कॅनव्हास – उद्योग जगतासाठी एक परिपूर्ण मार्केटींग सॉफ्टवेअर

0

आश्चर्यकारकपणे समान पार्श्वभूमी असलेले ते दोन तरुण म्हणजे राहूल लखानी आणि अंकुर नंदू... दोघेही मुंबईकर, अमेरिकेतून दोघांनीही संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले, सिलिकॉन व्हॅलीतील गुगल आणि सिस्को सिस्टीम्समध्ये काम केले आणि पण शेवटी भेट झाली ती मात्र हैदराबादमधील आयएसबीमध्ये, एमबीएचे शिक्षण घेण्याच्या निमित्ताने... एमबीएच्या वर्गामध्ये त्यांनी बरेच एकत्र काम केले पण ते एकमेकांच्या लगेचच जवळ येण्यामागचे कारण होते ते त्या दोघांचीही उद्योजक बनण्याची महत्वाकांक्षा... त्यानंतर या जोडगोळीने आयएसबीच्या ‘वाधवानी सेंटर फॉर आन्त्रप्रुनरशीप डेवलपमेंटमधून’ स्टार्टअप सुरु करण्याबाबतचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला.

शिक्षणानंतर त्यांनी आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोरदारपणे कामाला सुरुवात केली आणि त्यातूनच स्थापना झाली ‘कॅनव्हास’ (Canvass) या स्टार्टअपची... कॅनव्हास हे एक मार्केटींग सॉफ्टवेअर असून ते उद्योगांना पुढील चार प्रकारे मदत करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे - लीड जनरेशन, लीड नर्चरींग, मार्केटींग कम्युनिकेशन आणि मार्केटींग ऑटोमेशन. विक्रेते त्यांची मोहीम एकाच डॅशबोर्डवरुन (उपकरणफलक) चालवू शकतात, ज्यामध्ये इमेल मार्केटींग, एसएमएस मार्केटींग, रेफरल प्रोग्रॅम, ड्रीप मार्केटींग, सोशल शेअर कॅंपेन, ग्राहकांचा अभिप्राय, इत्यादी पर्यांयाचा समावेश असतो.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत कंपनीचे सहसंस्थापक राहूल यांच्याशी आम्ही खास बातचीत केली आणि जाणून घेतले त्यांच्या आजपर्यंतचा प्रवासाविषयी आणि भविष्यातील स्वप्नांविषयी...

बराच काळ सिलिकॉन व्हॅलीमध्ये घालविल्याने, अंकुर आणि राहूल या दोघांनाही उद्योग जगताकडे अगदी जवळून पहाण्याचा अनुभव मिळाला. कमी काळात मोठा परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती लवचिकता आणि चापल्य मिळविण्यासाठी स्वतःची स्टार्टअप सुरु करणे गरजेचे असल्याचे त्यांना चांगलेच समजले होते. “ उद्योजकतेने आम्हाला आमच्या मर्यांदांना पार करत पुढे जाण्याची ताकद तर दिलीच पण त्याचबरोबर आमच्या यश-अपयशावर थेट प्रभाव पाडला. मुख्य म्हणजे एक असे समाधान दिले, जे कॉर्पोरेट नोकरीतून आम्हाला कधीच मिळाले नसते,” राहूल सांगतात. मार्केटींग आणि तंत्रज्ञान या त्यांच्या दोन आवडत्या विषयांना एकत्र आणणारे असे काही सुरु करणे, हे निश्चितच आकर्षक होते आणि त्यातूनच जन्म झाला ‘कॅनव्हासचा’...

“उद्योगांकडून कोणतेही लक्ष्य नसलेल्या, गोंधळात टाकणाऱ्या आणि अगदी वाईट पद्धतीने बनविण्यात आलेल्या अशा मार्केटींग कम्युनिकेशनचा भडीमार होत असल्याचे आमच्या प्रकर्षाने लक्षात आले. चुकीचे लक्ष्य ठरवून केले गेलेले ईमेल मार्केटींग आणि कालबाह्य वेबसाईटस्, हे तर नेहमीचेच झाले होते. मार्केटींग धोरण अधिक चांगल्या प्रकारे राबविण्याचे अनेक मार्ग उद्योगांसाठी उपलब्ध होते. डेटा ऍनेलिटीक्सच्या (डेटा विश्लेषण) दृष्टीकोनातून या आव्हानांचा सामना करण्याचा प्रयत्न करत आम्ही सुरुवात केली,” राहूल सांगतात. अनेक संभाव्य ग्राहकांशी झालेल्या चर्चेतून त्यांच्या असे लक्षात आले की, बहुतेक उद्योगांना ऑनलाईन मार्केटींग अंतर्गत येणाऱ्या अगदी मुलभूत गोष्टींसाठीही झगडावे लागत होते, जसे की ईमेल मार्केटींग आणि वेबसाईट लॅंडींग पेजेस... ही परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी ग्राहकांच्या सातत्यपूर्ण अभिप्रायावर आधारीत अशा एका उत्पादनाची निर्मिती केली. सध्या प्रत्येक उद्योग हा त्यांचे ऑनलाईन मार्केटींग धोरण आखण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा फायदा उठविण्यासाठी त्यांनी स्वतःला चांगल्या प्रकारे तयार केले .

यामध्ये तयार टेंम्प्लेटस् आणि मार्केटींग वर्कफ्लो (कार्यपद्धती) उपलब्ध आहे, जेणे करुन मार्केटींग उपक्रम सुरु करण्यासाठी आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी उद्योगांना लागणारा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होण्यास मदत होते. एक मजबूत ऍनेलिटीकल इंजिन (विश्लेषणात्मक इंजिन) असल्याने उद्योगांना त्यांचा सर्वाधिक व्यवसाय कुठून मिळेल याची माहिती आणि त्यांचे सर्वोत्तम ब्रॅंड ऍम्बेसिडर्स यांचा शोध घेण्यासही मदत मिळते.

आज अशा कंपन्या आहेत, ज्या स्वतंत्रपणे सीआरएम, ईमेल मार्केटींग, रेफरल प्रोग्रॅम, फीडबॅक सोल्युशनस्, सोशल मिडीया सोल्युशनस्, लॅंडींग पेज टूल्स, इत्यादी गोष्टी पुरवतात. पण हे सर्व उपाय विस्कळीत आहेत आणि त्यांचा एकमेकांशी चांगला संपर्क नसतो. मात्र कॅनव्हास हे एकत्रिकृत मार्केटींग सॉफ्टवेअर असल्याने, तुम्हाला तुमची मोहीम इतर साधनांसारखी वेगवेगळ्या कोनांतून नाही तर संपूर्णपणे पहाता येते. लीड रेकॉर्डस् आणि डेटा राखण्यासाठी काही ठराविक सीआरएम सिस्टीम्स खूपच चांगल्या असतात. मात्र कॅनव्हास हे केवळ डेटा राखण्याच्या खूपच पुढे जाते आणि तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या ग्राहकाबरोबर व्यक्तिगतरीत्या आणि वेळेत संपर्क ठेवण्यास मदत करते. त्यांच्यासारखे पाश्चिमात्य देशांतील त्यांचे स्पर्धक आहेत, इन्फ्युजनसॉफ्ट, मार्केटो, पारडॉट, हब्सस्पॉट, इत्यादी.

भविष्यात मार्केटींग संचात सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडे मजबूत उत्पादन आराखडा आहे. एकाच डॅशबोर्डमधून एवढे काही मिळत असल्याने त्यांचे ग्राहकही खूपच खूष आहेत. “ आम्हाला मिळाणारा हा प्रतिसाद आमच्या उत्पादन आराखड्याला चालना देत आहे. ज्या पद्धतीने उद्योग मार्केटींग करतात, त्यामध्ये आम्हाला मुलभूत बदल घडवून आणायचा आहे. प्रत्येक उद्योगाला ऑनलाईन मार्केटींगची ताकद वापरता येणे शक्य आहे आणि त्यांनी ती वापरावीच आणि तेदेखील तंत्रज्ञानविषयक समस्यांशी आणि वेब डेवलपर्सबरोबर काम करताना समन्वयामध्ये होणाऱ्या दिरंगाईशी कोणताही झगडा न करता... टॅलीने जे अकाऊंटींगच्या क्षेत्रात केले, तेच आम्हाला मार्केटींगच्या क्षेत्रात करायचे आहे,” राहूल सांगतात.

हे सॉफ्टवेअर एसएएएस (SaaS) हे साधन देऊ करत असून, त्यासाठी सदस्यता शुल्क आहे जे अपलोड केलेल्या लीड रेकॉर्डसी संख्या आणि तुम्हाला हव्या असलेल्या वैशिष्ट्यांवर आधारीत आहे. ग्राहकांसाठी एक ट्रायल पिरियड अर्थात चाचणी कालावधीही देऊ करण्यात आला आहे. “ आम्ही सुरुवातीला एक तीस दिवसांचा सर्वसमावेशक असा ‘मार्केटींग सक्सेस प्रोग्रॅम’ देऊ करत आहोत, ज्यामध्ये विचारमंथन, शिक्षण, प्रशिक्षण, मोहिमेची रचना आणि डेटा क्लिनअपचा समावेश आहे,” राहूल सांगतात.

“ भारतात बीटूबी सेलिंगमध्ये अनेक आव्हाने आहेत. लांबलचक सेल्स सायकल्समुळे आम्हाला आमच्या बिझनेस मॉडेलमध्ये अनेक बदल करावे लागले, त्याशिवाय उद्योगांमध्ये ऑनलाईन मार्केटींगबाबतच्या शिक्षणाचा अभाव आणि पैशाच्या समस्या आहेतच. आमच्या मॉडेलमध्ये केलेल्या बदलांमुळे यापैकी बहुतेक समस्यांवर उपाय शोधणे शक्य होते आणि आम्ही ते यशस्वीरित्या केले देखील,” ते अभिमानाने सांगतात.

ग्राहकांना त्यांच्याकडून कस्टमाईस्ड सेवेची अपेक्षा होती, जी ते देऊ शकत नाही कारण ही शुद्ध उत्पादन कंपनी आहे. “ मात्र ज्या संस्था, सल्लागार, वेब डेवलपर्स आमच्या ग्राहकांना अपेक्षित असलेली कस्टमाईस्ड सेवा देऊ करतात, त्यांच्याबरोबर आम्ही एक जबरदस्त पार्टनर प्रोग्रॅम सुरु केला आहे,” राहूल सांगतात.

“आतापर्यंत आम्ही पंचवीसहून अधिक ग्राहकांबरोबर काम केले आहे आणि आणखी बरेच जण या सॉफ्टवेअरची चाचणी घेत आहेत. आमचे बहुतेक ग्राहक हे रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान, उत्पादन आणि ईकॉमर्सच्या उद्योगांतील आहेत,” ते सांगतात.

मोठ्या सेल्स सायकल्स असलेले उद्योग – दोन्ही प्रकारचे बीटूसी आणि बीटूबी – हे त्यांच्यासाठी आदर्श ग्राहक आहेत. “ ही केवळ भारतातील परिस्थिती आहे. आम्ही उर्वरीत आशियामध्ये संभाव्य बाजारपेठांच्या शोधात आहोत, जेणे करुन आम्ही आणखी प्रगतीपथावर जाऊ,” राहूल सांगतात.

लेखक – किर्ती पुनिया

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन