"पुरुषांपेक्षा स्त्रिया इतरांना मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत." शचि इर्दे, कार्यकारी संचालक, कॅटलिस्ट इंडिया

"पुरुषांपेक्षा स्त्रिया इतरांना मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत." शचि इर्दे, कार्यकारी संचालक, कॅटलिस्ट इंडिया

Tuesday November 17, 2015,

6 min Read

image


शचि इर्दे ह्या भारतातील ‘कॅटलिस्ट इंडिया’ च्या कार्यकारी संचालक आहेत. ‘कॅटलिस्ट इंडिया’ ही एक अशी संस्था आहे, जी व्यावसायिक जगतात स्त्रियांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संशोधन व कार्य करते. शचि यांना माइक्रोलँड, स्पाइस मोबाइल, विप्रो आणि इन्फोसिससारख्या संस्थासाठी काम करण्याचा १७ वर्षांपेक्षा जास्त व वैविध्यपूर्ण अनुभव आहे. ‘कॅटलिस्ट इंडिया’ मध्ये काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, त्या इन्फोसिस येथे ‘विविधता आणि समावेशन’ विभागाच्या प्रमुख होत्या. परंतु स्वतःची कॉर्पोरेट जगतातील उंचीवर असणारी व्यावसायिक कारकिर्द सोडून, त्यांनी कामकरी स्त्रियांच्या उत्कर्षासाठी स्वतःची उर्वरित कारकिर्द समर्पित केली आहे.

आम्ही ‘युअरस्टोरी’ साठी त्यांच्याशी बातचीत करून त्यांची प्रेरणा आणि ध्येयाविषयी जाणून घेतले.

लहानपणापासूनचे असे कोणते संस्कार आणि पाठ तुम्हाला आजपर्यंत प्रेरणा देत आहेत?

माझा जन्म आणि संगोपन अशा शहरात झाले आहे जे एक औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपाला आले होते. माझ्या लहानपणी मी भिन्न-भिन्न पार्श्वभूमी असण्याऱ्या लोकांच्या सानिध्यात होते. त्या वातावरणाचा अनुभव माझी चांगली जडणघडण होण्यास कारणीभूत आहे . त्यामुळे मी भाषा, खाद्यप्रकार, धर्म आणि संस्कृती यातील अंतर जाणून प्रत्येकाची प्रशंसा करण्यास शिकले. माझे मित्र-मंडळ भारतातील विविध राज्यातून आलेल्या लोकांचे बनले होते आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी एकमेकांचे भिन्नत्व जाणून त्याचा आदर करणे अत्यावश्यक होते. त्यामुळेच आम्हा सर्वांसाठी एकमेकांच्या सण-सोहळ्यात तसेच दु:खात सहभागी होणे, अतिशय सोपे झाले होते. आम्हा सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा जर कुठला रेशीमबंध होता, तर तो म्हणजे आमची शाळा. शिक्षण हे आम्हा सर्वांसाठी खूप महत्वाचे होते आणि त्या काळी आमचे लक्ष विचलित करणारी कमी साधनं अस्तित्वात होती. त्यामुळेच शाळेत जवळजवळ सगळेच सर्वोत्तम होण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत असत.

संगणक शास्त्रात पदवी घेतल्यानंतर, मी विपणन शाखेत एम.बी.ए. (MBA in Marketing) करण्याचा निर्णय घेतला कारण मी स्वतःला दिवसाचे ८ ते १० तास एका टेबलमागे बसून संगणकावर काम करताना पाहण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हते. माझ्या वडिलांनी प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य दिल्यामुळेच मी माझ्या आवडीचे कार्यक्षेत्र निवडू शकले.

माझ्या लहानपणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे आणि तो म्हणजे मला मिळालेले सुरक्षित, मोकळे वातावरण. आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहून नवीन गोष्टी शिकण्याचे स्वातंत्र्य होते. अशा वातावरणामुळे निर्भयपणे प्रयोग करण्याचे भान माझ्या अंगी जोपासले गेले, ज्यामुळे आजही व्यावसायिक कारकिर्दीत जोखीम घेऊन आव्हानांना सामोरे जाण्यास, मला बळ मिळत आहे.

आम्हाला तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल सांगा.

माइक्रोलँड येथे विपणन व्यवस्थापकाच्या पदावर मी माझी पहिली नोकरी केली. तो १९९४ चा काळ होता. १९९६ मध्ये मी स्पाईस टेलीकॉम मध्ये ‘विपणन आणि विक्री’ विभागात वरिष्ठ व्यवस्थापकाच्या पदावर रुजू झाले. तेथे मी ७ वर्ष काम केले. त्याकाळी मी नक्कीच अशा स्त्रियांपैकी एक होते ज्यांना विक्री विभागात काम करण्यास मिळणे, ह्याचा अतिशय आनंद होत असे. मी त्या स्वरूपाच्या कामातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला, मग ते ग्राहकांशी प्रत्यक्ष भेट घेणे, प्रस्ताव बनवणे, वाटाघाटी करणे असो अथवा शेवटी ग्राहकांकडून करार पूर्ण करून घेणे असो.

नंतर मी विप्रोमध्ये काम करण्यास गेले. तेथे माझी ‘मानवसंसाधन’ (Human Relations) विभागात नेमणूक झाली. विप्रोमध्ये ३ वर्ष काम केल्यानंतर, मी इन्फोसिसमध्ये नोकरीवर रुजू झाले.

माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रगतीचा आलेख, एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत काम करणे असा राहिला नसून, माझ्या कामाची भूमिका अथवा स्वरूपानुसार बदलत गेला आहे. सतत नवीन काहीतरी शिकण्याची प्रबळ इच्छा आणि संस्थेतील प्रत्येक विभागाचे संचलन जाणून घेण्याची कळकळ, ह्या दोन गोष्टींना मी नेहमी माझा हुद्दा आणि संधी निवडताना प्राथमिकता दिली आहे. आजवर मी माझ्या कारकिर्दीत, दर्शनी विक्री विभाग, किरकोळ विक्री विभाग, जाहिरात आणि विपणन विभाग, पार्श्वभूमी ग्राहक सेवा, ग्राहक निष्ठा सेवा, व्यवसाय भागीदार, मानवसंसाधन विभाग, कर्मचारी संबंध आणि अंतर्गत संचार, विविधता आणि समावेश विभाग अशा विविध–अंगी कामाचा अनुभव घेतला आहे.

इन्फोसिसमध्ये कारकिर्दीच्या उच्चतम स्थानावर असताना, ते काम सोडून, तुम्ही विना-नफा संघटनेत काम करण्याचा निर्णय का घेतला?

इन्फोसिसमध्ये ‘विविधता आणि समावेश’ (Diversity and Inclusion) विभागात काम करताना, मला खरोखरच ह्या गोष्टींचा साक्षात्कार झाला की स्त्रियांना कामाच्या ठिकाणी किती विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आणि व्यावसायिक संस्था योग्य व प्रतिभावान कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेत सामावून घेण्यासाठी किती तत्पर असतात.

मी माझ्या ‘कॅटलिस्ट इंडिया’ मधील भूमिकेचं विश्लेषण करताना हेच सांगेन की मी खरोखर तेथे एका उत्प्रेरकाची (catalyst) भूमिका साकारत आहे. सध्या मी मालक व कर्मचारी वर्गामध्ये एका सर्वसमावेशक संस्कृतीचे महत्व काय आहे, ह्याबद्दल जागरुकता वाढवण्यावर माझे लक्ष केंद्रित केले आहे. तसेच स्त्रियांना त्यांच्या पुढील कारकिर्दीतील वाटचालीच्या शक्यता समजावणे, व्यावसायिक समुदायांना एकत्र आणणे व अशा पद्धतीने कॅटलिस्ट इंडियाचे ‘स्त्रियांसाठी व्यावसायिक संधी विस्तारण्याचे’ ध्येय सत्यात उतरवण्यासाठी मी काम करत आहे.

मी नेहमीच वाटेत उभ्या ठाकलेल्या आव्हानांना सामोरी जाण्यास तत्पर असते आणि १० वेगवेळ्या गोष्टी तीन सेकंदांत तत्काळ पूर्ण करण्यासाठी उत्सुक असते. १७ वर्ष कॉर्पोरेट जगतात यशाच्या पायऱ्या चढल्यानंतर, मला आता असे जाणवते की कॅटलिस्ट इंडियामधील माझी भूमिका मला माझ्या वैयक्तिक मर्यांदांच्या पलीकडे जाऊन एका विशाल कार्याचा भाग होण्याची संधी देत आहे, जे कार्य समाजामध्ये सकरात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

कॅटलिस्ट इंडियाने संशोधन करून कशाप्रकारचे निष्कर्ष काढले आहेत?

कॅटलिस्टच्या ‘लीडर्स पे इट फॅारवर्ड’ नावाच्या संशोधन अहवालानुसार, उच्च प्रतीच्या प्रतिभावान व्यक्ती, ज्या स्वबळावर प्रशिक्षित होऊन त्यांच्या कारकिर्दीमध्ये उंचीवर पोहचलेल्या असतात, त्या नक्कीच त्यांच्या पुढच्या पिढीची जडणघडण करून त्यांना विकास करायला मदत करतात. ही एक लक्षणीय गोष्ट आहे की ह्या बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया इतरांना मदत करण्यामध्ये आघाडीवर आहेत.

दुर्देवाने, व्यावसायिक क्षेत्रात महत्वाच्या हुद्द्यांवर फार कमी महिला विराजमान आहेत. आणि स्त्रियांना उच्च स्थानापर्यंत पोहचण्यासाठी फार कमी संधी दिल्या जातात. कॅटलिस्टच्या ‘गुड इन्टेंशंन, इम्परफेक्ट एक्झेक्युशन’ ह्या संशोधन अहवालानुसार, उच्च पदांवर पोहचण्याची स्त्रियांना समान संधी नसणे, ही गोष्ट वरिष्ठ पदांवरील स्त्री-पुरुष वेतनश्रेणीमध्ये दीर्घकालीन तफावत असण्याचे मूळ कारण आहे. ही वस्तुस्थिती आमच्या एका ‘कॅटलिस्ट २०१३ सेन्सस ऑफ फॉर्चून ५००’ ह्या नवीनतम अहवालामध्ये अधोरेखित झाली आहे, ज्यात असे आढळून आले आहे की, २०१३ साली स्त्रियांना कॉर्पोरेट संचालक मंडळावरील फक्त १६.९% जागा मिळाल्या होत्या आणि १०% संस्थामध्ये एकही स्त्री त्यांच्या संचालक मंडळात नव्हती.

‘हाय पोटेन्शिअल वूमेन इन टेकनॉलॅाजी’ ह्या आमच्या भारतात केलेल्या अलिकडील अभ्यासावरून असा निष्कर्ष निघाला आहे की, गेल्या १२ वर्षात लिंगभेदावर आधारित वेतनश्रेणीमध्ये ६००० अमेरिकन डॉलर्स इतके अंतर आढळून आले आहे.

तुमच्या वैयक्तिक अनुभवानुसार, तुम्हाला काय वाटते की व्यावसायिक कारकिर्दीत येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जावे?

कारकिर्दीच्या पहिल्या दिवसापासूनच त्या परिघातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीत, जेंव्हा कधी माझ्यासमोर एखादं आव्हान होते, तेंव्हा मी आजवर जोपासलेले नातेसंबंध मला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. म्हणूनच मी स्त्रियांना असाच सल्ला देईन की त्यांनी कारकिर्दीच्या सुरवातीलाच सहकाऱ्यांशी मजबूत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत.

अजून एक महत्वाची बाब म्हणजे स्त्रियांनी नेहमीच मनातील विचारांना शब्दात व्यक्त करावे. ज्या काही गोष्टी तुम्हाला पटत नसतील त्याबद्दल चर्चा करण्यासाठी कुणीतरी सहृदय सहकारी असावेत. तुम्ही नक्कीच फक्त विश्वासातल्या लोकांसमोरच तुमचे मन मोकळे करावे, पण नेहमीच अशा सहकाऱ्यांचा गट, व्यवस्थापक, गुरु किंवा मित्र-मैत्रिणीं सोबत असावेत, जे तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीत तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मदत करतील.

तुमचे प्रेरणास्त्रोत काय आहे?

मी लगेच हार मानत नाही. ‘जर कुणीतरी एखादी गोष्ट करू शकत असेल, तर मी का नाही करू शकत?’ हा मीच मला विचारलेला प्रश्न मला नेहमी स्फूर्ती देत राहतो. मी फार उत्सुक स्वभावाची व्यक्ती आहे, मी सतत नाविन्याचा शोध घेत राहते आणि इतर लोकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते.