गुगल गुरूचा ग्रेट प्रवास...

गुगल गुरूचा ग्रेट प्रवास...

Monday October 12, 2015,

5 min Read

उंचच उंच शिखरांना गाठण्यासाठी पंखांची नव्हे, तर आत्मविश्वासाची गरज असते. या वाक्प्रचाराला सत्यात उतरवण्याचे काम केले आहे अमित सिंघल यांनी. आपण अमित सिंघल यांना ओळखत नसाल, परंतु गुगल सर्चबाबत माहिती नसेल असे क्वचित कोणी असेल. आजकाल सर्व कामे गुगल गुरू करतो हे आपण सर्वजण जाणतोच. प्रश्न कोणताही असो, गुगल गुरूजवळ गेलात तर तुम्हाला योग्य ती माहिती मिळते. ही माहिती अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात एका व्यक्तीचे योगदान आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. ती व्यक्ती म्हणजे झासी येथे राहणारे अमित सिंघल. गुगलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले अमित सिंघल हेच गुगलच्या शोध गुणवत्ता टीमच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात. त्यांचे हे काम पूर्ण झाल्यानंतरच आपण आपल्या प्रश्नांबाबत योग्य ती माहिती मिळवू शकतो. अमित यांच्याकडे सह-लेखकाच्या स्वरूपात ३० हून अधिक वैज्ञानिक लेख आणि त्यांचे पेटंट्स आहेत.

अमित सिंघल यांना गुगल मुख्यालयात भेटण्याची आम्हाला नुकतीच संधी मिळाली. तेथेच आम्ही त्यांच्या झासीमधून केलेल्या आयआयटी, रूडकीच्या प्रवासाबाबतही जाणून घेतले. आपण आपल्या कामात आनंद शोधून आपले काम कसे सार्थक बनवू शकता याबाबच आपण सुद्धा जाणून घ्या. जीवनात कोणत्या गोष्टीची काळजी घेतली म्हणजे आपले जीवन सोपे बनते? अमित म्हणतात की आपल्या कामावर प्रेम करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमचे काम अगदी मनापासून केलेत तर यशाला तुमच्या मागे मागे यावेच लागते. ही केवळ बोलण्याची गोष्ट नाही, तर अमितनी आपल्या जीवनात या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. अमितने आपले काम अगदी मनापासून आणि मोठ्या आनंदाने केले. याचा परिणाम म्हणूनच यश हे अमितच्या सोबतच चालत असते. यशाच्या त्या शिखरावर आहेत, तिथे पोहोचणे हे एक स्वप्न आहे असे वाटते अशा यशाच्या शिखरावर गुगलसोबत अनेक वर्षांपासून काम करणारे अमित आज पोहोचले आहेत.

image


अमित सिंघल झाशीचे आहेत. सन २००० मध्ये गुगलसोबत जोडले जाण्यापूर्वी AT&T Labs मध्ये तांत्रिक कर्मचारी टीममध्ये ते वरिष्ट सदस्य होते. रूडकीहून आयआयटी केल्यानंतर मिनेसोटा विद्यापीठातून त्यांनी एमएस ही पदवी संपादन केली. त्यानंतर कॉर्नल विद्यापीठातून त्यांनी पीएचडी ही पदवी सुद्धा प्राप्त केली.


कामावर प्रेम हाच यशाचा मंत्र


केवळ नाव कमावणे, पैसा, प्रसिद्धी मिळवणे म्हणजे यश नव्हे. जेव्हा आपण आपल्या कामावर प्रेम करतो तेव्हाच ख-या अर्थाने आपल्याला सफलता मिळते. अमितच्या मते लोक काय म्हणतात याबाबत विचार करून वेळ व्यर्थ घालवू नये, उलट जे काम आपल्याला आवडते, जे काम केल्यानंतर आपल्या अंतर्मनाला आनंद मिळतो ते काम आपण केले पाहिजे. आणि असे काम केले की यश आपल्यापासून दूर नाही असे समजा.

अमितनी आपले काम अगदी मनापासून केले. हेच अमितना यश मिळण्या मागचे मोठे कारण आहे. जर तुम्ही तुमच्या कामाने आनंदी नसाल तर तुम्हाला यशस्वी म्हटले जाणारच नाही, मग भले तुमच्याकडे पैसा असो, गाडी असो किंवा मग बंगला असो. अमित म्हणतात, की त्यांनी त्यांचे काम मन लावून केले आहे, इतर सर्व गोष्टी मग स्वत:च मागे मागे येत राहिल्या....आणि अमितची पंचवीस वर्षांपूर्वी जी काम करण्याची पद्धत होती तीच काम करण्याची पद्धत आजही आहे. कामाला ते केवळ काम आहे असे समजून अमित मुळीच करत नाहीत, तर आनंद शोधण्यासाठीच ते काम करत असतात. अमितनी कधीही यश मिळवण्याच्या उद्देशाने अथवा पैसा कमावण्याच्या उद्देशाने कामाकडे पाहिले नाही तर ख-या अर्थाने आपल्या कामावर प्रेम केल्यानेच त्यांनी यशाची शिखरे गाठलेली आहेत.

image


परदेशात जेव्हा ते शिक्षण घेत होते त्या काळात अमित पाश्चिमात्य समाजातील लोकांपासून अतिशय प्रभावित झाले होते. अमित यांच्या मते पौर्वात्य आणि पाश्चिमात्य समाजातील लोकांच्या दृष्टीकोनात मोठा फरक आहे. पौर्वात्य देशातले विद्यार्थी परीक्षेत सफलता मिळवण्यासाठी सतत तणावात राहतात तर पाश्चिमात्य विद्यार्थी आपला अभ्यास अगदी आनंदाने करतात आणि मोठ्या सहजतेने यश संपादन करतात असे अमित यांना वाटते. ते म्हणतात, “ मी अशा समाजात वाढलो, ज्या समाजात सांगितले जाते, की जर तुम्ही चांगले असाल तर इंजिनिअर बनू शकाल, डॉक्टर बनू शकाल किंवा आयएएस बनू शकाल, पण तुम्हाला जे बनाय़ला आवडेल ते तुम्ही बना असे मात्र सांगितले जात नाही किंवा या गोष्टीला कधी महत्त्व दिले जात नाही, वा काय केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल हेही सांगितले जात नाही.”

image


बॉलिवुडचे संगीत दिग्दर्शक शंतनु मोईत्राकडून अमित अतिशय प्रभावित झाले आहेत. शंतनु अमितचे चांगले मित्र सुद्धा आहेत. अमितच्या म्हणण्यानुसार शंतनु आपल्या कामावर खूप प्रेम करतात आणि प्रेम हेच उत्कृष्ट संगीत निर्माण होण्यामागचे कारण असल्याचे ते सांगतात. शिवाय संगीतावर असलेले त्याचे प्रेम हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.


आव्हानांचा सामना करा


आपल्या आयुष्यात पुढे जात असताना नेमका कोणता मार्ग निवडावा असा संभ्रम तुम्हाला पडला, तर तुम्ही तुमच्या आतला आवाज ऐका. याचे कारण म्हणजे आतून आलेला आवाजच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. बरेचदा आपल्याच निर्णयावर आपल्याला विश्वास ठेवावासा वाटत नाही असेही होते. परंतु अमित सिंघल यांच्या मतानुसार कोणत्याही गोष्टीचा योग्य निर्णय नसतोच मुळी, तर आपण आपल्या कामानेच आपल्या निर्णयाला योग्य बनवत असतो.


आई-वडिलांची सोबतच गरजेची, चुकांमधून शिकावे


आपले आई-वडिल आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. माझ्या आयुष्यात मला काहीही करण्याचे स्वातंत्र्य देणा-या अनेक संधी निर्माण झाल्या. अशात माझ्याकडून चुकाही खूप झाल्या आणि त्या चुकांपासून मी शिकलोही पुष्कळ... आयुष्यात एक टप्पा असा ही येतो ज्या टप्प्यावर तुम्ही चुका करता.... परंतु त्या महत्त्वाच्या ठरत नाहीत....कधी तुम्हाला ए ग्रेड, बी ग्रेड तर कधी सी ग्रेड मिळते किंवा कधी तुम्ही नापासही होता.... परंतु एक अशीही वेळ येते जेथे ग्रेडला काहीही महत्त्व उरत नाही....उलट ती वेळ आपल्याला आपल्या चुका आणि अपयशांची किंमत काय असते ते शिकवण्याचे मोठे काम करून जाते...

आयुष्यात प्रत्येकजण पडतो, धक्के खातो... इतकच नाही तर ब-याचवेळा विपरित परिस्थितीतूनही प्रत्येकाला जावे लागते...परंतु अशा स्थितीत सुद्धा तुमचे धैर्य आणि संयम तुम्हाला लवचिक बनवतात, परिस्थितीशी जुळवून घेण्याचे शिकवतात.. म्हणजेच तुम्ही पडून पुन्हा उठून उभे राहता...आणि पुढे जाऊ लागता. सहाव्या ग्रेडमध्ये कमी ग्रेड मिळणे ही मोठी गोष्ट नाही, परंतु त्या परिस्थितीशी कशा प्रकारे दोन हात करावेत हे मुलाने शिकणे गरजेचे आहे... घर आणि शाळेसारख्या सुरक्षित वातावरणात आपण आपल्या जीवनातले कितीतरी मोठे धडे शिकतो... म्हणून जेव्हा आपण वास्तवात मोठे होतो... आणि बाहेरच्या जगात बाहेर पडतो त्यावेळी आपण जे काही घर आणि शाळेच्या वातावरणापासून शिकलेलो असतो तेच सर्वकाही आपल्या सोबत असते. तिथेच ख-या अर्थाने आपल्याला आयुष्यात पडून पुन्हा उभे राहण्य़ाची प्रेरणा मिळते. माझ्या आई-वडिलांनी मला अगदी सुरूवातीपासूनच पुरेसे स्वातंत्र्य दिलेले आहे...आज जो काही मी आहे तो त्यामुळेच आहे. मला मिळालेल्या स्वातंत्र्याचीच माझ्या आय़ुष्यात मला मोठी मदत झाली


स्टार्टअप साठी


आपण जगाला काय देणार आहोत हे तुम्ही स्वत:ला सतत विचारत रहा... आणि जेव्हा तुम्ही स्वत:ला हे विचाराल, तेव्हा तुम्ही प्रामाणिक राहून ख-या मनाने आत्मविश्लेषण करा आणि मगच उत्तर द्या... आपण आपल्या कामावर खरोखर प्रेम करतो का... आणि दिवसाच्या शेवटी आपण आनंदी आहात का... जर या प्रश्नांचे उत्तर होय असे असेल तर यश तुम्हाला सलाम करेल... म्हणूनच लवचिकपणा( परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती) अत्यंत गरजेची आहे.... त्याला तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घ्या.