सर्वकार्येषु सर्वदा.. दातृत्वाचा अनोखा ...

0

अपुरी जागा, विसंवाद, प्रायव्हसीचे आकर्षण, जबाबदारी नाकारण्याची वृत्ती, पिढीतील अंतरामुळे उद्भविणारे मतभेद आदी विविध कारणांमुळे वृद्ध मातापित्यांना अथवा सासू-सासर्‍यांना एखाद्या आश्रमात ठेवण्याचा पर्याय नवी पिढी मोठ्या प्रमाणात स्वीकारताना दिसू लागली आहे.

अनेकदा याच्या अगदी उलटही घडते. मुले, जावई, सुना आणि लेकीला आई-वडिलांनी आपल्याकडेच राहावे असे वाटत असते, पण आयुष्यभर संसाराच्या खस्ता काढलेल्यांनाच उतरत्या वयात कुठेतरी निवांत जागी समवयस्कांमध्ये जाऊन राहावेसे वाटते. मुंबईच्या परिघात ठाणे-रायगड जिल्ह्यात अनेक वृद्धाश्रम असून त्यात कमाल क्षमतेने वृद्ध राहत आहेत. शिवाय यापैकी बहुतेक वृद्धाश्रमांमध्ये दाखल होऊ इच्छिणार्‍यांची प्रतीक्षायादीही मोठी आहे. खिडकाळी येथील साईधाम वृद्धाश्रम त्यापैकी एक होय.

डोंबिवली येथील गीता कुलकर्णी यांनी २५ वर्षांपूर्वी १९९० मध्ये खिडकाळी मंदिरालगतच्या गोशाळेची जागा विश्वस्तांकडून भाड्याने घेऊन अवघ्या तीन वृद्धांकरवी साईधाम वृद्धाश्रम सुरू केला. त्या एका कंपनीत नोकरी करीत होत्या. नोकरी करीत असतानाच त्यांनी निवृत्तीनंतर वृद्धांची सेवा करायचा निश्चय केला होता. त्यानुसार २८ वर्षांच्या नोकरीनंतर स्वेच्छानिवृत्ती पत्करून त्यांनी या कार्यात झोकून दिले. त्यासाठी निवृत्तीनंतर मिळालेली सारी मिळकत खर्च केली. अगदी सुरुवातीपासूनच ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वाने वृद्धाश्रम चालविण्याचा निश्चय त्यांनी केला होता. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकांहून अधिक काळाच्या वाटचालीत हे तत्त्व ‘साईधाम’ने कटाक्षाने पाळले आहे. आताही साईधाम एका व्यक्तीकडून महिना अडीच हजार रुपये शुल्क स्वीकारते. सध्याच्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत माफक आहे.

वृद्धाश्रमाचे हे शिवधनुष्य पेलण्यास गीता कुलकर्णीना त्यांचा मुलगा प्रवीण कुलकर्णीची खूप मदत झाली. इलेक्ट्रिकल डिप्लोमाधारक प्रवीणने पूर्णवेळ वृद्धाश्रमाच्या कामकाजात स्वत:ला झोकून दिले आहे. एकीकडे तरुण दाम्पत्यांना आपल्या संसारात वृद्ध-आई वडील नकोसे होत असताना प्रवीण आणि त्याची पत्नी प्रिया मात्र तब्बल ३५ आजी-आजोबांची मनोभावे देखभाल करताना दिसतात. प्रिया कुलकर्णी ‘साईधाम’चे स्वयंपाकघर सांभाळतात. ‘लग्नाआधी आम्ही तिला या कामाची कल्पना दिली होती आणि तिनेही केवळ कर्तव्य भावनेने नव्हे तर अगदी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे,’ असे गीता कुलकर्णी अभिमानाने सांगतात. अतिशय व्यस्त दिनक्रम असूनही प्रिया कुलकर्णी काही आजी-आजोबांची आवड विचारून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. कुलकर्णी कुटुंबीयांच्या या साईधाममध्ये फक्त वृद्धच नव्हे तर काही भिन्नमती व्यक्तीही आहेत. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातील व्यक्ती या आश्रमात एकत्र कुटुंब असल्यासारखे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. दरम्यान आता मंदिराची जागा ट्रस्टींच्या हवाली करून साईधाम स्वत:च्या जागेत आले. जागा खरेदी करतेवेळी पैशाची अडचण भेडसावली. त्यावेळी स्थानिक गावकरी सुखदेव पाटील कुलकर्णी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यामुळेच साईधामची वास्तू उभी राहू शकली. विशेष म्हणजे ते विश्वस्त म्हणून कायमचे साईधाम प्रकल्पाशी जोडले गेले आहेत.

‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वाने आश्रमाचा गाडा हाकताना साईधामच्या संचालकांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. जमाखर्चाची मिळवणी करणे कधीकधी जड जाते. मात्र अडीअडचणींवर आनंदाने मात करणे हा या आश्रमाचा स्वभाव आहे. अनेक वृद्ध स्वयंस्फूर्तीने आश्रमातील कामास हातभार लावतात. आश्रमाची वर्षांतून तीन वेळा सहल जाते. सगळे सण आनंदाने सामूहिकपणे साजरे केले जातात. दहीहंडी बांधून गोपाळकाला साजरा केला जातो. आश्रमात दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. पाच दिवस उत्साहाने गणपतीची सकाळ-संध्याकाळ आरती, नैवेद्य, प्रसाद, भजन-गाणी अशी सगळी धमाल असते. गेली काही वर्षे डोंबिवली परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आश्रमात येऊन येथील आजी-आजोबांसोबत चक्क ‘फ्रेंडशिप डे’ही साजरा करतात. मुंबई-ठाण्याकडे जाणारे काही प्रवासी खिडकाळी मंदिरालगत असणारा फलक पाहून वृद्धाश्रम पाहायला येतात. स्वत:हून काय हवं नको ते विचारतात. यशाशक्ती धन अथवा वस्तूरूप मदत करतात. काहीजण धान्य देतात. अशा संवेदनशील दात्यांच्या पाठिंब्यावर ही संस्था टिकून आहे. साईधाम म्हणजे जणू काही एक मध्यमवर्गीय कुटुंबच आहे. वाजवी किंमत आणि उत्तम प्रतीचे धान्य मिळावे म्हणून प्रवीण कुलकर्णी नवी मुंबईतील घाऊक बाजारातून खरेदी करतात. हल्ली अनेकांना आपल्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी सामाजिक उत्तरादायित्त्व जपावे असे वाटू लागले आहे. त्यातूनच पाटर्या आणि समारंभ टाळून अनाथालय, वृद्धाश्रम आदी ठिकाणी तेथील सदस्यांसमवेत वाढदिवस साजरे केले जातात. श्राद्ध अथवा पितृ पंधवरडयात पूर्वजांचे स्मरण करण्याची पारंपरिक पद्धत सोडून काहीजण अशा ठिकाणी येऊन तर्कसंगत कृती करू लागले आहेत. साईधामने वृद्धांशीही असे काही नवे ऋणानुबंध जोडले आहेत. चहा, नाश्ता आणि जेवणासाठी तीन हजार रुपये भरून आश्रमाचे एका दिवसाचे यजमानपद स्वीकारता येते.

प्रेरणा मिळाली सासूबाईंकडून..

गीता कुलकर्णीना वृद्धाश्रम सुरू करण्याची प्रेरणा त्यांच्या सासूबाईंकडून मिळाली. नोकरीनिमित्त त्या दिवसभर घराबाहेर असायच्या. साहजिकच सुरुवातीच्या काळात त्यांच्या सासूबाई त्यांच्याकडे नव्हत्या. पुढे विकलांग झाल्यावर त्यांची जबाबदारी कुणी घेईनासे झाले. त्याच काळात योगायोगाने त्यांच्या परिचित कुटुंबीयांच्या घरातील वृद्धांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या आणि नोकरीतून निवृत्त झाल्यावर वृद्धांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. सासूबाई अखेरची साडेचार वर्षे त्यांच्याकडेच होत्या. याच काळात त्यांनी अनेक वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. त्यांचे कामकाज पाहिले. अखेर नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर मात्र त्यांनी इतर ठिकाणी काम करण्यापेक्षा वेगळा वृद्धाश्रम सुरू करून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला. अर्थात आपण कोणत्या अग्निदिव्याला सामोरे जाणार आहोत, याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती. तरीही त्यांना आलेले अनुभव विलक्षण होते. महिन्याला ठराविक पैसे भरून आई-वडिलांप्रती आपले कर्तव्य संपले, असा विचार करणार्‍या मुलांविषयी त्यांना खेद वाटतो. वृद्धाश्रम चालविण्याचा वसा घेतल्यानंतर आपण जबाबदारी टाळण्याचा प्रश्नच येत नाही, पण ‘तुमचे आई अथवा वडील सीरिअस आहेत’ असे कळविल्यानंतरही काही वेळाने पुन्हा फोन करून ‘कितपत सीरिअस आहे?’ अशी विचारणा करणार्‍या मुलांची त्यांना कीव करावीशी वाटते. अशा परिस्थितीत स्वत: उत्तम इलेक्ट्रिशियन असूनही स्वत:च्या आयुष्याची वेगळी वाट न चोखाळता आईच्या कामातच झोकून देणार्‍या प्रवीणचा त्यांना अभिमानही वाटतो. गेल्या १५ वर्षांत कर्तव्यभावनेने प्रवीण कुलकर्णी यांनी २५ वृद्धांचे अंत्यसंस्कारही केले आहेत. काही महाभाग तर मृतदेह स्मशानात आणा आम्ही थेट तिथे येतो असेही सांगतात. शहरात असूनही जन्मदात्याच्या अंत्यविधीसाठी येण्यास असमर्थता व्यक्त करणारा मुलगाही प्रवीण कुलकर्णी यांनी पाहिला आहे. संपत्ती किंवा घर नावावर करावे म्हणून मुलाकडून, सुनेकडून होणार्‍या छळास कंटाळून नाइलाजाने वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतलेले आजी-आजोबाही साईधामने पाहिले आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांसाठी घर हाच त्यांचा श्वास असतो. घरापासून वेगळे होऊन जिवंत राहण्याची कल्पनाच त्यांना सहन होत नाही. केवळ घरात राहायला मिळावे म्हणून ते मुलाच्या, सुनेच्या सर्व अटी मान्य करतात. हवे तर घर तुमच्या नावे करून घ्या, पण मला त्यात मरेपर्यंत राहू द्या, एवढीच त्यांची मागणी असते. मात्र काही मुलांना जुन्या फर्निचरप्रमाणेच आई-वडीलही नकोसे असतात. मग काही जणांना जबरदस्तीने, फसवून आश्रमात आणून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. साईधाममघ्ये मात्र अशा प्रकारे मनाविरुद्ध कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

आश्रम हाच आधार

देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या जवानांनाही वर्षांतून काही काळ घरी जाण्यासाठी रजा मिळते. शिक्षा भोगणार्‍या कैद्यांनाही अपवादात्मक परिस्थितीत धरी जाण्याची मोकळीक दिली जाते. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनाही दिवाळीसारख्या सणानिमित्त का होईना चार दिवस आपण आपल्या घरी, मुला-नातवंडात रहावे, असे वाटत असते. स्पष्टपणे कुणी काही बोलत नसले तरी अशा दिवशी त्यांचे डोळे भरून येतात. काही जण भेटवस्तू, मिठाई पाठवितात. भेटायलाही येतात. मात्र सणासुदीनिमित्त का होईना चार दिवस आई-वडिलांना घरी घेऊन जाण्याचा समजुतदारपणा खूप कमी जण दाखवितात. अखेर आश्रमातले जीवन हाच त्यांचा आधार असतो. एवढे होऊनही ही मंडळी केवळ आपल्या नशिबालाच दोष देतात, मुलांना नाही. वृद्धाश्रम हा अपरिहार्य परिस्थितीत पत्कारावा लागणारा पर्याय आहे, याचे भान कुटुंबियांनी बाळगणे आवश्यक आहे. महिन्या-दोन महिन्यातून एकदा घरचे कुणी भेटायला आले तर त्या आजी-आजोबांना खूप बरे वाटते. त्या वयात आप्त स्वकियांचा सहवास हाच त्यांच्यासाठी फार मोठा दिलासा असतो. मुलगा, मुलगी, सून, नातवंडांच्या साध्या आठवणीनेही त्यांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटते. प्रत्यक्ष भेटणे शक्य नसले तर आठवणीने एखादा फोन केला तरीही त्यांचा तो दिवस मजेत जातो. अर्थात सगळीच मुले काही वरिष्ठांच्या भावनांचा अनादर करणारी नसतात. आपल्या जन्मदात्यांनी वृद्धाश्रमात राहणे त्यांनाही आवडत नसते. त्यासाठी त्यांच्या मनात सदैव अपराधीपणाची भावना असते. त्याचप्रमाणे निव्वळ सामाजिक उत्तरदायित्त्वाच्या भावनेने आश्रमाशी जोडल्या गेलेल्या अनेक संवेदनशील मनेही आश्रमातील ज्येष्ठांशी नवी सोयरिक निर्माण करतात. अनेकजण वाढदिवस साजरा करण्यानिमित्ताने आश्रमात येतात आणि ती वार्षिक भेट हळूहळू दर महिन्यावर येऊन ठेपते. कोणत्या दिवशी कोण येणार हेही आता आश्रमवासीयांना ठाऊक झालेले असते. सर्वसाधारणपणे रविवारी आश्रमात अशा पाहुण्यांची वर्दळ असते. गेली दोन दशके वृद्धाश्रमाचे संचालन करताना कुलकर्णी कुटुंबीयांनी संध्याछायेच्या अशा अनेक छटा अनुभवल्या आहेत.

‘साईधाम’मध्ये देणगीची सक्ती केली जात नाही. फक्त प्रवेश घेतेवेळी दहा हजार रुपये अनामत रक्कम घेतली जाते. अडीच हजार रुपये मासिक शुल्कात जेमतेम महिन्याचा खर्च भागतो. त्यामुळे आश्रमाची डागडुजी आणि विस्तारीकरणासाठी कुठून पैसा उभा करायचा, असा प्रश्न विश्वस्तांना भेडसावतो आहे. आश्रमात स्वतंत्र भोजनकक्ष उभारायचा आहे. त्याचप्रमाणे वृद्धाश्रम एकमजली करण्याचीही योजना आहे. अर्थात त्यासाठी मोठया निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे आणखी काही उपक्रम राबवता येतील तसेच आणखी काही आजी-आजोबांचीही सोय होऊ शकेल. सध्या कुलकर्णी दाम्पत्यांव्यतिरिक्त चार पूर्णवेळ कर्मचारी आश्रमाच्या सेवेत आहेत.

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories