दोघा नेत्रहीनांचा अनोखा प्रयत्न, अपंगांकरिता बनवली ‘डिसेबल्ड मेट्रिमोनीअल डॉट कॉम’!

0

“ एकीकडे लोक म्हणतात की प्रेम आंधळे असते, मात्र दुसरीकडे कोणीही सामान्य माणूस एखाद्या अंधव्यक्तीशी लग्न करु इच्छित नाही” हे म्हणणे आहे लुधियाना मध्ये राहणा-या अंकित कपूर यांचे. जे लहानपणापासूनच नेत्रहीन आहेत आणि आज आपला मित्र संदीप खुराणा आणि ज्योतिषी विनय खुराणा यांच्या समवेत एक मेट्रिमोनीअल (विवाहसंबंधी)संकेतस्थळ चालवतात. या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की, तेथे अपंगाना त्यांचा जीवनाचा जोडीदार निवडण्यास मदत केली जाते.

‘डिसेबल्ड मँट्रिमोनिअल डॉट कॉम’ च्या या संकेतस्थळाची सुरुवात करणा-या अंकीत कपूर यांचे मित्र संदिप अरोरा देखील नेत्रहीन आहेत. संदिप यांची दृष्टी बालपणीच एका अपघातात गेली. दोघांनीही लुधियाना येथे ब्लाइंड स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोघेही आज सरकारी नोकरी करत आहेत. हे कार्य सुरू करण्यापूर्वीच या मित्रांना ज्योतिषी विनय खुराना भेटले. त्यानंतर या तिघांनी मिळून ‘आहूती धर्मादाय संस्था’ स्थापन केली. आणि आता ते अपंगांची लग्नं, त्यांचे शिक्षण, आणि अशाच प्रकारची मदत करण्याची कामे करतात. अंकीत यांच्यामते महाविद्यालयीन दिवसातच त्यांच्या मनात समूह संपर्क माध्यमांकडे कल वाढला होता. त्यामुळे त्यांच्या ओळखी वाढू लागल्या आणि लुधियाना व्यतिरिक्त देशाच्या इतर भागातील लोक त्यांचे परिचित झाले. त्यावेळी अंकीत यांना जाणवले की, आज अपंग लोक भलेही आयएएस, पीसीए, वकील, झाले असतील मात्र लग्न जुळवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंकीत यांचे म्हणणे आहे की, “लोक यासाठी हैराण असत की, त्यांच्या मुलांची शिक्षण, नोकरी सारे झाले तरी लग्न कसे होणार?”

संकेतस्थळच का?

प्रेम, वेदना, सुख, दु:ख अशा भावना असलेल्या अंकीत यांच्यामते आजही लोकांची मानसिकता बदलत नाही. ते सांगतात की, “ मी पाहिले आहे की, लोक अपंगांच्या विवाहाचे कार्य करण्यास घाबरतात, त्याचवेळी मी हे ठरविले की हे काम मी करणारच आणि त्यासाठी मला मदत केली माझा मित्र संदीप अरोडा आणि विनय खुराणा यांनी, जे ज्योतिषी देखील आहेत.” अंकीत यांचे म्हणणे आहे की, त्यांनी हे तर नक्की केले होते की, ते अपंगाना लग्नासाठी मदत करतील पण हे कार्य कसे करायचे याचा विचार केला नव्हता. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की बाजारात विवाह करण्यासाठी संकेतस्थळे तर आहेत पण अपंगांसाठी असे कोणतेही संकेतस्थळ नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांसोबत संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी ६-७ महिन्यांपर्यंत खूप मेहनत केली. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि मे२०१४ पासून ‘डिसेब्लड मँट्रिमोनिअल डॉट कॉम’ अपंगांना त्याच्या जीवनाचा जोडीदार देण्याचे काम करत आहे.

संकेतस्थळाची वैशिष्ट्य

आज या संकेतस्थळावर आठशेपेक्षा जास्त अपंग वधु-वरांची माहिती आहे. खास गोष्ट ही आहे की, कुणीही या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करु शकतात आणि इतरांची माहिती पाहू शकतात. इतकेच नव्हेतर गरज पडल्यास ऑनलाइन चर्चा करण्याची सुविधा या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याशिवाय एकमेकांच्या पसंतीनंतर लोकांना संपर्काचा तपशिल देता येतो, आपले छायाचित्र अपलोड करता येते. असे नाही की हे संकेतस्थळ केवळ त्याच लोकांसाठी आहे ज्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे. त्यामुळेच या संकेतस्थळावर एक अर्ज दिला गेला आहे जो डाऊनलोड करून भरल्यानंतर कुणालाही तो टपालातून पाठवता येतो. त्यानंतर त्या व्यक्तीला संकेतस्थळावर असलेल्या स्थळांबाबत माहिती देतात. अंकित यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथे राहणा-या दोघांचा विवाह या संकेतस्थळामुळे झाला आहे.

गुंतवणूक मोठी समस्या आहे.

अंकीत यांचे म्हणणे आहे की, संकेतस्थळ तयार करण्यासाठी पैसा उभा करणे ही मोठी समस्या आहे. कारण तंत्रज्ञानाबाबत लोकांच्या विचारांत फारच कमी बदल पहायला मिळतो. ते सांगतात की, “ लोक अपंगांना शिक्षण शुल्क, त्यांच्या लग्नात पैसा खर्च करु शकतात, पण जेंव्हा आम्ही त्यांना हे सांगायला जातो की, आम्हाला अपंगांसाठी संकेतस्थळ निर्माण करायचे आहे, तेंव्हा कुणीच मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीत.” त्याच कारणामुळे हे संकेतस्थळ तयार करण्यास अंकीत आणि संदिप यांना आपल्या बचतीचा पैसा खर्च करावा लागला आहे. इतकेच नाहीतर ते तयार करण्याआधी त्यांनी ठरविले होते की हे संकेतस्थळ अपंगांच्या सुविधांसाठी असेल आणि त्यातून कोणताही नफा मिळवणार नाही. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि आज या संकेतस्थळावर रोज १५-२० लोक येतात. आता त्यांचा विचार टोल फ्री नंबर आणि ऍप आणण्याचा आहे. पण हे तेंव्हाच शक्य होणार आहे जेंव्हा त्यात गुंतवणूक केली जाईल.

अंकीत आणि संदीप दोघांनाही भले सरकारी नोकरी असेल पण या कामासाठी ते वेळ काढतातच. समूह संपर्क माध्यमात सक्रीय राहणा-या अंकीत यांचे म्हणणे आहे की, “ हे एक समाजकार्य आहे, आणि मी तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत नाही.” हे कार्य सुरु केल्यानंतर त्यांना अनेक नविन अनुभव देखील मिळाले. अंकीत सांगतात की, “ मी पाहिले की लोक आता निरक्षरता देखील व्यंग असल्याचे मानतात, त्यामुळेच आमच्या संकेतस्थळावर असे अनेक लोक येतात की जे असे सांगतात की, आमचा मुलगा किंवा मुलगी निरक्षर आहे, आणि त्यांच्यासाठी एखादा अपंग जोडीदार निवडण्यास मदत करा.” त्यांच्यामते समाज बदलतो आहे पण त्याचा वेग खूपच कमी आहे. आणि तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात खूप काही करता येण्यासारखे आहे. त्यामुळेच अंकीत सांगतात की, “खूपसे अपंग लोक असे आहेत जे तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकले नाहीत, त्यामुळे आता आमचा प्रयत्न अश्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचा आहे.” 

वेबसाइट :- http://disabledmatrimonial.com

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte