जीवनाच्या उत्कर्षाचा ज्यांनी मार्ग दिला त्यांच्या प्रति कृतज्ञभाव म्हणजेच ‘गुरू पौर्णिमा’ !

0

दयानीमूलं गुरूर्मुर्तीं, पुजानीमूलं गुरूर्पाद्दं;
मंत्रमूलं गुरूर्वाक्यं, मोक्षमूलं गुरूर्कृपां २।
व्यासं वसिष्टनप्तारं, शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वंदे, शुकतातं तपोनिधिम।

म्हणजे काय? तर महर्षी व्यास हे वसिष्ठांचा पणतू, शक्तीचा नातू, पराशराचा पुत्र आणि शुकाचा पिता होते. ज्यांनी महाभारतासारखे महाकाव्य रचले ते महर्षी व्यास यांच्या जयंतीच्या दिवशी आपण गुरूपौर्णिमा साजरी करतो. या दिवसाची महती मुळातून समजून घेताना खरेतर पौराणिक संदर्भ थोडक्यात माहिती करून घ्यायला हवा.


फोटो सौजन्य - पत्रिका न्यूज
फोटो सौजन्य - पत्रिका न्यूज

'व्यासपौर्णिमा' म्हणजेच गुरूपौर्णिमा या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा भारतीय हिंदू, बौध्द आणि जैन परंपरेत आहे. कारण भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार व्यासमुनी मानले गेले आहेत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होते, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व इहलौकिक ग्रंथ निर्माण केला. त्यात धर्म निती आणि व्यवहार यांचा मेळ घालत कसे वागावे याचा वस्तू पाठ घालून देण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी शिक्षण देण्याचे काम करणारे गुरूकुलम् करत होते, त्या गुरूकुलांमध्ये शिकणारे विद्यार्थी गुरूंच्या विद्याज्ञानाचे ऋण या दिवशी गुरूपूजन करून व्यक्त करत आणि गुरूंच्या ज्ञानाची याचना करत. त्यानी मार्ग द्यावा, ज्ञान द्यावे आणि जीवनाचे यश आणि समृध्दी यांचे मार्गदर्शन करावे ही अपेक्षा करताना त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस! व्यास जयंती म्हणत नाहीत, पौर्णिमा म्हणतात कारण जो गुरू आहे तो आदी आहे पूर्ण आहे. जो पूर्ण आहे त्याच्या कडून काही चांगले घेता येते ही संकल्पना यात आहे.

व्यासांचा पौराणिक संदर्भ असा आहे की, देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला ‘कुमारीपुत्र’ म्हणजे व्यास महर्षी! जे जन्माने कोळी होते असे सांगितले जाते. सत्यवती विवाहानंतर हस्तिनापूरच्या महाराणी झाल्या मात्र त्यानंतर त्यांना जे दोन पुत्र झाले ते दोघेही निपुत्रिक राहीले, राज्याला वारस उरला नाही.

त्यामुळे राणी सत्यवती व्याकुळ झाल्या, त्या तळमळीतून त्यांनी एक कल्पना मांडली ती कल्पना त्या काळच्या सामाजिक समजुतीला आणि रीतीरिवाजाला धरून होती. आपला पूर्वीश्रमीचा म्हणजे लग्नापूर्वीचा पुत्र व्यास याने आपला वंश वाढवावा अशा कल्पनेने त्यांनी व्यासांनी नियोगपद्धतीचा अवलंब करून आपल्या सुनांच्या ठिकाणी संतति निर्माण करावी, असा आग्रह धरला. मात्र व्यास यांना हे मुळीच मान्य नव्हते. त्यांनी आईला ह्या विचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सत्यवतीच्या अतीव आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. स्वत:च्या मर्जीविरुद्ध त्यांना तिचे म्हणणे मानणे भाग पडले आणि सत्यवतीच्या दोन्ही सुनांना दोन मुलगे झाले. तेच धृतराष्ट्र आणि पंडू. धृतराष्ट्राची संतति कौरव आणि पंडूची संतति पांडव होते हे सर्वज्ञात आहेच!

हे महाभारताचे मुख्य कथाबीज. व्यासांचे कौरव-पांडव ह्या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. ह्या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उद्धस्त झाली असेल त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते. गीतेच्या प्रारंभी जी अर्जूनाने श्रीकृष्णाना प्रश्नावली केली आणि विषादाची वेदना प्रगट केली, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. त्यातूनच भगवत गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेला उपदेश आहे. जो आज आपला सर्वात पवित्र धर्मग्रंथ समजला जातो.

व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांना आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अतिउच्च स्थानी सन्मानाने बसविते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी देखील सांगितले की, म्हणौनि भारतीं नाहीं तें न्हवे चि लोकीं तिहीं, एणें कारणें म्हणिपे पाहीं व्यासोच्छिष्ट जगत्रय.

व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. प्रात:स्मरणात व्यासांच्या नमनाचा श्र्लोक आहे, त्यामुळे प्रात:स्मरणीय गुरू व्यास यांना वंदन करूया!

गुरू म्हणजे आपले अंतर्मन, अनेकदा आपण आतल्या मनात बोलत असतो काय करावे, कसे वागावे, असे विचारत असतो आणि आतले मन सांगते, ‘थांब हे नको करू’. त्यावेळी थांबतो त्यातून आपण स्वकल्याण साधत असतो त्यासाठी आपल्या मन आणि बुध्दीला कृतज्ञ व्हा! तिचे आभार माना व्यासपर्व म्हणजे ध्यास पर्व होवू द्या. चांगल्या गोष्टीचा ध्यास मनात रूजवा हीच गुरू दक्षिणा आज या गुरूला द्या म्हणजे गुरूपौर्णिमा!

गुरू म्हणजे आपले जीवनानुभव जे आपल्याला मोठे मूल्य घेवून म्हणजे जीवनाचा अमूल्य असा काळ ‘गुरू द्क्षिणा’ म्हणून घेवून शिकवतात, जो काळ एकदा गेला की पुन्हा मिळत नाही. पण मग आपण पुढे कसे वागावे, कसे वागू नये हे अनुभवातून जो शिकतो त्याचे गुरू ‘अनूभव’ हेच असतात, त्यांचे आज स्मरण करूया.

पुस्तके आपली गुरू आहेत, लाखो वेळा सांगूनही जे शिकायला मिळत नाही ते योग्य पुस्तकांच्या सहवासात राहून, वाचून माणुस शिकतो आणि त्यानुसार वागतो म्हणून पुस्तकांना गुरू मानले आहे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूया.

मित्र हे गुरू असतात, जीवनाच्या वाटचालीत ते साथ देतात, योग्य काय, काय नाही ते सहज चर्चा करून सांगतात, त्यांच्या सहवासात माणूस आपले मन मोकळे करतो आणि मार्गदर्शन घेतो त्यांना त्याचे मुल्य देत नाही, पण ती कृतज्ञता आज व्यक्त करण्याची संधी संस्कृती देते त्यांची आठवण करा.

जीवनात असंख्य माणसे येतात नकळत काहीतरी सांगून जातात, व्यास म्हणजे परिघ, आपल्या सभोवतालच्या व्यक्ती, समाज, नातेवाईक, मित्र परिवार ज्यांच्या सोबत आपण रोज जगतो त्यांचे आपण काही गुण घेवूया त्यांच्याकडून चांगले काही नकळत शिकतो तसे वागतो आणि स्वत:चे चांगले करुन घेतो, त्यांना काय त्या मोबदल्यात देतो? त्यांचे उतराई होवूया. हीच गुरू पौर्णिमा!

ज्यांनी कळत-नकळत चार शब्द सहज उच्चारले आणि त्यातून आपले कल्याण झाले. त्यांचं ऋण मान्य करूया हीच गुरू पौर्णिमा! म्हणजे जीवनाच्या उत्कर्षांत ज्यानी कळत नकळत योगदान दिले त्यांना सम स्मरण करून आठवणे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञ भाव प्रकट करणे हा गुरू पौर्णिमेचा संदेश आहे. नाही का? गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरूवे नम:

लेखक : किशोर आपटे