बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर भारतीय पारंपरिक उपचार पध्दतीचा रामबाण इलाज...’क्युअरजॉय’

0

सध्याच्या काळात आरोग्याच्या काही तक्रारी दूर करण्यासाठी सध्याची उपचारपद्धती कमी पडत असताना योगविद्या, निसर्गोपचार आणि आयुर्वेदासारख्या प्राचीन उपचारपद्धतींद्वारे आजच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्यासारख्या आजारांवर उपचार होऊ शकतात. हाच मुद्दा लक्षात घेऊन श्रीनिवास शर्मा आणि दीक्षांत दवे यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. या चर्चेतून क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असल्याचं त्यांना समजलं. स्टॅनफोर्ड आणि UCLA ने तर या विषयांचा एक शास्त्र म्हणून संशोधन करण्यासाठी वेगळी टीम आणि विभागच बनवले होते.


त्यातूनच या दोघांनी हे ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला. त्यानंतर या दोघांनी प्रयोग करत लोकांना या उपचारपद्धतींमध्ये रस आहे का याचा शोध घेतला आणि लोकांना याची गरज असल्याचं लक्षात आल्यानंतर क्युअरजॉय (Curejoy) ची निर्मिती केली.

क्युअरजॉयची सुरूवात ऑक्टोबर २०१३मध्ये झाली. बंगळुरू आणि सॅनफ्रान्सिस्कोमध्ये त्यांची कार्यालयं आहेत. नैसर्गिक आरोग्यासाठीची विश्वासार्ह माहिती मिळवण्याचं हे एक व्यासपीठ आहे. आरोग्याबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही नेहमीच्या प्रश्नांची माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला दिला जातो. याद्वारे आरोग्यविषयक प्रश्नांवर स्टॅनफोर्ड आणि ULCA सारख्या विद्यापीठातील तज्ज्ञांनी एकत्रित केलेली माहिती पुरवली जाते. तसंच ही माहिती सध्याच्या जागतिक प्रवाह आणि पद्धतींमध्ये समाविष्ट करुनही पुरवली जाते असं क्युअरजॉयचे सीईओ दीक्षांत सांगतात.

गेल्या दीड वर्षात दर तीन महिन्याला क्युअरजॉयची जवळपास १०० टक्के प्रगती झाल्याचा दावा संस्थापक करतात. आता दर महिन्याला त्यांच्या जवळपास ८० लाख लोक व्हिजिट्स देतात. फेसबुकवरही त्यांचे दोन कोटी सात लाख युजर्सची कम्युनिटी आहे. यामुळे फेसबुकवरील जागतिक स्तरावरच्या लोकप्रिय तीन कंपन्यांमध्ये क्युअरजॉयचा समावेश होतो. सध्या त्यांनी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्रजी भाषिक युरोपीय देशांवरच लक्ष केंद्रित केले आहे. पुढील दोन वर्षात जर्मनी, स्पेन, फ्रान्स अशा देशांमध्ये स्थानिक भाषांसह विविध भाषा वापरुन पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.


या सप्टेंबरमध्ये क्युअरजॉयने पहिल्या फेरीतच ऍक्सेल पार्टनर्सच्या नेतृत्वाखाली सात कोटी रुपये निधी जमवला आहे. या निधीसाठी सुब्रता मित्रा, लॅरी ब्रेटमॅन (फ्लायकास्ट आणि ऍडिफीचे संस्थापक) आणि वेंक कृष्णन ( न्यूवेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि सीईओ) यांचीही मदत झाली. या निधीचा वापर कंपनी त्यांच्या भारतासह इतर देशातील सेवांचा विस्तार आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी करणार आहे. त्याचबरोबर कंपनी याच्याशी संबंधित पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारातही उतरण्याच्या विचारात आहे.

सध्या जागतिक पातळीवर नैसर्गिक आणि पर्यायी आरोग्य क्षेत्रासाठी अंदाजे २०० अब्ज अमेरिकेन डॉलर खर्च होतात तर एकट्या भारतात हा खर्च साडे चार अब्ज अमेरिकन डॉलर होतो.

आरोग्याबाबत आणि त्यावरील विविध उपचारपद्धतींबाबत सध्या लोकांमध्ये ज्या वेगानं जागृती होत आहे. हे प्रमाण पारंपरीक उपचारपद्धतींपेक्षा जास्त आहे. नैसर्गिक उपचार पद्धतींचे फायदे लक्षात घेत अनेकजण आता याकडे वळू लागले आहेत. यातून यावर्षी चार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे आणि येत्या दोन वर्षांत १००-१२०कोटींपर्यंत उत्पन्न नेण्याचं ध्येय आहे, असं दीक्षांत सांगतात.

एव्हरीडे हेल्थ डॉट कॉम ही क्युअरजॉयची स्पर्धक कंपनी आहे. अनेक प्रसारमाध्यमंही नैसर्गिक आरोग्याकडे लक्ष देत आहेत. बझफीड आणि याहूपण अनेक वर्षांपासून यामध्ये आहेत.

सध्या या क्षेत्रात अटीतटीची स्पर्धा असली तरी क्युअरजॉयनं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे असं दीक्षांत यांनी सांगितलं. हे क्षेत्र प्रचंड मोठं आणि विस्तारलेलं असल्यानं कोणताही एक स्पर्धक मक्तेदारी निर्माण करू शकत नाही.पण जेव्हा नैसर्गिक आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा नि:संदिग्धपणे क्युअरजॉयची सक्षम टीम आणि दृष्टीकोन याच्या जोरावर सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो असा दावा दीक्षांत करतात.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात अवघड असते. एखाद्या गोष्टीच्या विकासासाठी आणि अगदी अस्तित्वासाठीही अनेक घटक कारणीभूत ठरतात. क्युअरजॉयलाहीअनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. ग्राहकाची गरज ओळखून आणि संपूर्ण मार्केटचा आढावा घेऊन काम करणं सोपं नव्हतं. अंतिम योग्य उत्पादनांसाठी त्यांना अनेक प्रयोग करावे लागले,धडपडावं लागलं. हा टप्पा पार केल्यानंतरही अनेक आव्हानांचा सामना आम्ही केला, पण त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो आणि भविष्यातही यशस्वी होऊ असा विश्वास दीक्षांत व्यक्त करतात.

वेबसाईट : www.curejoy.com

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद - सचिन जोशी