इन्डो- ईस्त्रायल उपक्रम ईपीआरएस बायस्मार्टची भारतीय बाजारपेठेत मुसंडी...

0

ईपीआरएस बायस्मार्ट (ERPS Buysmart) या कंपनीचे बीज, २००५ साली ईस्त्रायलमध्ये रोवले, ते डॅन मॅटॅलोना यांनी.... आंतरराष्ट्रीय व्यवसायातील मॅटॅलोना हे एक अनुभवी व्यावसायिक.... चार दशकांहून अधिक काळ चीन, ईस्त्रायल, रोमानिया, तुर्कस्तान, नेपाळ आणि भारत या देशांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवसायातून कमावलेला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता.

पुढे २०१३ मध्ये जेंव्हा ईपीआरएस बायस्मार्टच्या भारतातील कामाची जबाबदारी हिमांशु पाटील यांनी स्विकारली, तेंव्हा हा उपक्रम इन्डो-ईस्त्रायल उपक्रम झाला. न्यू-एज ई कॉमर्स आणि पेमेंट तंत्रज्ञान व्यवसायात हिमांशू यांना अठरा वर्षांहून जास्त काळ कामाचा अनुभव होता.

ईपीआरएस बायस्मार्टमध्ये येण्यापूर्वी हिमांशु हे निरनिराळ्या न्यू-एज ई-कॉमर्स उपक्रमांमध्ये सहभागी होते आणि त्याचबरोबर ई-कॉमर्स, ई-ट्रॅव्हल, ई-पेमेंटस् आणि इतर व्यवसायांमध्ये त्यांनी काम केले होते.

ईपीआरएस बायस्मार्ट हे एक असे खास व्यासपीठ आहे, जेथे अनेक पुरवठादारांकडून विविध सेवा एकत्रित करण्यात येतात आणि प्रीपेड मॉडेलच्या माध्यमातून त्या त्यांच्या वितरकांपर्यंत वितरीत केल्या जातात. यामध्ये रिचार्ज, पैशाचे हस्तांतरण, बिल अर्थात देयक भरणा, प्रवास, विमा आणि आर्थिक सेवा, इत्यादींचा समावेश आहे.

रिटेलर्स अर्थात किरकोळ विक्रेत्यांकरता पैसे एकत्र करण्याचे आणि वितरणाचे व्यासपीठ म्हणून ईपीआरएस बायस्मार्ट काम करते. या तंत्रज्ञानामुळे किरकोळ विक्रेत्याला एकच युजर वॉलेटचा वापर करुन अनेक उत्पादनांची विक्री करता येते. बॅंकांचा वापर न करणाऱ्या लोकांना पैसे हस्तांतरण, खाते उघडणे, पैसे वाटप आणि लास्ट माईल बॅंकींगसाठी मदत करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

डिश टीव्ही, बिग टीव्ही, बीएसएनएल, आयडीया सेल्युलर, एमटीएस, टाटा इंडीकॉम, व्होडाफोन, आयसीआयसीआय बॅंक, आरबीएल बॅंक, व्हिडीयोकॉन, युनिनॉर, एअरसेल आणि इतर बऱ्याच सेवा पुरवठादारांबरोबर कंपनीची भागीदारी आहे.

डीटीएच, मोबिलिटी आणि इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) साठी रिचार्जची सेवा, दूरसंचार आणि आयएसपी मोबिलिटीसाठी बिल अर्थात देयक भरणे, त्याचबरोबर पैसे हस्तांतरण, खाते उघडणे, कर्ज, पैसे गोळा करणे आणि पैशाचे वाटप यांसारख्या आर्थिक सेवा त्यांच्या रिटेल काऊंटर्सवर उपलब्ध आहेत.

“ आघाडीच्या बॅंकांसाठी आम्ही व्यवसाय प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्या नात्याने आम्ही बॅंकांचा वापर न करणाऱ्या लोकांपर्यंत पोहचतो आणि त्यांच्या वतीने पैसे हस्तांतरण, खाते उघडणे, पैशाचे वाटप, आणि लास्ट माईल बॅंकींग करतो. त्याचबरोबर आमच्या रिटेल लोकेशनवर आम्ही बॅंकांसाठी पैसे गोळा करणे आणि वाटपाचे कामही करतो,” हिमांशु सांगतात.

त्यांच्या प्रिपेड डिजिटल सेवेच्या माध्यमातून कंपनीने, टाटास्काय, व्हिडीयोकॉन डी2एच, सन टीव्ही आणि इतर सेवा पुरवठदारांना, भारतभर नेक्स्ट जनरेशन डिजिटल वितरण व्यवस्था उभारण्यासाठी मदत केली आहे. सध्या कंपनी ३५०० पेक्षा जास्त शहरांमध्ये कार्यरत आहे आणि भारतातील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये कंपनीचे अस्तित्व आहे. त्यांची १२५ जणांची टीम आहे.

“ भारतभर किरकोळ विक्रेत्यांचे एक मजबूत नेटवर्क उभारण्यावर सध्या आम्ही पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी आम्ही त्यांना व्यावसायिक संधी देऊ करत आहोत आणि या माध्यमातून न्यू जनरेशन वितरण सेवा अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दशकभराच्या काळात ईपीआरएस भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचली आहे आणि आज भारतातील सर्वाधिक पसरलेली, स्वतंत्र आणि थर्ड पार्टी इलेक्ट्रॉनिक वितरण नेटवर्क बनली आहे,” हिमांशु सांगतात.

आजपर्यंत, ईपीआरएस बायस्मार्टने भारतातील  द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या प्रदेशातील ३५०० हून अधिक शहरांतील २,५०,००० किरकोळ विक्रेत्यांवर आपला प्रभाव पाडला आहे.

भारतभरातील श्रेणी २/३ शहरांमध्ये बॅंकांचा वापर न करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्याने, ईपीआरएस बायस्मार्ट प्रामुख्याने या भागात कार्यरत आहे. पूर्वेकडील मणिपूर, सिक्कीम, बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओडीसापासून ते पश्चिमेकडील गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दमण आणि दिवपर्यंत ते पोहचले आहेत. तसेच उत्तरेकडील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान मधील अनेक शहरांमध्यही त्यांचे ठळक अस्तित्व असून तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, पुड्डुचेरी, कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमधील अनेक शहरांमध्ये ते व्यापक सेवा देत आहेत.

रिटेल डिस्ट्रिब्युशनच्या माध्यमातून असलेली उत्पादन संख्या आणि झालेले व्यवहार यांच्यामधून ईपीआरएस बायस्मार्ट आपला महसूल मिळविते. सध्या ते तीन लाखांपेक्षा अधिक व्यवहार एकाच दिवशी हाताळतात आणि पुढील आर्थिक वर्षात हा आकडा दर दिवशी चार लाख एवढा होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. कंपनी सध्या लॉजिस्टीक्स, शिक्षण आणि बॅंकींग क्षेत्रामधील ई कॉमर्स पुरवठादारांसाठी लास्ट माईल पार्टनर म्हणून काम करत आहे.

“ अधिकाधिक शहरांचा समावेश करण्यासाठी आणि केवळ अधिक शहरांपर्यंतच न पोहचता, प्रत्येक प्रदेशातील अधिकाधिक किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत,” हिमांशु सांगतात.

लेखक - अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन