चाळीस वर्षांपासून बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणारे गांव, मळेगांव !

0

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये सध्या थेट सरपंचाची निवडणूक होणार असल्याने पहिल्यांदाच मोठी चुरस दिसणार आहे. यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे गावागावात सध्या पक्षीय रंगाच्या आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या गरमा गरम चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीत सोलापूरातले एक गाव असे आहे, जिथे १९७९ सालापासून निवडणूकच झालेली नाही.


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव… गेल्या ४० वर्षात एकदाही गावात निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार गावातले जेष्ठ मंडळी ठरवतात. प्रत्येक प्रभागाचा मतदारसंघाच्या आरक्षण रचनेप्रमाणे उमेदवार निश्चित होतो. ना कसली स्पर्धा..ना कुठले वाद..

या गावात १९७९ सालापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. निवडणुकीचा खर्च वाचवून बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्यावर विकासकामाचं दडपण ठेवण्याची मळेगावची प्रथा आहे.

मळेगावात निवडणुका होत नसल्याने पोलीस ठाण्यात गेल्या तीन दशकात एकही तक्रार दाखल झाली नाही. गावातली भांडण मिटवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. जी सगळ्यांना बंधनकारक असते. निवडणुका या अशांततेला कारणीभूत ठरत असल्याने या गावात आजपर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. निवडणुका जाहीर झाल्या की गावकऱ्यांची बैठक होते. प्रत्येक प्रभागातला एक उमेदवार सर्वानुमते ठरवला जातो. तोच उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतो. विरोधात कुठलाही उमेदवारी अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवसच विजयाच्या मिरवणुकीने समाप्त होतो. थेट सरपंचाची निवडणूक असल्याने सध्या राजकीय पक्षानी या निवडणुकात जास्त लक्ष देण्यास सुरूवात केली आहे मात्र गावातील लोक एकोप्याने राहून राजकारण न करता विकासाचे समाजकारण देखील करू शकतात त्यातून गावाचा खरा विकास होतो हा लोकशाहीचा वेगळा वस्तूपाठ या मळेगावाच्या नागरीकांनी घालून दिला आहे ते नक्की!