शरीरप्रकृतीची साथ नसताना जग जिंकण्याची आकांक्षा : दीपा मलिक यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व

0

दीपा मलिक यांच्याबरोबर दोन तास मारलेल्या त्या गप्पांच्या दरम्यान, मानवी शरीरशास्त्राविषयी काही विस्मयकारक गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

जे हात व्हिलचेअर चालवतात, तेच बाईकचे गिअर टाकू शकतात, अर्जुन पुरस्कार धरु शकतात, आकाशाला छेदणारी भालाफेक करु शकतात आणि त्याचवेळी लहान मुला-मुलींचे हात हाती घेऊन त्यांच्या तेवढ्याच अमर्याद भविष्यासाठी मार्गदर्शनही करु शकतात.

तर जे पाय व्हिलचेअरवर निर्जीवपणे पडून राहू शकतात, तेच पाय तरणतलावात मर्मेडप्रमाणेच निर्दोष कौशल्यपूर्ण हालचाली करु शकतात, दोन पारपत्र भरतील एवढ्या वेळा विमानात तुम्हाला आत आणि बाहेर घेऊन जाऊ शकतात आणि अगदी तुमच्या स्वप्नातील उपहारगृह व्यवसायात काऊंटरमागे उभे राहू शकतात.

यामागचे गुपित दडलंय ते पुढील तत्वज्ञानात – शरीराच्या अवयवांना आपल्याशी जखडून ठेवणारी ती चाके खरे तर काही त्या व्हिलचेअरची नसतातच, ती असतात अशोक चक्र, भविष्याची चाके, सातत्य आणि शाश्वततेची चिन्हं....

दीपा या पॅरॅप्लेजिक आहेत, अर्थात त्यांच्या शरीराचा छातीपासून खालचा भाग अधू आहे. मात्र अशाही परिस्थितीत त्या नोर्मलसीसाठी अर्थात सर्वसामान्य होण्यासाठी तळमळताना दिसत नाहीत. त्या सर्वसामान्य होऊ शकत नाहीत, हे त्यांना माहित आहे. “ तुम्हाला माहित आहे का, की ‘नॉर्मल’ असणे हे काही तितकेसे ‘कुल’ नाही,” त्या म्हणतात. त्यामुळे केवळ सर्वसामान्य शारीरिक स्थिती नाही तर उत्कृष्टता ही त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि त्यामुळे स्वतःमधील अपूर्णता स्वीकारतानाच, परिपूर्णता हे त्यांचे लक्ष्य आहे.

शारीरिक अपंगत्व त्यांच्यासाठी अपरिचित नाही आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड करणे ही त्यांच्या आत्म्याची कसोटी नव्हती – कारण अपयशी होण्याचा पर्यायच त्यांनी स्वतःला दिलेला नव्हता. “ मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमीच तयार होते. ती एक सवयच बनली – माझ्या आजारामुळे माझे आयुष्य माझ्याकडून निसटून जात नाहीये, हे जगाला सिद्ध करुन दाखविण्याची...”

लहानपणापासूनच दीपा या अगदी टॉमबॉय होत्या. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांच्या पाठीच्या कण्यात एक गाठ असल्याचे आढळून आले. जरी खूपच लवकर दुखण्याचे निदान आणि त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असले, तरी प्रतिकुल परिस्थितीत आयुष्य कशाप्रकारे जगले पाहिजे, याबाबतचा एक महत्वाचा धडा त्यांना यातून शिकता आला. दुखण्यातून बरे होण्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली. पण या विचित्र घडामोडींमुळे त्यांचे व्यक्तिमत्वच बदलून जाण्याचा धोका निर्माण झाला.

“ माझ्यासारख्या टॉमबॉय आणि दादागिरी करणाऱ्या मुलीला, जी कायम घराबाहेर असायची, झाडावर चढायची, मित्रांच्या सायकली पळवून सूर्यास्तापर्यंत चालवत रहायची, चित्रे काढण्यासारख्या गोष्टींच्या निमित्ताने एकाच खोलीत अडकवून ठेवणे शक्यच नव्हते. असे काहीतरी करणे मला शक्यच झाले नसते,” जन्मजात निडर असलेल्या दीपा सांगतात.

“ जेंव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या कलेत प्राविण्य मिळविता, तेंव्हाच तुम्ही आयुष्यातील सकारात्मक गोष्टींकडे पहायला शिकलेले असता. अगदी त्या पलंगावर असतानाच मी ठरविले होते की, मला माझे आयुष्य समृद्ध करायचे आहे आणि भविष्यासाठी तयार व्हायचे आहे, कारण दुसऱ्या बाजूला आयुष्य माझी वाट पहात आहे, हे मला माहित होते,” त्या सांगतात.

एका ब्रेक नंतर दीपा यांना पूर्वपदावर येण्यास मुळीच वेळ लागला नाही, मित्रांकडून त्यांच्या बाईक्स घेऊन त्या चालविणे, पकडले जाणे आणि बोलणी खाणे, हे पुन्हा सुरु झाले.

एकदा एक अत्याधुनिक बाईक असलेल्या एका तरुण अधिकाऱ्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ही स्त्री आपल्याकडे नाही तर आपल्या बाईककडेच पहाते आहे, हे लक्षात येताच त्या अधिकाऱ्याला विलक्षण धक्का बसला. ‘ तुला बाईक्सबद्दल काय माहिती आहे,’ त्या अधिकाऱ्याने दीपा यांना विचारले, त्यावर त्यांचे उत्तर होते, “ मला बाईकच्या किल्ल्या द्या, मला बाईक्सबद्दल काय माहिती आहे हे मी तुम्हाला दाखविन.”

त्यावेळी त्या अधिकाऱ्याने त्यांना केवळ गाडीच्या किल्ल्याच दिल्या नाहीत तर दुसऱ्याच दिवशी तयार होऊन त्यांच्याकडे येत, लग्नासाठी त्यांचा हात मागितला, “सर, मी तुमच्या मुलीशी लग्न करु शकतो का, जेणे करुन आम्ही एकत्रपणे आनंदाने बाईक्स चालवू शकू?” त्या तरुणाने विचारणा केली.

इतिहासाची पुनरावृत्ती

त्यांनी एकत्रपणे अतिशय सुंदर आयुष्य उभारले. लवकरच त्यांच्या आयुष्यात देविका या त्यांच्या पहिल्या कन्येच्या रुपाने आनंदाचा क्षण आला. पण, इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला, कदाचित हे नशिबातच होते.

“ अवघी वर्षाची असताना माझ्या मुलीला एका बाईकस्वाराने ठोकर मारली. तिच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि परिणामुळे तिची डावी बाजू पंगू झाली. आम्ही तिला घेऊन पुणे कमांड रुग्णालयात गेलो आणि अनेक वर्षांपूर्वी मी जेथे राहीले होते तोच हा वॉर्ड आणि पलंग होता,” दीपा सांगतात.

“ मी माझे अपंगत्व माझ्या मुलीला दिल्याच्या अफवा तेंव्हा पसरल्या. समाजाच्या डोळ्यातील अपंगत्वाबाबतच्या टीपिकल प्रतिमा मला आता दिसू शकत होत्या. लहानपणी मी एका सुरक्षित कवचात होते, मात्र आता मला ते विष जाणवू लागले. माझे वडील मला सांगायचे – देव हा शहाणपणाने आव्हानांची वाटणी करतो. तुझी यासाठी निवड झाली आहे,” त्या सांगतात.

त्यांनी आणि त्यांच्या पतींनी अविश्रांतपणे आपल्या मुलीची मदत करण्यास सुरुवात केली, जशी त्यांच्या पालकांनी त्यांची केली होती आणि या दरम्यानच त्यांची दुसरी मुलगी अंबिका जन्माला आली. कटू वास्तवापासून काही काळासाठी दूर नेणारे हे सुंदर कारण ठरले. “ पण असे दिसते, की देवाकडे माझ्यासाठी असलेली आव्हाने अजूनही संपली नव्हती. १९९९ साली माझ्या पतीला कारगिल युद्धासाठी बोलावून घेतले गेले आणि ते जाताच माझ्या गाठीचे दुखणे उलटले. त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणताच संपर्क होत नव्हता आणि त्यांचे अर्धे कुटुंब गोंधळलेले होते,” त्या कठीण काळाबद्दल दीपा सांगतात.

“ पण देवाने ही आव्हाने पेलण्याचे सामर्थ्यही दिले. माझे पती युद्धावर होते - दररोज लोकांच्या मरणाच्या बातम्या येत होत्या अशा वेळी मी भावनिकदृष्ट्या खूपच खचले होते, पण तरीही ठाम रहाण्याचे मी ठरविले, कारण माझ्या नवऱ्याच्या दैवाची मला काहीच कल्पना नव्हती. अशा वेळी माझ्यातील आई वरचढ ठरली, मला माझ्या मुलांसाठी जिवंत रहायचे होते,” दीपा सांगतात.

युद्धाचा काळ असल्याने संपूर्ण रुग्णालयाचे रुपांतर आयसीयुमध्ये (अतिदक्षता विभागात) झाले होते. “ माझ्या आसपास हात-पाय तुटलेले, डोळे गमावलेले - तेदेखील त्यांची कोणतीही चूक नसताना, कोणताही आजार नसताना, केवळ देशासाठी दाखविलेल्या शौर्याबद्दल – अनेक जण होते. अशा लोकांच्याबरोबरच माझ्यावरही उपचार सुरु होते. त्यामुळे मला तक्रार करण्याचे काहीच कारण नव्हते. अशा गोष्टी बघण्यासाठी माझे मन प्रशिक्षित झाले होते,” त्या सांगतात.

मात्र त्यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर काही गंभीर गुंतागुंत निर्माण झाली तर तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर त्या पंचवीस दिवस कोमात होत्या आणि हा काही शेवट नव्हता, काही लोकांना असेही वाटले असेल की ही शेवटाची सुरुवात होती.

“ माझ्या पुढील शस्त्रक्रियेपूर्वी मी त्यांना भविष्याबद्दल विचारले आणि त्यांनी मला सांगितले, की मला आयुष्यभरासाठी व्हिलचेअरवर जखडून रहावे लागेल. मला चालण्याचा आनंद घेण्यासाठी सात दिवस देण्यात आले,” त्या सांगतात.

मात्र त्या निराश झाल्या नाहीत तर त्या सात दिवसांत त्यांनी त्यांचे घर व्हिलेचेअरच्या दृष्टीने सुयोग्य बनवून टाकले आणि मोकळा वेळ हा चॅटरुममध्ये बसून त्यांच्यासारखी शारिरिक स्थिती असणाऱ्या जगभरातील लोकांशी चर्चा करण्यात घालविले, असे लोक जे त्यांना काही मार्ग दाखवू शकत होते, आशा देऊ शकत होते.

त्यांचे पती युद्धावरुन सुखरुप परतले, पण आता ते दीपा यांना सोडणार की काय अशी शंका लोकांना येऊ लागली. “ समाजाच्या नजरेत मी एक मृत शरीर होते. पण मी मृत्यू पाहिला होता. मी तो नव्हते. माझ्यामध्ये संपूर्ण आयुष्य उरले होते,” त्या सांगतात. त्यांची दोन सर्वाधिक प्रभावी शस्त्रे होती ती म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन आणि विनोदबुद्धी.

“ ‘नॉर्मल’ असणे काही ‘कुल’ नाही! जर मी उद्या राजकारणी झाले, तर मी माझी खुर्ची कधीच सोडणार नाही! दूरचे रेल्वे प्रवास करण्याचे किंवा चित्रपटातील एखादा प्रसंग चुकण्याचे मला भय नाही, कारण मी नेहमीच माझ्या डायपरमध्ये सुरक्षित आणि खूश असेन!” त्या सांगतात.

आणि त्याशिवाय, त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी त्या नेहमीच करत होत्या. “ मी नेहमीच माझ्या चाकांवर असते! तुम्ही मला काय म्हणता, व्हिलचेअरमध्ये जखडलेली, मी व्हिलचेअर मुक्त आहे. अशोकचक्रामध्ये पण चाके आहेत. मी माझ्यासारख्या सर्वांनाच सांगते, तेच तुमचे प्रेरणा स्थान आहे!”

पण त्यावेळी त्यांना समाजाच्या शंकाकुशंकांचा सामनाही करावा लागत होताच. त्याबाबत त्या सांगतात, “ पुन्हा एकदा मी लोकांचे लक्ष्य झाले – ‘ ती तिच्या मुलींना कसे खाऊ घालेल? तिला कायमच कोणाच्या तरी मदतीची गरज लागणार.’ पण माझ्यामध्ये काहीतरी असे होते जे त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी धडपडत होते.”

संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पतीला पुन्हा एकदा बोलावले गेले. यावेळी एका स्क्वाड्रन कंमाडरची पत्नी म्हणून त्यांना तीस कुटुंबांची काळजी घ्यावी लागली, कारण त्या बायकांच्या नवऱ्यांना एका रात्रीत जावे लागले होते.

त्या काळात लष्कराच्या क्वार्टर्समध्ये त्यापूर्वी उपलब्ध नसलेली घरपोच खाद्यपदार्थ पोहचविणारी खानपान सेवा सुरु करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या घरी काम करणारे आणि त्यांच्या खोलीत रंगाचे काम करणारे यांना एकत्र करुन त्यांनी त्यांच्या फार्महाऊसच्या कोपऱ्यात या सेवेला सुरुवात केली. सुरुवातीला एक घरपोच सेवा केंद्र म्हणून सुरु केलेले हे हे केंद्र पुढे एक अतिशय लोकप्रिय गार्डन रेस्टॉरंट बनले.

“ मी एका दिवसात २५० लोकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्यास तर शंभर घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली.” त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी शाळेत जाऊन दहावीची परिक्षा देण्यास मदत केली. “ मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाला कसे खाऊ घालणार, याची बायकांना चिंता होती. पण आता तर मी त्यांच्याही कुटुंबांना खाऊ घालू लागले,” त्या सांगतात.

काहीतरी हरविल्याची जाणीव

सगळ्यांच्या आवडत्या अशा या रेस्टॉरंटमध्ये यायला आणि मालकीण बाईंशी गप्पा मारायला तरुण अधिकाऱ्यांना खूप आवडायचे. अशाच गप्पांमध्ये एकदा एका तरुणाने त्यांना सांगितले, “ तुम्ही पुन्हा एकदा बाईकस्वार बनू शकता.” गुगलच्या माध्यमातून परदेशात लोक हे करत असल्याचे त्याने तातडीने दाखवूनही दिले.

“ मी त्याला वास्तवाची जाणीव करुन दिली. माझ्या छातीखालचा कोणताच भाग काम करत नाही. माझी परिस्थिती गंभीर आहे. माझा शरीराचा तोल गेला आहे, पुरेशा संवेदना नाहीत, माझी फुफ्फुसे नीट काम करत नाहीत. त्याचबरोबर माझ्या मुत्राशयावरील माझे नियंत्रणही नाही. मी हे रेस्टॉरंट चालविते हा एक चमत्कारच आहे.”

पण तो मुलगा हट्टालाच पेटला होता. हे शक्य असल्याचे त्याने दीपा यांना पटवून दिले.

त्यांनी पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. त्यांना दिलेला व्यायाम होता पोहण्याचा... कोणीतरी त्यांना टीव्हीवर पोहताना पाहिले आणि खेळ अधिकाऱ्यांना आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी याबाबतची माहिती दिली आणि महाराष्ट्राने त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी बोलावले.

“ मी ३६ वर्षांची होती. मी विचार केला, का नाही? संधी तुमचे दार ठोठावतात आणि विजेते ते असतात, ज्यांना त्या दारातून जाण्याचे धैर्य असते. मी ते दाखविले आणि पदकेही जिंकली. २००६ मध्ये मी क्वालालंपूरला गेले आणि रौप्य पदकही जिंकले.”

भारतीय जर्सी घालणे, खेळाडूचा किताब मिळविणे, तिच्या सीएसआरसाठी ब्रॅंड उभारणे आणि शेवटी विजय मल्ल्या यांच्याकडून प्रायोजकत्वासाठी विचारणा होणे. पण जेंव्हा भारतात कोणीही त्यांच्या गरजा पूर्ण करु शकेल, अशी बाईक बनविण्यास तयार नव्हते, तेंव्हा गोष्ट सगळीकडे पसरली आणि दुसऱ्याच दिवशी, रोडीज च्या टीमकडून मला फोन आला.

“ तुम्हाला बाईकर बनायचे आहे? तुम्ही तुमची बाईक आमच्या शोच्या माध्यमातून टीव्हीवर चालवा, त्यांनी मला सांगितले,” त्या सांगतात.

त्यांनी मनात जे काही ठरविले ते प्रत्यक्षात उतरले. सिक्रेटची खूप मोठी प्रशंसक असलेल्या, दीपा यांचा विश्वास आहे की, ज्या गोष्टीची तुम्ही मनापासून इच्छा करता, ती तुमच्या पायाशी आणण्यासाठी सारे विश्व एकवटते.

राष्ट्रीय स्तरावर ५४ सुवर्ण पदके, आंतरराष्ट्रीय स्तरावर १३, तीन वेळा विश्वविजेत्याचा किताब, एक रौप्य पदक आणि सगळ्या स्पर्धांमध्ये कमीत कमी पहिल्या पाचात स्थान मिळविले. धडधाकट खेळाडूंबरोबर स्पर्धा करताना, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये, त्या पॅरा-स्पोर्टस् विभागातील आदर्श बनल्या.

“ बाईकींग आणि खेळ हा व्हिलचेअरवरील लोकांची प्रतिमा बदलण्याचा एक चांगला मार्ग बनला आहे. तुम्हाला लोकांनी ऐकावे असे वाटत असेल, तर तुम्हाला काहीतरी साध्य करावेच लागते. तुम्हाला तुमचा आवाज बुलंद करायचा असेल, तर तुम्हाला काहीतरी खूप क्रेझी करावे लागते.”

त्यामुळे, त्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहत यमुना नदी पार केली आणि हे करुन चार लिम्का वर्ल्ड ऍडवेंचर रेकॉर्डस् (विश्वविक्रम) केले. हिमालयन रेस आणि डेजर्ट स्टॉर्ममध्ये भाग घेतला, जे अतिशय अवघड मार्ग आहेत. हिमालयन मोटरस्पोर्टस् असोसिएशन (एच.एम.ए) आणि फेडरेशन मोटरस्पोर्टस् क्लबस् ऑफ इंडीया (एफ.एम.एस.सी.आय.)यांच्या सहयोगाने त्या यामध्ये सहभागी झाल्या. या ठिकाणी शून्याच्या खालील तापमानात आठ दिवसांच्या काळात १८००० फीट अल्टीट्युडवर (समुद्रसपाटीपासूनची उंची) १७०० किमी बाईक चालविली.

“ मी माझ्या खोलीत, माझ्या विष्ठेतच मरणार असे लोक म्हणत – आज मी येथे आहे, दोन पारपत्र पूर्ण भरतील एवढा जगभर प्रवास करत! एक दिवस जॉन अब्राहम बरोबर राईड करत आहे तर दुसऱ्या दिवशी अर्जुन पुरस्कार हाती घेत आहे,” त्या अभिमानाने सांगतात.

दीपा यांची ही कामगिरी संपूर्ण जगाला आवाक करणारीच आहे आणि आता त्यांचे पुढील लक्ष्य आहे रिओ.... त्यावेळी शोर्टपुट (गोळाफेक) मधील आपले कौशल्य सिद्ध करण्यास त्या उत्सुक आहेत.

कितीही प्रतिकुल परिस्थितीतही सकारात्मक रहाणाऱ्या आणि आपल्या उदाहरणातून खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या दीपा यांना आमचा सलाम....

@deepaathlete


लेखक - बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन