अनेकांशी झगडल्या आहेत आणि आता ‘अपनी’ ही संस्था छाव फाउंडेशन मार्फत त्यांच्या पुनर्वसनाचे काम बघत आहे. ‘शिरोज हॅंगआउट’ चे कामकाज पाहणा–या ऋतु यांचे म्हणणे होते की, हे सुरु करण्याचा मुख्य उद्देश अॅसिड हल्ल्याने पिडीत महिलांचे पुनर्वसन करणे हा होता. कारण, अशा लोकांना सरकारी कार्यालयात काम मिळत तर नाही, शिवाय खासगी नोक-या देखील त्यांच्या नशिबात नसतात. कारण, अधिकाधिक प्रकरणात महिलांवर अॅसिड हल्ला लहान वयातच होतो, जेव्हा त्या आपले संपूर्ण शिक्षण देखील घेऊ शकत नाही. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये शिक्षण जास्त महत्वाचे नसते, तर या गोष्टीवर लक्ष दिले जाते की, अॅसिड हल्ल्याने पिडीत महिलांची अधिकाधिक मदत कशी करता येईल.

‘शिरोज हॅंगआउट’ची विशेष बाब ही आहे की, यांच्या भोजनसूचीमध्ये कुठल्याही गोष्टीची किंमत ठेवण्यात आलेली नाही, येथे येणारा ग्राहक आपल्या मनानुसार स्वतःचे बिल स्वतःच देतो. ऋतु यांच्या मते, त्या मागची विशेष बाब ही आहे की, येथे कुणीही श्रीमंत किंवा गरीब येऊ शकतात. कारण, त्यांचे मत आहे की, प्रत्येकजण मोठ्या ठिकाणी जाऊन कॉफी पिऊ शकत नाही. त्याव्यतिरिक्त येथे येणा-या लोकांना हे देखील माहित पडावे की, ‘शिरोज हॅंगआउट’ कुठल्या उद्देशाने सुरु करण्यात आले आहे. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये येणा-या लोकांना केवळ कॉफीच नव्हे, तर भोजन देखील दिले जाते. ‘शिरोज हॅंगआउट’ला आग्रा येथे मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेनंतर आता पुढीलवर्षी लखनौ मध्ये सुरु करण्यात येणार आहे. ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये ५ अॅसिड हल्ल्याने पीडित महिलांव्यतिरिक्त ७ अन्य लोक देखील काम करतात.

‘शिरोज हॅंगआउट’आठवड्यातून सातही दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत उघडले जाते. प्रथम जेव्हा ‘शिरोज हॅंगआउट’ सुरु केले होते तेव्हा, त्याला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आज ‘शिरोज हॅंगआउट’आपल्या बळावर केवळ कर्मचा–यांचे वेतन आणि दुकानाचे भाडेच काढत नाही तर, आता याला फायदा देखील व्हायला लागला आहे. ऋतु यांच्या मते, ‘शिरोज हॅंगआउट’ मधून जो फायदा होईल त्याला, पीडितांचा उपचार आणि त्यांच्या विकासासाठी देखील खर्च केला जातो. येथे येणारे अधिकाधिक ग्राहक विदेशी असतात. ऋतु यांच्या मते, ‘ट्रीप एडवायजर’ यांसारखी संकेतस्थळे चांगले रेटिंग देतात. त्यामुळे येथे येणारे लोक फेसबुक वा अन्य माध्यमातून माहिती घेऊन येथे येतात.

‘शिरोज हॅंगआउट’ ला विभिन्न प्रकारच्या पेंटिंगने सजविण्यात आले आहे, त्यामुळे येथे येणारे लोक थोड्या वेळ थांबून या जागेला एकदा नक्की पाहून जातात. येथे येणारे अनेक ग्राहक अॅसिड हल्ल्याने पीडित महिलांशी संवाद साधतात, त्यांची कहाणी ऐकतात आणि हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात की, त्या कशाप्रकारे ‘शिरोज हॅंगआउट’ ला चालवितात. ऋतु यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा लोकांना आमच्या बद्दल माहिती मिळते, तेव्हा ते अनेकदा चहा - नाश्ता करण्यासाठी नाहीतर, आमच्याशी संवाद साधण्यासाठी येतात.” ‘शिरोज हॅंगआउट’ मध्ये एकत्र ३० लोक बसू शकतात. ‘शिरोज हॅंगआउट’च्या भोजनसूचित चहा आणि कॉफी व्यतिरिक्त अनेक प्रकारचे शेक देखील मिळतात. तसेच टोस्ट, नुडल्स, फ्रेंच फ्राई, बर्गर, विभिन्न प्रकारचे सूप, डेजर्ट आणि दुसरे अनेक खाद्यपदार्थ येथे मिळतात.

ही जागा केवळ हॅंगआउटसाठीच नव्हे, तर जर एखाद्याला येथे पार्टी करायची असल्यास ते देखील करू शकतात. आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या ‘शिरोज हॅंगआउट’ ताजमहालच्या पश्चिमेकडील दरवाजाच्या केवळ ५ मिनिटे अंतरावर आहे. अॅसिड हल्ल्याने पीडित महिला आणि येथे काम करणा-या ऋतु हरियाणाच्या रोहतक, रुपाली मुजफ्फरनगर येथे राहणा-या आहेत, तर डॉली, नीतू आणि गीता या आग्रा येथेच राहतात. नीतू आणि त्यांची आई गीता यांच्यावर त्यांच्या वडिलांनी अॅसिड फेकले होते. तर रुपाली यांच्यावर त्यांच्या सावत्र आईने अॅसिड टाकले होते. तसेच ऋतु ज्यांनी १० वी पर्यंत शिक्षण केले आहे, त्या व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय खेळाडू राहिल्या आहेत.

ऋतु यांच्यावर नात्यातल्या एका भावाने २६ मे २०१२ ला अॅसिड हल्ला केला होता. त्यानंतर त्या २ महिन्यापर्यंत रुग्णालयात राहिल्या. त्या दरम्यान त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. ऋतु यांच्या मते, त्यांच्या सर्व शस्त्रक्रियेनंतर देखील त्या चांगल्या झालेल्या नाहीत आणि अजूनही त्यांच्या काही शस्त्रक्रिया शिल्लक आहेत. या मागील दीड वर्षापासून या मोहिमेत सामिल आहेत. आज त्या इतक्या खुश आहेत की, त्यांचे म्हणणे आहे की प्रत्येकाकडे एक कुटुंब असते, मात्र माझ्याकडे दोन कुटुंब आहेत. मला येथे खूप प्रेम मिळते. आता ऋतु यांची इच्छा पुन्हा एकदा खेळात नशीब आजमावण्याची आहे.

ऋतु यांच्या मते, ‘शिरोज हॅंगआउट’ ची सुरुवात हा विचार करून करण्यात आली होती की, अॅसिड पीडितांनी कुणासमोर हात पसरवून खाऊ नये आणि स्वतःच्या पायावर त्या महिला उभ्या रहाव्यात. त्यामुळेच आजही अनेक लोक येथे येऊन सांगतात की, त्यांना काही खायचे नाही, मात्र पैसे द्यायचे आहेत, त्या मात्र त्यासाठी नकार देतात. ऋतु यांचे म्हणणे आहे की, ही आमची नोकरी आहे, आम्ही कुणाकडून उपकार घेऊ शकत नाही. ज्याप्रकारे हे लोक दुस-या कैफे किंवा कार्यालयात जाऊन काम करतात, आम्ही देखील येथे असेच काम करतो.

लेखक : आशिष बिश्त

अनुवाद: किशोर आपटे.