आयुष्याची वाट हरवलेल्या चिमुरड्यांना स्वगृही परतविण्यासाठी कार्यरत ‘समतोल फाऊंडेशन’

आयुष्याची वाट हरवलेल्या चिमुरड्यांना स्वगृही परतविण्यासाठी कार्यरत ‘समतोल फाऊंडेशन’

Tuesday January 26, 2016,

4 min Read

मुंबई.. तीनशे पासष्ट दिवस, चोवीस तास जागे असणारे शहर. या शहराचे आकर्षण देश-विदेशातील सर्वांनाच आहे. या आकर्षणापोटी दर दिवशी परराज्यातून इथे येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. यापैकी काही जण केवळ शहर पाहण्यासाठी तर अनेकजण रोजगाराच्या शोधात इथे आलेले असतात. यामध्ये आयुष्याची दिशा चुकलेल्या लहान लहान मुलांचे प्रमाणही मोठे असते. ही मुले विविध कारणांमुळे घरातून पळून आलेली असतात. मात्र इथे आल्यानंतर वास्तवाचे चटके सोसण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसतो. अशा वाट चुकलेल्या मुलांना आयुष्याचा योग्य मार्ग दाखवून त्यांची पुन्हा त्यांच्या पालकांशी गाठ घालून देण्यासाठी ‘समतोल फाऊंडेशन’ २००४ सालापासून कार्यरत आहे.

image


“दर दिवशी जवळपास २०० मुलं घरातून पळून मुंबईत येतात. घरातलं कलुषित वातावरण तसंच पालक व मुलांमधील संवादाचा अभाव, मुंबईचं आकर्षण ही यामागची मुख्य कारणं असतात. तर काहीजण मोठमोठ्या आमिषांना फसून आलेली असतात. घर सोडून पळालेल्या मुलांमध्ये घरची परिस्थिती बेताची असलेल्या घरातील मुलं असतातच, मात्र या मुलांपेक्षाही आजकाल उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील मुलांचं घर सोडून येण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही मुलं मागता क्षणी एखादी गोष्ट न मिळाल्याने किंवा अशाच काही शुल्लक कारणांवरुन घराबाहेर पडतात,” असं ‘समतोल फाऊंडेशन’चे संस्थापक विजय जाधव सांगतात.

image


कला शाखेतून पदवी घेतलेल्या विजय यांनी एमएसडब्ल्यू करुन सामाजिक क्षेत्रात काम करायचे निश्चित केले आणि घरातून पळून मुंबईत आलेल्या मुलांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात केली. “ज्या मुलांच्या पालकांचा, घराचा ठावठिकाणा नाही अशा मुलांना अनाथ म्हणून वाढविणाऱ्या अनेक संस्था प्रत्येक राज्यात आहेत. मात्र या संस्थांच्या छताखाली अनाथ म्हणून वाढणाऱ्या या मुलांना सुरक्षित छप्पर मिळत असलं तरी त्यांनी त्यांची ओळख मात्र कायमची गमावलेली असते. त्यातच १८ वर्षानंतर या मुलांची जबाबदारी कोण घेणार हा सुद्धा एक प्रश्न असतो. ही समस्या वाढण्यापेक्षा वेळीच अशा मुलांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करणे हा त्यावर एक चांगला उपाय असू शकतो असे मला वाटले आणि मी घरदार सोडून पळून आलेल्या मुलांना त्यांच्या घरी परत नेऊन पोहचविण्याचं काम करायचं ठरवलं,” विजय सांगतात.

“सुरुवातीला मी एकटाच हे काम करत होतो. त्यानंतर हळूहळू स्टेशनवरच्या ऍक्सिडंट हमालांनी माझ्याबरोबर काम करण्यात स्वारस्य दाखविलं. ६-७ जण स्वतःहून माझ्याबरोबर हे काम करण्यासाठी पुढे आले. तेव्हापासून आजतागायत ते माझ्याबरोबर आहेत. आजघडीला आमची टीम २५ जणांची आहे. हे काम करण्यासाठी सामाजिक कार्याची मनापासून आवड असावी लागते. केवळ पगारासाठी काम करणारे लोक इथे जास्त काळ टिकू शकत नाहीत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे सामान्य ज्ञानही चांगले असावे लागते. कायद्याच्या चौकटीत राहून हे काम करण्यासाठी आम्हाला या संबंधित आरपीएफ, जीआरपीएफ, रेल्वे अधिकारी, ज्युवेनाईल पोलीस अशा जवळपास आठ खात्यांशी संपर्क साधावा लागतो. कार्यकर्त्याला या सगळ्याची माहिती असणं, कुठल्या प्रसंगी कुणाला संपर्क साधायचा याचं ज्ञान असणं आवश्यक असतं,” असं विजय सांगतात.

image


ते पुढे सांगतात, “जिथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात अशा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर प्रत्यक्ष उपस्थित राहून आम्ही आमचे काम करतो. कारण घर सोडून आलेली ही मुलं अनेकदा स्टेशनवरच राहतात. अशा मुलांना शोधून काढून त्यांच्याशी आमचे कार्यकर्ते संवाद साधतात. त्यांना जे मिळवायचे आहे ते मिळविण्यासाठी आमची मदत होईल असा विश्वास देतात. जेणेकरुन ती मुलं आमच्या शेल्टरमध्ये रहायला यायला तयार होतील. यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण दिलेले आहे. शेल्टरमध्ये आणल्यानंतर तिथे या मुलांचे समुपदेशन केले जाते. त्यांच्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यांच्या सवयी, विचार, मानसिकता यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जेणेकरुन ती मुलं स्वतःहून पुन्हा घरी परतण्यासाठी तयार होतील. जास्तीत जास्त दोन महिने या मुलांना शेल्टरमध्ये ठेवावे लागते. दोन महिन्यात आम्हाला त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात यश मिळतेच.” आतापर्यंत ‘समतोल फाऊंडेशन’ने साडे पाच हजारांहून जास्त मुलांना स्वगृही पाठविण्यात यश मिळविले आहे. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

image


मोठमोठी स्वप्न पहात मुंबापुरीत प्रवेश केलेल्या मुलांची इथे जगण्याची लढाई सुरु झालेली असते. स्वप्न चुरगळलेली असतात. दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत असते. अशा परिस्थितीत ही मुले वाममार्गाला जाण्याची शक्यताच अधिक असते. दर दिवशी मुंबईत येणाऱ्या अशा मुलांचे प्रमाण पाहिल्यास ही समस्या पुढे जाऊन समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढविणारी ठरु शकते. हे लक्षात घेता विजय यांचे हे कार्य समाजहितासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे समजते.

image


‘समतोल फाऊंडेशन’च्या समुपदेशन कार्यक्रमामुळे मुलांना योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याची जाणीव होते आणि जगण्याची नवी दिशा मिळते. घर सोडून गेलेले आपले मुल परत मिळाल्याचा पालकांचा आनंद तर वर्णनातित असतो आणि हा आनंद मिळवून देणारे विजय जाधव आणि समतोलचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी देवासमान असतात. त्यांच्या या कार्यामुळे एका कोवळ्या रोपट्याला कीड लागण्यापासून वेळीच वाचविले जात आहे. त्याला हक्काची सावली पुन्हा मिळते आहे. जिथे हे रोपटे नव्या जोमाने वाढेल, बहरेल.

    Share on
    close